Tag: #urdhvajaanu

  • औंढ्या नागनाथ मंदिरातील नटराज

    औंढ्या नागनाथ मंदिरातील नटराज

    महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण शैव क्षेत्र असलेल्या औंढ्या नागनाथ मंदिराच्या जंघाभागावरील एक नटराज प्रतिमा आज बघणार आहोत. औंढ्या नागनाथ मंदिर द्विजंघायुक्त असल्याने शिल्पवैभवाने संपन्न असे हे मंदिर आहे. या मंदिराचा अभ्यास करीत असताना याच्या जंघा भागावर एकूण चार नटराज प्रतिमा मला नोंदवता आल्या आहेत. त्यापैकी एक अत्यंत सुंदर अशी प्रतिमा आज बघणार आहोत.

    मंदिराच्या खालाच्या म्हणजे प्रथम जंघा भागात, दक्षिण दिशेकडील बाह्यांगावर असलेली ही नटेश्वराची अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिमा आहे. शिवाच्या या वैश्विक नृत्याचे दर्शन या शिल्पामधून होते. या विग्रहामध्ये नटेश्वर षोडशभुज म्हणजे सोळा हातांचा असून त्याच्या हातामध्ये अभयमुद्रा, भग्नावस्थेत असलेले त्रिशूल, शंख, एका हातातील आयुध भग्न आहे, वज्र, डमरू आणि मागच्या दोन हातांमध्ये सर्प धारण केला आहे. डाव्या हातामधील आयुधे भग्नावस्थेत असल्याने आयुधांचा आढावा घेता येत नाही, परंतु पुढचा हात हा करीहस्त मुद्रेत आहे. सर्वाभरणभूषितम् म्हणजे सर्व अलंकारांनी युक्त असे हे नटराज स्वरूप आहे. शिवाच्या डोक्यावर सुंदर जटामुकुट आहे. हा मुकुट छोट्या कवट्यांनी सुशोभित केला आहे. कानांमध्ये सर्पभूषणे आहेत. गळ्यात रत्नजडित ग्रेवेयक आहे. डाव्या खांद्यावर गोल मणी किंवा रुद्राक्षाचे यज्ञोपवीत रुळत आहे. दंडामध्ये असलेल्या मण्यांच्या केयुरामध्ये सिंहमुखाचे अलंकरण आहे. हातांमध्ये कंकण आहे. पायांमध्ये पादकटक आणि पादवलय आहेत. कटीवस्त्र हे तलम शेल्याने बांधून त्याचा सोगा हा नृत्याच्या लयीमध्ये हेलकावे खात आहे. शिवाच्या पदन्यासाचा विचार केला तर मण्डल स्थानामधील शिवाने डावा पाय कमरेपर्येंत उचलून ऊर्ध्वजानु करण साधले आहे. 

    या शिल्पामध्ये शिवाच्या या दिव्य नृत्याला संगत करण्यासाठी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूही वाद्यांचा ताल देत नृत्य करीत आहेत. विशेष म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेही मृदुंगम् हे तालवाद्य वाजवत आहेत. शिवाच्या उजव्या पायाजवळ ब्रह्मदेव तर डावीकडे विष्णू आहे. ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेही चतुर्बाहु असून त्यांच्या पुढच्या दोन हातांनी ते मुदुंग वादन करीत आहेत. मागच्या दोन हातांमध्ये ब्रह्माने स्रुक आणि पुस्तक धारण केले असून विष्णूच्या मागच्या दोन हातांमध्ये शंख आणि चक्र ही आयुधे आहेत. ब्रह्मदेवाचा उजवा पाय भग्नावस्थेत आहे. विष्णू भगवान स्वस्तिक पदन्यासात शिल्पीत केले आहेत. शिवाच्या डाव्या पायाशी त्याचे वाहन वृषभ विराजमान आहे. आपली मान उंचावून वृषभही या दिव्य नृत्याचे अवलोकन करीत आहे. 

    ज्याप्रमाणे नाट्य आणि नृत्य या कलांमध्ये शिवाचे नटराज स्वरूप पूजनीय आहे, त्याचप्रमाणे दार्शनिकदृष्ट्या शैव साधकांच्या, योगीजनांच्यादृष्टीने नटराज हे तत्त्व महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने ही नटराज प्रतिमा अलौकिक आणि महत्त्वपूर्ण आहे.

    छायाचित्र –  © धनलक्ष्मी म. टिळे

    (पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष चतुर्थी शके १९४४.)

  • मल्लिकार्जुन मंदिरावरील नटराज

    मल्लिकार्जुन मंदिरावरील नटराज

    पट्टदकल येथील मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे द्रविड शैलीतील उत्तम स्थापत्याचा अविष्कार. या मंदिराचा निर्माण हा चालुक्य राजा विक्रमादित्य द्वितीय (इ.स. 733-44 ) याची पत्नी लोकमहादेवी हीची बहिण त्रिलोकमहादेवी हिच्याकडून झाला आहे. या मंदिराच्या जंघा भागावर नटराज प्रतिमा बघायला मिळते. अतिशय रेखीव अशी प्रसन्न चर्या असलेली नटराज प्रतिमा आपल्याला मंदिराच्या बाह्यभिंतीवर एका कोनाड्यात शिल्पित केलेली दिसते. शिव त्याचा उजवा पाय उचलून उर्ध्वजानू पद्धतीने पदन्यास करीत आहे, त्याचा उजवा पाय हा अपस्मार पुरुषावर रोवलेला आहे. चतुर्भुज शिवाचे पुढचे दोन हात भग्न पावलेले आहेत. तरी शिवाचा पुढचा उजवा हात सिंहकर्ण किंवा कटकमुख मुद्रेत असावा तर डावा हात करीहस्त मुद्रेत आहे. मागच्या हातामध्ये डमरू आणि वृषभध्वज दिसतो आहे. शीर्ष जटामुकुटाने मंडित असून, त्यावर कवटीचे अलंकरण म्हणून वापर केला आहे. नर्तनातील संवेगाप्रमाणे रुळणाऱ्या जटाही शिल्पकाराने सुंदर कोरल्या आहेत. कानामध्ये सुंदर कोरीव कुंडले आहेत. गळ्यात ग्रेवेयक आहे. डाव्या खांद्यावरील यज्ञोपवीत ही नर्तन क्रियेमध्ये हलले आहे. कोरीव उदरबंध आहे. दंडामध्ये केयूर आणि हातामध्ये कंकण आहे. कटीला सुंदर असे तलम वस्त्र असून त्यावर मेखला आहे. पायामध्ये नुपूर आहेत. नटराजाच्या उजव्या पायाशी ताल वाद्य म्हणून घट आणि डाव्या पायाशी सुशीर वाद्य म्हणून बासरी वाजवणारे दोन गण आहेत. या शिल्पपटाच्या वर आकाशातून नटेशाला पुष्पमाला अर्पण करण्यासाठी येणारे दोन आकाशगामी आहेत. त्यांच्या वर दोन गन्धर्व युगल ही आकाशमार्गाने गमन करताना या शिवाच्या दिव्य नृत्याच्या अनुग्रहासाठी काही क्षण थांबले आहेत, असे हे अत्यंत सुबक आणि विलोभनीय असे शिल्प आपल्याला बघायला मिळते. 

    छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- मल्लिकार्जुन मंदिर, पट्टदकल.

    (पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल एकादशी शके १९४४.)

  • उर्ध्वजानु प्रकीर्तितम्

    उर्ध्वजानु प्रकीर्तितम्

    सौंदर्यपूर्ण शिल्पांनी वेढलेले वेरूळ येथील कैलासनाथ म्हणजे पृथ्वीवरील साक्षात कैलास. राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत घडवलेले हे शिवालय डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. नृत्यरत शिवाचे विविध पैलू दाखवणारी अनेक शिल्पे इथे आहेत. त्यातील एक म्हणजे कैलास मंदिराच्या नंदिमंडपाच्या तळमजल्यावर उत्तर दिशेला असलेले नटेश्वराचे हे शिल्प. शिल्प भग्न पावलेले असले तरी या नर्तनातील लय शिल्पामधून प्रतीत होते. आपला उजवा पाय अगदी वक्षस्थळापर्यंत वर उंचावून डाव्या पायावर शरीराचा भार सहज तोलून धरलेला आहे. भरतमुनी नाट्यशास्त्रामध्ये उर्ध्वजानु करणाचे लक्षण पुढील श्लोकातून सांगतात –

    कुञ्चितं पादमुत्क्षिप्य जानुस्तनसमं न्यसेत् |
    प्रयोगवशगौ हस्तावूर्ध्वजानु प्रकीर्तितम् ||
    कुञ्चितं पाद इतका वर उचलावा की जानु वक्षस्थळापर्यत यावा, त्यायोगे हातही उचललेले असावेत. 

    प्रस्तुत शिल्पामध्ये मण्डल स्थानाने डावा गुडघा वाकवलेला आहे. शिवाची मान या उचललेल्या गुडघ्याच्या दिशेने झुकल्याने शरीरामध्ये स्वाभाविकच भंग निर्माण झाला आहे. ही त्रिभंग अवस्था अधिक लयदार व्हावी यासाठी त्या पद्धतीचा हस्त विन्यास या शिल्पामध्ये शिल्पकारांनी साधला आहे. दशभुज नटराजाच्या पुढच्या दोन हातांपैकी उजवा हात सिंहकर्ण मुद्रेत असून डावा हात करीहस्त मुद्रेत गुडघ्यावर ठेवला आहे. उर्वरित हातांतील आयुधांचा विचार केला तर  हातामध्ये त्रिशूल, अग्नीपात्र आणि डमरू आहे. तर मागचा डावा हात डोलाहस्त असून, त्याच्या खालच्या हातामध्ये सर्प असावा. इतर हात आणि काही आयुधे भग्न झाल्याने त्यांचा वेध घेणे कठीण आहे. शिवाच्या डोक्यावर जटामुकुट असून नृत्याच्या लयीमध्ये हलणारे त्याचे कर्णकुंडलही या शिल्पांत दिसते. दंडामध्ये त्रिवलय सर्पाकृती केयूर आहे, तर हातामध्ये कंकण आहेत. या शिल्पपटामध्ये नटेशाच्या उजव्या पायाशी तालवाद्य घेतलेला एक गण आहे. डाव्या पायाशी पार्वती या दिव्य नृत्याचे अवलोकन करीत बसलेली शिल्पित केली आहे. तिच्या बसण्याची ढब बघितली तर ती राजलीलासनात बसलेली आहे. उजवा पाय गुडघ्यातून वाकवून पाय समतल पातळीवर ठेवलेला असतो. तर दुसरा डावा पाय हा मांडी घातल्याप्रमाणे मुडपलेला असतो. पार्वतीचा हात हे दिव्य नृत्य पाहून विस्मय भावाने तिच्या चेहऱ्याजवळ आला आहे. या शिल्पपटाच्या वरच्या बाजूला आकाशगामी गंधर्व, गण हे या नृत्याला वाद्यांच्या सहाय्याचे ठेका देऊन साथ करीत आहेत. संपूर्ण शिल्प हे एका कोरीव देवकोष्टामध्ये शिल्पित केले आहे. या देवकोष्टाच्या दोन्ही बाजूंना आकाशगामी गन्धर्व युगुल नटेश्वराच्या या दिव्य नर्तनाचा सोहळा अनुभवत आहेत. या नृत्यामधील आवेग हा या उर्ध्वजानु करण आणि सम्मेलीत ताल वाद्यांच्या साथीमुळे अधोरेखित होत आहे.

    छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- वेरूळ
    (पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल पंचमी शके १९४४.)