भक्तशिरोमणी संत नामदेव

Home \ बोधसूत्र \ भक्तशिरोमणी संत नामदेव

मध्ययुगामध्ये संपूर्ण भारतात सुरु झालेल्या भक्तिपरंपरेतील एक महत्वाचे नाव म्हणजे भक्तशिरोमणी संत नामदेव. यांचा काळ इ.स १२७० ते इ.स. १३५० असा मानला जातो. 

ज्ञानदेव म्हणे तूं भक्त शिरोमणी |
जोडिले जन्मोनि केशव चरण ||

ज्ञानदेवांनी दिलेल्या ‘भक्तशिरोमणी’ या उपाधी वरूनच नामदेवांच्या भक्तभावाची कल्पना येते. भारतामध्ये त्या काळात मुसलमानी आक्रमणांनी जोर धरल्याने समाजात आणि जनसामान्यांच्या मनामध्ये अत्यंत अस्थिरता मजली होती. अश्या काळामध्ये स्वतः भक्तिमार्ग स्वीकारून प्रबोधन आणि जनशक्तीला जोडण्याचे कार्य या तत्कालीन संतांनी केले आहे. या संतांच्या मांदिआळीमध्ये नामदेवांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

संत बहिणाबाई म्हणतात – 

ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिलें देवालया |
नामा त्याचा किंकर | तेणें केलासे विस्तार || 

महाराष्ट्रात भागवतधर्मरुपी देवालयाचा पाया ज्ञानदेवांनी रचला. नामदेव महाराजांनी त्या धर्ममंदिराचा विस्तार त्यांच्या अखंड सेवेतून केला. भागवतधर्माची पताका थेट पंजाबापर्यंत नेऊन फडकावण्याचे कार्य नामदेवांनी केले आहे. 

नामदेवांची पांडुरंग भक्ती अपार होती पण ती डोळस नव्हती. सद्गुरूंचा कृपाशीर्वाद त्यांना मिळायचा अजून बाकी होता. एकदा संतांच्या मेळ्यात जेव्हा संत गोरोबांच्या परीक्षेला नामदेव उतरले नाहीत, तेव्हा पंढरपूरला जाऊन अंतर्मुख दृष्टीने विचार करू लागले. त्यांना त्यांच्यामधील उणिवांची जाणीव मनोमन जाणवायला लागली. सद्गुरू शिवाय ईश्वर प्राप्ती नाही, त्यामुळे पांडुरंगाच्या आदेशानुसार ते गुरूच्या शोधात औंढ्या नागनाथ येथे विसोबा खेचर यांना भेटायला गेले.

विसोबा खेचर यांचे नाव विसोबा चाटी. विसोबा हे आळंदीचे चाटी होते म्हणजे कापड व्यापारी. ज्ञानदेव आणि भावंडांचा त्यांना मोठा तिरस्कार होता. पण मुक्ताईसाठी ज्ञानदेवांनी त्यांच्या योगबलाने पाठीवर मांडे भाजले, तेव्हा विसोबांचा अहंकार गळून पडला. ते ज्ञानदेवांच्या चरणावर पडले आणि अनुतापाच्या अश्रूंचा त्यांच्या चरणांवर अभिषेक केला. ज्ञानदेवांना त्यांनी गुरु केले. ज्ञानेश्वरांनी विसोबांना ‘तु खेचर आहेस, खेचर बनण्यापेक्षा वेगाने आकाशाच्याही पलीकडे जा’ असा उपदेश केला. (इथे खेचरचा अर्थ ‘ख’ म्हणजे आकाश आणि ‘चर’ म्हणजे चालणारा म्हणजे आकाशामध्ये विहरणारा असाही होतो.) विसोबांनी गुरुपदेश शिरसावंद्य केला आणि परा, पश्यन्ति, मध्यमा, वैखरी या चार वाणींच्या पार जाण्याची साधना ते करीत राहिले. अश्या दिव्य विभूतीला गुरु करून घ्यायला नामदेव जात होते. खेचर- नामदेव यांच्या भेटीचे हे वर्णन नामदेवांच्या अभंगांमधून येते. 

देव म्हणे नामया विसोबा खेचरासी | शरण तयासी जावें वेगीं |१|२९६ अ . 
इतुकें ऐकोनि नमियेलें देवा | चालियेला तेव्हां विसोबापाशीं |२|
चिंताग्रस्त नामा आला आंवढ्यासि | पुढें देउळासी देखियेलें |३|
नामा तयेकाळीं गेला देउळासी| देउळीं कौतुकासी देखियेलें |४|

नामदेव औंढ्या नागनाथ मंदिरात विसोबा खेचर यांना भेटायला गेले तेव्हा, चित्र काही वेगळेच होते. एक वृद्ध पिंडीवर पाय ठेवून निवांत झोपलेले दिसले. 

देवावरी पाय ठेवूनि खेचर| निजेला परिकर निवांतचि|१|२९६ ब. 
देखोनियां नामा पावला विस्मया| कैसा हा प्राणिया देवो नेणें|२|
उठींउठीं प्राण्या आंधळा तूं काय | देवावरी पाय ठेवियेले |३|

विसोबांना असे पाहून नामदेवांनी त्यांना हटकले आणि पाय पिंडीवरून बाजूला काढायला सांगितले. 

विसोबा खेचर बोले नामदेवा| उठविलें जीव कारे माझ्या |४|
देवावीण ठाव रिता कोठें आहे| विचारोनि पाहें नामदेवा |५|
जेथें देव नसे तेथें माझे पाय|ठेवीं पां अन्वय विचारूनी |६| 

तेव्हा विसोबांनी नामदेवांना सांगितले कि, जिथे देव नाही तिथे त्यांचे पाय ठेवावे. परंतु नामदेव विसोबांचे पाय जिथे जिथे ठेवत होता तिथे शिवपिंड निर्माण होत होती. नामदेवाला सर्वत्र देव दिसू लागला. विसोबांनी हा दृष्टांत नामदेवांना दिला.

नाम आणि रूप दोन्ही जया नाहीं |
तोचि देव पाहीं येर मिथ्या |12|

विसोबा खेचरांच्या सानिध्यात नामदेवांना दिव्य दृष्टी लाभली. या संत समन्वयातून नामदेवाचा पदभाव आणि जीवभाव (पिंड) दोन्हीही नाहीसे करून विसोबांनी नामदेवांच्या भक्तीला ज्ञानदृष्टीची जोड दिली. 

तुझें निजसुख तुझ्यापाशी आहे| विचारूनी पाहें मनामाजी |
विवेकवैराग्य शोधूनियां पाहे| तेणें तुज होय ब्रह्मप्राप्ती ||
ज्ञानाचा प्रकार सहजची झाला | अहं भाव गेला गळोनियां |
खेचर विसा म्हणे जेथें ओंकार निमला | सहजची झाला ब्रह्ममूर्ती|

जशी वीज पडावी तसा साक्षात्कार नामदेवांना झाला. गुरूच ज्ञानाचे द्वार खुले करू शकतात याची जाणीव नामदेवांना झाली. आपल्या गुरुविषयी कृतार्थ भावाने नामदेव म्हणतात – 

सद्गुरूनायकें पूर्ण कृपा केली | निजवस्तु दाविली माझी मज |
माझें सुख मज दावियेलें डोळां | दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा |
तया उतराई व्हावें कवण्या गुणें| जन्मा नाही येणें ऐसें केलें |
नामा म्हणे निकी दावियेली सोय| न विसरावे पाय विठोबाचे |

नामदेवांना सद्गुरूकृपेचा स्पर्श झाला आणि नामदेवांच्या भक्तीला ‘नाचूं कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप लावूं जगीं’ या ध्येयाची जोड मिळाली. भक्ति सोबतच त्यांचे कार्य समाजाभिमुख होण्यास सुरुवात झाली. संत हे कोण्या एका प्रदेशासाठी नाही तर समाजासाठी उपकारक असतात. समाजातील सौहार्द जोडून ठेवण्याचे कार्य ही संत मंडळी त्यांच्या दृष्टांतांतून, सिद्धांत्तातून वेळोवेळी करीत असतात. तेच कार्य नामदेव आणि तत्कालीन संतांनी केले. 

नामदेवांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार अनुभवले. पांडुरंग भक्तीचा आनंद अनुभवला,  ज्ञानेश्वर तर नामदेवांच्या हृदयी वसलेले होते. ज्ञानदेवांच्या भावार्थदीपिकेच्या लेखनाचे नामदेव साक्षी आहेत. ‘नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी’ म्हणत नामदेव भावार्थदीपिकेला ‘ज्ञानेश्वरी’ संबोधतात. संत मेळ्यासोबत त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केली आहे. ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ, सोपान आणि मुक्ताबाई या भावंडांच्या समाधीनंतर नामदेवांचे जीवन अजूनच पालटले. 

कासाविस प्राण मन तळमळी | जैसी कां मासोळी जीवनविण |
दाही दिशा वोस वाटती उदास | करिताती सोस मनामाजीं |

ज्ञानदेवांच्या समाधीवेळी नामदेवांची, सर्व संत मंडळींची आणि जनसामान्यांची व्याकुळता डोळ्यातून एकसारखी झरत राहिली. ज्ञानदेवांनंतर नामदेवांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. पुढे नामदेव उत्तरेत गेले आणि भागवत् भक्तीचा अधिकाधिक विस्तार केला.

भक्ती मार्गावर संकीर्तन करीत देवगिरीपासून अगदी उत्तर भारतापर्यंत समाजातील सुरु असलेल्या धर्मभंजन युगाचे ते साक्षी होते. अश्या परिस्थितीत त्यांनी तीर्थयात्रा करून जनसामान्यांच्या मनामध्ये उर्जेची ज्योत जागवण्याचे कार्य केले. 

मराठी सोबतच हिंदीतील खडी बोली मध्ये त्यांनी लिहिलेली अनेक पदे उत्तरेतील समाजात अतिशय लोकप्रिय झाली, नव्हे तर घराघरात आणि मनामनामध्ये रुजली. पंजाबमध्ये विष्णुस्वामी, बहोरदास, जाल्लो, लध्धा, केसो नामक नामदेवांचे काही शिष्यही झाले. नामदेवांच्या विचारांचा वारसा गुरु ग्रंथ साहिब मधील गुरुबानीमध्ये सतिगुरु (सद्गुरू) नानकदेव यांनी जपला, जो आज सिक्ख बांधव जपत आहेत. गुरु ग्रंथ साहिब मधील गुरुबानी किंवा गुरुमुख म्हणजेच ब्रह्मज्ञानी गुरूंच्या मुखातून उद्बृत झालेले ज्ञान एकत्र केले आहे, जे सिक्खांच्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत. या गुरुबानी मध्ये पंधरा भक्त, संत, सूफी संत यांची वाणी संकलित केली आहे, त्यात अग्रक्रमाने नामदेव महाराजांचे नाव घ्यावे लागते. भगत (भक्त) नामदेवांची ही पदे सिक्ख लोकांच्या नित्य पठणाचा भाग आहेत. नामदेव वाणीच्या स्मृती मनामध्ये ठेऊन सिक्ख लोक औंढ्या नागनाथ आणि नामदेवांच्या अनेक स्मारक मंदिरांना हजारोच्या संख्येने भेट देतात. 

आयुष्यातील उत्तरार्ध नामदेवांनी पंजाब प्रांतामध्ये घालवला असला, तरी शेवटच्या क्षणी ते विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरास आले.  

वैकुंठासी आम्हां नको धाडू हरी | वास दे पंढरीं सर्वकाळ ||

असे म्हणत श्रीक्षेत्र पंढरपुर येथील महाद्वारात आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ म्हणजे इ.स. १३५० ला नामदेव महाराजांनी समाधी घेतली.पांडुरंगाच्या सगुण भक्तीपासून सुरु झालेला नामदेवांच्या भक्तीचा प्रवास, द्वैताचे पाश तोडून सायुज्यतेला प्राप्त होतो. त्यांचे समग्र जीवन टप्याटप्याने उन्नत होत गेलेले दिसते. ज्ञानदेवांच्या सानिध्यानंतर गुरुचा शोध, विसोबा खेचरांची भेट आणि ज्ञानप्राप्तीने तेजाळलेले नामदेव पुढे महाराष्ट्रातून निघतात ते थेट पंजाबातील घुमानपर्यंत जाऊन पोहोचतात. भक्तशिरोमणी नामदेव यांचे व्यक्तित्व आणि कर्तुत्व इतके मोठे आहे की थोडक्या शब्दांत मांडणे केवळ अवघड आहे, परंतु औंढ्याच्या मंदिरावर अभ्यास करताना नामदेव, विसोबा खेचर आणि तत्कालीन समाजाला थोड्या अधिक प्रमाणात आणि प्रयत्नपूर्वक जाणता आलं, इतकंच. आज कार्तिक शुद्ध एकादशी, भक्तशिरोमणी संत नामदेव यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे पुण्यस्मरण करून नामदेवांच्या चरणी ही माझी शब्दसेवा विनम्रभावे समर्पित करते आहे.

कार्तिक शु. एकादशी शके 1944, भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज जयंती (4 नोव्हेंबर 2022, शुक्रवार)

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.