Year: 2017

  • लहान मुलं आणि वारसा

    लहान मुलं आणि वारसा

    आपली संस्कृती आपला वारसा ह्या लेख मालिकेच्या पहिल्याच भागात आपण पाहिलं होतं की वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे परंपरेने चालत आलेली एखादी गोष्ट, परंपरा, वस्तू किंवा वास्तू. हा वारसा भविष्यात आपण आपल्या भावी पिढीला सुपूर्त करणार असतो. पण हा वारसा आपल्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये देताना, आपण किंवा आपल्या पूर्वजांनी इतके वर्ष हा वारसा का जपला? ह्या वारश्याचे काय महत्व आहे? हे लहान मुलांना सांगायला हवे. लहान मुले, त्यात त्यांना वारसा म्हणजे काय कळणार? मोठ्ठे झाले की करतीलच सगळं, असा विचार करणं हे त्या मुलांनाही त्यांच्या संस्कृतीपासून दूर लोटण्यासारखं आहे. जवळजवळ 6 वर्ष मी आणि माझे पती महेश, आम्ही दोघेही बालकला ह्या संस्थेमुळे 4 ते 15 वयोगटाच्या अनेक मुलांच्या संपर्कात आलो. त्यामुळे बालकलाच्या निमित्ताने ह्या लहान मुलांच्या भावविश्वाचा वेध आम्हाला जवळून घेणे शक्य झालं.

    सध्याच्या तंत्रज्ञान युगामुळे जग जवळ आले आहे. जगाची माहिती लहान मुलेही अगदी एका क्लिकवर मिळवू शकतात. त्यांच्या विश्वाचा परीघ ह्या इवल्याश्या वयातच रुंदावला आहे. त्यामुळे सध्याची भावी पिढी खरोखरच जागरूक आहे. गरज आहे ती फक्त योग्य मार्गदर्शनाची. त्यामुळे आपला वारसा हा लहान मुलांना समजावा, ह्याचा प्रयत्न ह्या जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही केला. एक जागरूक कला शिक्षक आणि भारतीय विद्या अभ्यासक ह्या नात्याने इतिहास आणि कलेच्या मदतीने मुलांमधील सृजनशिलता (Creativity) आणि कल्पनाशक्ती (Imagination) वाढवण्यासाठी History through Art असा कला पाठ (Art Lesson) तयार केला. कला शिक्षण हे सर्वांसाठी असावे ह्या विचाराने बालकला ही आमची संस्था Online आणि Offline कार्यरत असते. त्यामुळे आम्ही घेतलेला हा कला पाठ Online ही आपल्या सर्वांच्या मुलांसाठी, त्यांच्या मित्र-मैत्रिणींसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. वारसा आणि त्याबद्दलची जागरूकता मुलांच्या विकासाला पूरक असते, ते कसे ते बघूया.

    लहान मुलं आणि वारसा

    लहान मुलं ही रोज नवीन काहीतरी शिकत असतात, आत्मसात करत असतात आणि त्या गोष्टींची पुनरावृत्ती करत असतात. वयाच्या चौथ्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्येंत आपण आपल्या आयुष्यात अनेक नवीन गोष्टी शिकतो. ह्या दहा वर्षांमध्ये आपले व्यक्तिमत्व आकार घेत असते. बालकला मध्ये आम्ही ह्या दहा वर्षांना Golden Years  म्हणतो. त्यामुळे व्यक्तिमत्व विकासासाठी लागणारी चांगली मूल्य, विचार, ध्येय, दृष्टीकोन आपण मुलांना ह्या वयात देतो. मुलांच्या ह्या वयामध्ये पालकांची अतिशय महत्वाची भूमिका असते, पण त्या सोबतच शिक्षक, नातेवाईक, आजूबाजूला असलेल्या लोकांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. लहान मुलांना सोप्या, त्यांना समजेल अश्या शब्दांत, त्यांना आवडेल अश्या पद्धत्तीने, त्यांच्याशी गप्पा मारत, खेळत अनेक गोष्टी आपण सहज शिकवू शकतो. मुलांना त्यांच्या संस्कृतीची ओळख त्यांच्या लहानपणापासूनच करून द्यायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. आपण परदेशातील लोकांचे अनेक बाबतीत अनुकरण करतो. लहान मुलांना मुद्दाम संग्रहालयाला घेऊन जाणे, ऐतिहासिक वास्तू स्थळांना घेऊन जाणे, त्याबद्दल त्यांना माहिती देणे, मुलांना स्वतः माहिती काढण्यास प्रोत्साहित करणे ह्या अनुकरणीय गोष्टी आपणही करायला हरकत नाही.

    कला आणि लहान मुलं

    कला हे लहान मुलांच्या भावविश्वात डोकावायचे अतिशय प्रभावी माध्यम आहे. प्राचीन काळापासून माणूस कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत आला आहे हे आपण भिमबेटकाच्या चित्रांवरून सांगू शकतो. तसचं लहान मुलांसाठी चित्रं हे अभिव्यक्त (Express) होण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. चित्रकला त्यांचे विचार बाहेर यायला मदत करते. जेव्हा त्यांचे विचार त्यांना व्यक्त करता यायला लागतात, तेव्हाच त्यांच्या विचारांना आपण आकार देऊ शकतो. उदा.  बालकला मध्ये खूप मुलं सुरुवातीला फक्त गाडी, किंवा फुल असं एकच चित्रं सतत काढत असतात. पण ती दोन चित्र सोडूनही अजून अनेक छोटी छोटी चित्र काढता येतात. प्राथमिक आकारांमधून अजून वेगळी चित्र कशी बनतात आणि त्यातून ते स्वःत ती चित्र कशी काढू शकतात हे आम्ही त्यांना शिकवतो. थोडक्यात त्यांचे विचार पेपरवर आले की त्यांना अजून कोणत्या गोष्टी हव्या आहेत हे शिक्षक म्हणून आम्हालाही समजते.

    वारसा बाबतीतही तसेच आहे. वारसा समजून सांगताना कला खूपच महत्त्वपूर्ण भूमिका पार पडते. कलेच्या माध्यमातून तयार केलेली कलाकृती मुलांना वारश्यासोबत जोडते. ह्या लहान वयामध्ये जरी त्यांना ह्या गोष्टींचे आकलन पूर्णतः झाले नाही, तरी भावी आयुष्यात जेव्हा त्यांचा संपर्क पुन्हा इतिहास किंवा संस्कृतीशी येतो, तेव्हा त्यांना ह्या शिकलेल्या गोष्टी सहाय्यक ठरतात.

    वारसा आणि इतिहास मुलांना काय देतो
    जिज्ञासा (Curiosity)

    लहान मुले ही मुळातच जिज्ञासू असतात. क्वचित आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांच्यासाठी सगळ्याच गोष्टी नवीन असतात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची त्याची इच्छा असते. जश्या वर्तमानातल्या गोष्टींची त्यांना जिज्ञासा असते तशीच आधी घडलेल्या गोष्टींची त्यांना जाणीव करून दिली तर त्याबद्दलही जिज्ञासा त्यांना निर्माण होते. मुळात माणसालाच त्याच्या भूतकाळाची जिज्ञासा प्रचंड असते, स्वाभाविक मुलानाही ही निर्माण होऊ शकते. कारण इतिहासातील काही पुरावे मुलांच्या समोर वास्तू आणि अवशेषांच्या रूपांत आजही उभे आहेत.

    उदा. History through Art ह्या पाठामध्ये मौर्य सम्राट अशोक ह्याचे स्तंभ (Capital Pillar) अशा विषय घेतला होता. त्यामुळे इतिहासातील एक राजा, त्यांने बांधलेले एका दगडातील स्तंभ, त्यावरची कला ह्या सगळ्या गोष्टीविषयी मुलांना स्वाभाविक कुतूहल निर्माण होतचं. नवीन गोष्ट मुलांच्या विचारशक्तीला कायमच आव्हान करत असते. त्यामुळे ज्यावेळी त्यांना स्वःताचा एक स्तंभशीर्ष आणि स्तंभ तयार करायची वेळ येते तेव्हा त्यांना आधी अशोक आणि त्याच्या स्तंभांची माहिती करून घ्यावी लागते.

    कारण आणि परिणाम (Cause & Effect)

    इतिहास रूपात असलेला हा वारसा मुलांना एखादी गोष्ट घडण्यामागची पार्श्वभूमी सांगतो. शिवाय प्रत्येक गोष्ट घडल्यानंतर त्याचे काही परिणामही मुलांना समजायला वारसा मदत करू शकतो.

    उदा. मौर्य सम्राट अशोक ह्याचे स्तंभ (Capital Pillar) हे एका विशिष्ट कारणासाठी त्याने बांधले. हे इतिहास अभ्यासकांना त्यावर असलेल्या लेखांवरून समजू शकते. अशोकाचे स्तंभ हे वस्तीच्या, व्यापारी मार्गाच्या जवळ आहे, शिवाय ज्या जागी ते बांधले गेले आहेत त्या जागेलाही एक विशिष्ट महत्त्व आहे. अशोकाच्या राज्याविस्ताराची प्रचिती सर्वांना यावी आणि सोबत धर्माचा प्रसार व्हावा म्हणून ह्या स्तंभांची रचना केलेली दिसते. आणि परिणामांचा विचार इथे दोनही अर्थी करावा लागतो, एक म्हणजे कोणत्या गोष्टीचा परिणाम म्हणून त्याने हे स्तंभ उभारले आणि त्याचा पुढे भविष्यात काय परिणाम झाला. ह्या गोष्टींमुळे मुलांना कारण आणि त्याचे परिमाण समजून घेण्यसाठी मदत होते.

    कल्पनाशक्ती (Visualization)

    इतिहासात घडून गेलेल्या गोष्टींमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला प्रचंड वाव मिळू शकतो. इतिहासातील घटना त्यांना त्या वेळी असलेली स्थितीची कल्पना करण्यसाठी भाग पडतात. कल्पनाशक्ती ही सृजनात्मक विकासासाठी महत्वाची असते. कलेद्वारे इतिहासाची ओळख ही मुलांच्या विचार क्षमतेला, त्यानंतर कल्पनाशक्ती आणि शेवटी त्यातून नवीन गोष्ट निर्माण करण्याच्या शक्तीला चालना देते.

    उदा. History through Art, मौर्य सम्राट अशोक ह्याचे स्तंभ (Capital Pillar) ह्या पाठामध्ये या टप्प्यावर  मुलांना स्वतः राजा/राणी असल्याची कल्पना करून स्वतःचे स्तंभ तयार करायला सांगितले. ह्यावेळी मुलांनी त्यांच्या सगळ्यात आवडत्या गोष्टींची कल्पना करून आपली चित्रं साकारली.

    Photo Credits : Baalkala.com

    बालकलाच्या माध्यमातून मी आणि महेशनी कला, वारसा आणि लहान मुलं ह्यांना एकमेकांच्या जवळ आणण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न होता. बालकला वेबसाईट वर सहभागी मुलांच्या चित्रकृती तुम्ही बघू शकता. सोबत Baalkala YouTube channel वर असलेला History through Art ह्या पाठचा Video मुलांना दाखवून त्यांच्या कडूनही अश्या पद्धतीने इतिहासाची उजळणी करून घेऊ शकता.

     

  • आपला वारसा आपली संस्कृती (भाग 3)

    आपला वारसा आपली संस्कृती (भाग 3)

    आपला वारसा आपली संस्कृती भाग 1 मध्ये वारसा म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व आपण जाणून घेतले. आपला वारसा आपली संस्कृती भाग 2 मध्ये पुरातत्त्वीय स्थळे आणि अवशेष, लेणी आणि संग्रहालये ह्या वारसा घटकांची माहिती करून घेतली. आज तश्याच काही वेगळ्या मुद्दांवर आपण नजर टाकूया.

    ऐतिहासिक वास्तू आणि अवशेष

    ऐतिहासिक वास्तू आणि अवशेष यांचा विचार केला तर त्यामध्ये हवेली – राजवाडे, किल्ले आणि स्मारके ह्यांचा समावेश होतो. ह्या प्रत्येक वास्तुप्रकाराची स्वतःची काही स्वतंत्र वास्तूवैशिष्ट्ये असतात. तत्कालीन काळात स्थापत्याच्या ज्या शैली आत्मसाद करून ह्या वास्तू बांधल्या जातात, त्यामध्ये काळाच्या ओघामध्ये निश्चितच बदल दिसायला लागतात. ह्या वास्तूंच्या स्थापत्यावरून तत्कालीन इतिहासाची पाने पुन्हा चाळली जातात. त्यादृष्टीने वारसा म्हणून ऐतिहासिक वास्तू आणि अवशेष ह्यांचे महत्त्व अधिक आहे.

    हवेली – राजवाडे

    ह्या गृह-वास्तुप्रकाराच्या वैविध्यपूर्ण व विपूल रचना झाल्याचे आढळून येते. हवेली – राजवाडे ह्या स्थापत्याचे तीन महत्वाचे कालखंड म्हणता येतील, जे त्याच्या शैलींमधील विविधता दर्शवतात. बहुपर्णी कमानी, चबुतरे, अष्टकोनी किंवा गोलाकार स्तंभरचना, पाषाणी छज्जे, सूक्ष्म नक्षीकाम केलेल्या संगमरवरी जाळ्या, भव्य अवकाशरचना, भिंतीवरील गिलाव्यात केलेले जडावकाम, लांबट, षट्कोनी,  अष्टकोनी, गोल घुमटरचना आणि या विविध वास्तुघटक ह्यांमुळे ह्या शैलीला हिंदुस्थानी शैलीचा भव्यपणा येतो. पुढे मोगल राज्यकर्त्यांनी त्यात इस्लामी शैलीची काही वैशिष्ट्ये मिसळली. त्यातून हिंदु-मोगल अशी संमिश्र शैली रूढ झाली. त्यानंतर इंग्रज राज्यकर्त्यांनी यूरोपीय गॉथिक व प्रबोधनकालीन वास्तुशैलींत भारतात विविध ठिकाणी अश्या वास्तू बांधल्या. त्यांच्या निर्मितीतही इंग्रजांनी अनेक ठिकाणी भारतीय वास्तुशैली-वैशिष्ट्यांचा आधार घेतलेला आढळतो.

    किल्ले

    किल्ले हे शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ जावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून बांधलेला वास्तूप्रकार. ज्या काळी अनपेक्षित हल्ल्याची भीती असे, त्या काळी घरे, मंदिरे, नगरे हे तटबंदी किंवा कोट बांधून सुरक्षित ठेवण्याची प्रवृत्ती होती.  शत्रूचा हल्ला झाल्यास नागरिकांना त्वरित संरक्षण मिळावे आणि शत्रूशी मुकाबला करण्यास सोयीचे व्हावे, म्हणून बहुतेक नगरे किल्ल्याच्या आसपास किंवा अनेक वेळा किल्ल्यातच वसवली जात. किल्ल्यात पाणीपुरवठा, गुप्त खजिने, धान्यगोदामे, शास्त्रागारे, दारूची कोठारे, गुप्त मार्ग ह्यांचा विचार आणि स्थापत्यदृष्टीने त्यांची आखणी ह्या दोनही गोष्टींना अतिशय महत्त्व होते. किल्ला अभेद्य रहावा, म्हणून त्या वेळच्या युद्धपद्धतीनुसार बुरूज, दरवाजे, तटबंदी, तटबंद माची, खंदक वगैरेंची रचना केलेली दिसते.

    स्मारके

    व्यक्ती, प्रसंग किंवा घटना यांच्या स्मरणार्थ बांधलेली वास्तू म्हणजे स्मारक (Monument/Memorial). या प्रत्येक वास्तूला एक स्वतंत्र इतिहास असतो. एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्रसंगाच्या आठवणी जपण्यासाठी स्मारके महत्त्वाची असतात.

    तुम्हाला हे माहित आहे का
    • जयपूरमध्ये स्थित महाराज सवाई प्रतापसिंह ह्यांचा हवा महाल, हा राजवाडा प्रकारातील एक वास्तुप्रकार आहे. ह्या महालामध्ये एकूण 953 छोट्या खिडक्या आहेत ज्यांना झरोका म्हणतात. हे झरोके खासकरून राज घराण्यातील स्त्रियांसाठी होते. महालाबाहेरील जनजीवन त्या खिडकीमधून त्या राण्या बघू शकत होत्या.
    • महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी येथील यशवंतगड, महिपतगड, गोपाळगड, पुणे येथील संगणदुर्ग, रायगड जिल्ह्यातील मानगड, ठाण्यातील घोडबंदर गड, वाशीम येथील पोहा दरवाजा, अमरावती येथील पायरी विहीर हे सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
    • बौद्ध स्तूप हे भारतामधील सर्वांत प्राचीन स्मारके म्हणता येतील.
    • थडगी, स्तंभ, देवळे, मिनार, कमानी, स्तूप, स्तंभलेख, वीरगळ, सतीचे दगड, पुष्करिणी, हौद ही ऐतिहासिक स्थळे आणि अवशेष स्मारक वारसा म्हणून महत्त्वाचे आहेत.
    माझा वारसा माझी जबाबदारी
    • आपण हवेली- राजवाडे ह्यांचे छायाचित्रे काढून आपल्या हितचिंतकांसाठी छोटासा संदेश पाठवू शकता.
    • पुरातत्त्वशास्त्र विभाग, इतिहास तज्ञ, किल्लेप्रेमी व सामाजिक संस्था गड संवर्धन प्रयत्नांत मोलाचे काम करीत आहेत.
    • दुर्गप्रेमी गड,किल्ले परिसर स्वच्छ करणे, तिथल्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे अशी अतिशय महत्त्वपूर्ण कामे करीत आहेत. त्यामुळे अश्या ठिकाणांना भेटी देताना आपण भान ठेवून तिथे प्लास्टिक, कचरा, दारूच्या बाटल्या टाकू नये.
    • अश्या ठिकाणी तिथला जाज्वल्य इतिहास अनुभवायला जा. धूम्रपान किंवा मद्यप्राशन करू नका.

    मंदिर स्थापत्य आणि मूर्ती

    वेगवेगळ्या प्रांतांमध्ये अनेक वर्षे उभी असलेली मंदिर वास्तू सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व ठेवणारी आहे. त्यामुळे त्या जागेचे पावित्र्य ठेवणे, हे वारसा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मंदिराचे प्रकार, त्यावरील शिल्पं आपल्या इतिहासाचे साक्षी असतात. हे स्थापत्य भारतीय प्रस्तर कलेचा नमुना आहेत. आजही अनेक परदेशी पर्यटक इथली प्राचीन वास्तुकला बघण्यासाठी भारतातील अनेक मंदिरांना भेटी देतात. प्रत्येक मंदिराचा इतिहास, त्याची शैली, त्यावरील शिल्पांची जडणघडण ही अतिशय कल्पकतेने आपल्या पूर्वजांनी योजली आहेत, हे ते मंदिर बघून लक्षात येतेच.

    मंदिराच्या संदर्भात त्याचाच दुसरा भाग म्हणजे मंदिरावरचे शिल्पवैभव. मंदिरामधील मूर्ती आणि त्याच्या बाह्यभिंतींवर कोरलेले शिल्पपट हेही आपला वारसाच आहेत. कालौघात किंवा यवनी आक्रमणात मूर्ती आणि काही मंदिरांची तोडफोड झाली आहे. तरीही जे शिल्पवैभव आजही आपल्याला बघायला मिळतंय त्याचे जतन करणे आपल्या हातात आहे.

    तुम्हाला हे माहित आहे का
    • प्रत्येक मंदिराच्या काही कथा परंपरेने चालत आलेल्या असतात. मंदिर निर्मितीच्या अनेक दंतकथा आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु या मंदिरांमध्ये किंवा मंदिर परिसरात काही शिलालेख आढळतात, ज्यांच्या मदतीने त्या मंदिराच्या स्थापनेचा इतिहास बांधता येतो.
    • 1927 सालापर्येंत खिद्रापूर येथील कोप्पेश्वर हे मंदिर पूर्णपणे जमिनीखाली होते. तिथे एक चाचणी खड्डा घेतल्यानंतर तिथे मंदिर असल्याचा पुरावा मिळाला आणि आज त्या मंदिराचे शिल्पवैभव आपल्याला बघता येते.
    • मंदिरातील अनेक शिल्पांवर तेलाने अभिषेक केला जातो. अनेक वर्ष तेलाच्या अभिषेकामुळे त्या मूर्ती गुळगुळीत होतात. याशिवाय मंदिरातील मूळ मूर्ती या अनेक वर्ष पूजेत असल्याने त्यांची झीज होते. त्यामुळे त्यांची झीज किंवा डागडुजी करण्यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक प्रक्रियांचा वापर करून त्या मूर्तींचे संवर्धन केले जाते.
    माझा वारसा माझी जबाबदारी
    • आपल्या गावांत अनेक प्राचीन मंदिरे असतात. अशी मंदिरे गावाचा इतिहास सांगतात. अश्या मंदिरांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.
    • घराजवळ असलेल्या मंदिराला भेट द्या. तिथे येणाऱ्या लोकांना त्या मंदिराविषयी माहिती द्या.
    • अनेक सण आणि उत्सवाच्या दरम्यान मंदिराभोवती मांडव टाकताना त्या मंदिर स्थापत्याला किंवा त्यावरील शिल्पकामाला इजा होणार नाही याची काळजी घ्या.
    • मंदिराच्या आवारात अतिशय सुंदर अश्या जलकुंड (बाराव) असतात. त्या जर स्वच्छ ठेवल्या तर निश्चितच त्यांचे पाणी दैनंदिन कामांसाठी वापरता येईल.

    भाषा

    कोस कोस पर बदला पानी कोस कोस पर वाणी

    अशी एक कहावत म्हणजे म्हण आहे. भारतात खरोखरच तशीच परिस्थिती आहे. अनेक भाषा आणि त्या बोलण्याच्या अनेक पद्धती, ही आपली ओळख आहे. संस्कृतीचा प्रसार हा आपल्या भाषेतून होतो. आपण आपल्या विचारांची अभिव्यक्ती, ज्ञानाचे आदानप्रदान हे भाषेच्या सहाय्याने करत असतो. त्यामुळे आपल्या मातृभाषेची ओळख आपल्या असणे गरजेचे आहे. भाषेचे एक खास वैशिष्ट्य आहे. प्रांताप्रांतानुसार या भाषा, बोलण्याची शैली वेगळी होत जाते. उदा. महाराष्ट्रामध्ये बोलल्या जाणाऱ्या मराठी या भाषेमध्ये प्रांतिक विविधता आढळते. जसे पुणेरी मराठी, सातारी मराठी, कोल्हापुरी मराठी , नागपुरी मराठी, सोलापुरी मराठी. यांमध्ये स्वरांचा उच्चार आणि हेल यांच्यात बदल होत जातो. पण प्रांतांमुळे भाषेमध्ये आलेल्या या शैली, त्या भाषेची गोडी जास्त वाढवतात. त्यामुळे तो वारसा तसाच जपणे खरंतर महत्त्वाचे आहे.

    बोली भाषा ही कधीच एकसारखी नसते. तिच्यामध्ये बदल, परिवर्तन झालेले दिसतात. दुसऱ्या भाषांचे वेगवेगळे प्रभाव आणि  त्यांचे परिणाम होऊन ती भाषा काळाच्या ओघात बदलते. उदा.पर्शियन भाषेचा मराठीवर पडलेला प्रभाव. मूळ पर्शियन असलेले अनेक शब्द आजही आपल्या व्यवहारात आहेत. जादू हा पर्शियन शब्द आहे. जादुलाच मराठीमध्ये यातू, चमत्कार, चेटूक असे पर्यायी शब्द येतात. तसेच हुश्यार या पर्शियन शब्दाचे हुशार हे मराठीकरण आपल्याला माहितीच आहे. भाषातज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ यांच्या मते, भाषा हे मानवाच्या अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे, त्यामुळे आपली स्वतःची भाषा, मातृभाषा शिकण्यावर त्यांचा भर अधिक असतो.

    तुम्हाला हे माहित आहे का
    • भारतामध्ये एकूण 1673 मातृभाषा आहेत आणि त्यापैकी 850 भाषा या रोजच्या जीवनात वापरल्या जातात.
    • संस्कृत ही भारतातील सर्वांत प्राचीन भाषा आहे.
    • प्राचीन काळात संस्कृत सोबत पाली, प्राकृत, पैशाची, महाराष्ट्री, शौरसेनी अश्या विविध भाषांमध्ये साहित्य निर्मिती झालेली दिसते.
    माझा वारसा माझी जबाबदारी
    • आपली भाषा वापरात ठेवा.
    • मुलांना, इतरांना शिकवा.
    • मातृभाषेत साहित्य निर्मिती करा.
    • आपल्या भाषेतून मुलांना गोष्टी सांगा. गोष्टी हे समाजाचे सांस्कृतिक अंग दाखवणारे महत्त्वाचे माध्यम आहे. गोष्टींमधून भावी पिढीकडे संस्कृती अपोआप प्रवाहित होत असते. शिवाय मनोरंजन होते आणि ज्ञानातही भर पडते.
    • बोली भाषा संरक्षित करण्यासाठी, रेकॉर्डिंग माध्यमातून त्यांचे जतन करा.
    • आपली भाषा सोडून, नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करा. हे देखील सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्याचे एक उत्तम माध्यम आहे. कारण नवीन भाषा शिकताना नवीन संस्कृतीचा परिचय होतो आणि ती भाषा आत्मसाद करणे ही सोपे जाते.
    • भाषा हा संघर्षाचा विषय न बनू देता तो आपल्याला एकमेकांशी जोडणारा सांस्कृतिक बंध बनवण्याचा प्रयत्न करावा.

    लिपी

    Photo Credits : Metropolitan Museum of Art

    संस्कृतीचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणाऱ्या भाषांसोबतच, लिपी ह्याही वारसा म्हणून तितक्याच महत्त्वाच्या असतात. लिपी म्हणजे शब्द लेखनाची पद्धत. प्राचीन काळापासून मानवाने लिपीच्या सहाय्याने त्याचे विचार चिरकाळ प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी त्या मनुष्याच्या पश्चातही ह्या लिपींच्या आधारे मानवाचा इतिहास बांधणे शक्य झाले आहे. भारतातील सर्वांत प्राचीन लिपी म्हणायचे झाले तर  हरप्पा – मोहें-जो-दडो येथे सापडलेली चित्र लिपी ही म्हणावी लागेल. अर्थात अजून ह्या लिपीचा अर्थ समजू शकला नसला तरी त्यावर अनेक अभ्यासक अभ्यास करीत आहेत. त्यानंतर अशोकाच्या काळातील शिलालेख हे प्राचीन कोरीव लेखांचे आणि इतिहासासाठी विश्वासार्ह पुरावे म्हणून महत्त्वाचे आहेत. त्या काळात ब्राह्मी आणि खरोष्टी ह्या लिपींचा वापर झालेला दिसतो. आठव्या शतकापासून हळूहळू नागरी लिपी दिसायला सुरुवात होते. महाराष्ट्रामध्ये यादव काळापासून मोडी ह्या लिपीचा वापर सुरु झालेला दिसतो. ह्याशिवाय भारतामध्ये मैथिली, ग्रंथ लिपी, शारदा, गुरुमुखी, उडिया, देवनागरी, गुजराती, तमिळ, मल्याळी, कन्नड, उर्दू अश्या अनेक लिपी सापडतात. लिपी ही आपले विचार व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम असल्याने ती जतन आणि संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.

    तुम्हाला हे माहित आहे का
    • बौद्ध ग्रंथामध्ये 64 लिपी, तर जैन ग्रंथामध्ये 18 लिपींची यादी आली आहे.
    • मौर्य सम्राट अशोक ह्याचे शिलालेख हे भारतातील प्राचीन शिलालेख मानले जातात.
    • मूर्ती, नाणी, प्रस्तर, धातूचे पत्रे, ताडपत्र, भूर्जपत्र, वस्त्र आणि कागद ह्यांवर वेगवेगळ्या लिपींमधील लेख बघायला मिळतात.
    माझा वारसा माझी जबाबदारी
    • प्राचीन लिपींचा मुळाक्षरे, वर्णाक्षरे लिहून सराव करा.
    • कला हे लिपी संवर्धनाचे प्रभावी माध्यम बनू शकते. कलेच्या माध्यमातून म्हणजे calligraphy ह्या कला प्रकाराच्या सहाय्याने नामशेष होत असलेल्या लिपिंना पुन्हा नव्याने श्वास घेता येईल.
    • शुभेच्छा पत्रे देताना,  तुमच्या आवडीच्या लिपीचा वापर करून तुमच्या भावना व्यक्त करा. सोबत तुम्ही त्याचे भाषांतरही पाठवू शकता.

    आपला वारसा आपली संस्कृतीच्या पुढच्या भागात वारसा म्हणता येतील अश्या अजून काही वेगवेगळ्या घटकांचा विचार करू.

    (क्रमशः)

  • आपला वारसा आपली संस्कृती (भाग 2)

    आपला वारसा आपली संस्कृती (भाग 2)

    वारसा म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व आपला वारसा आपली संस्कृती या लेखाच्या कालच्या भागात बघितले. आज आपण प्रत्यक्ष वारसा आणि त्याच्याशी निगडीत इतर घटकांची माहिती बघणार आहोत. या घटकांची, स्थळांची काही परिचित- अपरिचित वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, तो वारसा जतन करण्याच्या दृष्टीने आपली कर्तव्ये आणि जबाबदारी काय आहे, हे बघणार आहोत. छोट्या-छोट्या गोष्टीही वारसा जतन करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असतात, हे आपल्याला या लेखाद्वारे समजू शकेल. 

    पुरातत्त्वीय स्थळे आणि अवशेष

    पुरातत्त्वीय स्थळे आणि अवशेष म्हणजे सर्वेक्षण, उत्खनन आणि संशोधनात सापडलेल्या वस्तू आणि वास्तू. या स्थळ-अवशेषांतून भूतकाळातील मानवी जीवनाचा अंदाज बांधता येतो. मानवाच्या भोवतालची परिस्थिती, त्यातून निर्माण होणाऱ्या त्याच्या गरजा, यांचा मानवाने मागे ठेवलेल्या पुराव्यांच्या आधारे अर्थबोध केला जातो. मानवी मन आणि संस्कृती यांचे प्रतिबिंब पुरातत्त्वीयशास्त्राच्या आधारले स्पष्ट करता येते. ही पुरातत्त्वीय उत्खनने संपुर्ण मानवजातीच्या दृष्टीने महत्वाची असतात. आपली संस्कृती, इतिहास शास्त्रीयदृष्ट्या पाहण्याची गरज असते, त्यात पुरातत्त्वशास्त्र उपयोगी ठरते. या उत्खननात मृत्पात्रे, हत्यारे, अलंकार, दफने, प्राचीन लेख, धान्य, जनावरांची हाडे, मानवाने घडवलेली विविध आकाराची भांडी, खापरे, मंदिरे, गुंफा, शिल्पे, प्रस्तरलेख, चैत्य, विहार, नगरावशेष अश्या अनेक गोष्टी मिळतात. हा प्राचीन वारसा जतन करण्याच्या दृष्टीने काही शास्त्रीय पद्धतींचाही वापर केला जातो.

    अनेक महत्त्वाच्या उत्खनन स्थळांवर स्थानिक वस्तूसंग्रहालय तयार केले जाते. त्यांना स्थळ संग्रहालय किंवा क्षेत्रीय संग्रहालय म्हणतात. या संग्रहालयामध्ये उत्खननात सापडलेल्या वस्तू किंवा काही महत्वाचे अवशेष ठेवले जातात. याशिवाय वारसा जतन करण्याच्या दृष्टीने भूदृष्य पुरातत्त्वशास्त्र (Landscape Archaeology) उपयोगी ठरते. याचा अवलंब करून पुरातन वास्तुंच्या आजूबाजूचा भौगोलिक परिसराचा विचार केला जातो.  भूदृष्य  पुरातत्त्व म्हणजे पूर्वी एखाद्या वास्तूभोवती असलेल्या जागेचा किंवा भोवतालच्या वातावरणाचा वापर, पूर्वी ज्या पद्धतीने केला गेला असेल, त्याप्रमाणे अवलंब करून ती वास्तू पुन्हा तशीच विकसित करणे, जतन करणे.   

    उदा. पुण्यामधील शनिवारवाडा या वास्तूमधील कारंजी, बगीचे यांची डागडुजी करून, त्यांची पेशवे काळात होती तशी मांडणी केली जाते. त्यामुळे पेशेवेकालीन संपन्नता, तत्कालीन स्थापत्य यांच्याशी आपल्याला एकरूप होता येते.

    तुम्हाला हे माहित आहे का
    • खजुराहो, सांची, कोणार्क, मथुरा, हम्पी, नागार्जुनकोंडा अश्या अनेक मंदिर आणि स्तूपांच्या परिसरामध्ये स्थळ संग्रहालये बघायला मिळतात.
    • भारतीय  पुरातत्त्व सर्वेक्षण ASI अंतर्गत 46 स्थळ संग्रहालय आहेत. आपण या संग्रहालयाला भेट देताना आपल्याला मोफत सेवा किंवा अल्प दर आकारला जातो.
    • अँटिक्किटीज अँड आर्ट ट्रेझरर्स अँक्ट -1972 या कायद्याप्रमाणे, कोणतीही शंभर वर्षांइतकी जुनी वस्तू पुरातत्त्वीय अवशेष मानली जाते.

    आपला वारसा समजून घेऊन जतन करणे हे जितके महत्वाचे आहे, तितके तो पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे हेही महत्वाचे आहे. त्यामुळे लहान मुलांचा सहभाग मोलाचा आहे. त्यांना अवश्य अश्या उपक्रामध्ये सहभागी करा.

    माझा वारसा माझी जबाबदारी
    • तुमच्या गावांतील स्थळ संग्रहालयांना भेटी द्या.
    • काळाच्या पोटात लपलेल्या अनेक गोष्टींची माहिती पुरातत्त्वशास्त्र आपल्याला करून देते. त्यामुळे उत्खननांत सापडलेले नगर अवशेष, वसाहती बघायला जा.
    • स्थळ संग्रहालयातील प्राचीन अवशेष आणि वस्तूंचा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करा.
    • कागद, वस्त्र, नैसर्गिक रंग, तैलचित्रे, भित्तीचित्रे, लाकूड, हाडे, हस्तीदंत हे सर्व प्रकार अति संवेदनशील प्रकारात येतात. त्यामुळे त्यांची छायाचित्रे घेताना तीव्र प्रकाश, फ्लॅश वापरणे टाळावे.
    • स्थळ संग्रहालयांसारख्या वास्तूंमध्ये सेल्फी काढू नका.
    • जागतिक वारसा दिनानिमित्त तेर, उस्मानाबाद या ठिकाणी तेरचाप्राचीन समृद्ध वारसा दाखवण्यासाठी तगर इतिहास दर्पण या नावाने प्रदर्शन भरवण्यात आले आहे. अश्या प्रदर्शनांना अवश्य भेटी दया.
    • अनेकांना जुन्या वस्तू जमा करण्याचा छंद असतो, त्यांना खाजगी संग्राहक म्हणतात. या पुरातन वस्तूंमध्ये, मूर्ती, नाणी, ताम्रपट, शस्त्रे, हस्तलिखिते, चित्रं, कलाकुसरीच्या वस्तू आणि अश्या गोष्टी ज्या वास्तूपासून विलग आहेत यांचा समावेश होतो.
    • आपल्याकडे असलेल्या अश्या पुरातन वस्तूंची अधिकृत नोंद शासकीय नोंदणी कार्यालयात करावी. या नोंदी, पुरातन वस्तूंची तस्करी अश्या अवैध गोष्टींवर आळा घालण्यासाठी आवश्यक आहेत. आपल्याकडे असलेला पुरातन वस्तूंच्या वारसा संरक्षण आणि जतन या दोनही दृष्टीने या नोंदी अतिशय महत्त्वपूर्ण असतात.

    लेणी आणि शैलगृहे

    भारताची भौगोलिक संपन्नता दाखवणारा एक घटक म्हणजे इथले पर्वत. या पर्वतश्रेणीत प्रस्तर खोदून तयार केलेली जागा म्हणजे लेणी किंवा शैलगृहे. लेणी हा शब्द संस्कृत लयन या शब्दावरून आला आहे. लयन म्हणजे गृह. या पर्वतीय खडकांमध्ये काही ठिकाणे नैसर्गिकरीत्या तयार झालेली असतात तर काही मानवाने डोंगर खोदून ती तयार केलेली असतात. लेणी हा शब्द मानवनिर्मित गुंफांसाठी वापरला जातो.  सुरुवातीच्या काळात खोदलेली लेणी ही त्या डोंगरांच्या पायथ्याशी असून ती साधी, लहान व ओबडधोबड अशी होती. नंतरच्या काळातील लेणी पर्वतश्रेणीच्या वरच्या भागांत आढळतात. अखेरच्या टप्प्यातील लेणी मात्र माथ्यावर कोरलेली आहेत असे दिसते. या लेण्यांमध्ये काही दानलेख आणि काही आश्रय दात्यांची नावे कोरलेली असतात. हे लेख प्राचीन लिपींमध्ये आहेत. त्यामुळे प्राचीन भाषा आणि लिपीच्या दृष्टीनेही लेणी हा वारसा महत्त्वाचा आहे.

    तुम्हाला हे माहित आहे का
    • भारतात खडकांतून कोरलेली सुमारे 1200 हून अधिक लेण्या आहेत. त्यांपैकी जवळजवळ 80 टक्के लेण्या महाराष्ट्रात आढळतात.
    • भारतामधील लेणी हिंदू , बौद्ध आणि जैन अशा विविध धर्मपंथीयांनी कोरलेली आहेत. त्यांत बौद्ध धर्मीयांच्या लेण्यांची संख्या सर्वाधिक आहे.
    • बिहार येथील बाराबर आणि नागार्जुन ह्या लेण्या भारतामधील सर्वांत प्राचीन लेण्या आहेत.
    • महाराष्ट्रातील भाजे ही लेणी सर्वांत प्राचीन आहे.
    • सांस्कृतिक वारसा यादृष्टीने लेणी महत्त्वाच्या ठरतात. या लेण्यांतील स्थापत्य, शिल्प व त्यांतील लेखांवरून भारताच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक परिस्थितीवर प्रकाश पडतो.
    माझा वारसा माझी जबाबदारी
    • आपल्या गावांतील किंवा आजूबाजूच्या भागांतील लेण्यांना भेट द्या.
    • लेण्यांच्या भिंतीवर सुंदर शिल्प आणि कोरीव लेख असतात. वारसा म्हणून आणि आपला इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पुरावे आहेत. त्यामुळे त्या सुस्थितीत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.
    • या लेण्यांनाही एक स्वतंत्र इतिहास असतो. अश्या ठिकाणी जाऊन मद्यपान, मांसाहार करून आजूबाजूचा परिसर अस्वच्छ होणार नाही याची खबरदारी घ्या.
    • चहाचे कप, प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, कागद यांसारख्या गोष्टी लेणी परिसरात टाकू नका.
    • निसर्गाने वेढलेल्या या लयन स्थापत्याच्या सौंदर्याचा आनंद घ्या.   

    संग्रहालये

    अतिशय दुर्मिळ आणि नाविन्यपूर्ण वस्तू आणि सामग्री या संग्रहालयामध्ये जतन केल्या जातात. वेळोवेळी या सामग्रीचे परीक्षण, संवर्धन आणि प्रदर्शन केले जाते. संशोधक, विद्यार्थी आणि सोबतच समाजामधील सर्व लोकांसाठी संग्रहालय सेवा उपलब्ध असते. ही संग्रहालये सांस्कृतिक वारसाचे अधिरक्षक व अन्वेषक असतात.

    भारतात दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालय हे सर्वांत केंद्रस्थानी मानले जाते. या संग्रहालयात 320 पाषाणशिल्पे, विविध चित्रशैलींची 8 हजार रंगीत चित्रे, 615 ब्राँझमूर्ती, 1 हजार वस्त्रे, 4200 फार्सी व अरबी हस्तलिखिते, 2500  संस्कृत, प्राकृत, पाली हस्तलिखिते, 10 हजार नाणी आणि जवाहिरांचा एक संग्रह आहे. यांशिवाय शस्त्रास्त्रे, हस्तिदंती व काष्ठशिल्पे आणि असंख्य मृत्पात्रे असून त्यात दरवर्षी दुर्मिळ वस्तूंची भर पडत आहे. आज तेथे विविध प्रकारच्या कलावस्तू , सर्व प्रकारची शिल्पे व अन्य सामग्री अशी दोन लाखांहून अधिक साहित्य-सामग्री आहे.

    तुम्हाला हे माहित आहे का
    • शासकीय आणि अशासकीय संग्रहालया व्यतिरिक्त भारतामध्ये अनेक वैशिष्टपूर्ण  संग्रहालये आहेत.
    • अहमदाबाद मध्ये दोन अतिशय सुंदर आणि नाविन्यपूर्ण संग्रहालये आहेत. एक म्हणजे वेचार युटेन्सिल्स  म्यूझीयम हे भांड्यांचे आणि काइट म्यूझीयम हे पतंगांचे संग्रहालय आहे.
    • कलकत्ता येथे गॅलरी ऑफ म्यूझिकल इन्स्ट्रूमेंट्स ह्या संग्रहालयात संगीत साधने बघायला मिळतात.
    • दिल्ली मधील नॅशनल पोलीस म्यूझीयम ह्या संग्रहालयात पोलिसांनी प्रदर्शित केलेल्या गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे बघायला मिळतात.
    • ज्यूट म्यूझीयम, वेस्ट बेंगॉल फॉरेस्ट म्यूझीयम, एअर फोर्स म्यूझीयम, नॅशनल रेल ट्रान्स्पोर्ट म्यूझीयम, स्पोर्ट म्यूझीयम, हेल्थ म्यूझीयम अशी वैविध्यपूर्ण संग्रहालये भारतात आहेत.
    माझा वारसा माझी जबाबदारी
    • संग्रहालये ही मनोरंजन आणि त्यातून ज्ञान मिळवण्याचे उत्तम साधनं असतात. त्यामुळे संग्रहालयांना भेटी अवश्य द्या.
    • संग्रहालायची माहितीपर पुस्तिका येते किंवा काही पोस्ट-कार्ड रूपात छायाचित्र संच मिळतो. असे संच हितचिंतकांना भेट द्या.
    • संग्रहालयात आवडलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल आपण सविस्तर माहिती लिहू शकता.
    • संग्रहालयातील चित्रांचा वापर करून एक छोटी माहिती पुस्तिका तुम्ही स्वतः तयार करू शकता.
    • लहान मुलांकडून संग्रहालयातील वस्तूंचे हस्तलिखित बनवून घेऊ शकता.

    आपला वारसा आपली संस्कृतीच्या पुढच्या भागात वारसा म्हणता येतील अश्या अजून काही वेगळ्या घटकांचा विचार करू.

    (क्रमशः)

    आपला वारसा आपली संस्कृती (भाग 3)

  • आपला वारसा आपली संस्कृती (भाग 1)

    आपला वारसा आपली संस्कृती (भाग 1)

    आपला वारसा, आपली परंपरा, आपली संस्कृती असे अनेक शब्द आपल्या कानावरून अनेकदा गेले आहेत. त्यामुळे वारसा हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाही. पण हा वारसा म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे परंपरेने चालत आलेली एखादी गोष्ट. मग ती मूर्त रूपामधली एखादी वास्तू जसे की एखादा वाडा किंवा एखादे घर असेल, मूर्ती असेल किंवा कोणताही दृश्य स्वरूपाची वस्तू असेल. किंवा ती अमूर्त रूपामधली एखादी परंपरा असेल, कला असेल, किंवा एखाद्या विषयाचे ज्ञान असेल. अगदी बोलण्याची लकब, काही सवयी आणि स्वभाव सुद्धा आपला वारसाच असतो. आपल्या वाडवडीलांनाकडून मिळालेला वारसा आपण अभिमानाने जपतो आणि आपल्या पुढच्या पिढीला तो सुपूर्त करतो. तसाच समाजाचा एक भाग म्हणून, आपल्या पूर्वसुरींनी संस्कृतीचा वारसा आपल्या हाती सोपवला आहे. परंपरेने आपल्या पिढ्यांमध्ये चालत आलेल्या वारश्यापेक्षा अनेक हजारो वर्ष चालत आलेल्या सांस्कृतिक वारश्याचे परीघ निश्चितच मोठे आहे. पण हा सांस्कृतिक वारसा, व्यक्ती म्हणून आपल्याला उन्नत करतो. सगळ्याच जुन्या गोष्टी वारसा म्हणता येतील का असं विचारलं तर त्याचे उत्तर नाही असे द्यावं लागेल. कारण वारसा म्हणजे अश्या गोष्टी ज्यांचे महत्त्व त्या व्यक्तीला, कुटुंबाला, जमातीला, परिसराला, प्रदेशाला किंवा देशाला आहे. या प्रत्येक घटकाला एकत्रित किंवा त्यापैकी कोणा एकासाठी स्वतंत्र तरी तो वारसा महत्त्वपूर्ण असला पाहिजे.

    उदा. महाराष्ट्र भागातील वारली ही एक आदिवासी जमात आहे. या जमातीचा वारली चित्रं हा एक सांस्कृतिक ठेवा आहे. ही चित्रं, त्यांच्या सण- समारंभ, त्यांच्या चालीरीती, परंपरा यांचा एक भाग आहेत. थोडक्यात त्यांच्या जीवनातले महत्त्वाचे अंग म्हणता येईल. त्यांची घरे याचित्रांनी सुशोभीत केलेली असतात. ही लोककला असल्याने त्यात त्यांच्या जीवनातले भावभावनांचे उत्स्फूर्त रंग दिसतात. ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर असताना, त्यांच्यातील एकाला या कलेचे जतन करून, त्याची माहिती जगाला देण्याचे महत्त्व वाटले. पद्मश्री सन्मानित जिव्या सोमा मशे यांनी त्यांच्या जमातीचा हा वारसा जगासमोर आणला. त्यांंने वारली चित्रांचे रोज रेखाटन करून त्यातून पर्यावरण, जैवविविधता, संस्कृती, परंपरा, खेळ आणि समाज-दर्शन घडवले. या जमातीचे अस्तित्व किंवा वेगळेपण म्हणून ही चित्रं त्यांचा सांस्कृतिक वारसा आहेत आणि त्याचे त्यांना महत्त्व वाटले. इतकंच काय तर ही चित्रशैली महाराष्ट्र आणि भारताच्या आदिवासी दृश्यकलेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरली.

    आपला भारत देश, हा खरोखरीच वैविध्यतेने संपन्न असा देश आहे. आपल्या देशाला नैसर्गिक संपत्ती, वनराई, जैवविविधता विपुल प्रमाणत लाभल्या आहेत. याशिवाय धर्म, कला, खाद्य-संस्कृती, पाककला, परंपरा, बोली-भाषा, लिपी, साहित्य, नाट्य, लोकसंस्कृती अश्या अनेक गोष्टींची विविधता वर्षानुवर्षे इथे एकत्रित नांदत आहे. हीच खरी आपली ओळख आहे. हाच खरा आपला संस्कृतीक वारसा आहे. भारतीय नागरिक म्हणून या वैभवशाली संस्कृतीचे आपण उत्तराधिकारी आहोत. पण अधिकारांसोबत येते ती जबाबदारी. आपले हे वैभव वैयक्तिकदृष्ट्या, प्रांतिकदृष्ट्या आणि जागतिकदृष्ट्याही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे हा वारसा सांभाळण्याची जबाबदारी आपलीही आहे.

    वारसा संदर्भात तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. जागरुकता, जतन आणि संवर्धन. आपला वारसा जाणून घेणे ही झाली पहिली पायरी आहे. ही जागरूकता आपल्याला आपल्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींचे भान देते. या जाणीवेतून वारश्याचे जतन आणि संवर्धन करण्यास सहाय्य होते. हा वारसा खरचं इतका महत्त्वाचा असेल तर तो जपणे ही तितकेच महत्त्वाचे आहे का? हा स्वाभाविक प्रश्न आहे. त्यामुळे वारसा आपल्याला नेमकं देतो तरी काय हे समजल्यावर तो जतन करण्याचे आपण प्रयत्न करू शकतो.    

    वारसा आपल्याला काय देतो
    • ओळख

    परंपरेने आलेला वारसा असो किंवा समाजाचा एक भाग म्हणून आलेला, वारसा आपल्याला स्वतःची ओळख मिळवून देतो. आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्याला निश्चित मार्ग दाखवतात.   

    • जाणीव

    वारसा आपल्या जाणीव देतो. जाणीव, समाजाचा एक भाग असल्याची. जाणीव, समाजात दडलेलं वैभव बघण्याची आणि जाणीव, समाजाने आपल्याला दिलेले परत समाजाला देण्याची.

    वारसा म्हणजे आपला इतिहास. त्यामुळे भूतकाळातील चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी त्यासोबत येतात. पण इतिहासातून हेच शिकायचं, की चांगल्या गोष्टींचे अनुकरण आणि वाईट गोष्टींचे दमन.

    • प्रेरणा

    इतिहासातील राज्यांच्या शौर्यगाथा आपल्याला प्रेरणा देतात. त्याच राज्यांची धर्मनिष्ठता आणि करुणा आपल्याला सन्मार्ग दाखवतात. मौर्य सम्राट अशोकाच्या शिलालेखांतून धर्मतत्त्वांचा प्रसार केलेला दिसतो. त्याकाळी त्याने सांस्कृतिक ऐक्य साधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची नोंद तो या लेखांमध्ये करतो. प्राचीन काळात भारतामध्ये आलेल्या कुषाण, क्षत्रपांसारख्या परकीय राज्यांनीही इथल्या संस्कृतीचा स्वीकार करून आपल्या परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या गोष्टी आपल्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आहेत.

    • अस्मिता

    अस्मिता म्हणजे आपले स्वतंत्र अस्तित्व असल्याबद्दलची आणि ते महत्त्वपूर्ण असल्याबद्दलची भावना. आपली कार्यक्षेत्र भिन्न असतात. तरी संस्कृतीच्या वेगवेगळ्या पैलूंनी, आपल्या सर्वांना एकत्रित बांधले आहे. हा एकी भाव म्हणजेच अस्मिता जी या वारसा रूपाने आपल्याला मिळते.

    वारसा किती महत्वाचा आहे हे आपल्याला आत्तापर्यंत समजले असेलच. पण कोणकोणत्या गोष्टींना वारसा म्हणायचे? हा प्रश्न तसाच राहतो. याही प्रश्नाचे उत्तर आपण बघणार आहोत, पण पुढच्या भागात.

    (क्रमशः)

    आपला वारसा आपली संस्कृती (भाग 2)

  • दीदारगंज यक्षी

    दीदारगंज यक्षी

    20 ऑक्टोबर 1917 रोजी, म्हणजे आजपासून बरोबर शंभर वर्षांपूर्वीची ही गोष्ट असेल. बिहारमधील एका पोलीस निरीक्षकाने एका मूर्तीची गुप्तपणे नोंद केली होती. ह्या पोलिस रिपोर्ट प्रमाणे, जुन्या पटना शहरातील दीदारगंज परिसरात, गंगेच्या किनारी एक धोबी, जमिनीत फसलेल्या एका दगडाच्या स्लॅबवर कपडे धुवत असे. एक दिवस काठावर कपडे धुवत असताना, त्याच्या जवळून एक साप पाण्यात त्या दगडाखाली जाऊन बसला. गावातल्या लोकांनी तो साप काढण्यासाठी त्या दगडाच्या स्लॅबची माती काढायला सुरुवात केली. माती बरीचशी काढल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं, की हा दगड एका अलौकिक भव्य मूर्तीचा एक भाग आहे, जीला आज आपण दीदारगंज यक्षी या नावाने ओळखतो.  

    5 फुट 2 इंच उंच, गुलाबी चुनार वालुकाष्मातील ही मूर्ती, 1 फुट 7 ½ इंच पाद-पीठावर उभी आहे. मूर्तीवर झिलईयुक्त चकाकी आहे. चवरीधारी यक्षीची एक खासियत म्हणजे,  इ.स. 1917 साली पटना संग्रहालयाची स्थापना झाली आणि ह्याच वर्षात ही यक्षी प्रतिमा मिळाली. गेली शंभर वर्ष ही दीदारगंज यक्षी तिच्या अलौकिक सौंदर्याने पटना संग्रहालयाची शोभा द्विगुणीत करीत उभी आहे.  ही मूर्ती कशी मिळाली ह्यावर अनेक मते आहेतच. त्यापैकी एक घटना मी वरती नमूद केली आहे. पण पटना संग्रहालयाद्वारा ह्या मूर्तीचा इतिहास थोडा वेगळा सांगितला जातो. तत्कालीन कमिश्नर ई.एच.एस. वाॅल्स (E.H.S. Walsh) ह्यांच्या पत्रामध्ये ह्या मूर्तीच्या उपलब्धीचे श्रेय गुलाम रसूल नामक व्यक्तीला जाते, ज्याने दीदारगंज जवळ, नदीकाठावर चिखलात फसलेल्या ह्या मूर्तीला सर्वप्रथम पहिले आणि ती मूर्ती बाहेर काढण्यासाठी खोदकामही केलं.

    कलात्मकदृष्टीने महत्त्व ठेवणारी ही मूर्ती, प्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ते आणि इतिहासकार डॉ. जे एन सामदार (Dr. J N Samaddar) ह्यांच्या नेतृत्वाखाली पटना संग्रहालयात आणली गेली. ह्या यक्षीच्या प्राप्तीनंतर इतिहासकारांच्या समोर अजून एक नवा प्रश्न उभा राहिला. तो म्हणजे ह्या मूर्तीची कालनिश्चिती. ही कलाकृती, त्यासाठी वापरला गेलेला दगड, शिल्पाची शैली त्यावर असलेली कृत्रिम चमक किंवा झिलाई असे काही अलौकिक गुण लक्षात घेता, भारहुत मध्ये मिळणाऱ्या बौद्ध स्तुपांच्या वेदिकांशी समतुल्य अशी ह्या मूर्तीची शैली आहे असा निष्कर्ष आर.पी.चन्द्रा ह्यांनी मांडला आहे. अशोककालीन कला शाखेतील, विदेशी कलाकारांच्या मगध कलाकारांच्याद्वारा रुजवलेल्या शास्त्रीय शिकवणुकीचे संस्कार ह्या मूर्तीवर झालेले दिसतात. ह्या मूर्तीवर असलेली चमक आणि एकूणच मूर्तीची गोलाई ही मौर्यकालीन मूर्तींशी साधर्म्य दाखवणारी असल्याचे एक मत जे.एन. बनर्जी मांडतात. निहार रंजन रे ह्यांच्या मते ही शैली मथुरा शैलीतील यक्षींशी साधर्म्य दाखवणारी आहे. त्यामुळे ह्या मूर्तीला यक्षी म्हणणे अधिक योग्य आहे.

    परंतु ह्या मूर्तीचा एकूणच शाही साज, हा मौर्यकालीन एकपाषाणी स्तंभशीर्ष आणि त्यावरील नक्षीकामाशी मिळता-जुळता वाटतो.  त्यामुळे ही मूर्ती कदाचित मौर्यकाळाच्या आसपास जाऊ शकते. अनेक वर्ष जमिनीखाली असल्यामुळे ह्या मूर्तीला थोड्या प्रमाणात नुकसानही सोसावे लागले आहे. ह्या मूर्तीचा वाम हस्त भंजीत अवस्थेत आहे. नाकाचा टवका उडाला आहे. तरीही तिच्या कलात्मक सौंदर्यात यत्किंचितही कमीपणा येत नाही.

    इ. स. पू. तिसऱ्या–दुसऱ्या शतकात घडवलेली, म्हणजे जवळपास 2200 वर्षांपूर्वी घडवलेली ही एकपाषाणी मूर्ती, पटना संग्रहालयातील ही सर्वांत आकर्षक मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पटना संग्रहालयाने दिलेले विवृत्ति हे नाव ती सार्थ करते आहे. विवृत्ति ह्या शब्दाचा अर्थ DiscoverPerceiveInterpret असा घेतला आहे. ह्या मूर्तीचे गंगेच्या काठावर पुन्हा मिळणे, तिचे पुन्हा नव्याने ज्ञान करून घेणे आणि तिची पुन्हा नव्याने व्याख्या लावणे हे तिची विवृत्ति दर्शकता सार्थ करतात. 

    यक्षी ही प्राचीन भारतीय स्त्री सौंदर्याचे प्रतिक मानली गेली आहे. यक्षी प्रतिमांची वक्षस्थळे आणि नितंब जास्त पुष्ट दाखवलेली असतात. हातात कोपरापर्यंत बांगड्या, कर्णभूषणे, गळ्यात माळा, आणि पायात चांगल्या जडसर तोरड्या असतात जश्या ह्या चवरीधारी यक्षीच्या शिल्पांतही दिसतात. 

    मौर्य काळात स्त्री आणि पुरुषाच्याही काही मूर्ती घडवल्या गेल्या. यामध्ये सर्वांत महत्त्वाच्या मूर्तींमध्ये प्रथम उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे दीदारगंज येथे मिळालेल्या ह्या चवरी धारिणीचा. स्त्रीच्या पूर्णाकृती मूर्तीतल्या या स्त्रीने तिच्या वाम हातात चवरी धरली आहे. तिने हातात भरपूर बांगड्या आणि अंगावर पुष्कळ दागिने घातले आहेत. कलाकाराने तिच्या लांबसडक केसांची अतिशय सुरेख केशरचना केलेली दाखवली आहे. तिच्या शरीरावरील वस्त्र, दागिने, केशरचना हे सर्व तपशिलात दाखवल्यानंतर मौर्य काळातील वैशिष्ट्यपूर्ण झिलईही यामूर्तीवर आणली आहे. भारतीय परंपरेने मान्य केलेली स्त्रीसौंदर्याची सर्व लक्षणे या मूर्तीत आहेत. स्त्रीदेहाचे अत्यंत सौष्ठवपूर्ण दर्शन ह्या मूर्तीच्या रूपाने होते. 

    वेशभूषा आणि केशविन्यास

    मौर्य काळातील वस्त्र, ते धारण करण्याच्या पद्धती आणि केशविन्यासाची माहिती विविध ग्रांथिक साधनांमधून घ्यावी लागते. मेगॅस्थानीसचं इंडिका, एरियन, कौटिल्य अर्थशास्त्र आणि महाभारताचे सभा पर्व ह्या दृष्टीने अभ्यासावे लागते. ह्याशिवाय जातक कथा आणि विनय पिटक ह्यांचीही तत्कालीन वेशभूषा जाणून घेण्यासाठी मदत होते. अर्थशास्त्रामध्ये वस्त्र आणि केशविन्यासाची माहिती येते.

    दीदारगंज यक्षी च्या वेशभूषेत कंचुकीचा अभाव आहे. अधोवस्त्र म्हणून साडी धारण केली आहे. एक विशिष्ट पद्धतीची साडी ज्याच्या पद्धतशीर चुण्या घातलेल्या आहेत. हे अधोवस्त्र कमरेपेक्षा थोडेसे खाली नेसलेले आहे. त्या वस्त्रावर पाच लडींचा कमरबंध आहे. साडीमध्ये खोचलेला पटका किंवा वस्त्र ज्याला बौद्ध साहित्यामध्ये फासुका असा शब्द वापरलेला आहे. उत्तरीय वस्त्र उजव्या हातातून पाठीमागे, कंबरेतून थोडं खालून दुसऱ्या हातापर्येंत आले आहे, पण तो हात तुटल्यामुळे त्या हातामधले उत्तरीय दिसत नाही.

    ह्या चवरीधारी यक्षीने विशिष्ट पद्धतीचा केश विन्यास केला आहे. त्यावर अलंकरण शिल्पातून लीलया अभिव्यक्त झाले आहे. केशरचना नेटकी असून, केस मागे बांधले आहेत. डोक्याच्या मध्यभागी मोठ्या बिंदीने सजावट केली आहे. गळ्यात दोनच अलंकार आहेत. हातामध्ये मात्र बांगड्या भरपूर आहेत आणि त्याच हातामध्ये तिने चवरी (fly whisk) पकडलेली आहे.

    अतिशय सुंदर शैलीत ह्या मूर्तीच्या सौंदर्याची अभिव्यक्ती कलाकाराने साधली आहे. ह्या मूर्तीचे भाव आणि तिची प्रत्यांगातून प्रवाहित होणारे सौंदर्य अनेक वर्ष लोटली तरी आजही आपल्या नजरा खिळवून ठेवते.

  • वेदोऽखिलो धर्ममूलम्

    वेदोऽखिलो धर्ममूलम्

    भारतीय परंपरेचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे प्राचीन वैदिक संस्कृती आणि या वैदिक संस्कृतीने आपल्याला दिलेले वैदिक वाङ्मय. वैदिक परंपरा ही भारतीयांच्या जीवनशैलीचा, संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग होता आणि आजही आहे. म्हणूनच ही वेद पठण परंपरा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंदवली गेली आहे. या वेद परंपरेतून लाभलेले वाङ्मय म्हणजे अलौकिक ज्ञानाची अमुल्य रत्न, गर्भात धारण केलेला सागर आहे. भारतीयांसाठी जीवनाचे मर्म म्हणजेच वेद, त्यामुळे इथे राहणाऱ्या प्राचीन माणसांच्या मनाचा वेध घेण्यासाठी वेदांची माहिती करून घ्यावी लागेल.

    प्राचीन काळात डोकावताना काही निकष हे समजून घ्यावे लागतात. या निकषांचा अर्थ विविध ऐतिहासिक साधनांमधून व्यक्त होत असतो. त्या साधनांपैकी एक महत्त्वाचे साधन म्हणजे वाङ्मय. जे जे वाणीद्वारा प्रकट होते ते म्हणजे वाङ्मय. असाच एक अलौकिक मौखिक ठेवा आपल्याला मिळालेला आहे तो म्हणजे ऋषितुल्य वेद. हे वेद ऋषितुल्य का? असं काय ज्ञान त्यात लपलेलं आहे? असे प्रश्न जिज्ञासूंना पडतातच आणि सुरु होतो एक प्रवास, तो वेद म्हणजे काय, त्यांची रचना काय आहे, प्रणाली काय आहे हे जाणून घेण्याचा.

    वेदोऽखिलो धर्ममूलम् (मनूस्मृती) – सम्पूर्ण वेद हे धर्माचे मूळ आहे

    यावरून वेदांचे महत्त्व लक्षात येतेच पण वेदांच्या अभ्यासावरून तत्कालीन समाजदर्शन होते, धार्मिक स्थित्यांतरांचा आढावा घेता येतो. इतकच नाही तर त्यावेळी कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, रूढी- परंपरा, अनुशासन आणि एकूणच त्या काळाचा अंदाज बांधणे शक्य होते.
    वेद शब्दाची व्युत्पत्ती बघितली तर विद् या धातूपासून वेद हा शब्द तयार होतो. याचा अर्थ होतो ज्ञान. वेदांना अपौरुषेय म्हटले आहे. अपौरुषेय म्हणजे हे कोणा एका पुरुषाने लिहिलेले वाङ्मय नाही, त्याचा कर्ता सांगता येत नाही. लिखित स्वरूपात नसलेल्या या वेदांची ज्ञान-परंपरा मौखिक पद्धतीने प्रवाहित होत आपल्यापर्येंत येऊन पोहोचली आहे, हेच याचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल. सुरुवातीला एकच वेद अस्तित्वात होता. हा काळ म्हणजे वेदांचा प्राथमिक काळ म्हणावा लागेल ज्यात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांच्या संहिता तयार झाल्या नव्हत्या.

    वेदांची संरचना समजून घेतली तर त्यातील अनेक गोष्टींचे अर्थ समजण्यास आपल्याला मदद होते. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या तीन वेदांना वेदत्रयी म्हणतात. परंतु अथर्ववेदही तितकाच महत्त्वाचा आहे. वेदांचे चार प्रकारचे ग्रंथ असतात. ते म्हणजे संहिता, ब्राह्मणे, अरण्यके, उपनिषदे. त्यापैकी शेवटचे दोन म्हणजे आरण्यके आणि उपनिषदे एकच भाग मानतात. या चार ग्रंथांची माहिती करून घेऊ.

    संहिता

    प्रत्येक वेदाच्या शाखा असतात आणि त्या शाखांच्या स्वतंत्र संहिता असतात. त्या त्या संहितेमध्ये त्या वेदाच्या मंत्रांचा संग्रह असतो. जसे की ऋग्वेद संहितेमध्ये ऋग्वैदिक मंत्र एकत्रित केले जातात ज्यांना ऋचा म्हणतात.

    ब्राह्मणे

    ब्राह्मणे हे दुसऱ्या प्रकारचे ग्रंथ आहेत. इथे ब्राह्मण ही जातीवाचक संज्ञा घेऊन चालणार नाही. ब्राह्मणग्रंथ हे गद्य स्वरूपात आहेत. ब्राह्मणग्रंथात वेदाच्या संहितेमध्ये आलेला मंत्र, प्रार्थना, ऋचांचा अर्थ किंवा उपयोग सविस्तर मांडलेला असतो. प्रसंगी एखादा विधी किंवा ऋचा समजवण्यासाठी छोट्या कथांचाही अंतर्भाव ब्राह्मण ग्रंथात होतो.

    आरण्यके

    आरण्यके म्हणजे आरण्यामध्ये जाऊन ऋषींनी केलेलं आत्मिक चिंतन. आरण्यके स्वतंत्र ग्रंथ म्हणून नसतात कारण आरण्यके हा भाग ब्राह्मण ग्रंथाचा शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे आरण्यके ही ब्राह्मणग्रंथ आणि उपनिषदे यांंना जोडणारा दुवा मानतात.

    उपनिषदे

    उपनिषदे ही वेदांचा अंतिम भाग असल्याने त्यांना वेदान्त म्हणतात. या वेदान्तामध्ये ब्रह्म आणि जगत्‌ या संदर्भातील तत्वज्ञान आणि त्याचे चिंतन मांडलेले असते.

    भारतीय धर्म आणि धार्मिक संकल्पनांचे ज्ञान श्रुतीद्वारा होते. गुरु आपल्या शिष्यांना हे वेदांचे ज्ञान मौखिक पद्धतीने देत असत. गुरुवाणीतून हे ज्ञान श्रवण करून शिष्यांनी वेद जाणले. म्हणून या वेदांना श्रुती वाङ्मय असही म्हणतात. या वेदांचा प्राचीनतम भाग म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेदाची सविस्तर माहिती मात्र पुढच्या लेखात बघूया.

    (क्रमशः)

  • लोकसाहित्य आणि भारतीय विद्या

    लोकसाहित्य आणि भारतीय विद्या

    आज जशी तंत्रज्ञान युगाने लहान मुलांच्या हातामध्ये अनेक Digitized खेळणी दिली आहेत तशी खेळणी मी लहान असताना माझ्याकडे नव्हती. किंबहुना माझ्या वयाच्या कुणाकडेच नव्हती. आमच्या घरासमोर एक आजी रहायच्या. पटवर्धन आजी. दररोज संध्याकाळी त्या त्यांच्या बाल्कनीमध्ये खुर्चीवर बसून रस्त्यावरची वर्दळ बघत चहा घ्यायच्या. पटवर्धन आजींंचा अजून एक विरंगुळा होता, तो म्हणजे माझ्यासारख्या लहान मुलांना त्या रोज गोष्टी सांगायच्या. मी खूपदा त्यांच्या बाल्कनीमध्ये आजींंच्या पुढे बसून अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. ही फक्त माझीच गोष्ट आहे असं नाही. आपल्यापैकी प्रत्येकानेच आपल्या आजीकडून खूप गोष्टी ऐकल्या असतील. कधी त्या इसापनीतीच्या गोष्टी असतील किंवा कधी पंचतंत्रातल्या असतील. देवांच्या, असुरांच्या, परींच्या असतील किंवा कोणाची मुशाफिरी असेल. आपण या कथांमधून आपलं बालपण जगलो. त्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टींनी आपलं बालपण समृद्ध केलं. त्या गोष्टी, त्या कथा, मिथक हे लोकसाहित्याचा एक महत्वाचा भाग आहे, हे समजवून सांगणाऱ्या एक दुसऱ्या आजी आहेत. ज्या माझा भारतीय विद्येमधला प्रवास समृद्ध करतायेत. दुर्गा आजी म्हणजेच दुर्गा भागवत. आपली संस्कृती, भारतीय साहित्य आणि समाज यांचा संशोधनात्मक वेध ज्यांनी आयुष्भर घेतला अश्या दुर्गा भागवत. Folklore या इंग्रजी संज्ञेला लोकसाहित्य ही पर्यायी मराठी संज्ञा पहिल्यांदा वापरली ती समाजशास्त्रज्ञ व लोकसाहित्यविशारद दुर्गाबाई भागवत यांनी. पण लोकसाहित्य म्हणजे केवळ कथा असे नाही. लोकसाहित्याची व्याप्ती मोठी आहे. लोककथा, लोकगीते, म्हणी, वाक्प्रचार, उखाणे, लोकोक्ती, लोकपुराणें याशिवाय लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, हस्तकला, क्रीडा, संगीत, वैद्यकीय आणि रूढी, श्रद्धा, परंपरा, मंत्र आणि तोडगे ही लोकसाहित्याची वैविध्यपूर्ण अंग आहेत. आज जागतिक लोकसाहित्य दिनानिमित्त लोकसाहित्य आणि भारतीयविद्या (Indology) यांचा परस्पर संबंध या विषयावर मी थोडा प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न करणार आहे.

    लोकसाहित्य म्हणजे Folklore ही संज्ञा विल्यम जॉन थॉमस या ब्रिटीश लोकसंख्याशास्त्रज्ञने (Demographer) 1846 मध्ये प्रथम वापरली. वाङ्‌मयीन, सांस्कृतिक, कलात्मक आविष्कार म्हणजे लोकसाहित्य. लोकसाहित्यातील लोक या संज्ञेचा अर्थ भारतीय आणि पाश्चिमात्य अभ्यासकांनी वेगवेगळा घेतला आहे. त्यामुळे कदाचित लोकसाहित्य म्हणजे आदमी लोकांचे साहित्य असा एक समज झाला आहे किंवा तसा होण्याचा संभाव असतो. पण एन्सायक्लोपीडिया ऑफ सोशल सायन्सेस (Encyclopedia of the Social Sciences) सारख्या विषयकोशांतून आणि डिक्शनरी ऑफ फोकलोअर(Folklore) , मायथॉलॉजी (Mythology), अँड लेजंड्स (Legends) या बृहत् व्याख्या-कोशातून Folklore च्या अर्थाची व्याप्ती आणि स्वरूप जास्त स्पष्ट होताना दिसते.

    लोकसाहित्यात, लोकजीवनामध्ये समूहप्रतिभेच्या आणि समूहमानसाच्या अबोध प्रेरणेतून आपोआप निर्माण झालेले व आपोआप परंपरेने टिकत आलेले सर्व घटक समाविष्ट होतात. त्यात कथा, गीते, म्हणी, उखाणे, कोडी, लोकप्रचलित मंत्र इ. सर्व साहित्याबरोबरच लोकप्रचलित धर्मविधी, श्रद्धा, देवदेवता, रूढी, चालीरीती, धारणा, व्रतवैकल्ये, उपासना, सर्व कला, कारागिरी, क्रीडा, वैद्यक, अन्नवस्त्रादी नित्योपयोगी वस्तू व त्यांच्या उपयोगाच्या रीती या सर्वांचा समावेश होतो.

    लोकसंस्कृती आणि त्यातून निर्माण होणारे लोकसाहित्य हे संस्कृती अभ्यासातील एक महत्वाचे अंग आहे, हे आपण बऱ्याचदा विसरतो. पण भारतमध्ये लोकसाहित्याच्या अभ्यासाची सुरुवात ही ब्रिटीश राजवटीमध्ये झालेली दिसते. युरोपमध्ये 18 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये तौलनिक भाषाशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झाली. इथून भारतीयविद्या या शाखेचा प्रारंभ म्हणता येईल. कारण इथूनच पुढे तौलनिक दैवतशास्त्र, आचारशास्त्र आणि इतिहास यांची मांडणी होत गेलेली दिसते. भारतीयविद्या अभ्यासात संस्कृती अध्यायनाची ही मांडणी विविध साधनांच्या आधारे अभ्यासता येते. सर विलिअम जोन्स यांच्या नेतृत्वाखाली 1774 मध्ये कलकत्ता येथे स्थापन झालेली The Asiatic Society आणि दुसरी Royal Asiatic Society या संस्थांमधून लोकसाहित्यावर काम झाले.  पण 1872 मध्ये मुंबईत, पुरातत्त्वशास्त्रज्ञ जेम्स बर्जेस यांच्या The Indian Antiquary, A journal of oriental research नियतकालिकातून पुरातत्त्व, इतिहास, साहित्य, भाषा, तत्त्वज्ञान, धर्म, ह्यांच्या सोबत दैवतकथा (myths) आणि लोकसाहित्याचाही अभ्यास सुरु झाला. सुरवातीला केवळ मानववंशशास्त्र (anthropology) दृष्टीने होणारा अभ्यासाची क्षितिजे रुंदावून भारतीयविद्या (Indology) आणि समाजशास्त्र (sociology) या ज्ञानशाखांमध्ये लोकसंस्कृतीचा विचार आणि अभ्यास केला जाऊ लागला.

    लोकपरंपरा आणि इतिहास यांत रा.चिं.ढेरे यांनी कोरीव लेख, इतिहास आणि लोकसाहित्य यांचा असलेला घनिष्ट संबंध समजावून सांगितला आहे. इतिहास लेखनातील महत्त्वाचे साधन म्हणजे अभिलेख. या अभिलेखांच्या आधारे राजकीय परिस्थिती आपण समजून घेतो. पण ढेरे म्हणतात

    अनेक कोरीव लेखांत विशिष्ट स्थानांचा महिमा सांगताना स्थानमहिमापोषक पारंपारिक पुराणकथा नोंदवलेल्या आहेत. दान लेखांतून पुण्याचे आमिष निर्माण करणारे आशीर्वादश्लोक तर पापांचे भय निर्माण करणारी शापवचनेही कोरलेली असतात.

    यावरून आपल्या हे लक्षात येते की सामाजिक स्थित्यंतरे होत असताना लोकजीवनाचा त्या संस्कृतीवर पडलेला प्रभाव हा अश्या साधनांच्या रूपाने अभ्यासता येतो.

    भारतीय लोकसाहित्याची ही समृद्ध परंपरा प्राचीन काळापासून प्रवाहित होत आलेली आहे. प्राचीन वैदिक वाङ्‌मयात लोकसाहित्याची मूळं बघायला मिळतात. रामायण, महाभारत, पुराणे यांतील कथांचे प्रादेशिक, स्थानिक वैशिष्ट्यांसह रुपभेदात्मक आविष्कार सर्वच भाषांत आणि बौद्ध, जैन धर्मातील लोकसाहित्यातही आढळतात. भारतीय विद्येच्या अभ्यासात संस्कृतीचा अभ्यास करताना त्या समूहाचा इतिहास, त्यांच्या भूप्रदेशाचा अंदाज, समाजशास्त्र, मानवशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र, दैवतकथाशास्त्र सोबत लोकसाहित्याचा आणि त्या अनुषंगाने त्या लोकसंस्कृती अश्या सर्व शास्त्रांचा एकत्रित अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे.    

  • शिवाय नमः – एक अनुभव

    शिवाय नमः – एक अनुभव

    प्रत्येक अनुभव हा आपल्याला समृद्ध करत असतो. शिवाय नमः हाही त्यापैकी एक अनुभव होता. बोधसूत्रच्या माध्यमातून मी श्रावण महिन्यामध्ये शिवाय नमः हे सदर सुरु केले. दर सोमवारी शिवाच्या वेगवेगळ्या रूपांना शब्दबद्ध करत होते. शिवाय नमः – एक अनुभव या शेवटच्या लेखाने मी या शृंखलेला पूर्णविराम देणार आहे. या प्रवासात नेहमीप्रमाणे थोडी धडपड, पडझड आणि नंतर सुंदर लेख संग्रहित होत गेले. कोणत्याही गोष्टीच ज्ञान करून घायचं म्हणजे हे सर्व स्वाभाविकच आहे. शृंखला म्हणजे सातत्याने केलेल्या अनेकविध गोष्टींची एकत्रित गुंफण. श्रावणामध्ये शिव देवतेवर आधारित ही संकल्पना शिवाचे रुद्र, संहारक, मुग्ध आणि महाविलयन स्वरूपाचा वेध घेणारी होती. ही लेखमालिका मी सातत्याने लिहून पूर्ण करू शकले याचा आनंद आहे. रुद्र या संकल्पनेपासून प्रत्येक लेखांमध्ये कधी वाङ्मय आणि पुराणे, कधी दैवतशास्त्र, कधी मूर्तीशास्त्र, कधी नाणकशास्त्र तर कधी अभिलेखांचा आधार घेतला. या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हा वाचकांचा प्रतिसाद ही लेखमालिका पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करत होता. या लेखमालिकेमधील चौथ्या लेखाने बोधसूत्रवर माझे एकूण 25 लेख मी शब्दबद्ध केले. 25 लेख म्हणजे तसे काही फार निश्चितच नाही, पण पुढच्या लिखाणासाठी प्रेरणा देणारे नक्कीच आहेत.

    या संपूर्ण लेखमालिकेचा प्रवास शिवाय नमः मध्ये संकलित करावा म्हणून या लेखाचे प्रयोजन आहे.   

    1. रुद्राय नमः

    रुद्राय नमः

    रुद्राय नमः  या पहिल्या लेखामध्ये शिवरूपाची सर्वांत प्राथमिक अवस्था, प्राचीन वाङ्मयातून येणाऱ्या रुद्रापासून सुरु होताना दिसते. रुद्र ही अमूर्त स्वरूपातील एक संकल्पना. ही अभ्यासताना काही कथांच्या आधारे, काही श्लोकांच्या आधारे रुद्राचा शोध घेण्याचा प्रयत्न मी केला. प्राचीन ग्रंथातून उमटणाऱ्या भयानक रुद्राच्या संकल्पना पुराणकाळापर्येंत येताना शिव या सौम्य स्वरूपात कश्या विलीन होताना दिसतात याचा आढावा या लेखाच्या माध्यमातून मला घेता आला. रुद्राला म्हणून संबोधलेल्या नावांचा अर्थ जाणून घेऊन रुद्र ही संकल्पना हळूहळू साकार होते. हा पिनाकपाणी रुद्र म्हणजे शिवाचे अलौकिक रूप आहे जो विनाश आणि सृजन यांचे एकत्व दाखवतो.

    2. त्रिपुरान्तकाय नमः

    त्रिपुरान्तकाय नमः

    शिवाय नमः मधला दुसरा लेख म्हणजे, त्रिपुरान्तकाय नमः. तीन मायावी पुरांचा सर्वनाश करायला सज्ज झालेला संहारक शिव, त्रिपुरारी बनून या लेखातून अभिव्यक्त झाला आहे. पुराणांमध्ये त्रिपुरान्तक आख्यानाचे अतिशय सुंदर आणि मनोरंजक वर्णन प्रस्तुत केलेले आहे. ते वाचताना किंवा शब्दबद्ध करताना मीही त्या संपूर्ण कथाभागाचा आनंद घेत होते. शिल्पातील निरीक्षणे (Observations) कथानकाशी साधर्म्य दाखवणारी असली तरी शिल्प साकारताना शिल्पकारला येणाऱ्या काही मर्यादाही जाणवल्या. हा लेख संकलित करताना, वेळेच्या अभावी शिल्पातले बारकावे लेखामध्ये समाविष्ट करता आले नाहीत, त्याची थोडी खंत आहे. या लेखासाठी माझ्या एका मैत्रिणीच्या प्रतिसाद आला, की संपूर्ण शिल्प बघयला आवडेल. तर भविष्यात त्रिपुरान्तकाच्या रेखाचित्रांचा संपूर्ण आढावा घेऊन एक लेख पुन्हा लिहीन, अशी इच्छा मी व्यक्त करते. दुर्गांचा विनाश करण्यासाठी बाण सोडण्यपूर्वीचा शिल्पांमध्ये गोठवला तो एक क्षण शब्दांमध्ये उतरवताना संपूर्ण कथाभागाची नाट्यमयता शिल्पाच्या आधारे शब्दबद्ध करणे जास्त सुलभ झाले. 

    3. उमामहेश्वराय नमः

    उमामहेश्वराय नमः

    या लेखमालिकेतील तिसरा लेख उमामहेश्वराय नमः. खरतर हा लेख निशब्द करणारा आहे. उमा महेश्वर या दोन तत्त्वांची भावनिक सुसूत्रता आपल्याला प्रत्येक भौतिक साधनांमधून दिसते. उमा महेश्वर रूपाने, संपूर्ण सृष्टीतील दैवी तत्त्व आणि त्या तत्त्वाशी संधान बांधणाऱ्या मानवी भावभावनांच्या मुग्धतेचे मूर्त रूप या लेखामध्ये शब्दबद्ध करण्याचा एक छोटा प्रयत्न मी केला. एक असा अनुबंध जो सृष्टीतील चैतन्य साकार करतो. काव्यातून, नाणी आणि शिल्पांसारख्या भौतिक साधनांमधून उमेचे स्वतंत्र अस्तित्व जे शिवरूपात एकरूप होणार आहे याचा आढावा या लेखाच्या निमित्ताने मी घेतला आहे.

     4. हरीहाराय नमः

    हरीहराय नमः

    हरीहाराय नमः हा शिवाय नमः  या शृंखलेमधील शेवटचा लेख. या लेखांचे पूर्वनियोजन करतानाच शेवट हरिहर या स्वरूपाने करायचा हे मी ठरवले होते. योगायोगाने श्रावणातील चौथ्या सोमवारी श्रीकृष्ण जयंती आली. त्या दिवशी मी हरीहाराय नमः या शिव रूपावर लेख सादर केला. शिव आणि विष्णू या दैवतशास्त्रातील प्रमुख देवतांची ही संयुक्त मूर्ती. भारतातील आणि भारताबाहेरील ह्या संयुक्त संकल्पनेची लोकप्रियता महाविलयन प्रक्रियेची साक्ष देतात. जी अभिलेखातही उमटली आहेत. शिव आणि विष्णू या दोन स्वतंत्र सिद्धांतांवर आधारित देवतांचे एकीकरण दाखवणारे हरिहर हे स्वरूप आहे.

    शिवाय नमःच्या रूपात शिवाच्या काही स्वरूपाचा थोडक्यात आढावा इथे एकत्रित संकलित केला आहे. वाचकांचा अभिप्राय हा नेहमीच प्रेरणा देणारा असतो, त्यामुळे माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला, हे मला ऐकायला नक्की आवडेल. श्रावणातील या शेवटच्या सोमवारी शिवाय नमः म्हणून या शृंखलेला इथेच पूर्णविराम देते.

  • हरीहराय नमः

    हरीहराय नमः

    1882-83 साल. एक फ्रेंच अभ्यासक जो कम्बुज म्हणजे सध्याच्या कंबोडिया प्रांतामध्ये काही संशोधनार्थ गेला होता. फुनान मधील ताकेओ (Takeo) प्रांतातील नोम-दा (Phnom Da) या मंदिरातून एका देवता मूर्तीचे शीर्ष तो फ्रान्सला सोबत घेऊन गेला. फ्रान्समधील ग्युमेट (Guimet) संग्रहालयातील हे शीर्ष, 2016 साली कंबोडिया प्रांताला परत करण्यात आले. कंबोडिया सरकारने या निर्णयाचे स्वागत केले. इ.स. 7 व्या शतकातील मूर्तीचे हे शीर्ष तब्बल 135 वर्षांनी पुन्हा त्या धडाला जोडले गेले. ते शीर्ष होते हरीहाराचे. कपाळावर तिसरा अर्धनेत्र. ज्याच्या मस्तकावरील अर्धा भाग हा जटांनी विभूषित होता तर अर्धा भाग मुकुटाने.

    कंबोडिया म्हणजेच प्राचीन कम्बुज देश. हा देश भारतीय संस्कृतीशी इ.स. 4 शतकापासून जोडला गेलाच आहे, पण भारतीय देवतांपैकी शिव आणि विष्णू या देवतांचे एकत्रित प्राबल्य आणि त्यांची लोकप्रियता इथेही बघायला मिळते. प्रो. मधूसुधन ढाकी यांनी अभिलेखाच्या सहाय्याने सर्वांत प्राचीन हरिहर मूर्तीचा पुरावा इ.स. 6 शतकातल्या ख्मेर आश्रम महा रोसेई इथला आहे हे मत मांडले आहे. कंबोडियातल्या प्राचीन संस्कृत शिलालेखांमध्ये शिव आणि विष्णू या दोनही देवतांसाठी शम्भू-विष्णू, शंकर-अच्युत, हर- अच्युत, परमेश्वर-सारंगी, विष्णू-ईश, हरी-शंकर आणि हरी-ईश्वर या नावांचा उल्लेख आलेला आपल्याला दिसतो.

    हरिहर हे शिव आणि विष्णू या दोन स्वतंत्र सिद्धांतांवर आधारित देवतांचे एकीकरण दाखवणारे स्वरूप आहे. असे स्वरूप तत्कालीन तत्त्ववेत्यांना किंवा पुराणकारांना निर्माण का करावे लागले? याचा खुलासा ही मूर्ती अभ्यासूनच समजून घेता येईल. भारतीय परंपरेमध्ये शैव आणि वैष्णव पंथ हे पूर्वापार त्यांच्या स्वतंत्र तत्त्वज्ञानिक सिद्धांतावर चालत आले आहेत. पण या पंथामध्ये कालांतराने वाढत गेलेले मतभेद कुठेतरी थांबवणे, ही तत्कालीन समजाची गरज बनली. शिव आणि विष्णू यांचे एकमेकांत सामावणे हे त्यावेळी झालेल्या महाविलयन प्रक्रियेची साक्ष देतात. अर्धनारीश्वरच्या धर्तीवर हरिहर संकल्पना विकसित होताना दिसते. याचे पुरावे वायूपुराण, शिवपुराण यांसारख्या पुराणांच्या आधारे पडताळता येतात. वायू पुराणात शिव आणि विष्णू या दोनही देवतांचा तितीकाच सन्मान केला गेला आहे. शिवाला विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ मानले आहे तर विष्णूच्या सूक्ष्म रूपाचा सर्वत्र संचारही सांगितला आहे. विष्णूला प्रकृती स्वरूप मानले आहे. त्यामुळे हरिहर मूर्तींमध्ये शिवाच्या वाम बाजूला जी अर्धनारीश्वर मध्ये पार्वतीची बाजू आहे त्या बाजूला, विष्णू अंकित करतात.

    शिवायविष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे ।
    शिवस्य हृदयं विष्णुर्विष्णोश्च हृदयं शिवः॥8॥
    ईशादिविंशोत्तरशतोपनिषदः (51- 60.8 )

    शिव म्हणजेच विष्णूचे रूप आणि विष्णू म्हणजेच शिवाचे रूप आहे. शिव विष्णूच्या हृदयात आहे आणि विष्णू शिवाच्या.

    या तत्त्वावर या हरिहर मूर्तीची संकल्पना मूर्त रूपात साकार झालेली आपल्याला दिसते.

    Harihara at Badami

    चालुक्य राज्यांची राजधानी असलेले बदामी इथे हरीहराची सर्वांत प्राचीन मूर्ती सापडते. बदामीच्या गुंफांमध्ये असलेल्या हरिहर मूर्तींचे अंकन दिसते. त्यातली एक मूर्ती चतुर्भुज असून शिवाच्या हातामध्ये मागे परशु आणि त्याला सर्प गुंडाळलेला आहे. पुढच्या हातामध्ये मातुलिंग आहे. विष्णूच्या मागच्या हातामध्ये शंख आणि पुढचा हात मांडीवर कटावलंबित मुद्रेत स्थिरावला आहे. शिवाला जटामुकुट आणि विष्णूला किरीटमुकुट दाखवला आहे. यज्ञोपवीत आहे. विविध आभूषणे आहेत. दुसऱ्या एका हरिहर मूर्तीमध्ये शंकराच्या बाजूस पार्वती आणि नंदी अंकित केले आहेत तर नारायणाच्या बाजूला लक्ष्मी आणि स्वस्तिक मुद्रेतील गरुड यांचे शिल्पांकन केलेले दिसते.

    बेंजामिन ल्युईस राईस1  या ब्रिटीश पुरातत्त्ववेत्ता आणि इतिहासकाराने संस्कृत, तेलगु, कन्नड आणि तमिळ भाषेतील अभिलेखांवर उल्लेखनीय काम केले आहे. त्याने एका अभिलेखातील उल्लेखावरून तुंगभद्रेच्या काठावर हरिहर नावाचे एक प्राचीन शहर असल्याचे मत व्यक्त केले आहे. एका प्रचलित लोककथेनुसार हे शहर गुहासूर नावाच्या असुराच्या अधिपत्याखाली होते. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे एकट्या शिव किंवा विष्णूला त्याचे पारिपत्य करणे शक्य नव्हते. त्याच्या निर्दालनासाठी शिव आणि विष्णू यांना हरिहर रूप धारण केले आणि त्याचा विनाश केला. या असुराचे निर्दालन तुंगभद्रा आणि हरिद्रा नदीच्या संगमावर झाले. या क्षेत्राला गुह्यारण्यक क्षेत्र हे नाव प्रचलित आहे. हरिहर हे शहर तिथल्या मंदिरासाठी प्रसिद्ध ज्या मंदिराची प्रमुख देवता हरिहर ही आहे. इ.स 1224 सालच्या शिलालेखामध्ये तसा उल्लेख आढळतो, ज्यात हरीहाराची स्तुती केलेली आहे.

    या मंदिराचे निर्माण कार्य आणि त्याचा जीर्णोद्धार या संबंधी विविध अभ्यासकांची वेगवेगळी मते आहेत. हेन्री कर्झीनच्या मते होयसळ राजा नरसिंह 2 याचा अधिकारी पोलवा ह्यानी ह्या मंदिराचा निर्माण केला आहे. पण अॅडम हार्डीच्या मते इ.स. 1124 मध्ये होयसळ राजा नरसिंह 2 याचा अधिकारी पोलवा यांनी या मंदिराचा निर्माण केला असावा. तेच होयसळ राजा नरसिंह 3 ह्याचा अधिकारी सोमनाथ दण्डनायक याच्या दानातून या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे असे मत डॉ. श्रीनिवास पडिगर यांनी मांडले आहे.

    याशिवाय आसाम, नेपाळ, राजस्थान, कर्नाटक, महाबलीपुरम आणि इंडोनेशिया इथल्या मंदिरांतही हरिहर मूर्तीचा आढळ आहे. या सर्व विवेचनावरून निश्चितच हे लक्षात येते कि इ.स. 5-6 शतकापासून शिव आणि विष्णूच्या या  संयुक्तमूर्ती प्रचारात होत्या. काळानुरूप त्यांची लोकप्रियताही वाढलेले दिसते. हरीहाराचे हे स्वरूप पुरुष आणि प्रकृतीचे स्वरूप म्हणून समाजामध्ये सर्वश्रुत होते हे वाङ्मयीन पुराव्यावरूनही स्पष्ट होताना दिसते. एकूणच ही दोन भिन्न तत्त्वांची सामुहिक वाटचाल हरीहाराय नमः मधून उमटते.

    Photo Credits : Wikimedia, BBC News

    1.
    Karnataka’s Rich Heritage – Art and Architecture. Google Books. https://goo.gl/p5pvaw.
  • उमामहेश्वराय नमः

    उमामहेश्वराय नमः

    ऋग्वेद काळापासून शिव देवतेच्या संकल्पनेच्या विकासातील रुद्राचे दैवतशास्त्रीय स्वरूप, शिवाय नमः  या लेख शृंखलेचा पहिला भाग रुद्राय नमः मध्ये बघितले. दुसऱ्या भागात, याच रुद्राने त्रिपुरांचा विनाश करणारा त्रिपुरान्तकाय नमः हा लेख आपण बघितला. आज शिवाचे, उमेसोबत परिवार देवतेत होणारे रूपांतरण बघणार आहोत. 

    शिव अर्धांगिनी उमा म्हणजेच पार्वती. हिमवान आणि मेना यांची कन्या पार्वती आणि शिव यांचा विवाह होतो आणि उमा, त्या महेश्वराची पत्नी होते. शिवतत्त्व हे या मनुष्यरूपी उमापेक्षा खूप भिन्न आहे. उमेचा जन्म शिवतत्त्वाशी एकरूप होण्याकरिता योजला होता. पूर्वजन्मात दक्ष कन्या सती आणि मग तीच पार्वती रूपात पुन्हा जन्म घेऊन शिवपत्नीत्व स्विकारते. शिवा आणि शिव यांच्या एकत्वाची साक्ष अर्धनारीश्वर स्वरूपात साकार होते. पण उमा महेश्वर मूर्तीत उमेचे स्वतंत्र अस्तित्व जे शिवाशी जोडले जात आहे अश्या स्वरूपात साकार होते. उमा महेश्वर म्हणजे संपूर्ण सृष्टीतील दैवी तत्त्व आणि त्या तत्त्वाशी संधान बांधणाऱ्या मानवी भावभावनांच्या मुग्धतेचे मूर्त रूप आहे. एक असा अनुबंध जो सृष्टीतील चैतन्य साकार करतो.

    उमा महेश्वराच्या अश्या अलौकिक प्रेमबंधाला शिल्पकारांनी शिल्पांमध्ये तर कवींनी काव्यबद्ध केले आहे. महाकवी कालिदासरचित कुमारसंभव हे माधुर्ययुक्त काव्य पार्वती-परमेश्वराला समर्पित आहे. चंद्रशेखर रूपातील राजस शिव, कोमलकांती हैमावतीचे पाणिग्रहण करतानाची, कल्याणसुन्दर मूर्ती या दोघांच्या मनातल्या मदनरंगाचे सुंदर चित्रण साक्षात समोर उभे करते. चंद्रशेखर शिव मूर्तीच्या विविध छटा या केवल चंद्रशेखर, कल्याणसुन्दर मूर्ती, उमासहित चंद्रशेखर, आणि सोमस्कंद मूर्तींमध्ये साध्य होतात. परंतु उमा-महेश्वर आलिंगन मूर्ती शिव-पर्वतीमधल्या दिव्य प्रेमाची अभिव्यक्ती करणारी मूर्ती आहे.

    Huvishka Coin Obverse
    Uma-Mahehswara Reverse

    उमा महेश्वराचे प्राचीन अंकन, कुषाण राजा कनिष्क याचा वारस, हुविष्कच्या नाण्यावर येते.  डॉ. मधुकर ढवळीकर यांच्या भारतीय नाणकशास्त्र मध्ये शिव आणि उमा यांची हुविष्कच्या नाण्यावरील अंकनाबद्दल माहिती मिळते. या नाण्याच्या दर्शनी बाजूस शिरस्त्राण आणि अलंकारांनी युक्त राजाचा अर्धपुतळा आहे. त्याच्या हातामध्ये राजदंड आहे. नाण्याच्या कडेने ग्रीक लिपीमध्ये शावनानो शाओ उएष्की कोशानो असा लेख आहे.  दुसऱ्या बाजूस, शिव आणि उमा एकमेकांच्या समोर उभे आहेत. शिवाच्या मागे प्रभावलय आणि डोक्यावर जटाभार आहे. अंतरीय नेसले असून शिव चतुर्भुज आहे. डाव्या हातामध्ये त्रिशूळ, मृग (?) आणि उजव्या हातामध्ये अंकुश आणि कमंडलू आहे. उमेने ग्रीक पद्धतीचा वेश परिधान केला असून ती द्विभुज दाखवली आहे.

    म्हैसूरचे राजा कृष्णराजा 3 ओडेयर इ.स. 1799–1868 यांच्या नाण्यावर उमा महेश्वर आलिंगन मूर्तीचे अप्रतिम अंकन आहे. शिव सव्य-ललीतासनात बसले असून उमा त्यांंच्या मांडीवर आसनस्थ झाली आहे. मागे शिवाकडे त्रिशूल आहे आणि उमेच्या बाजूस एका मृगाचे अंकन आहे. या नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर श्री कृष्णराजा हा लेख आहे.

    डॉ. नि. पु. जोशी यांच्या भारतीय मूर्तीशास्त्र यात गुप्तकालीन शिव-पार्वतीची मूर्ती मथुरा संग्रहालयात असलेल्या मूर्तीचा उल्लेख आहे. तसेच कुमारगुप्ताच्या काळातील अभिलेखीत मूर्ती कौसंबी इथे सापडल्याची नोंद आहे. या दोनही मूर्ती आलिंगन मुद्रेत नसून केवळ जवळ उभ्या आहेत. शिवाच्या डाव्या हातामध्ये कमंडलू आहे. उजव्या हातामध्ये अक्षमालेसह अभय मुद्रा आहे आणि उमेच्या हातामध्ये दर्पण आहे.  डॉ. गो. बं. देगलूकर यांच्या शिवमूर्तये नमः मधेही उमा महेश्वर आलिंगन मूर्तीचे विवेचन येते.

    शिल्पशास्त्र अश्या मूर्तीचा निर्माण करण्याचे निर्देश सांगते ते असे-  

    उमामहेश्वरं वक्ष्ये उमया सह शङ्कर | 
    मातुलिङ्गं त्रिशुलश्च धरते दक्षिणे करे ||
    आलिङ्गीतो वामहस्तें नागेन्द्रं द्वितीये करे | 
    हरस्कन्द उमाहस्ते दर्पणो द्वितीये करे ||  (रूपमंडन – 28)

    पत्नी उमा, शंकरासोबत आहे. ज्याच्या उजव्या हातामध्ये मातुलिंग आणि त्रिशूल आहे. डाव्या हाताने उमेला आलिंगन दिले आहे आणि दुसऱ्या हातामध्ये नागेंद्र आहे. उमेचा एक हात शिवाच्या स्कंदावर (खांद्यावर) स्थिरावला आहे आणि तिच्या दुसऱ्या हातामध्ये दर्पण आहे.

    Uma-Maheshwara 10 C.E. Rani Durgavati Museum, Jabalpur M.P.

    शिल्पकलेतील काही अंकनात उमा आणि महेश्वर त्रिभंग स्थितीत उभे असतात. बऱ्याचदा महेश्वर सव्य-ललीतासनात बसलेले आणि त्यांच्या डाव्या मांडीवर उमा बसलेली दाखवतात. कधी ते नंदीवर आरूढ असतात तर कधी शिवाच्या पायाशी नंदी आणि उमेच्या पायाशी सिंह किंवा गोधा (घोरपड) दाखवतात. शिव चतुर्भुज असून त्याच्या हातामध्ये मातुलिंग किंवा अक्षमाला, त्रिशूळ आणि सर्प असतो. एका हाताने त्याने उमेला आलिंगन दिलेले असते. उमेचा एक हात शिवाच्या खांद्यावर असतो आणि दुसऱ्या हातामध्ये दर्पण किंवा उत्पल असते. क्वचित उमाही चतुर्भुज अंकित केलेले असते. या अश्या अनेक मूर्ती सध्या भग्नावस्थेत आहेत. तरीही या पाषाणांच्या अंतरातले लालित्य शिल्पकाराने साकारलेले होते याची निश्चितच जाणीव होते. काही मूर्तीमध्ये शिव त्याच्या हाताने सलज्ज उमेच्या हनुवटीला हलका स्पर्श करून तिचा चेहरा वर उचलत आहे असे दिसते. उमा महेश्वराच्या लोचनांचे झालेले मिलन होऊन त्यांना पडलेला सृष्टीचा विसर या शिल्पांतून दिसतो. अश्याच उमा महेश्वर मूर्तींच्या अद्वितीय प्रेमाचे साक्षात दर्शन आपल्याला मथुरा, नाचणा, लातूर येथील निलंगा, नांदेड येथील कंधार, घारापुरी, वेरूळ, पट्टडकल आणि उत्तरेपासून अगदी दक्षिण भारतापर्येंत सर्वत्र असंख्य ठिकणी घडत राहते. शिवपार्वतीच्या मुग्ध स्नेहाचे, उमामहेश्वराय नमः हे स्वर काव्यातून, नाणी आणि शिल्पांसारख्या भौतिक साधनांमधून सतत मधून उमटत राहतात.