Category: स्थापत्यसूत्र

  • श्रीरामाचे ‘हजार-राम’ मंदिर आणि कथाशिल्प

    श्रीरामाचे ‘हजार-राम’ मंदिर आणि कथाशिल्प

    पम्पा नदीच्या म्हणजेच तुंगभद्रेच्या दक्षिण काठावर वसलेले एक छोटेसे गावं म्हणजे प्राचीन पम्पाक्षेत्र. सध्या आपण या गावाला हम्पी म्हणतो. कर्नाटकातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेले हम्पी, किष्किंदा क्षेत्र म्हणूनही सुपरिचित होते. इतिहास काळात विजयनगरचे साम्राज्य या क्षेत्रावर पसरलेले होते. विजयनगर साम्राज्यातील राज्यांनी त्यांचे आधिपत्य स्थापन करून या संपूर्ण नगरीची पुनर्रचना केली होती हे, सध्या इथे असणाऱ्या वास्तू अवशेषांवरून दिसते. रामायणातील वाली आणि सुग्रीव यांची किष्किंदा नगरी ही हम्पीच्या जवळच आहे. त्यामुळे रघुनंदन श्रीराम आणि रामायण काव्याशी निगडीत अनेक कथा इथल्या मंदिरांमध्ये आणि या मंदिरांवरील शिल्पांमध्ये बघायला मिळतात. आज श्रीरामनवमी, या पावन दिवसाची सुरुवात विजयनगर साम्राज्यातील एका राम मंदिराच्या, नयनरम्य स्थापत्य आणि शिल्पकलेतून करूया. 

    श्रीरामाचे ‘हजार-राम’ मंदिर 

    भगवान विष्णूचा अवतार श्रीरामचंद्र यांना समर्पित हजार-राम मंदिर म्हणजे विजयनगर स्थापत्य शैलीतील एक अप्रतिम मंदिर आहे. या मंदिरातील अभिलेखात देवरायाने या मंदिराचा निर्माण केल्याचा उल्लेख आहे. या अभिलेखात अन्नलादेवी किंवा अम्नोलादेवी या राणीने दान दिल्याचाही उल्लेख आहे. या मंदिराचे पीठ हे कृष्णदेवराय याच्या काळात म्हणजे इ.स. 1513 मध्ये निर्माण करण्यास सुरुवात केले होते हे सांगणारा अभिलेख प्राप्त झाला आहे. म्हणजेच मंदिराचा काळ इ.स. 15 वे शतक असले तरी त्याचा निर्माण आधीच सुरु झाला होता. काही टप्यांमध्ये मंदिराची बांधणी झालेली असावि असे वाटते. ‘हजार-राम’ म्हणजेच रामाच्या हजार शिल्पांचे दर्शन इथे होते. श्रीराम सोबतच या मंदिरामध्ये भगवान विष्णू आणि त्याचे दशावतार, देवी शिल्प, आणि क्वचित शैव शिल्पही बघायला मिळतात. सध्या या मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामाची मूर्ती नाही पण राम आणि रामाशी निगडीत अनेक कथाशिल्पे या मंदिराच्या स्तंभ, मंदिराची बाह्यभिंत आणि प्राकाराच्या आतील भिंतींवर बघायला मिळतात. मंदिर वास्तू साधारण 33.5 x 61 मी. भागामध्ये बांधलेली आहे. मंदिराभोवती एक कोट किंवा ज्याला आपण प्राकार म्हणतो तो बांधलेला आहे.

    या प्राकाराच्या बाह्यांगावर पाच थरांमध्ये अगदी कमी उठावाची शिल्पे बघायला मिळतात. यात सर्वांत खाली हत्ती आणि त्यावर स्वार त्यांचे माहूत आहेत. दुसऱ्या थरामध्ये घोडे आणि त्यांचे स्वार, तर तिसऱ्या थरामध्ये सैन्य दाखवले आहे सोबतच उंटाची शिल्पही दिसते. या थरामध्ये वाद्य वाजवणाऱ्या लोकांची शिल्पे आहेत. चौथ्या आणि पाचव्या थरामध्ये स्त्रिया नर्तन करताना शिल्पांकित केल्या आहेत. तसेच कृष्णलीलेतील काही प्रसंग या थरामध्ये दिसतात. 

    मंदिरात प्रवेश करताना पारंपारिक गोपुराची संरचना नाही, परंतु अर्धमंडपाप्रमाणे स्तंभ आणि द्वारातून आपण आत प्रवेश करतो. या प्रवेशद्वारावर अभिषेक लक्ष्मीचे शिल्प आहे. मकरमुखातून निघणाऱ्या वल्लीतून द्वारशाखा अलंकृत केल्या आहेत.

    मंदिर प्रांगणात प्रवेश केल्यावर आहे ते रामाचे मंदिर. राम मंदिर हे पूर्वाभिमुख असून गर्भगृह, अंतराळ, मुखमंडप, दक्षिण आणि उत्तर दिशेला दोन अर्धमंडप अशी एकूण संरचना आहे. मंदिराच्या पूर्व दिशेला महामंडप किंवा जो मुखमंडप आहे तो खास विजयनगर शैलीतील स्तंभांनी सुशोभित केलेला आहे. मंदिराच्या उत्तर दिशेला देवीचे मंदिर आहे ज्याला अम्मन मंदिर म्हणतात.

    अम्मन मंदिरावर लव-कुश यांची कथाशिल्पे आहेत. या मंदिरांसाठी ग्रानाईट हा दगड वापरला असून शिखरे विटांची आहेत. मुख्य मंदिराच्या शिखरावर द्राविड शैलीतील गोलाकार स्तूपी आहे. अम्मन मंदिराचे शिखर गजपृष्ठाकार आहे.

    या मंदिराच्या स्तंभांवर आणि बाह्यांगावर असलेली कथाशिल्पे या मंदिराला अधिकच सौंदर्य प्रदान करतात.

    कथाशिल्प

    हे मंदिर बघताना, आपण जर ती एक विशिष्ट क्रमाने ते बघत गेलो तर रघुनंदन रामाची एक संपूर्ण कथाच आपल्यासमोर उभी राहते. अनेक कथा या शिल्पांमधून दिसतात. त्या सर्वच कथा आजच संकलित करणे शक्य नसले तरी भविष्यात अजून काही कथा नक्की संकलित करेन. पण आज रामनवमीच्या निमित्ताने त्यातील मला आवडलेली काही कथाशिल्प बोधसूत्रवर संकलित करीत आहे. रामायणातील अनेक कथा आपल्याला परिचित आहेतच, पण त्या कथा या शिल्पांमधून समजून घेताना, शिल्पांच्या भाषेत बघताना आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो. या मंदिराच्या भिंतीवर आडव्या तीन भागांमध्ये ही कथा सुरु राहते. त्यापैकी भिंतीवरील खालच्या आडव्या भागात श्रीराम आणि त्यांचे राजवाड्यातील वास्तव्य दिसते आणि राजदरबारातील कथानके दिसतात. दुसऱ्या भागामध्ये वनवासातील जीवन आणि त्यातील प्रसंग दिसतात आणि तिसऱ्या वरच्या भागामध्ये वानर कथा दिसतात. या अनेक कथाशिल्पांपैकी काही निवडक कथाशिल्पांचा आढावा घेऊ.  

    पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ

    राजा दशरथ निपुत्रिक असल्याने व्यथित असतात. त्यांचे कुलाचार्य वसिष्ठ यांच्या आदेशानुसार राजा दशरथ पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचे योजतात. हे शिल्प प्रदक्षिणक्रमाने म्हणजे डावीकडून उजवीकडे पाहत गेले कि आपल्याला ही कथा समजेल. या शिल्पकथेतील पहिल्या डाव्या भागात  ऋषीशृंग एका पिठावर बसलेले आहेत. यज्ञामध्ये ते आहूत देत आहेत. त्याच्या समोर राजा दशरथ उभा आहे. यज्ञातील प्रज्वलित ज्वालांमधून अग्निदेव अवतरीत झाले आहेत आणि ते दशरथाला खिरीचे सुवर्णपात्र देत आहेत. दुसऱ्या भागात राजा दशरथ आपल्या तीनही पत्नी कौशल्य, कैकेयी आणि सुमित्रा यांना खीर आपल्या हाताने वाटून देत आहे. तिसऱ्या भागात दशरथ आपल्या चार पुत्रांसोबत म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या समवेत बसलेले दाखवले आहे. ऋषी विश्वामित्र दशरथाकडे रक्षा मागण्यासाठी आले आहेत. विश्वामित्र ऋषीच्या आज्ञेने रामाने धनुष्याची प्रत्येंचा ताणून तडका राक्षसीवर बाण मारला आहे. रामाच्या मागे लक्ष्मणही धनुष्य बाण घेऊन उभा आहे.

    रामाला वनवासाची आज्ञा

    राणी कैकेयीची दासी मंथरा उभी आहे. दुसऱ्या भागामध्ये आसनावर बसलेल्या कैकेयीला मंथरा समजावत आहे. रामाला वनवासाला पाठवून भरताचा राज्याभिषेक करावा यावर दोघी भाष्य करताना शिल्पांकित केल्या आहेत. तिसऱ्या भागामध्ये  राजा दशरथाला कैकेयी समजावत आहे. चौथ्या भागात भरत भ्रातृ वियोगाने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेऊन हात जोडून त्यांची पूजा करीत आहे. 

    श्रीराम आणि सुग्रीव भेट 

    किष्किंदा नगरीत राहणारे वाली आणि सुग्रीव हे जुळे वानर भाऊ. परंतु सत्तेच्या लालसेत वालीने सुग्रीवाला राज्यातून हद्दपार केले आणि त्याच्या पत्नीला बंधक बनवले. या कृत्यासाठी अधर्मी वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचे राज्य परत करण्याचे वचन श्रीराम सुग्रीवाला देतात. परंतु सुग्रीवाला श्रीरामाच्या शक्तीवर विश्वास बसत नाही. 

    स गृहीत्वा धनुर्घोरं शरमेकम् च मानदः । सालमुद्दिश्य चिक्षेप ज्यास्वनैः पूरयन्दिशः ||
    – रामायण, किष्किंदा काण्ड, 12.2

    सुग्रीवाच्या मनातील किंतु मिटवण्यासाठी रामाने तत्क्षणी एक बाण काढला आणि शालवृक्षाच्या दिशेने सोडला. त्या बाणाच्या वेगाच्या आवाजाने दाही दिशा दुमदुमून गेल्या. एका बाणात रामाने सात वृक्ष भेदून जमीनही भेदली होती. सुग्रीवाला रामाच्या पराक्रमाची पूर्णतः जाणीव झाली. सुग्रीव रामाला शरण जातो. सुग्रीवाला सहाय्य करण्याचे वचन राम देतात.
    दुसऱ्या भागामध्ये श्रीराम त्यांच्या बाणाने वालीला मारतात. या शिल्पामध्ये वाली रामाच्या बाणाने धारातीर्थी पडलेला आहे. त्याची पत्नी तारा हिच्या मांडीवर वालीचे डोके आहे. पती वियोगाने तारा विलाप करीत आहे. ताराच्या मागे वाली आणि ताराचा पुत्र अंगद उभा आहे.  तिसऱ्या कथाशिल्पामध्ये श्रीरामाने सुग्रीवाला त्याचे राज्य परत केले आहे सुग्रीव दोनही हात जोडून हाताची अंजली मुद्रा धारण करून रामापुढे उभा आहे.

    अशोकवाटिकेतील सीता

    रावणाने सीतेला पळवून आणल्यानंतर ती तिचे जीवन अशोक वाटिकेमध्ये व्यतीत करीत असते. श्रीराम हनुमानाला आपला दूत बनवून रावणाकडे पाठवतात तेव्हा हनुमानाला सीतेचे दर्शन होते. हनुमानाची आणि सीतेची भेट झाली आहे, हे रामाला कळावे यासाठी सीता हनुमाला तिच्या बोटातील अंगठी देते. या शिल्पात अतिशय सुंदर असा हा प्रसंग शिल्पांकित केला आहे. 

    असे अनेक प्रसंग या मंदिरावरील कथाशिल्पांच्या रूपात बघताना ते समजून घेताना, रामायणाचे अनेकदा पारायण निश्चितच होत असेल, त्याकाळातही आणि अगदी आजही. 

  • श्री क्षेत्र औंढा नागनाथ

    श्री क्षेत्र औंढा नागनाथ

    श्री क्षेत्र औंढा नागनाथ (GPS 19°32’13.5″N, 77°02’29″E) म्हणजे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शैव क्षेत्र.  गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या मराठवाड्यातील हिंगोली जिल्हात, श्री क्षेत्र औंढा येथे भव्य आणि मंत्रमुग्ध करणारे शिल्पसमृद्ध नागनाथ शिवालय आपल्याला बघायला मिळते. समुद्रसपाटीपासून साधारण 464 मीटर उंचीवर नागनाथाचे हे मंदिर आहे. औंढा हे गावं मराठवाड्यातील परभणीच्या नैऋत्येस 36 कि.मी. अंतरावर कळमनुरी या तालुक्यात स्थित आहे. परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीची उपनदी, कैदू नदीच्या काठावर औंढा हे गावं आहे जिथे हे भव्य शिवालय स्थापन केलेले आहे. 

    आजच्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाच्या निमित्ताने, श्री क्षेत्र औंढा नागनाथाचे वैभव मी बोधसूत्राच्या माध्यमातून संकलित करीत आहे. भारतात बारा ज्योतिर्लिंगे आहेत, त्यापैकी औंढा नागनाथ हे देखील एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. शिवपुराणात शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगाचा उल्लेख असणारा एक श्लोक येतो. 

    सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम्॥
    परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने॥
    वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥

    सौराष्ट्रातील सोमनाथ, श्रीशैले पर्वतावर मल्लिकार्जुन, उज्जयिनी येथील महाकालेश्वर, नर्मदेच्या तीरावरील ओंकार अमलेश्वर, परळी येथील वैजयनाथ, पुण्याजवळील भीमाशंकर, दक्षिणेत सेतुबंधाजवळ रामेश्वर, हिंगोली जिल्हातील औंढा नागनाथ, काशी विश्वेश्वर, नासिकमधील त्र्यंबकेश्वर, हिमालयातील केदारनाथ आणि औरंगाबाद वेरूळ येथील घृष्णेश्वर या बारा ज्योतिर्लिंगांचे वर्णन उपरोक्त श्लोकात आले आहे, परंतु पाठभेदांमुळे यातील काही स्थळांची निश्चिती करताना अडचणी उद्भवतात.

    दारूकावन की द्वारकावन

    ज्योतिर्लिंगांच्या वर्णनामध्ये भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेता पाठभेद झालेले दिसतात. औंढा नागनाथ मंदिराबाबत सांगायचे झाले तर गुजरात येथील पाठानुसार नागेशं द्वारकावने असा उल्लेख येतो. त्यामुळे गुजरातमधील द्वारका येथील नागेश्वर शिवालय हे ज्योतिर्लिंग मानतात. द्वारका आणि दारूका यांमध्ये जरी पाठभेद निर्माण झाला असला, तरी सामान्यतः द्वारका ही श्रीकृष्णाची नगरी म्हणून सर्वश्रुत आहे. पुराणकथांच्या आधारे हे निश्चित करता येते की, दारूका हे एका राक्षसीचे नावं होते, जिला पार्वतीच्या कृपाशीर्वादाने या वनाचे राज्ञीपद प्राप्त झाले होते. दारूका राक्षसीमुळे या वनाला दारूकावन हे नावं प्राप्त झाले. शिव पुराणातील कथेनुसार दारूका आणि तिचा पती दारूक, हे या वनात तपस्येसाठी येणाऱ्या ऋषीजनांना नेहमी त्रास देत असत. भक्तांच्या रक्षणासाठी शिव आणि शिवा म्हणजे पार्वती या स्थानी विराजमान झाले, ते हे नागेश्वर स्थान. अभ्यासकांच्या मते हे औंढा या क्षेत्री आहे.

    नागनाथ शिवालय

    पश्चिमाभिमुख शिवालय 7200 sq.feet अश्या एका विस्तीर्ण आवारात असून त्याभोवती एक मोठा कोट आहे. या तटबंदीला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. ही शिल्पसमृद्ध वास्तू माझ्यासमोर तत्कालीन संस्कृतीचे प्रतिबिंब आणि सोबत अनेक प्रश्न घेऊन उभी राहिली. भौतिक पुरावाच्या रूपाने आपल्या गत संस्कृतीचा एक धागा मला मिळाला. या घडामोडींना पुन्हा एकत्रित गुंफण्याचा माझा प्रयास सुरु आहे.

    Aundha Nagnath Temple

    मंदिराची संरचना गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप आणि तीन द्वारे अशी आहे. मंदिराच्या भोवतीने आसलेल्या तटबंदीच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारातून आपण आत प्रवेश करताना मुख्य मंदिराच्या सुमारे 60 फूट उंच भव्य वास्तूचे दर्शन प्रथम होते. मंदिराच्या समोर नदीमंडप आहे, परंतु त्याचे बांधकाम नंतरच्या काळातील असावे. मंदिरात जातानाच बाह्य भिंतीवरील शिल्पवैभव आपल्या नजर खिळवून ठेवते. मंदिरात प्रवेश केल्यावर आपण मुखमंडप, सभामंडप, अंतराळ ओलांडून गर्भगृहात प्रवेश करतो, परंतु येथील गर्भगृहाची संरचना वेगळी आहे. प्रत्यक्ष वरील गर्भगृहात विष्णूच्या केशव रूपातील मूर्तीचे दर्शन होते. नागनाथ मंदिराच्या गर्भगृहाला खाली म्हणजे तळाकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरून तळ-गाभाऱ्यात नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. याला पातळलिंग असे म्हणतात. या गाभाऱ्याची उंची अतिशय कमी आहे म्हणजे सरळ उभे राहणे अशक्य आहे. नागनाथाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात आपण येतो. असे म्हणतात मंदिराचे शिखर पूर्णतः उध्वस्त झाले होते, जे अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा बांधून या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिराचे शिखर नंतरच्या काळातील आहे. मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यात एक मठ बांधलेला आहे, जिथे काही संन्यास्यांचे वास्तव्य असते. हा मठ एका उंच चौथरावर पश्चिमबाजूपासून आग्नेय कोपऱ्यातील नागतीर्थापर्येंत बांधला आहे. आवारातच एक पायविहीर आहे त्यास ऋणमोचन तीर्थ किंवा सासू-सुनेची बारव किंवा नागतीर्थ असेही म्हणतात. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरु विसोबा खेचर यांचेही गाव असल्याने त्यांची समाधी या परिसरातच आहे. या मंदिराच्या पूर्वेला तटबंदीबाहेर एक पाण्याचे विस्तृत तळे आहे. या तळ्याला हरिहरतीर्थ या नावाने ओळखतात, कदाचित या तळ्यात विष्णूची मूर्ती सापडल्यापासून त्याला असे नामकरण झाले असावे.

    याशिवाय नागनाथ शिवालयाचे शिल्पवैभव हे खरोखरीच एक अद्वितीय सौंदर्याची साक्ष देणारे आहे. भैरव, तांडवनृत्य करणारा शिव, पार्वती आणि शिव यांचे कल्याणसुंदर शिल्प, महिषासुरमर्दिनी, अंधकासुरवध, गजासुरवध, रावणानुग्रह, पंचमुखी शिव, चामुंडा, अष्टदिक्पाल, गणेश यांशिवाय साधक, योगी यांचीही सुरेख शिल्पांकने इथे बघायला मिळतात.  या मंदिरात शिलालेख उपलब्ध न झाल्याने या मंदिराचा निश्चित काळ, दानकर्ता किंवा मंदिराच्या इतर तपशिलांचा अभाव असला तरी मंदिराची संरचना आणि याचे शिल्पवैभव या मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष देतात. जगन्नाथपुरी येथे ज्याप्रमाणे देवाची रथयात्रा असते, त्याप्रमाणे औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीला नागनाथाची यात्रा असते. सुशोभित रथातून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. ही रथयात्रा भाविकांसाठी आजही खास आकर्षण आहे, त्यामुळे महाशिवरात्रीच्या पावन पर्वात भाविकांची अलोट गर्दी येथे अनुभवता येते. 

  • मुंबईचा वारसा – व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको

    मुंबईचा वारसा – व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको

    बहरीनमधील मनामा येथे 30 जून 2018 रोजी संपन्न झालेल्या 42 व्या सत्रात, मुंबईचा सांस्कृतिक वारसा म्हणून मुंबईच्या व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. जवळजवळ 94 इमारती आणि 1500 पृष्ठसंख्या असलेले तीन भागांमधील दस्ताऐवज या सत्रात सादर केले गेले. या इमारतींच्या स्थापत्य शैलींंची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. या इमारती युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित झाल्या आहेत. त्यानिमित्ताने व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको यांच्या संबधित माहिती जाणून घेऊया. 2004 मध्ये मुंबमधील व्हिक्टोरिया टर्मिनस या नावाने परिचित असलेले, सध्याचे छत्रपति शिवाजी टर्मिनस हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नोंदवले गेले होते. हे व्हिक्टोरियन इटालीयन गॉथिक रीव्हायवल स्थापत्याचा प्रभाव असलेले एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. इ.स. 19 व्या शतकातील रेल्वेस्थानक स्थापत्यामधील ही ब्रिटीशकालीन वास्तू एक आधुनिक आणि कलात्मक संरचना यांचे प्रतिक आहे. अश्याच अनेक इमारती मुंबईच्या सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवणाऱ्या आहेत.

    मुंबई हे सात बेटाच्या शहर, एक प्राचीन व्यापारी केंद्र तर होतेच आणि आजही ते आहे. त्यामुळेच इथल्या स्थापत्यावरून सांस्कृतिक समन्वयाची कल्पना येते. व्हिक्टोरिया शैली, गॉथिक आणि डेको या तीनही शैलींचा मिलाफ महाराष्ट्रातील मुंबईच्या कुशीत आजही श्वास घेताना दिसतो तो या इमारतींच्या रूपात. सध्या समावेश झालेल्या व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेकोतील इमारती यांची काही वैशिष्ट्ये आहेत. साधारण  १९ व्या आणि २० व्या शतकातील या इमारती मूर्त रूपाला आल्या आणि आजही त्या माणसांच्या रेलचेलीने गजबजलेल्या आहेत. या इमारती त्यांचा जिवंतपणा आजही टिकवून आहेत. मुंबई शहर आणि महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बाब म्हणता येईल. पण तरी जागतिक वारसा म्हणजे नेमके काय? व्हिक्टोरिया गॉथिक म्हणजे काय ? आर्ट डेको काय असते? असे काही प्रश्न आपल्या मनात अनुत्तरीत राहतातच. त्यामुळे या सर्व प्रश्नांचे टप्याटप्याने निरसन करते.

    जागतिक वारसा म्हणजे काय?

    सर्वप्रथम जागतिक वारसा म्हणजे काय हे जाणून घेऊया. युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील एखादे स्थान, ज्याला सांस्कृतिक व भौगोलिकदृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे, त्याला जागतिक वारसा असे म्हणतात. युनेस्कोने या जागतिक वारश्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे जतन, संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी 1972 मध्ये जागतिक वारसा अधिनियम (1972 World Heritage Convention) प्रसारित केला. हा अधिनियम विशेषतः जागतिक वारश्याचे संरक्षण आणि त्याची वैविध्यता टिकवण्यासाठी करण्यात आला आहे. या नियमातील सांस्कृतिक वारसा याच्या अंतर्गत मुंबईमधील व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको यांचा समावेश करण्यात आला आहे.

    सांस्कृतिक वारसा म्हणजे काय?

    वारसा स्थळे ही त्या विशिष्ट प्रांताच्या, देशाच्या, प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करीत असतात. त्यामुळे हा वारसा त्या स्थानाचे महत्त्व तर दर्शवतोच परंतु याशिवाय तिथे राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या जीवनमानाचा एक अविभाज्य भाग असतो. तिथे नांदणाऱ्या संस्कृती, परंपरा या वारसा रूपात त्यांच्या पाऊलखुणा स्पष्ट दाखवतात. या सांस्कृतिक वारश्यामध्ये स्मारके, इमारतींचे समूह आणि साईट येतात.  
    मुंबईमधील सांस्कृतिक वारसा म्हणून व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे तो इथल्या इमारती आणि त्यांचे समूह यांमुळे. याचे कारण असे आहे की, या इमारतींची स्थापत्यशैली, त्यांच्या एकजिनसीपणा किंवा त्या इमारतींच्या बाजूचा परिसर हा इतिहास, कला आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान दृष्टिकोनातून सार्वत्रिक मौल्यवान आहे. हा सांस्कृतिक वारसा जगासमोर येणे आणि तो जपणे महत्त्वाचे असल्याने व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेकोच्या नामांकनाला जागतिक वारसा म्हणून स्विकृती मिळाली आहे.

    बॉम्बे गॉथिक म्हणजे काय?

    इ.स. 18 व्या आणि 1 9 व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईमध्ये व्हिक्टोरिया गॉथिक शैली प्रथम आली ती ब्रिटिश राज्यात. ब्रिटीश शैलीची ही वास्तुकला भारतमध्ये बहरायला लागली. वास्तूनिर्मितीचे सुरुवातीचे पर्व निओ-क्लासिकल शैलीच्या नावाने ओळखले जात होते. पुढे या शैलीत सुधारणा होऊन एक नवीन शैली निर्माण झाली. या वास्तूशैलीवर आधुनिक युरोपियन पद्धतीचा प्रभाव होता. त्याला गॉथिक रीव्हायवल शैली असे म्हणतात.
    क्लासिकल शैली पेक्षा ही भिन्न असण्याचे कारण हे होते की, गॉथिक शैली ही निओ-क्लासिकल शैलीच्या तुलनेने अधिक अर्थपूर्ण, कोरीव काम असलेली, कथा घटकांसह सुशोभित असलेली आणि सुंदर अश्या खिडक्या असलेली अशी होती. भारतीय आणि ब्रिटीश वास्तूविशारदांनी भारतीय वातावरणाशी जुळवून घेणारी आणि इथला स्थानिक समाज संरचना आणि संवेदना लक्षात घेऊन वास्तुनिर्मिती केली, त्यामुळे या गॉथिक आणि समकालीन शैलीचे मिश्रणातून निर्माण झालेल्या नवीन शैलीला बॉम्बे गॉथिक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याच इमारती म्हणजे  युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या समवेश केलेल्या मुंबईच्या व्हिक्टोरिया गॉथिक इमारती.

    मुंबईतील  व्हिक्टोरिया गॉथिक इमारती कोणत्या?

    व्हिक्टोरिया गॉथिक इमारतींमध्ये उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, राजाभाई क्लाॅक टॉवर, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिस्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, ओव्हल मैदान यांसारख्या अनेक वास्तूंचा समावेश केला आहे.

    आर्ट डेको म्हणजे काय?

    Art Nouveau ही स्थापत्यामधील अलंकारिक (ornamental) शैली मागे पडली, तेव्हा 1910 मध्ये डेकोचा प्रारंभ झाला असे म्हणता येईल. आर्ट डेको शैलीमध्ये स्थापत्यविशारद यांनी अनेकविध स्त्रोतांतून प्रेरणा घेतली. मुंबईमधील डेको या अतिशय वैविध्यपूर्ण शैली दाखवणाऱ्या इमारती असल्याने त्यांचे वारसा म्हणून स्वतंत्र असे एक अस्तित्व आणि महत्त्व आहे. इस्लामिक आणि हिंदू स्थापत्यशास्त्रातील शैलीचे मिश्रण या आर्ट डेको मध्ये आपल्याला बघयला मिळते. या शैलीला डेको सारसिनीक (Deco-Saracenic) असे म्हणतात. उठावदार रंगीत इमारती ज्या त्यांच्या रंगांमुळे, त्यांच्या वैशिट्यपूर्ण आकारामुळे आपले लक्ष वेधून घेतात, त्या आर्ट डेको इमारती मुंबईचा सांकृतिक वारसा आहेत.

    मुंबईतील आर्ट डेको इमारती कोणत्या?

    क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्लमेन्सनची पहिली रांग, दिनशॉ वाछा रोडवरील राम महल, इरॉस व रिगल सिनेमा हॉल तसेच मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती यासारख्या वास्तूंचा समावेश यात करण्यात आला आहे. आर्ट डेको मुंबई ट्रस्ट यांच्या अधिकृत संकेतस्थळी या विषयी आपण अधिक माहिती वाचू शकता.

    भारतमध्ये विविध कालखंडात निर्माण झालेल्या या संमिश्र वास्तूशैली तत्कालीन भारतीय इतिहास, कला, तंत्रज्ञान यांची साक्ष देणाऱ्या आहेत. जागतिक वारसा यादीत मुंबईचा वारसा म्हणून या इमारतींचा समावेश होणे हे मुंबईच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतिक आज जगासमोर येत आहे. युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणाऱ्या स्थळांना त्यांच्या संरक्षांसाठी, संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देते. त्यामुळे भविष्यात या इमारतींचे वेगळेपण जपणे शक्य होऊ शकेल. याशिवाय जागतिक पातळीवर जेव्हा या इमारतींचे वारसा म्हणून नामांकन स्वीकारले जाते तेव्हा स्वाभाविकच मुंबईला आणि त्या अनुषंगाने देशाला पर्यटन आणि व्यापार या दोनही दृष्टीने आर्थिक फायदा होऊ शकतो.
    याविषयावर आपले विचार ऐकायला मला नक्कीच आवडतील.