हरीहराय नमः

Home \ बोधसूत्र \ हरीहराय नमः

1882-83 साल. एक फ्रेंच अभ्यासक जो कम्बुज म्हणजे सध्याच्या कंबोडिया प्रांतामध्ये काही संशोधनार्थ गेला होता. फुनान मधील ताकेओ (Takeo) प्रांतातील नोम-दा (Phnom Da) या मंदिरातून एका देवता मूर्तीचे शीर्ष तो फ्रान्सला सोबत घेऊन गेला. फ्रान्समधील ग्युमेट (Guimet) संग्रहालयातील हे शीर्ष, 2016 साली कंबोडिया प्रांताला परत करण्यात आले. कंबोडिया सरकारने या निर्णयाचे स्वागत केले. इ.स. 7 व्या शतकातील मूर्तीचे हे शीर्ष तब्बल 135 वर्षांनी पुन्हा त्या धडाला जोडले गेले. ते शीर्ष होते हरीहाराचे. कपाळावर तिसरा अर्धनेत्र. ज्याच्या मस्तकावरील अर्धा भाग हा जटांनी विभूषित होता तर अर्धा भाग मुकुटाने.

कंबोडिया म्हणजेच प्राचीन कम्बुज देश. हा देश भारतीय संस्कृतीशी इ.स. 4 शतकापासून जोडला गेलाच आहे, पण भारतीय देवतांपैकी शिव आणि विष्णू या देवतांचे एकत्रित प्राबल्य आणि त्यांची लोकप्रियता इथेही बघायला मिळते. प्रो. मधूसुधन ढाकी यांनी अभिलेखाच्या सहाय्याने सर्वांत प्राचीन हरिहर मूर्तीचा पुरावा इ.स. 6 शतकातल्या ख्मेर आश्रम महा रोसेई इथला आहे हे मत मांडले आहे. कंबोडियातल्या प्राचीन संस्कृत शिलालेखांमध्ये शिव आणि विष्णू या दोनही देवतांसाठी शम्भू-विष्णू, शंकर-अच्युत, हर- अच्युत, परमेश्वर-सारंगी, विष्णू-ईश, हरी-शंकर आणि हरी-ईश्वर या नावांचा उल्लेख आलेला आपल्याला दिसतो.

हरिहर हे शिव आणि विष्णू या दोन स्वतंत्र सिद्धांतांवर आधारित देवतांचे एकीकरण दाखवणारे स्वरूप आहे. असे स्वरूप तत्कालीन तत्त्ववेत्यांना किंवा पुराणकारांना निर्माण का करावे लागले? याचा खुलासा ही मूर्ती अभ्यासूनच समजून घेता येईल. भारतीय परंपरेमध्ये शैव आणि वैष्णव पंथ हे पूर्वापार त्यांच्या स्वतंत्र तत्त्वज्ञानिक सिद्धांतावर चालत आले आहेत. पण या पंथामध्ये कालांतराने वाढत गेलेले मतभेद कुठेतरी थांबवणे, ही तत्कालीन समजाची गरज बनली. शिव आणि विष्णू यांचे एकमेकांत सामावणे हे त्यावेळी झालेल्या महाविलयन प्रक्रियेची साक्ष देतात. अर्धनारीश्वरच्या धर्तीवर हरिहर संकल्पना विकसित होताना दिसते. याचे पुरावे वायूपुराण, शिवपुराण यांसारख्या पुराणांच्या आधारे पडताळता येतात. वायू पुराणात शिव आणि विष्णू या दोनही देवतांचा तितीकाच सन्मान केला गेला आहे. शिवाला विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ मानले आहे तर विष्णूच्या सूक्ष्म रूपाचा सर्वत्र संचारही सांगितला आहे. विष्णूला प्रकृती स्वरूप मानले आहे. त्यामुळे हरिहर मूर्तींमध्ये शिवाच्या वाम बाजूला जी अर्धनारीश्वर मध्ये पार्वतीची बाजू आहे त्या बाजूला, विष्णू अंकित करतात.

शिवायविष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे ।
शिवस्य हृदयं विष्णुर्विष्णोश्च हृदयं शिवः॥8॥
ईशादिविंशोत्तरशतोपनिषदः (51- 60.8 )

शिव म्हणजेच विष्णूचे रूप आणि विष्णू म्हणजेच शिवाचे रूप आहे. शिव विष्णूच्या हृदयात आहे आणि विष्णू शिवाच्या.

या तत्त्वावर या हरिहर मूर्तीची संकल्पना मूर्त रूपात साकार झालेली आपल्याला दिसते.

Harihara at Badami

चालुक्य राज्यांची राजधानी असलेले बदामी इथे हरीहराची सर्वांत प्राचीन मूर्ती सापडते. बदामीच्या गुंफांमध्ये असलेल्या हरिहर मूर्तींचे अंकन दिसते. त्यातली एक मूर्ती चतुर्भुज असून शिवाच्या हातामध्ये मागे परशु आणि त्याला सर्प गुंडाळलेला आहे. पुढच्या हातामध्ये मातुलिंग आहे. विष्णूच्या मागच्या हातामध्ये शंख आणि पुढचा हात मांडीवर कटावलंबित मुद्रेत स्थिरावला आहे. शिवाला जटामुकुट आणि विष्णूला किरीटमुकुट दाखवला आहे. यज्ञोपवीत आहे. विविध आभूषणे आहेत. दुसऱ्या एका हरिहर मूर्तीमध्ये शंकराच्या बाजूस पार्वती आणि नंदी अंकित केले आहेत तर नारायणाच्या बाजूला लक्ष्मी आणि स्वस्तिक मुद्रेतील गरुड यांचे शिल्पांकन केलेले दिसते.

बेंजामिन ल्युईस राईस1  या ब्रिटीश पुरातत्त्ववेत्ता आणि इतिहासकाराने संस्कृत, तेलगु, कन्नड आणि तमिळ भाषेतील अभिलेखांवर उल्लेखनीय काम केले आहे. त्याने एका अभिलेखातील उल्लेखावरून तुंगभद्रेच्या काठावर हरिहर नावाचे एक प्राचीन शहर असल्याचे मत व्यक्त केले आहे. एका प्रचलित लोककथेनुसार हे शहर गुहासूर नावाच्या असुराच्या अधिपत्याखाली होते. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे एकट्या शिव किंवा विष्णूला त्याचे पारिपत्य करणे शक्य नव्हते. त्याच्या निर्दालनासाठी शिव आणि विष्णू यांना हरिहर रूप धारण केले आणि त्याचा विनाश केला. या असुराचे निर्दालन तुंगभद्रा आणि हरिद्रा नदीच्या संगमावर झाले. या क्षेत्राला गुह्यारण्यक क्षेत्र हे नाव प्रचलित आहे. हरिहर हे शहर तिथल्या मंदिरासाठी प्रसिद्ध ज्या मंदिराची प्रमुख देवता हरिहर ही आहे. इ.स 1224 सालच्या शिलालेखामध्ये तसा उल्लेख आढळतो, ज्यात हरीहाराची स्तुती केलेली आहे.

या मंदिराचे निर्माण कार्य आणि त्याचा जीर्णोद्धार या संबंधी विविध अभ्यासकांची वेगवेगळी मते आहेत. हेन्री कर्झीनच्या मते होयसळ राजा नरसिंह 2 याचा अधिकारी पोलवा ह्यानी ह्या मंदिराचा निर्माण केला आहे. पण अॅडम हार्डीच्या मते इ.स. 1124 मध्ये होयसळ राजा नरसिंह 2 याचा अधिकारी पोलवा यांनी या मंदिराचा निर्माण केला असावा. तेच होयसळ राजा नरसिंह 3 ह्याचा अधिकारी सोमनाथ दण्डनायक याच्या दानातून या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे असे मत डॉ. श्रीनिवास पडिगर यांनी मांडले आहे.

याशिवाय आसाम, नेपाळ, राजस्थान, कर्नाटक, महाबलीपुरम आणि इंडोनेशिया इथल्या मंदिरांतही हरिहर मूर्तीचा आढळ आहे. या सर्व विवेचनावरून निश्चितच हे लक्षात येते कि इ.स. 5-6 शतकापासून शिव आणि विष्णूच्या या  संयुक्तमूर्ती प्रचारात होत्या. काळानुरूप त्यांची लोकप्रियताही वाढलेले दिसते. हरीहाराचे हे स्वरूप पुरुष आणि प्रकृतीचे स्वरूप म्हणून समाजामध्ये सर्वश्रुत होते हे वाङ्मयीन पुराव्यावरूनही स्पष्ट होताना दिसते. एकूणच ही दोन भिन्न तत्त्वांची सामुहिक वाटचाल हरीहाराय नमः मधून उमटते.

Photo Credits : Wikimedia, BBC News

1.
Karnataka’s Rich Heritage – Art and Architecture. Google Books. https://goo.gl/p5pvaw.
ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

One thought on “हरीहराय नमः

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.