आपली संस्कृती

Home \ बोधसूत्र \ आपली संस्कृती

कोणी आपल्याला आपला परिचय विचारला की आपण स्वतःचा परिचय यथायोग्य करून देतो. पण खरचं आपल्या स्वतःची ओळख आपल्याला स्वतःला पटली आहे का? असा प्रश्न किती लोकांच्या मनात डोकावतो? स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर आधी आपल्या संस्कृतीची ओळख होणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती ही प्राचीन काळापासून म्हणजे सुमारे हजारो वर्षांपासून अविरत प्रवाहित होत आलेली संस्कृती आहे. अनेक थोर भारतीयांच्या बरोबरीने अनेक परकीयांना आपल्या संस्कृतीने मोहून टाकले. आपल्या भारतीय संस्कृतीची विविधता अभ्यासण्यास भाग पाडले, अश्या वैभवशाली संस्कृतीची थोरवी गाऊ तितकी कमीच आहे. त्यामुळे सुरुवातीलाच संस्कृती म्हणजे नेमकं काय? आणि ती आपल्याला काय देते हे जाणून घेऊ.

संस्कृती शब्दाची फोड सम् (उपसर्ग) + कृ (धातू) + क्ति (प्रत्यय) अशी आहे. संस्कृती आणि संस्कार हे दोन्ही शब्द सम् + कृ या धातूपासून बनलेले आहेत. संस्कारांनी मनुष्य एकदा परिष्कृत झाला की तो समाजात एक विशिष्ट स्थान प्राप्त करण्यास लायक होतो. या संस्कारित माणसाच्या समाजोपयोगी योगदानाने संस्कृती बहरते. त्यामुळे संस्कार आणि संस्कृती या एकमेकांशी परस्पर संबंध साधतात.

व्याख्या रूपात संस्कृतीला बघायचे झाले तर हा शब्द इंग्रजी “कल्चर” या शब्दाचा प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. काही मानववंशशास्त्रज्ञ (Anthropologist ), समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार “कल्चर” या शब्दाची व्याख्या अशी सांगतात-

इरावती कर्वे

मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी, पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय. मनोमय संस्कृती वस्तुरूप निर्मितीमुळे दृढरूप व दृढमूल होते आणि मनोमय संस्कृतीचे ज्ञान अथवा कल्पना आल्याशिवाय द्रव्यरूप संस्कृतीचे कार्यच कळणार नाही. संस्कृती नेहमी परंपरागत व म्हणून दिक्काल निर्बंधित अशी असते. संस्कृती समाजाची असते. व्यक्तींमध्ये संस्कृती साकारते, जिवंत होते, नव्याने निर्माण होते किंवा लय पावते; पण कोणतीही व्यक्ती कोणत्याही संस्कृतीचे स्वरूप पूर्णांशाने दाखवूच शकत नाही. संस्कृतीला व्यक्तिनिरपेक्ष असे एक निराळेच स्वतंत्र जीवन असते. व्यक्ती जन्माला आल्यापासून एका परंपरागत वस्तुरूप संस्कृतीने वेढलेली व अव्यक्त पण दृढ अशा सामाजिक परंपरेत गुरफटलेली असते. व्यक्तीच्या जीवन विकासाच्या मर्यादा संस्कृतीच्या या दोन अंगांनी निश्चित केलेल्या असतात.

E.B. Taylor

Culture is as that complex whole which includes knowledge, belief, art, morale, laws, custom and any other capabilities and habits as acquired by man as a member of society.

B. Malinowski

Culture is the handwork of man and the medium through which he achieves his ends.

R. Redfield

Culture is an organised body of conventional understandings manifest in art which persisting through tradition, characteristics a human group.

पं.जवाहरलाल नेहरू

संस्कृति का अर्थ मनुष्य का आन्तरिक विकास और उसकी नैतिक उन्नति है, पारम्परिक सदव्यवहार है और एक-दूसरे को समझने की शक्ति है।

मुळात संस्कृती या शब्दाची व्याप्ती प्रचंड असल्याने त्या शब्दाला व्याख्येच्या परिघात बांधता येणार नाही. तरीही संस्कृती म्हणजे समाजातील प्रचलित असलेला धर्म, रूढी-परंपरा, तत्त्वज्ञान, धार्मिक-सामाजिक-आर्थिक आणि राजकीय व्यवस्था असे त्या विशिष्ट समाजाचे असलेले चार आधारस्तंभ, कला, स्थापत्य, शास्त्र, नीती, साहित्य या सर्व घटकांमधून वेळोवेळी दर्शन देणारी ती म्हणजेच संस्कृती.

कुठलीही संस्कृती निर्माण होणे आणि ती बहरणे हे त्या संस्कृतीच्या मुल्यांवर ठरते. प्राचीन काळात अनेक संस्कृती उदयास आल्या आणि लय ही पावल्या. पण भारतीय संस्कृतीची मुळे इतकी खोलवर रुजली गेली की साहजिकच ही संस्कृती आजही आपल्याला भुरळ घालते. भारतीय संस्कृतीसारख्या प्राचीन आणि लोकप्रिय संस्कृतीचा अभ्यास करताना त्या सोबतच इतर अनेक घटक लक्षात घ्यावे लागतात. कुठलाही समाज हा पुढील तीन अवस्थांमधून अभ्यासता येतो. त्या तीन अवस्था म्हणजे – प्रकृती, संस्कृती आणि विकृती

प्रकृती ही कुठल्याही समाजाची सर्वात प्राथमिक अवस्था मानता येईल. यालाच मूळ स्थिती म्हणतात. त्या समाजात राहणाऱ्या व्यक्तिला संस्कारांनी परिष्कृत केले जाते आणि हळूहळू तो माणूस प्राथमिक अवस्थेतून प्रगत अवस्थेत प्रवेश करतो, यालाच संस्कृती म्हणतात. आणि सर्वात शेवटचे म्हणजे, हीच प्रगत संस्कृती आपल्या चरम सीमेला पोहोचते. त्यानंतर मात्र ती ढसळताना दिसते, ती विकृत होते. संस्कृतीतील अश्या अनिष्ट बदलांना अवनीत स्थिती म्हणतात, ज्यामुळे त्या संस्कृतीचा पुढे ऱ्हास होतो.

प्राचीन भारतीय समाज हा धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चतुःसूत्री प्रमाणे आपले जीवन व्यतित करत होता. भारतीय संस्कृतीत मात्र मानवाने आपल्या मनावर, आत्म्यावर संयम प्राप्त करून, स्वतःवर निरनिराळे संस्कार घडवून, स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठी योगदान देण्यास लायक बनून जीवनात प्रगती केलेली दिसते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संस्कृतीचे दोन विभागत वर्गीकरण केलेले आहे. अध्यात्मिक संस्कृती जी भारतात आढळते आणि आधिभौतिक संस्कृती जी जास्त करून पाश्चात्य देशात बघायला मिळते. परंतु पाश्चात्य संस्कृतीतही अध्यात्मिक संस्कृतीचे क्वचित धागे सापडतात.

भारतातील अध्यात्मिक संस्कृतीमध्ये आपल्याला केवळ धर्मच दिसतो असे नाही. तर त्याशिवाय नीती, कायदा, विद्या, कला, वाङ्मय असे विविध पैलूही बघायला मिळतात. उच्च अध्यात्मिक मूल्यांच्या सहाय्याने मानवाने त्याच्या अनेक इच्छा-आकांक्षांवर ताबा मिळवून सुख, समृद्धी, वैचारिक संपन्नता, सदाचार, बंधुत्व, आदर, सत्यनिष्ठा, सहिष्णुता, औदार्य यांसारख्या नीतीमूल्यांची जपणूक केली आहे. मनुष्याला त्याच्या जीवनातील वाटचालीत धर्म-अर्थ-काम-मोक्ष हा मार्ग पादाक्रांत करता यावा यासाठी विविध संस्था समाजात निर्माण झाल्या. भारतीय समाज उत्तम प्रकारे स्थिरावण्यासाठी आणि प्रगतीकडे मार्गक्रमण करण्याच्या हेतूने आश्रमव्यवस्था, शिक्षणसंस्था, विवाहसंस्था, कुटुंबसंस्था अश्या सामाजिक संस्थांच्या जडणघडणीतून दिसून येतो. या संस्थांनी माणसाला त्याच्या वैयक्तिक प्रगतीची संधी तर दिली सोबतच सामाजिक कर्तव्याची सदैव जाणीव करून देण्याचाही प्रयास केला. त्यामुळेच भारतीय संस्कृतीला इतके व्यापक स्वरूप प्राप्त झालेले आपल्याला दिसते.

 

संस्कृती आपल्याला काय देते

संस्कृतीचेही दोन टप्पे असतात. ते म्हणजे प्राथमिक आणि प्रगत. प्राथमिक अवस्थेत त्या संस्कृतीची मूल्य तयार होत असतात. पुढे अनेक परंपरा, मूल्य ही हळूहळू रुजतात. या प्रक्रियेला बराच कालावधी जावा लागतो. हा सरलेला कालावधी येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आदर्श इतिहास मागे ठेवून जातो. त्यामुळेच तर आपल्याला आपल्या संस्कृतीची खरी ओळख होते.

  • एकात्मता भाव

संस्कृती निर्मितीमध्ये अनेक घटक कारणीभूत असतात. जसे की भौगोलिक परिस्थिती, वैचारिक संपन्नता, मुल्यांचा ठेवा आणि त्या मानवासमोर जगण्यासाठी उपलब्ध असलेली परिस्थिती इ. यांमुळेच वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या संस्कृती निर्माण झालेल्या दिसतात. त्या संस्कृतीतील लोकांमध्ये मात्र आपण एकाच संस्कृतीने जोडलेलो आहोत ही भावना निर्माण होण्यास मदद होते. त्या विशिष्ट समूहांमध्ये एकात्मता भाव बघायला मिळतो.

  • हस्तांतरणशीलता

मानवाने संस्कृती निर्माण केली, की ती संस्कृती तो अधिकाधिक प्रगत अवस्थेकडे नेतो. परंतु ती संस्कृती प्रदिर्घ काळापर्येंत टिकावी यासाठी हस्तांतरणशीलता आवश्यक असते. भारतीय संस्कृती ही मौखिक परंपरेतून हस्तांतरित होत आपल्यापर्येंत आली आहे. निश्चितच सध्या आपल्या संस्कृतीत अनेक बदल झाले आहेत परंतु हस्तांतरणशीलता या गुणामुळेच भारतीय संस्कृती आजही आपल्याला बघायला मिळती आहे.

  • आदर्शवाद

संस्कृतीत निर्माण होणारी मुल्ये, कायदे, नियम आणि नीती आपल्याला ठराविक आदर्श देतात. जो आदर्शवाद जीवनातील विविध टप्प्यात मार्गदर्शक बनून त्या संस्कृतीच्या पाऊलखुणांवर आपल्याला मार्गक्रमण करण्यास सहाय्य करतो.

 

Dhanalaxmi
ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

6 thoughts on “आपली संस्कृती

  1. फारच छान.. उत्तम रीतीनं उलगडवलंस धनू. लिखाण शैली सुद्धा ओघवती, सोपी.. पटकन समजेल अशी.

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.