मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्रदेशा |
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा ||
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा |
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा ||
राकट, रांगडा असलेल्या, कणखर असलेल्या या महाराष्ट्र देशाची कल्पक आणि सौंदर्यदर्शक ओळख लपली आहे ती इथल्या लयन (लेणी) स्थापत्यामध्ये; आणि यातूनच साकार झालाय शिल्पातीत महाराष्ट्र. इथल्या ट्रॅप या काळ्या दगडातील शिल्पसंपदा महाराष्ट्राच्या कलात्मकतेची साक्ष पटवून देणारी आहे. इथली शिल्पं आणि त्यातून साकार होणारे विश्व यांची विलोभनीयता अतुलनीय आहे. तरी या शिल्पांतून निर्माण होणारे सौंदर्याचे चिकित्सक परीक्षण करणे आवश्यक आहे. कारण या अभ्यासात्मक दृष्टीकोनातूनच आपल्याला अनेक वेगवेगळ्या घटनांशी, तत्कालीन सामाजिक परिस्थितीशी, आणि समाजातील कलेच्या झालेल्या वाटचालीशी एकरूप होणे शक्य आहे. या कलाप्रवाहात होत गेलेले बदल, त्यातून घडलेल्या विविध शैली, नजरा खिळवून ठेवणारी कथनात्मक शिल्पे, त्यांची वैशिष्ट्ये, विविधता आणि त्यातून निर्माण झालेली रसोत्पत्ती या सर्व गोष्टी, एक कला अभ्यासक म्हणून मला महत्त्वाच्या वाटतात. त्यामुळे आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कलेच्या माध्यमातून, विशेषतः इथल्या कणखर दगडात घडलेल्या शिल्पाकृतीतून प्राचीन महाराष्ट्राचा वेध घेऊया.
महाराष्ट्रातील लयन शिल्पसंपदा
महाराष्ट्र आणि इथे बहरलेली शिल्पकला आणि त्यांच्या विविध शैलीचा विचार केला तर महाराष्ट्रात आपल्याला या शिल्पाशैलीचेही विविध टप्पे बघायला मिळतात. दगडाच्या अंतरंगातून उमटलेल्या शिल्पाकृती या वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या शैलीची एक स्वतंत्र छाप दाखवतात. लयनांमध्ये दडलेल्या या शिल्पाकृतींमध्ये भव्यता, सौष्ठवता आणि कमनीयता, भावदर्शी शिल्पपट आणि आणि त्यातून निर्माण होणारी रसोत्पत्ती, नक्षीकाम आणि अलंकरण ही वैशिष्टे आहेत. ज्यामुळे भारतीय आणि परदेशी नागरिकांची महाराष्ट्रातील लयन स्थापत्याला अधिक पसंती असते. यासाठीच महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ, घारापुरी सारखे लेणी समूह हे युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जागतिक आणि राष्ट्रीय वारसा यादीतही नोंदवले गेले आहेत.
महाराष्ट्रामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन या तीन धर्मियांची लयन परंपरा दिसते. हे स्थापत्य प्रस्तर किंवा दगडात झाल्याने अनेक वर्ष टिकून आहे त्यामुळे लयन स्थापत्य ही स्थापत्य शैलीतील प्राथमिक अवस्था म्हणून बघतात. महाराष्ट्रातील शिल्पं बघताना आपल्याला भाजे या लेणीतील शिल्पांपासून सुरुवात करावी लागते.
शुंगकालीन शिल्पसंपदा
महाराष्ट्रातील प्राचीन शिल्पावशेष म्हणायचे झाले तर प्राचीनतम शिल्पं आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील, एक महत्वाचे लेणे भाजे येथे बघायला मिळतात. भाजे इथल्या विहारात कोरलेल्या कमी उठावाचे शिल्प, शुंग कालीन शिल्पशैलीचा नमुना आहे. रथात आरूढ एक व्यक्ती शिल्पांकित केली आहे. वासुदेवशरण अग्रवाल यांच्या मते हा शिल्पपट दिव्यावदान या महायान ग्रंथात वर्णन केलेल्या विजिगीषु राजा मांधाता याच्या उत्तर कुरुतील स्वारीचे शिल्पांकन आहे. कारण अशीच एक शिल्पाकृती जी या शिल्पपटाला समकालीन म्हणता येईल अशी आहे, ती पवनी येथील उत्खननात सापडली आहे. पवनी आणि भाजे इथले हे दोन्ही शिल्पपट भारहूत येथील शुंग शिल्पशैलीशी साम्य दर्शवणारे आहेत. यातील शिल्पे ही अत्यल्प उठावातील आहेत. या शिल्पांमधील मानवी आकृती या काहीश्या चापट्या दिसतात. त्रिमितीचा अभाव इथल्या शिल्पकलेत दिसतो. स्वाभाविक आहे, शिल्पशैलीचा हा प्राथमिक टप्पा असल्याने शुंगकालीन शिल्पे बघताना त्यातील तंत्राच्या मर्यादाही जाणवतात. हा महाराष्ट्रातील शिल्पशैलीचा प्राथमिक टप्पा म्हणावा लागेल.
सातवाहनकालीन शिल्पसंपदा
भारतातील लयन स्थापत्याची परंपरा जरी मौर्य काळात सुरू झाली असली तरी तिला बहर मात्र सातवाहन काळात म्हणजे इ. स. पूर्व 1 ले शतक ते इ. स. 3 शतकात आला. भारतातील जवळजवळ 80% लेण्या या महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या गर्भात निर्माण झाल्या आहेत. सातवाहनकालीन शिल्पशैलीमध्ये शुंग शैलीपेक्षा सुबकपणा आलेला दिसतो. कलाकाराची माध्यमावर आणि ते माध्यम हाताळण्याच्या तंत्रावर आलेली पकड ही त्या शिल्पांमधून व्यक्त होताना दिसते. अनेक मानवी शिल्पे ज्यात यक्ष, द्वारपाल, स्त्री-पुरुष यांशिवाय प्राणी यांची शिल्पांकने आहेत. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील दुसरे महत्वाचे प्राचीन लेणे म्हणजे पितळखोरा.
पितळखोरा येथील यक्षमूर्ती महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतीय शिल्पकलेतील उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. सातवाहनकालीन मानवी शिल्पांमध्ये एक प्रकारचा भारदस्तपणा दिसतो. इथे जिवंत हत्तींच्या आकाराच्या हत्तींची एक रांग, त्यांच्यापुढे माहूत, विहाराच्या प्रकाराच्या व प्रवेशद्वारापाशी दोन सशस्त्र पाहरेकरी, काही जातक कथा आणि बुद्धचरित्रातील काही प्रसंग दाखवणारी शिल्पे, काही स्वतंत्र यक्ष मूर्ती कोरलेल्या होत्या असे दिसते. एवढ्या शिल्पाकृती या काळातील इतर कोणत्याही लयन समूहात आढळत नाही.
याच सातवाहन काळातील शिल्पशैलीचा परमोच्च बिंदू म्हणजे महाराष्ट्रातील कार्ले हे लेणे. कार्ले लेणीच्या दर्शनी भिंतीवर स्त्री-पुरुषांच्या जोड्या दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर हलक्या हास्यछटा उमटवण्यात कलाकाराला यश आले आहे. वस्त्रांमधील चुण्या, त्याचा तलमपणा हा दगडासारख्या कठीण माध्यमातून दाखवणे आता शक्य झाले होते. शिरोभूषणे आणि अलंकरण कल्पकतेने घडवलेले आहेत.
वाकाटककालीन शिल्पसंपदा
जसा काळ पुढे सरकतो तसे भारताचे खऱ्या अर्थाने सुवर्णयुग मानले जाणारे गुप्त घराणे पुढे येताना दिसते. पण याच काळात महाराष्ट्रातील सुवर्णयुग आपल्याला दिसते ते गुप्त घराण्याला समकालीन असलेले, महाराष्ट्रातील वाकाटक घराण्याच्या रूपाने. वाकाटक नृपती हरिषेण या काळात बहरलेले औरंगाबाद येथील अजिंठा, हे तर महाराष्ट्राचे गौरवस्थान आहे. अजिंठा हे तिथल्या चित्रशैलीसाठी प्रसिद्ध असले तरी तेथील शिल्पकलाही उल्लेखनीय आहे. मानवाकृती, पशुपक्षी, फुलापानांच्या नक्षी येथे कोरल्या आहेत. अजिंठा लेणी क्र. 10 ही कालानुक्रमाने प्राचीन आहे. या लेणीजवळ नागराज आणि नागराणी यांच्या शिल्पाकृती आहेत. अजिंठ्यातील शिल्पं त्यावर मातीचा लेप लाऊन रंगवलेली होती. कालांतराने हे रंग गेले असले तरी त्या रंगाचे काही अवशेष शिल्पांवर आजही बघायला मिळतात. इथल्या शिल्पांना कथानकांची जोड मिळाली आहे. त्यामुळे बुद्ध जीवनातील अनेक प्रसंग इथे बघायला मिळतात.
कलचुरीकालीन शिल्पसंपदा
इ.स. 9 वे शतक उजाडताना महाराष्ट्रात पुन्हा एक अप्रतिम कलाविष्कार साकार होतो आणि आपल्या पुढे साक्षात उभा राहतो तो कलचुरी घराण्याच्या काळातील घारापुरी येथील लेणी समूह. या काळातील शिल्पशैली बघताना शिल्पांमध्ये लय आणि सुडौलपणा येताना दिसतो. भाव-उत्कटता इथल्या प्रत्येक शिल्पांमधून पदोपदी जाणवते. घारापुरी येथे शिल्पकला आणि त्यासोबत शिल्पांमधून तत्त्वज्ञानाचा संचार होताना दिसतो आणि त्याच धर्तीवर घडलेली सदाशिवाची भव्य मूर्ती आपले डोळे दिपवून टाकते. शिवपार्वतीची संयुक्त प्रतिमा, अर्धनारीश्वर या शिल्पांत पुरुष आणि प्रकृती ही दोन तत्त्वे एकाच शरीरात सामावलेली दाखवताना शिवस्वरूपातील भारदस्तपणा आणि पार्वती स्वरूपातील नाजूकपणा या दोन्हींचा समतोल शिल्पकाराने साधलेला दिसतो. शिवपार्वतीच्या कल्याणसुंदर मूर्तीमध्ये विवाह प्रसंग असल्याने धार्मिक विधी, गोष्टी यांचे बारीकसारीक तपशिलासह शिल्पांकन केलेले आहे. याशिवाय अंधकासुरवध, गंगाअवतरण अशी अनेक शिल्पे उल्लेखनीय आहेत.
राष्ट्रकुटकालीन शिल्पसंपदा
कलचुरींना समकालीन असलेल्या राष्ट्रकुट राजघराण्याच्या काळात निर्माण झालेली शिल्पशैली ही देखील तितकीच विलोभनीय आहे. औरंगाबाद येथील वेरूळ म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतीय शिल्पशैलीचा एक अद्वितीय नमुना आहे. वेरूळ लेणीसमूह हा बौद्ध, जैन आणि हिंदू तीनही धर्मांना समर्पित लेणीसमूह असल्याने शिल्पातील वैविध्य इथे दिसते. विश्वकर्मा, तीन थाल, जांभाल या बौद्ध गुहा शिल्पाकृतींनी सुशोभित केलेल्या आहेत. यात बुद्धाच्या जीवनाशी निगडित कथात्मक प्रसंग असून प्रारंभी द्वारपालांच्या भव्य मूर्ती आहेत. सर्व बुद्धमूर्तींचे वस्त्र अत्यंत तलम दाखविले असून त्यातून बुद्धाचे अंगसौष्ठव उत्तम रीतीने व्यक्त होते. येथील रूपकांना जिवंतपणा आहे, त्याचप्रमाणे उठावातील या शिल्पांत त्रिमिती शिल्पांकनामुळे नजरा खिळून राहतात. याशिवाय दशावतार, रामेश्वर, धुमार, रावण की खाई इ. लेण्यांमधूनही विपुल शिल्पांकन आहे. रामेश्वर लेण्यात गंगा-यमुनाच्या सुरेख मूर्ती आढळतात. भव्यता आणि सोबतच कमनीयता हे इथल्या शिल्पांमध्ये दिसते. वेरूळ येथील जैन लयनांमध्ये तीर्थंकार, चक्रेश्वरी यक्षिणी, पार्श्वनाथ, गोमटेश्वर, अलंकारयुक्त गंधर्व-युग्म आणि नर्तक-नर्तिका यांच्या सुबक मूर्ती उत्कृष्ट कलेची साक्ष देतात. कैलास हे शिवमंदिर वेरूळच्या शिल्पकलेतील मुकुटमणी आहे. भिंतींवर त्रिपुरांतक, गरुडारूढ नारायण, अर्जुन-सुभद्रा विवाह अशांसारख्या मूर्ती आहेत. जोत्यावर रामायण, महाभारत, विष्णुपुराण यांतील शिल्पपट कोरले आहेत. इथल्या मूर्तींचे वैशिष्ट्ये हे त्यांच्या कलात्मकतेतच दडलेले आहे. प्रत्येक एक शिल्पं त्यांच्या सौंदर्याची एक वेगळीच छाप पाडत राहते.
समारोप
महाराष्ट्राची शिल्पसंपदा ही केवळ अतुलनीय आहे. शिल्पांमधील वैविध्य, त्यांचे विशिष्ट तंत्र आणि सादरीकरण या सर्व गोष्टी, थोडक्या शब्दांत मांडता येणे केवळ अशक्य काम आहे. तरीही माझ्या अल्प शब्दांत प्राचीन महाराष्ट्रातील या कलाकृतींच्या वेगवेगळ्या शैलींचा एक छोटासा आढावा घायचा, मी प्रयत्न या लेखातून केला आहे. शिल्पकला आणि त्यातून आपल्याला लाभलेला कलेचा हा सांस्कृतिक वारसा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आपली ही ओळख आपण जपूयात.
जय महाराष्ट्र..!!