द्वादश ज्योतिर्लिंग

Home \ बोधसूत्र \ द्वादश ज्योतिर्लिंग
twelve_jyotirlingas_of_siva

भारतामध्ये भगवान शिवाला समर्पित अनेक शैवक्षेत्र आसेतुहिमाचल पसलेली आहेत. परंतु भारतीय परंपरेत या शैव क्षेत्रांमध्ये द्वादश ज्योतिर्लिंग ही विशेष महत्त्वाची आहेत. शिवाय परंपरेने या स्थानांना तीर्थक्षेत्राचे महत्त्व लाभलेले आहे. त्यामुळे या द्वादश ज्योतिर्लिंगाची यात्रा भाविक पुण्यार्जनासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी करतात. या बारा ज्योतिर्लिंगांच्या समूहामध्ये अनेक साधर्म्य आहेत. या ज्योतिर्लिंगांपैकी बहुतांश ही अनादितीर्थे म्हणता येतील. म्हणजेच ज्योतिर्लिंग संकल्पनेचा उद्भव होण्यापूर्वीही अगदी प्राचीन काळापासून या बारा स्थानांना धार्मिक आणि ऐतिहासक महत्त्व आहे. याशिवाय अनेक प्राकृतिक वैशिष्ट्ये या स्थानांना अधिक विलोभनीय बनवितात. या ज्योतिर्लिंग असलेल्या बारा स्थानांवर असलेली शिवालये ही भारतीय स्थापत्य आणि संस्कृतीचा सुरेख संगमही दाखवतात. त्यामुळे भगवंताच्या दर्शनास आलेल्या सश्रद्ध भाविकाच्या अंतर्मनाला इथले निसर्गाच्या सानिद्ध्यात सारूप झालेली ही देवालये तृप्ती प्रदान करतात. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचा उद्भव आणि त्याची महत्ता ही, विविध पौराणिक कथा, स्थळमहात्म्य आणि परंपरेने समाजात रूढ असलेल्या लोककथांमधून अधोरेखित केली आहेत. 

सूत्रवाङ्‌मयात, स्मृति ग्रंथ, महाभारत यांमधून अनेक तीर्थांचे महत्त्व विशद केले आहेत. या तीर्थांमध्ये या द्वादश ज्योतिर्लिंग यादीतील बहुतांश पुण्यक्षेत्रांचा उल्लेख येतो. परंतु द्वादश ज्योतिर्लिंग संकल्पनेचा प्रथम उल्लेख येतो तो शिवपुराणामध्ये. शिवपुराणाच्या ज्ञानसंहितेमध्ये द्वादश ज्योतिर्लिंगांची यादी प्रथम येते. शिवपुराणाच्या शतरुद्रसंहिता आणि कोटीरुद्र संहितेमध्ये या ज्योतिर्लिंग संकल्पनाचा विकास प्रभावीपणे दिसतो. शिवाचे बारा अवतार या स्वयंभू ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये प्रकट झाले असा उल्लेख यामध्ये येतो.

सौराष्ट्रे सोमनाथश्च श्रीशैले मल्लिकार्जुनः ।।
उज्जयिन्यां महाकाल ओंकारे चामरेश्वरः ।।२।।
केदारो हिमव त्पृष्टे डाकिन्याम्भीमशंकरः ।।
वाराणस्यां च विश्वेशस्त्र्यम्बको गौतमीतटे ।। ३ ।।
वैद्यनाथश्चिताभूमौ नागेशो दारुकावने ।।
सेतुबन्धे च रामेशो घुश्मेशश्च शिवालये ।।४।। – शिव.पु.३.४२.२-३

 या द्वादश ज्योतिर्लिंगांमध्ये श्रीसोमनाथ (सौराष्ट्र), श्रीमल्लिकार्जुन (श्रीशैल), श्रीमहाकालेश्वर (उज्जैन), श्रीओमकारेश्वर (अमरेश्वर), श्रीकेदारनाथ (हिमालय), श्रीभीमाशंकर (डाकिन्य), श्रीविश्वेश्वर (वाराणसी), श्रीत्र्यम्बकेश्वर (नासिक), श्रीवैद्यनाथ (चिताभूमी), श्रीनागेश्वर (दारूका वन), श्रीरामेश्वर (सेतुबंध) आणि श्रीघृष्णेश्वर यांचा उल्लेख केला आहे.      

या द्वादश ज्योतिर्लिंग स्थानांचा थोडक्यात परामर्श घेऊया – 

1.श्रीसोमनाथ (सौराष्ट्र) 

सौराष्ट्र देशे विशदेsतिरम्ये, ज्योतिर्मयं चंद्रकलासतंसम् |
भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्यते || 

सौराष्ट्र देश म्हणजे सध्याच्या काठियावाड प्रदेशांतर्गत असलेल्या प्रभास क्षेत्रामध्ये भगवान शिव सोमनाथ रुपात अवतरीत झाले आहेत. शिवमहापुराणामध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या उद्भवाची कथा येते. या पौराणिक कथेनुसार दक्ष प्रजापती त्याच्या सत्तावीस कन्यांचा विवाह चंद्रासोबत लावून देतो. परंतु या सर्व कन्यांमधील चंद्राचे रोहिणीवर सर्वाधिक प्रेम असल्याने त्याच्या इतर सव्वीस भार्या कष्टी होत्या. या दुःखी कन्यांनी त्यांची व्यथा तिच्या पित्याला म्हणजे दक्ष प्रजापतीला सांगितली. प्रजापती दक्षाने चंद्राला सर्वांना समान वागणूक द्यावी हे अनेकदा सुचवूनही चंद्राने काही ऐकले नाही. शेवटी प्रजापतीने चंद्राला शाप दिला की तो क्षयी होऊन पडेल. त्यायोगाने चंद्रमा क्षयग्रस्त झाला. चंद्राचे सुधावर्षण कार्य थांबले. चंद्राने इंद्र, देवता, वसिष्ठ आदि ऋषी मुनी यांना उपाय विचारला पण कोणाकडे चंद्राच्या या रोगमुक्तीचे उत्तर नव्हते. चंद्रमा पितामह ब्रह्मदेवाला शरण गेला. ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार चंद्राने रोगमुक्तीसाठी प्रभास तीर्थामध्ये मृत्युंजय भगवानाची आराधना आरंभली. निरंतर सहा महीने सोमाने घोर तपश्चर्या केली. साक्षात भगवान मृत्युंजय संतुष्ट होऊन प्रकट झाले. भगवान शिवाने चंद्रमाला रोगमुक्त करून त्याला अमरत्व प्रदान केले. चन्द्राने त्याचा क्षय पूर्णपणे वारित करण्याची कामना केली. त्यावर भगवानांनी वरदान दिले –

पक्षे च क्षोयतां चन्द्र कला ते च दिने दिने |
पुनश्च वर्द्धतां पक्षे सा कला च निरन्तरम् ।। – शिव.पु. ४.१४.४५

कृष्णपक्षामध्ये प्रतिदिन चंद्राची एकएक कला क्षीण होईल. तसेच शुक्लपक्षामध्ये त्याच क्रमाने के एक कला वाढत जाईल आणि पौर्णिमेला पूर्ण कलायुक्त आणि तेजस्वी सुधाकाराचे दर्शन होईल. 

चंद्रदेवाची रोगमुक्ती आणि भगवान आशुतोषाने त्याला दिलेले वरदान बघून सर्वच देवता प्रभास क्षेत्री आले. सर्व देवानी शिवाला प्रार्थना केली की आपण उमा सहित या पुण्यक्षेत्री वास करावा. यावर भगवान प्रसन्न झाले. सोमाच्या तपश्चर्याचे फलस्वरूप आणि भक्तांच्या उद्धारासाठी ‘सोमनाथ’ नावाने सदा-सर्वदा प्रभास क्षेत्री स्थिर झाले. या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे ‘अन्तकेश’ नामक उपलिंगाचेही वर्णन शिवपुराणात येते. 

सध्या गुजरात राज्यामध्ये सोमनाथ पाटण, वेरावळक्षेत्र, प्रभासक्षेत्र, अनंतपूर, पाटण-सोमनाथ अश्या विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्री सोमनाथाचे एक सुंदर देवालय आहे आणि आजूबाजूला अनेक पवित्र कुंड आहेत. वल्लभी मैत्रक राज्यांच्या कारकिर्दीमध्ये या मंदिराचा निर्माण झाला आहे. गुर्जर प्रतिहार राज्यांनी इ.स.८१५  मध्ये या क्षतिग्रस्त मंदिराचे रक्षण करून पुननिर्माण केल्याचा उल्लेख मिळतो. आठव्या शतकात अरबांच्या स्वाऱ्यात हे देवालय उद्ध्वस्त झाले. सोळंकी (चौलुक्य) घराण्याच्या कारकिर्दीत ९४१ मध्ये सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी झाली. पहिल्या भीमदेव राजाच्या कारकिर्दीत १०२४ मध्ये महमूद गझनीने सोमनाथवर स्वारी केली आणि शिवमंदिराची मोडतोड करून तेथील अगणित संपत्ती लुटून नेली. पुढे अनहिलवाडच्या कुमारपाल राजाने इ.स.११६९ मध्ये सोमनाथ मंदिर पुन्हा बांधले. इराणच्या झकेरिया कझीनी या प्रवाशाने इ.स.१२६३ मध्ये या स्थळाला भेट दिली होती. तो लिहितो, “सोमनाथची मूर्ती भव्य असून शिवपिंडीखाली विपुल द्रव्य व रत्नांच्या राशी होत्या. मंदिराचे सर्व शिल्प अप्रतिम असून सुंदर नक्षी व कलाकृतींनी युक्त होते. मंदिरासमोर २०० मण वजनाची प्रचंड सुवर्णशृंखला व घंटा होती.” हे मंदिर १२९९ मध्ये अलाउद्दीन खिलजी याने उद्ध्वस्त केले. तेव्हा जुनागढचा चुडासमा राजा महिपाल याने त्याचा इ.स.१३२५ मध्ये जीर्णोद्धार केला. यानंतर हे शिवमंदिर सुस्थितीत दिमाखाने अवशिष्ट होते, परंतु पुढे महमूदशाह बेगडा नावाच्या सम्राटाने ते उद्ध्वस्त करून त्या जागी मशीद बांधली. त्यानंतरही सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे प्रयत्न झाले पण औरंगजेबाने त्याची मोडतोड केली.

भग्नावस्थेत असताना अहिल्याबाई होळकर या धर्मशील शिवभक्त राणीने इ.स.१७८३ मध्ये मूळ मंदिराची पीठिका बदलून त्याच्या जवळच दुसऱ्या जागेवर सोमनाथ मंदिर बांधले. या मंदिराच्या भोवताली पार्वती, लक्ष्मी, गंगा, नंदी, सरस्वती इ. देवतांच्या मूर्ती आहेत. कालांतराने हे मंदिरही मोडकळीस आले. स्वातंत्र्योत्तर काळात मंदिराच्या मूळ पीठिकेवरच त्याचे बांधकाम पालिताणा येथील प्रसिद्ध स्थापत्यविशारद प्रभाशंकर सोमपुरा यांनी केले. ११ मे १९५१ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते आणि वेदमूर्ती तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वेदघोषाने श्रीसोमनाथाच्या ज्योतिर्लिंगाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. 

भारतातील आद्य ज्योतिर्लिंगाचा मान सोमनाथ आहे. करोडो भाविकांचे हे श्रद्धास्थान भारताच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतिक आहे. म्हणूनच २०२१ साली भारताचे पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांनी जुना सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा पाया घातला. तसेच तिथे पार्वती मंदिराचेही निर्माण कार्य सुरु केले आहे. भाविक जेव्हा श्रीसोमनाथाच्या भेटीस येतील तेव्हा ‘सोमनाथ प्रदर्शन केंद्र’ ही उभारण्यात आले आहे. धर्म आणि संस्कृती सोबतच पर्यटनाच्या समृद्ध किनारा या श्रीसोमनाथ ज्योतिर्लिंगाला आजच्या युगामध्ये लाभत आहे.    

2.श्रीमल्लिकार्जुन (श्रीशैल) 

श्रीशैलश्रृङ्ग विविधप्रसङ्गे शेषाद्रिश्रृङ्गेsपि सदा वसन्तम् |
तमर्जुन मल्लिकपूर्वमेन नमामि संसारसमुद्रसेतूम् ||

आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या श्रीशैल पर्वतावर असलेले दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजे मल्लिकार्जुन. भगवान शंकराचा द्वितीय अवतार श्रीशैल या स्थानी झाला. मल्लिकार्जुन भगवानांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी इथे वाहणारी कृष्णा नदी ही ‘पाताळगंगा’ आणि मल्लिकार्जुन मंदिर हे ‘दक्षिणेचे कैलाश’ आहे. 

श्रीशैलम् हे स्थान प्राचीन काळापासून पुण्यक्षेत्र मानलेले आहे. महाभारतामध्ये श्रीशैल पर्वतावर जाऊन शिव पूजन केल्याने अश्वमेधयज्ञाचे पुण्य प्राप्त होते असा उल्लेख येतो. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची महती ही शिव आणि पद्मपुराण यांमध्ये आली आहे. या ज्योतिर्लिंगाची कथा येते ती अशी, एक दिवस गणेश आणि स्कन्द यांच्यामध्ये कोणाचा विवाह प्रथम व्हावा यावर विवाद होतो. यावर सुवर्णमध्य काढत भगवान शंकर त्यांच्या दोन्ही पुत्रांना पृथ्वी प्रदक्षिणा घालून यायला सांगतात, जो सर्वांत आधी पोहोचेल त्याचा प्रथम विवाह केला जाईल असे सांगतात. महाबली स्कन्द पृथ्वी प्रदक्षिणेस निघतात. परंतु गणेश मात्र विचार करतात की संपूर्ण पृथ्वी परिक्रमा करणे कठीण आहे, त्यामुळे गणेश शिव-पार्वती यांना पुजून त्यांच्याच भोवतीने परिक्रमा पूर्ण करतात. याचे फलित गणेशाचा विवाह संपन्न होतो. पार्वतीनंदन स्कन्दाला जेव्हा झाला प्रकार समजतो तेव्हा परिक्रमा करून स्कन्द क्रौंञ्च पर्वतावर जातो. देवता, ऋषी-मुनी यांच्या समजावण्यावरही स्कन्दाचा क्रोध शमत नाही म्हटल्यावर शिव-पार्वती स्वतः त्याची समजूत काढण्यास जातात. परंतु स्कन्द क्रौंञ्च पर्वतावरून तीन योजन दूर निघून गेला. आपला पुत्र आपल्यापासून दूर गेला या जाणीवेने शिव-पार्वती दोघेही ज्योतिस्वरूप होऊन तिथे स्थिर झाले. हेच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग म्हणून कीर्तिमान झाले. 

याशिवाय मल्लिकार्जुन मंदिराशी निगडीत एक लोककथा आहे. चंद्रावती नावाची एक वन निवासी कन्या होती. वनविहार करताना तिने पहिले की कपिला गाय एका बिल्व वृक्षाखाली उभी राहून तिच्या स्तनांमधून दुधाची धार जमिनीवर पाडत आहे. असाच प्रसंग अनेक दिवस  पाहिल्यावर चंद्रावतीने दुधाची धार जिथे पडत होती ती जमीन उकरून पाहिली. चंद्रावतीला तिथे स्वयंभू शिवलिंग दिसले, भगवान शिवाने साक्षात प्रकट होऊन चंद्रावतीला या ज्योतिर्लिंगाची आराधना करायला सांगितली. तिने इथेच शिवमंदिराची उभारणी केली. काही काळाने चंद्रावतीला मुक्ती मिळाली आणि ती वायुयानामध्ये बसून कैलासावर शिवचरणात विलीन झाली. अश्या आशयाचे एक शिल्प या मंदिरावरही आहे.

मल्लिकार्जुन मंदिराचा इतिहास पाहिला तर श्रीशैल इथे सातवाहन राजघराण्याची सत्ता होती असे अभिलेखातील नोंदीवरून स्पष्ट होते. सातवाहन राज्यांपैकी सातकर्णी राजा हा श्रीमल्लिकार्जुन स्वामींचा निस्सीम भक्त होता. इ.स. तिसऱ्या शतकातील काही प्राचीन धर्मग्रंथांमध्ये सातकर्णीच्या अधिपत्याखाली असलेल्या श्रीशैल येथील जमिनीचा उल्लेख येतो. सातवाहनांनंतर इक्ष्वाकू, कदंब, पल्लव अश्या  राजघराण्यांची सत्ता आंध्रावर होती. बदामी चालुक्यांच्या काळात पुलकेशी याने अनेक मंदिरे बांधल्याचा उल्लेख येतो. इ.स ७३५-७५५ दरम्यान राष्ट्रकुट राजा दान्तिदुर्ग याने श्रीपर्वत आणि आसपासच्या भूभागावर राज्य केले. दाक्षिणात्य शैलीचे हे मंदिर शिल्पसमृद्ध अश्या उंच गोपुरांनी वेढलेले आहे. ९८०-१०५८ च्या दरम्यान कल्याणी चालुक्यराजा त्रैलोक्यमल्ल देवाने या मंदिराच्या गर्भगृहावर गोपुराची स्थापना केली. १४ व्या शतकातील विजयनगर राजघराण्याची सत्ता आल्यावर श्रीकृष्णदेवरायाने मंदिराच्या दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेकडील गोपुराचे बांधकाम करून घेतले आहे. श्रीकृष्णदेवरायाचा मंत्री चंद्रशेखर यानेही एक मंडप बांधून घेतल्याचा उल्लेख येतो. विशेष म्हणजे या मंदिराचे उत्तर गोपूर आणि अन्नछत्र हे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेशावरून बांधले गेले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी पाताळगंगेपर्येंत जाणाऱ्या ९५२ पायऱ्या आणि एक मजबूत घाट बांधून घेतला.

या श्रीमल्लिकार्जुन शिवालय आणि या संपूर्ण परिसरात असलेली शक्तीपीठे, मंदिरे आणि कुंड यांच्या सानिध्यात असल्याने श्रीशैल क्षेत्र भाविकांसाठी महत्त्वाचे आणि पुण्यस्थान मानले जाते. श्रीशैल पर्वताचा प्रदेश थोडा कष्टप्रद असला तरी भाविक श्रीमल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि त्या अनुषंगाने परिसरातील इतर तीर्थस्थानांच्या दर्शनला येतात.


3.श्रीमहाकालेश्वर (उज्जैन)

अवन्तिकाया विहितावतार मुक्तिप्रदानाय च सज्जनानाम् |
अकालमृत्यो परिरक्षणार्थं वन्दे महाकालमह सुरेशम् ||

भारतातील महत्त्वाच्या शैवक्षेत्रांपैकी एक म्हणजे उज्जैन. माळवा प्रदेशात, क्षिप्रा नदी तटावर वसलेल्या मोक्षदायक सप्तपुरींपैकी एक ‘अवन्ति’ नामक नगरीत हे महाकालेश्वराचे मंदिर आहे. पुराणांमधून, प्राचीन काव्यांमधून उज्जैन नगरीचे धार्मिक महत्त्व, श्रीमहाकालेश्वराचे मंदिर, भगवान महाकाल यांचा महिमा यांचा उल्लेख येतो. या नगरामध्ये सात सागरतीर्थ, अठ्ठावीस तीर्थ, चौऱ्याऐंशी सिद्धलिंग, अष्टभैरव, एकादश रुद्रस्थान विविध देवतांची मंदिरे आणि अनेक पवित्र जलकुंड आहेत. प्राचीन काळापासूनच ही नगरी विद्या, शास्त्र, ज्ञान आणि कला यांच्या वैभवाने संपन्न अशी नागरी आहे.

भगवान शंकराच्या ‘महाकाल’ अवतारातील ज्योतिर्लिंगांचा उद्भव या नगरीत झाला आहे, अशी कथा शिवपुराणामध्ये येते. ही कथा आहे, उज्जैन नगरीत एक वेदप्रिय नामक शिवोपासक ब्राह्मणाची. तो शिवाचा निस्सीम भक्त होता. त्याला देवप्रिय, मेधाप्रिय, सुकृत आणि धर्मवाही नामक चार धर्मात्मा सुपुत्र होते. पित्याप्रमाणेच तेही भगवान अशुतोषाचे भक्त होते. सदैव शिवआराधनेत लिन असलेल्या या पिता पुत्रांच्या पुण्य-प्रतापाने सर्वत्र कल्याण आणि मांगल्य नांदत होते. दुसरीकडे रत्नमल नामक पर्वतावर दूषण नामक दैत्यराज निवास करीत होता. भूतलावरील धर्मपरायणतेचा समूळ नाश करण्याच्या हेतूने तो सर्व तीर्थक्षेत्रांवर आक्रमण करीत होता. दूषणाने अवन्ति नगरीवर आक्रमण करून लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. लोक व्यथित होऊन वेदप्रिय आणि त्याच्या चार पुत्रांकडे गेले. लोकांची व्यथा पाहून पिता-पुत्र शिवाच्या पार्थिव अर्चेत तल्लीन झाले. इतक्यात दूषण दैत्य त्याची सेना घेऊन तिथे आला आणि ध्यानपरायण ब्राह्मणांना बंदी करू लागला. शिवाच्या पार्थिव स्थानाच्या जागी एक मोठा खड्डा पडला त्यातून भगवान शिवाचे महाकाल स्वरूप प्रकट झाले. भगवान महाकालाने एक हुंकार भरून त्या दैत्याला भस्मसात केले. दैत्याचा विनाश केल्यावर शिवभक्त आणि देवतागण यांनी शिवाची स्तुती केली आणि जिथून महाकालाचा उद्भव झाला होता त्याच ठिकाणी भगवान महाकाल ज्योतिर्लिंग स्वरुपात स्थिरावले.

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उद्भावाशी निगडीत दुसरी एक कथा येते ती अशी, उज्जैन नरेश चंद्रसेन राजा हा मोठा शिवभक्त होता. एक दिवस चंद्रसेन शिवपूजनात व्यग्र असताना पाच वर्षाचा गोप बालक श्रीकर या राजाची शिवाराधना पाहतो आणि त्याच्या मनातही आपणही अशी शिव पूजा करावी असे येते. मनामध्ये विचार करीत तो त्याच्या मातेसोबत घरी येतो. मार्गामधला एक सुंदर दगड त्याने उचलला असतो त्यालाच शिवलिंग समजून भक्ति भावाने पूजन करू लागतो. विधिवत पूजन आणि अर्चनेत मग्न असताना त्याची माता त्याला शोधत येते. पण काही केल्या श्रीकर आपल्या सोबत येत नाहीये म्हटल्यावर ती माता शिवाचे ध्यान करून मुलाला बलपूर्वक घेऊन जाऊ लागते. विमोहित माता जाताना तिने शिवलिंग बाजूला भिरकावते. घरी पोहचल्यावर दुःखी झालेला बालक देवाला धावा करतो आणि तो मुर्स्च्छित होऊन जामिनीवर कोसळतो. बालकाला जेव्हा शुद्ध येते त्यावेळी त्याच्या डोळ्यांसमोर साक्षात भगवान महाकालाचे मंदिर प्रकट झालेले असते. या मंदिरामध्ये मध्यभागी त्याला दैदिप्यमान ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. एका लहान गोप बालकाच्या भक्तीचा हा चमत्कार ऐकून राजा चंद्रसेन स्वतः त्या बालकाला भेटायला जातात. श्रीकराच्या भक्तीची प्रशंसा राजा चंद्रसेन करतात. वानराधिश हनुमान प्रकट होऊन राजा चंद्रसेनाला सांगतात की भगवान शिव हेच मनुष्याच्या गतीचे कारण आहेत, विना मन्त्र केलेली पूजाही भगवान शंकराला संतुष्ट करणारी आहे, याचे उदाहरण साक्षात हा गोप बालक आहे. हे सांगून हनुमान तिथून अंतर्धान पावतात.

            महाकाल मंदिरचा इतिहास पहिला तर, इ.स. सहाव्या शतकात महाकाल मंदिरातील कायदा आणि सुव्यवस्था पाहण्यासाठी राजा चंद्रप्रद्योत याने कुमारसेन याची नियुक्ती केल्याचा उल्लेख येतो. इथे गुप्तसाम्राज्य आणि त्यांच्या पतनानंतर मैत्रक, चालुक्य, कलचुरी, पुष्यभूती, गुर्जर, प्रतिहार, परमार आणि राष्ट्रकुट इत्यादी राजघराण्यांची सत्ता प्रस्थापित केली. माळवा प्रांत भारताचे नाभीस्थान असल्याने या प्रदेशावर वारंवार आक्रमणे होत राहिली. या आक्रमणांमध्ये अनेक मंदिरे आणि तीर्थे क्षतिग्रस्त झाली. नागर शैलीतील या महाकाल मंदिरांचा पुर्ननिर्माण परमार राज्यांच्या कारकिर्दीत झाला. मंदिराचे स्थापत्य विलक्षण सुंदर आहे. तीन मजली मंदिराला तीनही मजल्यांवर गर्भगृह आहेत. यातील सर्वात खालच्या मजल्यावर महाकालेश्वराचे लिंग आहे, तर मधल्या मजल्यावर ओंकारेश्वराचे आणि तिसऱ्या सर्वांत वरच्या मजल्यावर नागचंद्रेश्वराचे लिंग आहे. या मंदिराचे विधान ताराकाकृती असून शिखर हे छोट्या-मोठ्या उरुशृंगाने सजवलेले आहे. या मंदिरावर शिल्पशास्त्रानुसार घडविलेल्या नवग्रह, देवी-देवता, परिकर, कीचक यांच्या प्रतिमा भाविकांचे लक्ष वेधून घेतात.

मध्ययुगीन काळात माळवा प्रांतात काही इस्लामिक राज्यांच्या सनदी सापडतात, ज्यात त्यांनी महाकालेश्वरासाठी तिथल्या पुजाऱ्यांना दान दिले आहे. इ.स. अठराव्या शतकात उज्जैनवर मराठा साम्राज्याचा अधिकार प्रस्थापित झाला. उज्जैनचा कारभार बाजीराव पेशवे प्रथम यांनी त्यांचे विश्वासू सेनापती राणोजी शिंदे यांच्याकडे सोपविला. या राणोजी शिंदे यांचे दिवाणजी बाबा शेनवी यांनी त्याची संपत्ती धार्मिक कामात लावली आणि याच काळात महाकालेश्वर मंदिराची पुनर्बांधणी झाली.

श्रीमहाकालेश्वर अकाली मृत्युपासून रक्षण करून मुक्ती प्रदान करतो म्हणून भाविक या ज्योतिर्लिंगाला भेट देऊन भगवान महाकालांचा कृपाशीर्वाद घेतात.

4.ओंकारेश्वर (मान्धाता) 

कावेरीकानार्मदयो पवित्रे समागमे सज्जनतारणाय |
सदैव मान्धातृपुरे वसन्त मोंकारमीश शिवमेकमीढे ||

कावेरी आणि नर्मदा या दोन नदीच्या पवित्र संगमाजवळ मान्धातापुर हे गाव आहे. द्वादश ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग हे ओमकारेश्वर नावाने विख्यात आहे. भौगोलिकदृष्ट्या इथे वाहणारी नर्मदा प्रणवाकारमध्ये प्रवाहित होते त्यामुळे या क्षेत्राचे नाव ओमकार पडले आहे. मध्यप्रदेशातील खाण्डवा जिल्ह्यात असलेल्या मान्धाता पर्वताच्या उत्तर दिशेकडून एक आणि पर्वताच्या दक्षिणेकडून एक असे नर्मदा नदीचे दोन प्रवाह निघतात. नर्मदेच्या या दोन धारांमुळे तयार झालेल्या मान्धाता पर्वताला शिवपुरी असेही म्हणतात. या शिवपुरित वसलेले आहे ते ओंकारेश्वराचे देवालय.

भगवान शिवाच्या ‘ओंकारेश्वर’ अवताराची कथा येते ती अशी, प्राचीनकाळी नर्मदेच्या पावन तटावर सर्व देव आणि दानव आनंदाने राहत होते. कालांतराने दानवांची शक्ती अधिक वाढली आणि त्यांनी देवांशी घनघोर युद्ध सुरु केले. दानवांनी त्रस्त झालेले देवता भगवान शिवाला शरण गेले. परंतु भगवान शिवाला शीघ्र संतुष्ट करण्यासाठी देवगुरु बृहस्पती यांच्या आज्ञेने देवतांनी यज्ञ आरंभला, परंतु दानवांनी परास्त केल्याने देवांची मन्त्रशक्ती लुप्त झाली होती, त्यामुळे त्यांना यज्ञीय मंत्रांचे विस्मरण झाले होते. इतक्यात शिव पाताळातून ‘भू भूवः स्वः’ या तीन व्याहृति उच्चारीत दिव्यलिंग स्वरुपात प्रकट झाले आणि ब्रह्मदेवाला वेद पुन्हा प्रदान केले. ब्रह्मदेवाला सर्व लोकांमध्ये शान्ति प्रस्थापित करणारा सौम्य यज्ञ करण्यास सांगितले. या यज्ञाने देवतांचे बळ त्यांना पुन्हा प्राप्त झाले. देवतांनी दानवांना परास्त केले आणि आनंदाने पुन्हा स्वर्गाकडे रोहण केले. 

भगवान ओंकारेश्वर, वेद रहस्य आणि नव शक्तींनी युक्त असे मानलेले आहेत. ओंकारेश्वराच्या सद्योजात नामक पश्चिम मुखातून ऋग्वेद, वामदेव नामक उत्तर मुखातून यजुर्वेद, अघोर नामक दक्षिण दिशेच्या मुखातून सामवेद, तत्पुरुष नामक पूर्व मुखातून अथर्ववेद आणि ईशान नामक उर्ध्व मुखातून वेदांचे सिद्धान्त उत्पन्न झाले आहेत अशी कीर्ती या ओंकारेश्वराची सांगितली जाते.

इक्ष्वाकुवंशीय मान्धाता राजाने या क्षेत्री येऊन शिवाराधना केली. शिवभक्त असल्याने या पावन क्षेत्रालाच त्याने आपली राजधानी बनवली. इ.स.१०६३ सालचा परमार राजा उदियादित्य याने मामलेश्वर मंदिरामध्ये शिवाला समर्पित चार ओळींचा संस्कृत शिलालेख उत्कीर्ण करवून घेतला आहे. बाजीराव पेशवे द्वितीय यांनी इथल्या राज्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. देवी अहिल्याबाई यांनी ओंकारेश्वराच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांचा बगीचा, नर्मदेच्या तटावर लागणारी होडी, एक मेणा (पालखी) दान दिली. तसेच ममलेश्वर मंदिरासाठी निरंतन दिवाही त्यांनी दान केला. इथे विस्तृत आणि मजबूत घाट देवींनी बांधून घेतले. अहिल्यादेवी यांनी कोटीलिंगार्चन रित या पुण्यक्षेत्री रुजवली.

निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे ज्योतिर्लिंग इथे भेट देणाऱ्या भक्तासाठी साक्षात शिवपुरी आहे. त्यामुळे श्रद्धावान या तीर्थक्षेत्राला आवर्जून भेट देतात, नर्मदा परिक्रमा करतात आणि पुण्यार्जन करतात.

5.श्रीकेदारनाथ (हिमालय) 

हिमाद्रिपार्श्वेsपि तटे रमन्त सपूज्यमान सतत मुनीन्द्रै |
सुरसुरैर्यक्षमहोरगाद्दै केदारसंज्ञ शिवमीशमीडे || 

उत्तराखंड मधील हिमाच्छादित प्रदेशात बद्रीनाथ आणि केदारनाथ ही दोन प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. हिमालयाच्या देवभूमीवर अगदी पर्वताच्या टोकावर श्रीकेदारनाथ ज्योतिर्लिंग अवस्थित आहे. या शिखराच्या पूर्वेला अलकनंदा नदीच्या तटावर श्रीबदरीनारायण आहे तर पश्चिमेला मंदाकिनी नदीच्या तटावर श्रीकेदारनाथ. कार्तिक महिन्यापासून हिमालयावरील बर्फवृष्टी वाढायला लागण्याने कार्तिक महिन्यातील पहिल्या दिवसापासून भक्तांसाठी मंदिराची द्वारे काही काळ बंद होतात. या काळात मंदिरात तुपाचा नंदादीप लावला जातो आणि श्रीकेदारेश्वराचे भोगसिंहासन बाहेर आणले जाते. कार्तिक ते चैत्र महिन्यापर्येंत उखी मठामध्ये केदारेश्वराचा निवास असतो. वैशाख महिन्यात श्रीकेदार धामची द्वारे भक्तांसाठी खुली होतात.

हिमालयाच्या केदार शृंगावर विष्णू अवतार नर आणि नारायण तपस्या करण्यासाठी बद्रिका वनात आले. इथे त्यांनी त्यांचा आश्रम बनविला आणि तिथे शिवाच्या पार्थिवलिंगाची स्थापना केली. नर-नारायण त्या शिवलिंगाचे षोडशोपचारांसह आराधना करायला लागले. निराहार राहून आपल्या इंद्रियांना वश करून अहिर्निश तपाधीन झाले. त्यांच्या तपावर संतुष्ट होऊन भगवान शंकर स्वतः प्रकट झाले आणि त्यांना वर मागायला सांगितला. त्यावेळी त्या तपस्वींनी भगवान शिवाने लोककल्याणासाठी सदैव इथे वास करावा अशी इच्छा प्रकट केली. त्यांच्या विनंतीवर भगवान शिव या तीर्थक्षेत्री केदारेश्वर ज्योतिर्लिंग स्वरुपात वास करायला लागले. पौराणिक कथांनुसार सतयुगामध्ये उपमन्यु यांनी या तीर्थक्षेत्री शिवाची उपासना केली. त्यानंतर द्वापार युगामध्ये पांडवांनी तपस्या केल्याच्या कथा आहेत.

मंदिराच्या निर्मितीचा इतिहास सांगतो की इ.स. आठव्या शतकामध्ये आदि शंकराचार्य यांनी या मंदिराचा जीर्णोधार केला. परंतु एक मत असेही आहे की ग्वालियरचा राजा भोज याच्या स्तुतीनुसार मंदिराचा निराम १०७६-१०९९ सालच्या आसपास झाला असावा. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केदारेश्वरासह इथे बद्रीनारायण, इतर मंदिर, कुंड यांनाही दान दिले आहे. भगवान शिवाच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या.

मंदिराची संरचना केवळ गर्भगृह आणि त्यासमोर मंडप अशी अत्यंत साधी रचना आहे. हिमवृष्टीमुळे मंदिराच्या मंडपाचे छत हे उतरत्या छपराचे आहे. मंदिराच्या आत द्रौपदी आणि पाच पांडवांच्या भव्य प्रतिमा आहेत.

ऋषिकेश या तीर्थापासून रुद्रप्रयाग, गुप्तकाशी, गौरीकुंड करीत केदारनाथ मंदिरापर्यत जाणाऱ्या खडतर मार्गाचा अवलंब करावा लागतो. केदारेश्वराच्या टोकावर म्हणजे जवळपास तेवीस हजार फुट उंच चढण चढून भाविक दर्शनाला जातात. अत्यंत कठीण वाटणाऱ्या हा प्रवासाचे कष्ट केदारेश्वराच्या दर्शनाने क्षीण होतात आणि भक्त इथून जाताना त्याच्या सोबत भगवंताच्या भेटीने लाभलेले समाधान सोबत घेऊन जातात.     

6.श्रीभीमाशंकर (डाकिन्य) 

यो डाकिनीशाकिनिकासमाजे निषेव्यमाण पिशिताशनैश्च |
सदैव भीमादिपदप्रसिद्ध त शंकर भक्तहित नमामि ||

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात राजगुरूनगर (खेड) इथे श्रीभीमाशंकर हे एक ज्योतिर्लिंग आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत सुमारे ९७५मी. उंचीवर भीमा नदी उगम पावते. भीमाशंकर हे तीर्थ वनश्रीने नटलेले आहे. या वनाला ‘डाकिनीचे वन’ म्हणतात. या ज्योतिर्लिंगाच्या उद्भवाच्या विविध कथा या पुराणांमधून, आख्यायिकांमधून सांगितल्या जातात. याशिवाय भीमाशंकाराचा महिमा शिवलीलामृत, गुरुचरित्र, स्तोत्ररत्नाकर आदि धार्मिक ग्रंथांमध्ये गौरवलेला आहे.   

भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दोन कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक लोककथा अशी आहे की भगवान शंकराने इथे त्रिपुरासुराचा वध करून या स्थानी विश्राम केला तेव्हा इथे भीमक नामक सूर्यवंशी राजा तपस्या करीत होता. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन राजाला दर्शन दिले. तेव्हा पासून ज्योतिर्लिंग स्वरुपात अवतरीत भीमाशंकर याच्या नावाने हे स्थान प्रसिद्ध झाले.  

शिवपुराणात शिवभक्त राजा कामरूपेश्वर याची कथा येते, जी या ज्योतिर्लिंगाचा उद्भव आणि महात्म्य सांगते. कुंभकर्ण आणि कर्कटी यांचा पुत्र भीम नामक राक्षस सर्व जीवांना दुःख देत असे. भीमाने त्याच्या पित्याबद्दल त्याच्या मातेला विचारणा केल्यावर तिने इतिवृतांत सांगितला. भीमाचे पिता कुंभकर्ण म्हणजे लंका नरेश रावणाचे बंधू ज्यांना श्रीरामाने मारले. पती निधनानंतर कर्कटी तिच्या माहेरी तिचे माता पिता पुष्कसी आणि कर्कट यांच्या जवळ येऊन राहिली. परंतु अगस्त्य ऋषींना या राक्षस माता-पिता स्वतःचे भोजन बनवायला गेले तेव्हा मात्र अगस्त्य ऋषींनी त्यांच्या तीव्र तपाने त्या दोघांना भस्म केले. हे ऐकून भीम सर्व देवता आणि ऋषी मुनींवर कोपला आणि त्यांना त्रास देऊ लागला. असाच एक शिवभक्त राजा कामरूपेश्वर शिवाचा निस्सीम भक्त होता. जो नित्य शिवाराधना करायचा. एक दिवस राजा कामरूपेश्वराला भीम त्रास देऊ लागला. राजाला तलवारीचा धाक दाखवून त्याला शिवाची नाही तर स्वयं भीमाचे पूजन करण्यास सांगितले. परंतु परम शिवभक्त राजा कामरुपेश्वर शिव पूजनात लीन होता. हे बघून चिडलेल्या भीमाने शिवाच्या पार्थिव लिंगावर तलवारीने प्रहर करताच त्यातून स्वयं शिव प्रकट झाले. हातामध्ये धनुष्य, बाण, तलवार, परशु आणि त्रिशूल घेऊन स्वयं शिव प्रकट झाले. शिवाने दैत्य भीमाला भस्मसात केले आणि देवता, ऋषी आणि त्यांच्या भक्तांना दैत्याच्या त्रासातून विमुक्त केले. लोककल्याणासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी भगवान आशुतोष इथे भीमाशंकर या नावाने स्थिर झाले.

भीमाशंकराचे हे मंदिर हेमाडपंती असून शिखर शेखरी स्वरूपाचे आहे. या मंदिराच्या भिंतीवर ब्रह्मा, गणपती, परशुराम इत्यादींच्या प्रतिमा आहेत. मंदिरात नंदीची भव्य मूर्ती आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज भीमाशंकर दर्शनास आले होते. पेशवे बालाजी विश्वनाथ आणि रघुनाथराव पेशवे यांनी इथे एक विहीर खोदली आहे. पुण्याचे सावकार चिमणाजी अंताजी नाईक यांनी इ.स १४३७ मध्ये मंदिराच्या सभा मंडपाचा निर्माण केला आहे. या मंदिराचा जीर्णोधार नाना फडणीसांनी केला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नीने कळसाचे काम पूर्ण केले. या मंदिरात १७२९ अशी अक्षरे कोरलेली एक मोठी घंटा आहे. घंटेवर मानवी आकृती असून ती कुमारी मेरीची असावी. मराठा सरदारांनी वसई घेतली तेव्हा ही घंटा सु. १७३९ च्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील वाशिंदहून (कल्याणजवळ) आणली असे म्हणतात. मंदिराचा परिसर मोक्षकुंड, ज्ञानकुंड, गुप्तभीमेश्वर, सर्वतीर्थ अश्या विविध पावन तीर्थांनी वेढलेला आहे. याशिवाय साक्षी विनायक, हनुमान, कमळजा देवी, गोरक्षनाथ आश्रमही इथे दर्शनीय आहेत.

            प्रकृतीचे नयनरम्य सौंदर्य इथे एकवटलेले आहे. हा निसर्ग कधी संपन्न तर कधी भयावह वाटतो परंतु भीमशंकर ज्योतिर्लिंगाच्या सानिध्यात भाविकाला भयाचे कारण उरत नाही आणि तो भीमशंकराचे डोळे भरून दर्शन घेतो. 

7.श्रीविश्वेश्वर (वाराणसी)

सानन्दमानन्दवने वसन्त मानन्दकन्द हतपापबृन्दम् |
वाराणसीनाथमनाथनाथ श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये ||

सप्तपुरींपैकी एक म्हणजे मोक्षदायिनी वाराणसी नागरीमध्ये भगवान शिवाच्या ‘विश्वेश्वर’ नामक अवताराचा उद्भव झाला आहे. या ज्योतिर्लिंगाचे महत्त्व हे इतर ज्योतिर्लिंगाच्या अपेक्षेने अधिक मानले गेले आहे. कारण दार्शनिकदृष्ट्या ही या ज्योतिर्लिंगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

शिवपुराणामध्ये याची कथा येते.

तस्यैव कैवल्यरतेर्द्वितीयेच्छा ततोऽभवत् |
स एव सगुणा जातः शिव इत्यभिवोयते || – शिव. पु. ४.२२.२ 

समस्त संसारातील जे काही वस्तुमात्र दृष्टिगोचर होत आहे, ते सर्व निर्विकार, सनातन, चिदानंदस्वरूप आहे. जेव्हा कैवल्यरति ज्ञानस्वरूप ब्रह्मतत्त्वास द्वैत होण्याची इच्छा झाली, तेव्हा तो सगुणरूपातून उत्पन्न होऊन शिव स्वरूप प्रकट झाले. हा शिव पुरुष आणि प्रकृती यामध्ये विभक्त झाला. त्यातला पुरुष होता तो शिव आणि प्रकृती ही शक्ती. पुरुष आणि प्रकृती यांना उत्तम सृष्टी निर्मितीसाठी तपाचा आदेश, निर्गुण परमात्माने वाणीद्वारा दिला. पुरुष-प्रकृतीने जेव्हा तपाच्या स्थान निर्देशाची प्रार्थना केली तेव्हा शिवाने अंतःप्रेरणेने समस्त तेज संपादन करून अत्यंत शोभायमान नगराचा निर्माण केला. भगवान विष्णूंनी तिथे अनेक वर्ष तपस्या केली तेव्हा तिथे जलधारा प्रकट झाल्या. या अद्भुत दृशाला पाहून विष्णूने विस्मयाने त्यांचे मस्तक हलवले तर त्यांच्या कानातील मणी तिथे पडला आणि त्या स्थानाचे नाव मणीकर्णिक तीर्थ पडले. या मणीकर्णिकाचे संपूर्ण जल शिवाने त्याच्या त्रिशुलावर धारण केले. या जलामध्ये भगवान विष्णूंनी शयन केलं. भगवान शिवाच्या अज्ञाने विष्णूच्या नभीकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवांनी भगवन शिवाच्या आज्ञेने सृष्टीची उत्पत्ती केली. या अद्भुत सृष्टीरचनेमध्ये चौदा लोक होते. स्वकर्म बंधनात अडकलेल्या जीवांच्या उद्धारासाठी शिवाने पंचकोश असलेल्या नगरीतील संपूर्ण लोक हे स्वतंत्रठेवले. या नगरांमध्ये भगवान शंकराने स्वतः ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. हे शिवलिंग म्हणजे भगवान शिवाचे अंशभूत आहे, त्यामुळे काशी इथे मुक्तिप्रद शिवलिंग जीवांना सायुज्य मुक्ती प्राप्त करून देणारे आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार विश्वेश्वर वा विश्वनाथ हा या क्षेत्राचा अधिष्ठाता देव, भैरव हा कोतवाल, तर धुंडिराज गणेश (साक्षी विनायक) हा नगरपालक आहे.

वाराणसी नगरीने अगदी प्राचीन काळापासून अनेक राजकीय स्थित्यंतरे पहिली आहेत. अनेक राजवटीचे राज्य या प्रदेशावर असल्याने अनेक शासक या भूमीला मिळाले. या विश्वेश्वर मंदिरावर अनेकदा आक्रमणे झाली. तत्कालीन हिंदू धर्मपरायण राज्यांनी अनेकदा मंदिराचे रक्षण करून पुनर्निर्माण केला. उद्‍ध्वस्त विश्वेश्वर मंदिर अकबराच्या कारकीर्दीत १५८५ मध्ये नव्याने बांधण्यात आले. औरंगजेबाने पुन्हा ते मंदिर जमीनदोस्त करून १६६९ त्या जागी मशीद बांधली आणि हिंदूवर जझिया कर लादला. तेव्हा भक्तांनी तेथील शिवलिंग नजीकच्या ज्ञानवापीमध्ये हलविले. त्याकाळी मंदिराच्या जागेला विश्वेश्वर प्रतिमा मानून भक्तजन त्यास नमस्कार, पिंडदान व प्रदक्षिणा करीत असत. इ.स. १७७७ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्ञानवापीतून शिवलिंग काढून विद्यमान पंचमंडपयुक्त विश्वनाथाचे मंदिर बांधले. पुढे १८३९ मध्ये महाराजा रणजितसिंगाने या मंदिराचे शिखर सोन्याने मढवून दिले. हे शिखर रेखीव असून त्यावर कलात्मक नक्षी आहे.. या मंदिराच्या कुशीत औरंगजेबकालीन मशिदीचे मीनार आहेत. मंदिराजवळच दक्षिणेस ज्ञानवापी-ज्ञानरूपी-शिवास स्नान घालणारी अशा अर्थाने प्रसिद्ध असलेली व विश्वेश्वराने नित्य स्नानार्थ स्वतः त्रिशूळाने खोदलेली, अशी समजूत असलेली, प्रसिद्ध विहीर आहे. या मंदिराच्या उत्तरेकडे सु. पाऊण किमी. वर बिसेसर गंज अंतर्भागात कालभैरवाचे मंदिर आहे. तो क्षेत्रपाल (कोतवाल) मानला जातो. त्याला दंडपाणी, भैरवनाथ, काळराज, आमर्दक, पापभक्षणक वगैरे अन्य नावे आहेत. विश्वनाथपूजेने सुरू होणारी यात्रा कालभैरवाच्या पूजनाने संपते, अशी भाविकांत धारणा आहे. यांशिवाय ॐकार, त्रिलोचन, चंद्रशेखर, केदार अशी एकूण चौदा महालिंगे आहेत.

8.श्रीत्र्यम्बकेश्वर (नासिक) 

सिंहाद्रिपार्श्वेsपि तटे रमन्त गोदावरीतीरपवित्रदेशे |
यद्दर्शनात्पातकजातनाश प्रजायते त्र्यम्बकमीशमीडे ||

द्वादश ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील प्रसिद्ध शैवक्षेत्र म्हणजे श्रीत्र्यंबकेश्वर. हे नासिकच्या नैर्ऋ‌त्येस सु. २९ किमी. वर ब्रह्मगिरी डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. ब्रह्मगिरी डोंगरमाथ्यावर किल्ला असून गोदावरी नदीचा उगम याच डोंगरातून झाला आहे.

गौतमी गंगा नावाने सुपरिचित असलेल्या गोदावरीच्या पावन तटी भगवान शिवाचा त्र्यंबक नामक अवतार झाला. शिवपुराणात याची कथा येते. एकेकाळी ऋषींच्या वैमनस्याच्या कारण महर्षी गौतम यांच्यावर गोहत्याचे पातक लागले. या पातकातून मुक्ती मिळवण्यासाठी या ऋषीच्या निर्धारित तपस्या गौतम करू लागले. त्यांच्या तपस्येवर संतुष्ट होऊन भगवान शिव यांनी गंगेला भूतलावर अवतरीत होण्यास सांगितले. भगवान शिवांचे कथन शिरोधार्य धरून गो दान करणारी देवी गंगा अवतरीत झाली. माघ शुद्ध दशमीला गौतमी गंगा प्रकट झाली. देवी गंगेनीही शिवाला विनंती केली, की भगवानांनी देवी अंबा आणि गणांसोबत गंगेच्या जवळ निवास करावा. ही तिची इच्छा शिव मान्य करतात. भगवान शिव म्हणतात, ‘जेव्हा देवगुरु बृहस्पती सिहंस्थ होतील तेव्हा सर्व देव, तीर्थ, ऋषी, क्षेत्र हे इथे जमा होतील आणि जोपर्येंत बृहस्पती या राशीत विराजमान असतील तोपर्येंत तिन्ही त्रिकाळ स्नान करून भगवान शंकराचे दर्शन घेऊन स्वतःचे पापक्षालन करतील.’ त्याप्रमाणे आजही बारा वर्षातून एकदा सिंहस्थ कुंभमेळा नासिक इथे भरतो आणि लाखो भाविक कुशावर्त तीर्थामध्ये स्नान करून पापक्षालन करतात.

सध्याचे त्र्यंबकेश्वराचे मंदिर बाळाजी बाजीराव पेशव्यांनी बांधले आहे. मंदिराभोवती चिरेबंदी तट असून त्याचा विस्तार ८०·७७ X ६६·४५ मी. आहे. या मंदिरातील शिवलिंग शाळुंकेच्या आत असून त्यातून सतत पाणी झिरपत असते. शिवलिंगासाठी सोन्याचा पंचमुखी मुखवटा व रत्‍नखचित किरीट आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी कुशावर्त तीर्थकुंडालगत घाट बांधून घेतला आहे. सरदार विंचूरकर यांनी त्र्यंबकेश्वराला रथ प्रदान केला आहे.

या मंदिराभोवती श्रीकृष्ण, परशुराम, लक्ष्मीनारायण इत्यादींची मंदिरे आहेत. येथे कुशावर्त तीर्थकुंड आहे. याशिवाय गोदावरी परिक्रमा मार्गात रामतीर्थ, प्रयागतीर्थ, नृसिंहतीर्थ अशी रम्य स्थाने आहेत. ब्रह्मगिरीच्या उतारावर नाथ पंथीयांचा मठ आहेत. सिंहस्थ पर्वात नासिक त्र्यंबकेश्वर इथे कुंभमेळा भरतो, त्यात लाखोने नाथ पंथाचे जोगी येथे जमतात. कार्तिकातील त्रिपुरी पौर्णिमा, पौष वद्य एकादशीची निवृत्तिनाथांची पुण्यतिथी व माघातील महाशिवरात्र या दिवशी येथे मोठ्या यात्रा भरतात. त्यामुळेच त्र्यंबकेश्वर हे क्षेत्र अत्यंत पवित्र आणि दिव्य तीर्थक्षेत्र म्हणून सर्वश्रुत आहे.

9.श्रीवैद्यनाथ (चिताभूमी) 

ज्योतिर्लिंगस्वरूपेण चिताभूमौ प्रतिष्ठितः ।।
वैद्यनाथेश्वरो नाम्ना प्रसिद्धोभूज्जगत्त्रये ।
दर्शनात्पूजनाद्भक्त्या भुक्तिमुक्तिप्रदः स हि ।।
– शिव. ३.४२.३९-४०

चिताभूमी इथे भगवान शिव वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या स्वरुपात स्थिर झालेले आहेत. महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामधील आंबेजोगाई तालुक्यापासून २६ की.मी अंतरावर परळी या गावी वैद्यनाथाचे हे ज्योतिर्लिंग आहे. स्थानिक कथा अशी आहे की अंबाजोगाईची योगेश्वरीचा विवाह परळीच्या वैद्यनाथाशी जुळला होता पण मुहूर्त टळूनही वैद्यनाथ न आल्याने योगेश्वरी तिथेच बसून राहिली आणि या लग्नसोहळ्याचे जे वराती होते ते दगडाचे बनून गेले. 

देव आणि दानव यांच्याद्वारा जेव्हा अमृत मंथन केले गेले तेव्हा त्या मंथनातून धन्वंतरी प्रकट झाले आणि त्यानंतर अमृत कलश ही बाहेर आला. अमृतप्राप्तीसाठी दानव पुढे सरसावलेले दिसताच भगवान विष्णूंनी अमृत आणि भगवान धन्वंतरी यांना शिवलिंगामध्ये लपवले. दानवांनी त्या लिंगाच्या जवळ जाऊन त्या लिंगाला हात लावण्याच्या प्रयत्न केला तर त्या लिंगातून प्रचंड ज्वाला बाहेर पडायला लागल्या. दानवांना याचे भय वाटले आणि ते तिथून पळून गेले. परंतु जेव्हा शिवभक्तांनी या लिंगाला सभक्ती भावाने हात लावला तेव्हा त्यातून अमृत पाझरू लागले. तेव्हा पासून या शिवलिंगामध्ये धन्वंतरी आणि अमृत असल्याने याला अमृतेश्वर, धन्वंतरी किंवा वैद्यनाथ असेही म्हणू लागले.

पुराणांमधून येणारी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची कथा ही रावणाशी निगडीत आहे. राक्षसेन्द्र रावण शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवाची आराधना करीत होता. पण भगवान शिव प्रसन्न झाले नाहीत. खूप काळ लोटला तरी रावणाला त्याच्या तपस्येने भगवान शिवाचा कृपाशीर्वाद प्राप्त होत नाही म्हटल्यावर त्याने आपले एक-एक मस्तक शिवला अर्पण करण्यास सुरुवात केली. दशननाने नऊ मस्तके शिवाला अर्पण केल्यावर मात्र भगवान शिव साक्षात प्रकट झाले. रावणाने भगवान शंकराला हात जोडून विनम्रपणे प्रार्थना केली की, आपण स्वतः त्याच्या सोबत लंकेला यावे. त्यावर शिव रावणाला शिवलिंग देतात. शिव रावणाला निर्देश देतात की हे आत्मलिंग जिथे जमिनीवर ठेवेले जाईल त्याच जागी त्याची प्रतिष्ठापना होईल. त्यानुसार रावण ते शिवलिंग घेऊन निघाला, वाटेत तो  लघुशंकेसाठी थांबला. एका गोप बालकाकडे हे शिवलिंग धरायला दिले तर तो गोप बालक ते लिंग जमिनीवर ठेऊन निघून गेला होता. तेव्हा ते शिवाचे आत्मलिंग चिताभूमी म्हणजेच वैद्यनाथ इथे प्रतिष्ठित झाले. हेच वैद्यनाथ नावाने प्रसिद्ध झाले. भगवान शिवांनी त्यांच्या अमोघ दृष्टीने वैद्याप्रमाणे रावणाच्या शिरकमलांना पूर्ववत केल्याने शिवाच्या या अवताराला वैद्यनाथ म्हटले जाते.

सध्याचे परळी वैजनाथ येथील मंदिर हे देवगिरीच्या यादवांचा श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले असावे. त्या मंदिराच्या अवशेषांपैकी फक्त नंदीच सुस्थितीत राहिलेला दिसतो. पुढे अहिल्याबाई होळकर यांनी इ.स. १७८३ साली या मंदिराचा जीर्णोद्वार केला, असा उल्लेख तेथील एका संस्कृत शिलालेखात आढळतो. वैजनाथ मंदिरास पश्चिम सोडून इतर तीनही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. मंदिराचा सभामंडप १९०४ मध्ये रामराव नाना देशपांडे या दानशूर गृहस्थाने बांधला. सभामंडपात एक पितळी व दोन पाषाणी अशा नंदीच्या तीन मूर्ती आहेत. येथे वीरभद्राची एक भव्य पितळी प्रतिमा आहे. मंदिरात मंडपाशिवाय दोन गाभारे असून त्यांचे दरवाजे कलात्मक नक्षीने सजविलेले आहेत. मुख्य ज्योतिर्लिंगाच्या सभोवताली असलेल्या बारा लिंगांमुळे बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडते. हरिहर, मार्कंडेय, नारायण ही तीर्थे आणि शनैश्वर, झुरळ्या गोपीनाथ यांची मंदिरे तसेच संत जगमित्र नागाजी यांची समाधी या गोष्टी प्रेक्षणीय आहेत.

10.श्रीनागेश्वर (दारूकावन) 

द्वादश ज्योतिर्लिंग क्षेत्रांमधील एक महत्त्वाचे शैव क्षेत्र म्हणून औंढा नागनाथ प्रसिद्ध आहे. श्रीनागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील औंढा नागनाथ, गुजरात प्रांतातील द्वारका क्षेत्रातील नागेश्वर आणि उत्तराखंड येथील जागेश्वर अश्या तीन संभाव्य स्थळांचा उल्लेख केला जातो. श्रीसोमनाथ सोबत द्वारकेतील नागेश, परळी वैजयनाथ सोबत औंढा नागनाथ आणि देवभभूमीतील श्रीकेदारेश्वर सोबत जागेश्वर अश्या या तीनही ठिकणी भाविक दर्शनाला जातात. गुजरात प्रांतातील काही पुराणांमध्ये ‘नागेशो दारुकावने’ याऐवजी ‘नागेशं द्वारकावने’ असा पाठभेद आढळतो. याशिवाय शिवपुराणामध्ये कथा संकेतनुसार पश्चिमी तटापासून सोळा योजने लांब असलेले दारूका हिचे वन असा उल्लेख आल्याने पश्चिमी तटावरील द्वारका नगरीतील नागेश्वर हे ज्योतिर्लिंग मानले जाते.

उत्तरखंड येथील देवभूमीत असलेले जागेश्वर हे ठिकाण तिथे उपलब्ध असलेल्या देवदारूच्या वनांमुळे दारूका वन म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या क्षेत्रामधील जागेश्वर हेच ज्योतिर्लिंग क्षेत्र म्हणून काही मानतात. 

परंतु श्रीमत आद्य शंकराचार्य यांच्या द्वादशलिंग स्तोत्रामध्ये श्रीनागनाथाचा उल्लेख पुढीलप्रमाणे केला आहे- 

अमर्दसंज्ञे नगरे च रम्ये विभूषिताङ्ग विविधैश्च भोगै | 
सद्भुक्तिमुक्तिप्रदमीशमेक श्रीनागनाथ शरण प्रपद्ये ||

अमर्दक नावाच्या रमणीय नगरीमध्ये हे भुक्तिमुक्ती प्रदान करणारे नागनाथाचे शिवलिंग आहे. औंढा हे क्षेत्र प्राचीनकाळी अमर्दक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते.

पौराणिक कथांचा संदर्भ देताना सांगतात की, पश्चिमी तटावर एक धर्मध्वंसी राक्षस कुलाचा राजा होता दारूक. त्याच्या पत्नीचे नाव होते दारूका. ती पार्वतीची भक्त होती. देवतांनी त्यांच्या आक्रमण करून त्यांना पृथ्वी सोडून जलामध्ये लोटले. हे राक्षस पाण्यात निवास करीत होते, मात्र तिथली सृष्टी त्यांनी भयभीत केली होती. नाविकांना, व्यापाऱ्यांना पकडून त्यांची संपत्ती लुटत, त्यांना त्रास देत. एक दिवस हे नाविक सुप्रिय नामक वैश्याला त्यांची व्यथा सांगतात. सुप्रिय भगवान शिवाच्या परम भक्त असतो. दारूक राक्षसाच्या सेवकाकडून त्याला जेव्हा सुप्रियच्या शिवभक्तीचा महिमा ऐकायला मिळतो, तेव्हा सुप्रियला बंदी बनवले जाते. सुप्रिय भगवान शिवाचा धावा करतो आणि भगवन शंकर प्रकट होतात आणि दारूकसहित सर्व राक्षसांचा वध करतात. परंतु दारूका ही पार्वतीची भक्त असल्याने पार्वती तिला अभय देण्याचा हट्ट करते. रक्षसांचा समूळ उन्मूलन न झाल्याने शिव स्वतः त्यांच्या भक्तांच्या रक्षणार्थ दारूकावनात ज्योतिर्लिंग स्वरुपात प्रकट होऊन स्थिरावतात.  

याच स्थानासंबंधी एक दंतकथा प्रचलित आहे. दक्षप्रजापतीने एकदा महायज्ञ केला होता. त्यावेळी भगवान शंकराला निमंत्रण दिले नव्हते. तरीही पार्वती त्या यज्ञासाठी तिच्या पित्याच्या कडे गेली, मात्र तिलाही उपेक्षा सहन करावी लागली. त्यामुळे स्वतःचा आणि आपल्या पतीच्या अपमान सतीला सहन झाला नाही आणि तिने या महायज्ञामध्ये स्वतःचीआहुती दिली. हे जेव्हा भगवान शिवाला समजले तेव्हा त्यांचे चित्त सैरभैर झाले आणि ते जंगलात भटकत राहिले. त्या जंगलातून ते अमर्दक नावाच्या तटावर येऊन रहिले. इथेही काही अपमानास्पद घटना घडल्याने विरक्त शिव स्वतःला भस्म करून घेतात. काही काळानंतर वनवासी पांडव या क्षेत्रामध्ये येतात आणि त्यांचा आश्रम बांधतात. इथल्या एका तलावात गायी पाणी प्यायला येत आणि तिथेच दुधाचा अभिषेक करून निघून जात. भीमाने हे पाहून आश्चर्य व्यक्त केले. ही गोष्ट भीमाने युधिष्ठिराला सांगितली. या तलावामध्ये देवतांचा निवास आहे हे जाऊन ते तलावाच्या मध्यभागी गेले. तलावाच्या मध्यावर पाणि अतिउष्ण होते. भीमाने पाण्यावर गदेने प्रहर केला आणि तलावातील पाणी घटले आणि रक्ताच्या धारा निघायला लागल्यावर भीमाने तलावाची जमीन उकरली तर तिथे शिवलिंग सापडले. पाडवांनी त्या शिवलिंगाचे विधिवत अर्चन केले.

या नागनाथ मंदिराचे स्थापत्य विलक्षण सुंदर आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज त्यांच्या गुरूंच्या शोधात औंढा नागनाथ या मंदिरात आले होते. त्यांनी गुरुभेटीला जाण्यापूर्वी काही क्षण या मंदिराचे वैभवसंपन्न रूप त्यांच्या हृदयात साठवून घेतल्याचा उल्लेख नामदेव गाथेतील अभंगामध्ये येतो.

या पश्चिमाभिमुख शिवालय संरचना गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप आणि तीन द्वारे अशी आहे. मंदिराच्या भोवतीने आसलेल्या तटबंदीच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारातून आपण आत प्रवेश करताना मुख्य मंदिराच्या सुमारे साठ फूट उंच भव्य वास्तूचे दर्शन प्रथम होते. मंदिराच्या समोर नदीमंडप आहे. नागनाथ मंदिराच्या गर्भगृहाला खाली म्हणजे तळाकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरून तळ-गाभाऱ्यात नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. याला पातळलिंग असे म्हणतात. या गाभाऱ्याची उंची अतिशय कमी आहे म्हणजे सरळ उभे राहणे अशक्य आहे. नागनाथाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात आपण येतो. भैरव, तांडवनृत्य करणारा शिव, पार्वती आणि शिव यांचे कल्याणसुंदर शिल्प, महिषासुरमर्दिनी, अंधकासुरवध, गजासुरवध, रावणानुग्रह, पंचमुखी शिव, चामुंडा, अष्टदिक्पाल, गणेश यांशिवाय साधक, योगी यांचीही सुरेख शिल्पांकने इथे बघायला मिळतात. असे म्हणतात मंदिराचे शिखर पूर्णतः उध्वस्त झाले होते, जे अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा बांधून या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिराचे शिखर नंतरच्या काळातील आहे. मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यात एक मठ बांधलेला आहे, जिथे काही संन्यास्यांचे वास्तव्य असते. हा मठ एका उंच चौथरावर पश्चिमबाजूपासून आग्नेय कोपऱ्यातील नागतीर्थापर्येंत बांधला आहे. आवारातच एक पायविहीर आहे त्यास ऋणमोचन तीर्थ किंवा सासू-सुनेची बारव किंवा नागतीर्थ असेही म्हणतात. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरु विसोबा खेचर यांचेही गाव असल्याने त्यांची समाधी या परिसरातच आहे. या मंदिराच्या पूर्वेला तटबंदीबाहेर एक पाण्याचे विस्तृत तळे आहे. या तळ्याला हरिहरतीर्थ या नावाने ओळखतात, कदाचित या तळ्यात विष्णूची मूर्ती सापडल्यापासून त्याला असे नामकरण झाले असावे. सुशोभित रथातून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून नागनाथ भागवान यांची रथयात्रा काढली जाते. ही रथयात्रा भाविकांसाठी आजही खास आकर्षण आहे, त्यामुळे श्रावण महिन्यात, महाशिवरात्रीच्या पावन पर्वात भाविकांची अलोट गर्दी येथे अनुभवता येते. हे मंदिर भारतातील  सांप्रदायिक एकात्मतेचे ही प्रभावी प्रतिक आहे हे इथे हजारोच्या संख्येने येणऱ्या शीख भाविकांवरून दिसते. 

11.श्रीरामेश्वर (सेतुबंध) 

श्रीताम्रपर्णीजलराशीयोगे निबद्धय सेतु निशि बिल्वपत्रै |
श्रीरामचन्द्रेण समर्चित त रामेश्वराख्य सतत नमामि ||

दक्षिण सागरी तटावर सेतुबंध या स्थळी भगवान शिवाच्या रामेश्वर नामक ज्योतिर्लिंगाचा उद्भव झाला आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या पावन करकमलांनी या शिवलिंगाची स्थापना केल्याने हे रामेश्वर नावाने कीर्तिमान झाले आहे. सीता मातेच्या शोधात प्रभू श्रीराम ससैन्य दक्षिण सागरापर्येंत येऊन पोहोचले. परंतु दक्षिण तट पार करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर उभे होते. शिव आराधनेतून काही मार्ग निघेल असे शिवभक्त श्रीराम यांच्या मनामध्ये आले. त्यांनी शिवाचे पार्थिव लिंग घडवून त्याचे यथासांग पूजन केले. प्रभू श्रीराम यांची श्रद्धा बघून भगवान शिव साक्षात प्रकट झाले. आणि श्रीरामाच्या इच्छेनुसार जनकल्याणासाठी ‘रामेश्वर’ नावाने इथेच स्थिरावले.    

इ.स १२ व्या शतकापर्यंत श्रीरामेश्वर मंदिराचे स्वरूप एका छोट्या गोलाकार झोपडीप्रमाणे होते. मात्र सेतुपती शासकांनी या मंदिराचा पुनर्निर्माण अक्रून मंदिरला भव्यत्व प्रदान केले. इ.स बाराव्या ते सोळाव्या शतकापर्यंत विविध राजवटीत मंदिराच्या स्थापत्यामध्ये नवनवीन भर पडत राहिली. सध्य स्थितीला आपल्या समक्ष श्रीरामेश्वर मंदिराची भव्य वास्तू जवळपास पंधरा एकर मध्ये पसरलेली दिसते. दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला भव्य खांब, विस्तीर्ण मंडप, भिंती, उंच गोपुरे आणि त्यावरील कलाकुसर यांचे आकर्षण वाटते. या मंदिरामध्ये एकूण बावीस तीर्थे आहेत. मंदिरामध्ये पर्वतवर्धिनी, विश्वनाथ, विशालाक्षी, संतान गणेश, सेतूमाधव अशी छोटी मंदिरे आहेत. श्रीरामेश्वर इथल्या तीर्थकुंडासाठी ही प्रसिद्ध आहे. इथे रामतीर्थ, सिताकुंड, जटातीर्थ, लक्ष्मणतीर्थ, कपितीर्थ, ब्रह्मकुंड यांसारखी चौवीस तीर्थे आहेत. त्यापैकी अग्नीतीर्थ हे सर्वांत महत्वाचे मानले जाते. रामेश्वर मंदिराची व्यवस्था आणि देखभाल ही भारत सरकारच्या अधीन आहे. प्रदोष, शिवरात्री आदि काळांमध्ये रामेश्वराच्या पालखीचा सोहळा असतो. महाशिवरात्री आणि आषाढ महिन्यातील पंधरा दिवस इथे उत्सव साजरा केला जातो, ज्याला संपूर्ण भारतातील अनेक भाविक या मंदिराला भेट देतात.  

12.श्रीघृष्णेश्वर (एलापूर)

एलापुरीरम्यशिवालयेsस्मि न्स्रमुल्लसन्त त्रिजगद्वरेण्यम् |
वन्दे महोदारतरस्वभाव सदाशिव त घियाषणेश्वराख्यम् ||

द्वादश ज्योतिर्लिंगातील अंतिम स्थान, श्रीघृष्णेश्वर. महाराष्ट्रातील औरंगाबादपासून सु. ३० किमी. वेरूळ गावाजवळ महिषाद्रीच्या पायथ्याशी येलगंगा नदीतीरी घृष्णेश्वराचे हे सुंदर शिवालय आहे. या ठिकाणी भगवान शिवाचा बारावा अवतार श्रीघुश्मेश नावाने झाला.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या उद्भावाची कथा ही सुधर्मा नामक आणि शिभक्त घुश्मा यांची आहे. देवगिरीजवळ भारद्वाज गोत्रोत्पन्न सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पहिली पत्नी सुदेहा ही गुणवती होती परंतु तिला संतती होत नव्हती. सुदेहाची धाकटी बहिण घुश्मा हिच्याशी सुधर्माचा विवाह झाला. घुश्मा ही शिवभक्त होती. ती एकशे एक पार्थिव शिवलिंगाचे अर्चन नित्यनियमाने करे. सुरुवातीला घुश्मा आणि सुदेहा या दोन्ही बहिणी सुखाने एकत्र नांदत होत्या पण जेव्हा घुश्माला पुत्रप्राप्ती झाली तेव्हा सुदेहाचा संताप आणि ईर्षा वाढायला लागली. इकडे घुश्माचा पुत्र प्रियवादी उपवर झाला आणि योग्य वेळी त्याचा विवाह झाला. नवपरिणीत दम्पती झोपले असताना सुदेहाने प्रियवादीवर तीक्ष्ण सुरीने वार करून त्याच्या शरीराचा तुकडा त्याच सरोवरात फेकला जिथे दररोज घुश्मा पार्थिव शिवलिंग विसर्जित करीत असे. सुदेहाने तिच्या कृत्याने घुश्मा पुत्राने इहलोकाची यात्रा संपविली. सकाळी नववधूला हे समजताच ती सुधर्मा आणि घुश्मा यांच्याकडे ती आली. नित्य पूजेत लीन असणारे सुधर्मा आणि घुश्मा हे दम्पती पुत्र वियोगाच्या शोकाने किंवा पुत्रवधूच्या विलापाने विचलित झाले नाहीत. घुश्मा जेव्हा तिची दररोजची पूजा आटपून शिवलिंग विसर्जित करयला गेली तेव्हा त्याच सरोवरातून तिच्या पुत्र तिला दिसला. तीचा पुत्र तिला म्हणत होता,’हे माते, तुझ्या पुण्याईमुळे मी पुन्हा जिवंत झालो आहे, मी तुला परत भेटेन.’ हे ऐकूनही घुश्मा प्रसन्न झाली नाही. तिच्या स्थितप्रज्ञतेवर भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला दर्शन दिले. तेव्हा घुश्माने भगवान शिवला संसार रक्षणासाठी तिच्या नावाने शिवाने इथे वास करावा अशी प्रार्थना केली. भगवान शिव घुश्मेश या नावाने ज्योतिर्लिंग स्वरुपात स्थिरावले.

घृष्णेश्वर घोटीव दगडांचे असून गाभाऱ्यात काळ्या पाषाणाचे शिवलिंग आहे. मंदिराच्या शिखरावर, छतावर आणि मंडपाच्या खांबांवर सुंदर नक्षी, सुरेख मूर्ती व चित्रकारी आहेत. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणाभोवती उंच कोट असून जवळच शिवालयतीर्थ हे बांधीव प्रशस्त तळे आहे. राष्ट्रकूट वंशातील कृष्णराजाने बांधलेल्या मूळ मंदिराचा आणि शिवालयतीर्थांचा १५९९ मध्ये वेरूळचे पाटील मालोजी भोसले यांनी जीर्णोद्धार केला, परंतु पुढे औरंगजेबाने त्याचा विध्वंस केला. मल्हारराव होळकरांची पत्नी, गौतमाबाई हिने १७३० मध्ये सध्याचे मंदिर बांधले आणि अहिल्याबाईने १७६९ मध्ये शिवालयतीर्थ पुन्हा बांधले. सोमवार, प्रदोष, शिवरात्रीला भाविकांची अलोट गर्दी इथे लोटते.

द्वादश ज्योतिर्लिंगांच्या शृंखलेमध्ये पुराणकथा आणि स्थळ महात्म्य यांच्या अनुबंधातून सांस्कृतिक इतिहासाचा अखंड पट आपल्याला दिसतो. अर्थात या यादीमध्ये काही मंदिरांची आणि स्थांनांची कमी- अधिक गणती होत राहते. ज्योतिर्लिंगांच्या स्थानाबाबत काळाच्या ओघात नव्याने भर पडत गेलेली दिसते. तर क्वचित काही स्थानांचे माहात्म्य कमी झाल्याने किंवा काही स्थाने पूर्णपणे लुप्त किंवा अर्धलुप्त अवस्थेत गेल्याने, आज त्यांची यथायोग्य स्थाननिश्चिती करणे अवघड जाते. ज्योतिर्लिंग संकल्पनेतील दुसरा मुद्दा म्हणजे, आज उपलब्ध होणाऱ्या काही हस्तलिखातांमधील पाठभेदामुळे ज्योतिर्लिंगांच्या स्थान निश्चितीमध्ये काही भेद आढळतात. परंतु या स्थाननिश्चिती आणि भेदापेक्षाही अधिक थोर आहे ती या ज्योतिर्लिंगांना मनोभावे भेट देणाऱ्या भाविकांची सात्विक श्रद्धा. दरवर्षी भाविक हृदयामध्ये कोणताही भेदाभेद न ठेवता लाखोच्या संख्येने या द्वादश ज्योतिर्लिंगांची यात्रा करून पुण्यार्जन करतात. तत्कालीन धर्मपरायण राज्यकर्ते, छत्रपती श्री शिवाजी महाराज, पेशवे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांसारख्या विभूतींनी धर्मरक्षणासह या ज्योतिर्लिंग स्थानांना दान देऊन मंदिरांचा पुनर्निर्माणाचे कार्य केले. तिथे विविध कुंड, धर्मशाळा, अन्नछत्र, घाट बांधले. राजे, सरदार, सामंत, समाजातील लहान-थोर सर्वच घटक आणि शिवभक्त यांनी अश्या स्थानांचे पावित्र्य अबाधित राखून इथले वैभव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला आहे. त्यामुळेच भारतीय परंपरेमध्ये ही बारा ज्योतिर्लिंगांसारखी पावन क्षेत्रे प्राकृतिक सौंदर्य, धर्म, संस्कृती आणि जाज्वल्य इतिहासाची महास्थाने म्हणून आजही बघता येतात.

(सदर लेख महर्षी याज्ञवल्क्य संस्कृत विद्या प्रतिष्ठान, गंगाखेड प्रकाशित श्रावणमास शिवपूजन सोहळा २०२२, शतकोत्तर स्मरणीकेत प्रकाशित.)

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.