स्वाध्याय सुधा सूत्र 8 कलादेवी नमस्तुभ्यं

Home \ बोधसूत्र \ स्वाध्याय सुधा सूत्र 8 कलादेवी नमस्तुभ्यं

‘कला’ या शब्दाची व्याप्ती अपार आहे. कलेसारखी दिव्य शक्ती माणसाच्या जीवनाला सौंदर्य, उल्हास, लालित्य, प्रतिभेने संपन्न करते. कलेच्या दिव्यत्वाची प्रचिती जिथे येते, तिथे कलात्मक नवसृजन दिसतेच. कला म्हणजे नित्य साधना आणि नित्य चिंतन यांतून प्रगल्भ होत जाणाऱ्या अनुभूतीचा विषय आहे. त्यामुळे कलासाधनेत कोणतेच हमरस्ते उपयोगी पडत नाहीत.

कोणत्याही कलाकृतीचे सृजन होताना अनेकविध क्रिया या कार्यरत असतात, त्याचा वेध सहसा आपण घेत नाही. काही वर्षांपूर्वी मीही एक कलासाधक म्हणून, कलेच्या मुलभूत तत्त्वांना जाणण्याच्या जिज्ञासेने पाश्चात्य कलेचा इतिहास अभ्यासात होते. परंतु भारतीय कलेची परंपरा समजून घेण्यासाठी मात्र भारतीय विद्येनी मला ती दृष्टी दिली. भारतीय विद्या शाखेतील मूर्तिशास्त्र अभ्यासताना मला या विविध क्रिया-प्रक्रिया समजून घेता आल्या. कलाकाराच्या मनाचा वेध घेऊन, त्याने कलाकृतीमधून अभिव्यक्त केलेले व्यक्त आणि अव्यक्त अर्थ, शिल्पाच्या किंवा चित्राच्या माध्यमातून समजून घ्यावे लागतात, तेव्हा त्या कलाकृतीतील ‘रम्य‘ आकलनास अधिक सुगम होते.

मला कलेचे स्वरूप जाणून घेताना, भारतीय दृष्टीकोन हा अधिक अथांग आणि सखोल वाटतो. भारतीय कलेत काही तांत्रिक उणीवा असण्याची शक्यता आहे, पण प्रक्रिया समजून घेताना त्यामागील तत्त्वज्ञान अधिक अर्थबोध निमार्ण करणारे ठरते. भारतीय कलेच्या अभिव्यक्तीच्या सीमारेषा या केवळ अनुकरणाच्या कुंपणामध्ये बंदिस्त झाल्या नाहीत. मानवी भावभावनांच्या द्वारांनी कलात्मक अभिव्यक्ती ही थेट अंतरंगात उतरते.

याचे प्रत्यक्ष उदाहरण द्यायचे झाले तर, अजिंठ्यासारख्या लेण्यांमधील चित्रे ही आज जरी जीर्ण असली, तरी त्यातील प्रकट होणाऱ्या मनोभावांशी रसिकाला आजही समरसता साधता येते. असंख्य शिल्पवैभवाने भारताचा कानाकोपरा वेढलेला आहे. या एकसंध शिल्पांमधून किंवा काही भग्न शिल्पावशेषांमधून आजही विस्मय निर्माण होतो. हे भावरसयुक्त कलेच्या सादरीकरणने भारतीय कलाकारांनी साधले आहे.

जगभरातील अनेक विद्वान कलाकार, कला समीक्षक, तत्त्ववेत्ते यांनी अनेक पद्धतीने, अनेक अंगाने विचार करून कला आणि त्याची मूळतत्त्वे कायमच समोर ठेवली आहेत. कलेचे स्वरूप, तीची अभिव्यक्ती, कलेतील तत्त्वज्ञान यांवर एकमत होणे शक्य नाही आणि एकार्थी ते योग्यही नाही. विविध दृष्टीकोन, वैचारिक जडणघडण, बौद्धिक क्षमता अश्या अनेक घटकांवर कलेचे मूल्यमापन कलामीमांसक करतात, त्यामुळे त्यामध्ये एकवाक्यता दिसत नाही. परंतु आज भारतीय कलेला, भारतीय दृष्टीकोनातून समजून घेऊन प्राचीन भारतीय कलाकारांनी, तत्त्ववेत्यांनी साकारलेले, स्मरलेले कलेचे नेमके स्वरूप काय असेल, याचा वेध ‘कलादेवी नमस्तुभ्यं‘ या आजच्या सूत्राद्वारे मांडण्याचा एक प्रयास करते आहे. 

कलानां प्रवरं चित्रम् धर्मार्थ काम मोक्षादं।

विष्णूधर्मोत्तर पुराणांतर्गत उद्भृत आलेख्य कर्माचे महत्त्व इथे सांगितले आहे. कलांमधील उत्कृष्ट कला ही चित्रकला आहे, जी धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्रदान करणारी आहे. कला अभिव्यक्तीच्या विविध स्वरूपांचे महत्त्व हे महनीय आहे. त्यामुळे माझ्यादृष्टीने सर्वच कला या एकाच चिन्मयी शक्तीच्या विविध रूपा आहेत. या सर्व कला रूपांचे अद्वैत समजले पाहिजे, इतकेच.

भारतीय कला परंपरेत सर्व कलांचे आणि त्यांना सहाय्यक शास्त्रांचे एकमेकांशी असलेले समत्व स्वीकारलेले आहे. विविध कलाप्रकारांचे, कला सदरीकारांचे माध्यम हे भिन्न असले तरी ‘मोक्ष’ हे अंतिम ध्येय एकरूपाने मान्य केलेले आहे. अगदी प्रागैतिहासिक काळापासून सुरु असलेला हा मानवाचा कलाप्रवास त्याच्या बदलत्या धारणा, विचार, मूल्य, भीती, नीती यांचा समग्र पट उलगडून दाखवतो. पण कला म्हणजे नेमके काय, हे सर्वप्रथम जाणून घेऊया.

कला म्हणजे काय?

भारतीय दृष्टीकोनातून कलेचे स्वरूप समजून घेताना ‘कला’ या शब्दाचा ART या अर्थाच्या जवळ जाणारा पहिला उल्लेख भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये येतो. 

न तज्ज्ञानं न तच्छिल्पं न सा विद्या न सा कला |
नासौ योगो न तत्कर्म नाट्येऽस्मिन् यन्न दृश्यते ||

याचा अर्थ असा की, असे कोणतेही ज्ञान, शिल्प, विद्या, कला, योग अथवा कर्म नाही ज्यामध्ये नाट्य प्रदर्शित होत नाही. इथे स्वाभाविकच कलेचे स्वरूप हे ज्ञान, शिल्प, विद्या, योग आणि कर्म यांच्याहून निराळे असे अपेक्षित धरले आहे. यातील कलेचा अर्थ अभिनवगुप्त यांनी ‘कला गीतवाद्यादिका’ म्हणजे केवल गीत आणि वाद्य आदींच्या सोबत कला हा शब्द योजला आहे. परंतु भारतीय परंपरेत ‘कला’ पेक्षा ‘शिल्प’ हा शब्द कौशल्य, कारागिरी या अर्थाने अधिक आला आहे. अमरकोषामध्ये शिल्पं कर्म कलादिकम् असे म्हटले आहे, म्हणजे शिल्प हे कला किंवा कारागिरी आदि कौशल्यांचे नाव आहे. कौषीतकी ब्राम्हण ग्रंथामध्ये नृत्य आणि गीत यांनाही शिल्प म्हटले आहे. निघण्टुनुसार शिल्प शब्द हा कर्म या अर्थी आला आहे. शिल्प शब्द हा शील समाधौ या धातूपासून बनल्याने त्याचा अर्थ होतो मनुष्याच्या मनाला समाधान देणारे ते म्हणजे शिल्प. थोडक्यात शिल्प म्हणजे कौशल्ययुक्त कर्म आहे म्हणता येईल. जेव्हा कौशल्य हा अर्थ जोडला जातो तेव्हा कलाकृती सोबत तिची उपयोगीतही लक्षात घेणे आवश्यक आहे.

कलेचे स्वरूप

पाश्चात्य तत्त्ववेत्ते आणि कला समीक्षकांनी कलेच्या विभिन्न व्याख्या, विभिन्न सिद्धांतांच्या आधारे प्रस्तुत केल्या आहेत. अरिस्टॉटल कलेला केवल ‘अनुकरण’ असे म्हणतो. प्लेटो कलेची व्याख्या करताना म्हणतो, ‘कला म्हणजे कलेच्या सत्याच्या अनुकृतीची अनुकृती आहे’. हेगेलच्या मते, बाह्यप्रभावाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप म्हणजे कला, असे मानले आहे. इटालीयन दार्शनिक बेनोडीहो क्रोसे याने कलेचे स्वरूप सांगताना आत्मिक साक्षात्काराला प्राधान्य दिले आहे. इथे पाश्चात्य कला तत्त्ववेत्यांची मते देण्याचे तात्पर्य इतकेच होते की, भारतीय दृष्टीकोनातील कलेचे स्मरलेले स्वरूप समजावे. 

कला म्हणजे नवसृजन. कलाकाराच्या डोळ्यांनी जे ग्रहण (Observation) केले ते तसेच अगदी हुबेहूब अभिव्यक्त करणे हा कार्यभाग अपेक्षित नसतो. किंबहुना आबिंद्रनाथ टागोर म्हणतात त्याप्रमाणे, काही विशिष्ट अभिव्यक्तीच्या कारक परिणामांसाठी शास्त्राच्या चौकटीच्या बाहेर कलाकाराचे विचार जाऊ शकतात, आणि तेवढे स्वातंत्र्य हे कलाकारासाठी आवश्यक व कलाकृतीच्या दृष्टीने पोषक असतात. चित्ताला एकाग्र करून ब्रह्मचैतन्याच्या समग्र सारग्रहण कलाकृतीतून झिरपले पाहिजे. त्यामुळे नित्य साधना हा कलाकाराच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो.

भारतीय कलेमध्ये लौकिक आणि धार्मिक अश्या दोनही कलांचे दर्शन होते. तरीही बाह्य आणि भौतिक सौंदर्य हा भारतीय कलेतील केवल एक अंशमात्र आहे. परंतु दार्शनिक परंपरेप्रमाणेच भारतीय कला परंपरा अध्यात्मिक सौंदर्यावर निष्ठा ठेवणारी आहे. कलाकार कलाकृती निर्माण करताना त्याच्या अंतःपटलावर प्रसुप्त दिव्य संकल्पनांचे अमूर्त स्वरूप साकार करीत असतो. त्याच्या अंतस्थ भावभावनांना तो आकार, रंग, रूप प्रदान करीत असतो.

भारतीय कलेतील ध्येये ही मनुष्याच्या ऐहलौकिक रुपामध्ये कुंठीत झालेले नाही. चिन्मयानंदाच्या अनुभूतीसाठी देहाच्या स्थूल पातळीवर इंद्रियांना साधन बनवून आत्मानुभूतीच्या सूक्ष्मावास्थेपर्येंत पोहोचण्याचा कला हाही एक मार्ग आहे, जो भारतीयांना गवसला होता. जीवनाचे वैभव अनुभवायचे असले तर कलेचा आधार हा घ्यावाच लागतो. तत्त्वरूपाला मूर्त करण्याचे प्रेरणास्थान हाच भारतीय दृष्टीकोन आहे, असे मला वाटते. 

भारतीय कलेमध्ये अधिकाधिक आत्मिक ज्ञानाने संपन्न अश्या अभिव्यक्तींचा समावेश होतो. आत्मज्ञानाच्या साधनेत वस्तूंच्या तत्त्वांची जाणीव इंद्रियांच्या पलीकडे जाऊन ग्रहण करता येते आणि त्यांचे ‘सत्वरूप’ आकलन करता येते. अश्या प्रकारच्या अभिव्यक्ती अनेक कलाकृतीमधून दिसतात. उदाहरणा दाखल, शिवाच्या अनेक विग्रहांमधून कलासाधकाने त्या मूर्तीमधील सार साक्षात शिवस्वरूपात साकार केले आहे. शिव विग्रहांपैकी शिवाचे नटराज स्वरूप हे त्यापैकीची एक, अधिक सखोल तत्त्वज्ञानाने परिपूर्ण असे. केवळ नृत्य या क्रियेतून शिवाच्या सृष्टी, स्थिती, संहार, तिरोधान आणि अनुग्रह या दिव्य पंचक्रिया, शिल्पकार लीलया अभिव्यक्त करतो. हे तत्त्वज्ञानाचे अंश कलाकार त्याच्या ‘बौद्धिक ज्ञान‘ आणि त्याच्या पलीकडे साधनेने निर्माण होणारे ‘आत्मज्ञान‘ यांच्या समन्वयाने साध्य करत असतो. बाह्यइंद्रियांपेक्षा अंतर्मुखता अधिक प्रखर बनवून आत्मज्ञानाचे प्रतिबिम्ब त्या कलाकृतीमध्ये कलाकार उतरवतो.  

कलाकार, कलाकृती आणि रसिक

कोणतीही कलानिर्मिती होत असताना जी प्रत्यक्ष प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेतील तीन तत्त्वे ही अत्यंत महत्वपूर्ण असतात. या तीन तत्त्वांमधील पहिले महत्त्वाचे तत्त्व म्हणजे ‘कलाकार‘. दुसरे तत्त्व म्हणजे कलाकाराने निर्मित केलेली ‘कलाकृती‘आणि तिसरे म्हणजे त्या कलाकृतीचा आस्वाद घेणारा ‘रसिक‘. 

अंतःप्रेरणेने कलाकृती निर्माण करणारा कलाकार, हा त्याच्या मनःपटलावर संकल्पनेला मूर्त स्वरूप देतो, तिथेच खरतरं त्याच्या कलाकृतीचा जन्म होतो. म्हणजे कलाकृती ही साकार रूप घ्यायच्या पूर्वी कलाकाराच्या चित्तामध्ये निमार्ण झालेली असते. त्यानंतर ती कलाकृती साकार स्वरूप धारण करते ते प्रत्यक्ष कलाभिव्यक्तीतून. निर्मित कलाकृतीचा आस्वाद घेणारा आणि या प्रक्रियेतील तिसरा महत्वाचा घटक म्हणजे रसिक. या तीनही पातळ्या स्वतंत्र असल्या तरीही त्याचे कार्य हे एकमेकांच्या अस्तित्वावर आश्रित असते.

इथे कला प्रक्रियेचे दोन प्रवाह लक्षात घेणे आवश्यक आहेत. कला प्रक्रियेतील पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे, कलेचा कलाकाराकडून कडून होणारा अविष्कार. कलाकाराच्या कलाकृतीचे रसिकाद्वारा होणारे रसस्वादन हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे.

कलाकाराच्या कलात्मक अभिव्यक्तीचा प्रवास हा, कल्पनादृष्टीद्वारा (Visualization) रुपाकडे (Form) अश्या स्वरूपाचा असतो. म्हणजेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, अव्यक्ताकडून व्यक्तापर्यंत जाणारा असा हा मार्ग असतो. तेच रसिकाच्या बाबतीत मात्र हा प्रवास अगदी विरुद्ध असतो. रसिकासमोर कलाकृती ही तिच्या पूर्णरुपामध्ये साकार झालेली असते. रसिक ज्यावेळी त्या कलाकृतीचा रसास्वाद घेत असतो तेव्हा, तो त्या पूर्णाकाराकडून तत्त्वाकाराकडे जाण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजेच मूर्त स्वरूपाचे गर्भित तत्त्व किंवा त्या कलाकाराचा मनोभाव ज्यामधून ही कलाकृती व्यक्त झाली आहे, तिथेपर्यंत पोहचण्याचा हा रसिक मनाचा प्रयत्न असतो. या प्रक्रिये दरम्यान कलाकार, कलाकृती आणि रसिक यांच्यात सामायिक बंध निर्माण होतो, जो रसिकाला त्या कलाकृतीशी अनुभूतीच्या पातळीवर जोडून ठेवतो. अर्थात रसिकाला कलाकृतीतून मिळणाऱ्या आनंदानुभव हा सर्वथा त्याच्या मनोभाव, पूर्वानुभव, विचार आणि मूल्य यांच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे कलाकाराने साकारलेल्या मनोभावापर्यंत रसिक पोहोचेलच असे नाही.

आपल्याला भारतीय कलेचे उदात्त स्वरूप दिसते ते या कलाकारांच्या त्यागी रुपामध्ये. त्यागी हा शब्द मी जाणीवपूर्वक योजला आहे, तो का हे समजून घेऊया. भारतीय कलेमध्ये कलाकारांनी अनेक कलाकृतींचे सृजन केले हे खरे. परंतु या कलाकृतींचे स्वामित्व स्वीकारले नाही. कलाकृती ही जेव्हा एखाद्या अर्थकारणाचा भाग असते तेव्हा कला निर्मितीनंतर कलाकृतीशी कलाकाराला विभक्त होणे अपरिहार्य असते. पण तरीही कलाकृतीवर कलाकार त्याची स्वाक्षरी सोडू शकतो. इथे तसे दिसत नाही, काही क्वचित उदाहरणे सोडली तर कलाकृतीच्या कर्तृत्वाच्या वैयक्तिक खुणा कलाकारांनी मागे ठेवलेल्या दिसत नाहीत. एखादी कलाकृती निर्माण करताना कलाकार त्या कृतीला नव्याने जन्मच देत असतो. ती कलाकृती घडवताना अनेक तास, अनेक क्षण कलाकाराने कलाकृती सोबत घालवलेले असतात. कलाकृती जेव्हा पूर्णत्वाला जाते तेव्हा मात्र कलाकार स्वतःच्या भावनांची नाळ तोडून स्वतःला विभक्त करून घेतो. कलाकृतीवर विविध संस्कार करून ती कलाकाराचा नव्हे तर एका सामायिक बृहद कलाविष्काराचा भाग बनून लौकिक प्राप्त करते. ही कलाकाराची त्यागवृत्ति भारतीय मूल्यांमध्ये रुजली आहे. विष्णुधर्मोत्तर पुराणासारखे ग्रंथ ही अश्या मूल्यांना पुष्टी देतात.

कलानिर्मितीच्या प्रक्रियेची एक अखंड शृंखला असते. वात्सायनाच्या कामसुत्रावर यशोधर याने भाष्य लिहिले आहे. या भाष्यामध्ये त्याने कलेची षडांगे सांगितली आहेत, ती अशी – 

रूपभेदः प्रमाणानि भावलावण्ययोजनम।
सादृश्यं वर्णिकाभंग इति चित्रं षडंगकम्।।

अर्थात ती आलेख्य कर्माशी म्हणजेच चित्रकर्माशी निगडीत असलेली षडांगे आहेत, तरी शिल्प आणि चित्र या दोनही दृश्यकलांच्या आधारे त्यांच्या आढावा घेते येईल. या षडांगांच्या चिंतनातून भारतीय कलेचे स्वरूप अधिक विस्तृत आणि समग्रतेन आपल्या समोर मांडता येईल असे वाटते, ते पुढील काही भागांतून बघूया.

क्रमशः

– ज्येष्ठ अमावस्या शके 1943, शुक्रवार (9 जुलै 2021).

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.