स्वाध्याय सुधा सूत्र 9 कलादेवी नमस्तुभ्यं - रूपभेद

Home \ बोधसूत्र \ स्वाध्याय सुधा सूत्र 9 कलादेवी नमस्तुभ्यं – रूपभेद

कला म्हणजे काय? कला म्हणजे माणसाच्या सृजनशील आत्मचैतन्याला दिलेली यथार्थाची साद आहे.
– गुरुदेव रवींद्रनाथ टागोर

सृजनशील आत्मचैतन्याला दिलेली यथार्थाची साद हे भारतीय कलेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. यथार्थ दर्शनाचे अनुकरण हा भाग भारतीय चिंतनामध्ये अभिप्रेत नाही. भारतीय दर्शन परंपरा असो वा कला परंपरा आत्मचैतन्य जाणण्याची ही प्रक्रिया सर्वत्र समांतर चालते. आत्मतत्त्व जाणण्याचे आणि ते अभिव्यक्त करण्याचे मार्ग भिन्न असले, तरी अंतिम ध्येय हे मोक्षसाधन आहे. कलेमध्ये चैतन्य स्वरूप जाणून कलाकार थांबत नाही तर जाणलेले ‘ब्रह्म’ हे सरूप साकार करतो. त्यामुळेच भारतीय परंपरेमध्ये कला आणि चैतन्याचे सौंदर्यस्वरूप यांचे साहचर्य प्रत्येक पावलोपावली दिसते. 

भारतीय कलेचे अलौकिक स्वरूप, कलेतील तीन महत्त्वपूर्ण घटक आणि कलेची व्याप्ती जाणून घेण्यासाठी स्वाध्याय सुधा सूत्र 8 – कलादेवी नमस्तुभ्यं हे पूर्वसूत्र अवश्य वाचा – 

कलाकार त्याच्या मर्मदृष्टीने विविध माध्यमांचा आधार घेऊन, कलेची अभिव्यक्ती ही एखाद्या तत्त्वबोध निर्मितीतून व्यक्त करतो. पण या अभिव्यक्तीमधील चारुता साधण्याकडेही कलाकार तितक्याच विचक्षण वृत्तीने लक्ष पुरवतो. कोणतीही कलाकृती निर्मित करताना काही मुलभूत सिद्धांत हे नजरेसमोर ठेऊनच कलाकृती ही सिद्ध होत असते. चित्र किंवा शिल्प या कला सिद्ध होतानाही अश्याच काही प्रक्रियांचा अंतर्भाव रसिकांसमोर नितांत रमणीय असे काही निर्मित करण्यासाठी होत असतो. 

वात्सायनाचे कामसूत्र या ग्रंथामध्ये चौसष्ठ कलांचा उल्लेख येतो, त्यापैकी एक म्हणजे आलेख्य किंवा चित्रकर्म. याच कामसूत्र ग्रंथावर यशोधर पंडित याने जयमंगला नावाचे भाष्य लिहिले आहे, ज्यामध्ये चित्रकलेची सहा मुलभूत अंगे सांगितली आहेत, ती अशी –  

रूपभेदः प्रमाणानि भावलावण्ययोजनम।
सादृश्यं वर्णिकाभंग इति चित्रं षडंगकम्।।

चित्रकर्माची सहा अंगे म्हणजे रुपभेद, प्रमाण, भाव, लावण्य, सादृश्य आणि वर्णिकाभंग. ही षडांगे आणि त्यांचा क्रमही चिंतनीय आहे. रुपभेद, प्रमाण, भाव, लावण्य, सादृश्य आणि वर्णिकाभंग ही षडांगे एकमेकांच्या संयोगातून अधिक बहरत जातात. 

चित्रकर्माच्या षडांगांमध्ये प्रथमस्थानी आहे रुपभेद हे अंग. रूप या शब्दाचा विचार केला तर या शब्दाला जेव्हा कृ किंवा भू धातु लागतो तेव्हा त्याचा अर्थ होतो आकार किंवा आकृती (Form). वैजयन्ती कोष रूप या शब्दाला परिभाषित करताना मात्र अधिक सखोल अर्थ समोर प्रस्तुत करतो. 

रूपं तत्त्वं सतत्त्वं च स्वरूपं च सलक्षणम्

याचा अर्थ असा की, रूपं म्हणजे रचना, तत्त्वं म्हणजे वास्तविक स्वरूप, सतत्त्वं म्हणजे सत्य स्वरूप, स्वरूपं म्हणजे प्राकृतिक आकार, सलक्षण म्हणजे साधर्म्य. 

रूप या शब्दाचे हे प्रतिशब्द अधिक अर्थगर्भित आहेत. भारतीय कला परंपरेत या सर्वांचा कलेच्यादृष्टीने यथोचित वापर झालेला दिसतो. या आकारांमधील भेद किंवा वैविध्य हे कलाकृतीला एक रूप प्रदान करते. कलेच्या निर्मितीमध्ये रचना, तत्त्वरूप, सत्यरूप, प्रकृतिकरूप आणि साधर्म्य यांचा समतोल राखून कलाकार त्यांच्या अव्यक्त कल्पनांचे प्रकटीकरण करीत असतो.  

रूप हा नेत्र या इंद्रियाचा विषय आहे. कलेमध्ये दोन चक्षु महत्त्वपूर्ण मानले आहेत. एक स्थूल रूपाने मानवी इंद्रियाचा भाग असणारा नेत्र, आणि दुसरा म्हणजे अंतःचक्षु. स्थूल आणि सूक्ष्म या दोनही पातळींवर ‘रूप’ ग्रहण करण्याचे सामर्थ्य मनुष्याला या दोन नेत्रांच्याद्वारा लाभते. बाह्यआकार आणि त्यातील लावण्य ग्रहण करण्यासाठी स्थूल नेत्र महत्त्वाचे आहेत, परंतु  मर्मदृष्टीच्या सहाय्याने अभ्यंतर गुणग्रहणाने अंतरिक सौंदर्य, अनुपमता, माधुर्य, तत्त्वरूप ग्रहण करता येते. 

दृष्टी हे तत्त्वतः देवी सरस्वतीचे एक स्वरूप आहे. दृष्टी म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी स्वाध्याय सुधा सूत्र 4. – श्रुती आणि दृष्टी अवश्य वाचा –

कलाकार आणि रसिकही या रूपभेदाचे ग्रहण स्थूल आणि सूक्ष्म या दोनही पातळीवर करीत असतात, फक्त त्यांच्या ग्रहण करण्याचा प्रवाह हा विरुद्ध असतो. रूपाचे म्हणजेच रचनेचे किंवा आकाराचे प्रथमदर्शनी होणारे ग्रहण, हे खूप काळ मनःपटलावर त्याची छवी सोडून जाते. म्हणूनच रूप या तत्त्वाची परिणामकारकता ही चक्षु इंद्रियांच्या सहाय्याने तत्क्षणी होते आणि स्मृतीमध्ये दीर्घकाळ राहते. त्यामुळे रूपाचा विचार भारतीय कलासाधक अग्रक्रमाने करतात. 

कलेमध्ये या रुपभिव्याक्तीमधील भेदांचा विचार तितकाच मौलिक आहे. रूप हा ‘प्रकृती विशेष’ प्रामुख्याने अधोरेखित करणारा हा घटक आहे. वास्तुसूत्र उपनिषद या मताला अधिक पुष्टी देते.

यथा प्रकृतिस्तथा रूपलक्षणम्

जशी प्रकृती तसे रूप. आणि प्रकृती म्हणजे स्वतःचा मुलभूत आकार किंवा सत्य, नैसर्गिक रचना. 

कला निर्मिती प्रक्रियेमध्ये कलाकाराच्या पातळीवर दोन क्रिया प्रामुख्याने घडतात, एक म्हणजे ग्रहण आणि दुसरी अभिव्यक्ती. भारतीय कलाकारांनी ग्रहण या पातळीवर निसर्गाला आपले प्रेरणास्थान मानले. चित्रकार काय किंवा शिल्पकार काय या कलाकारांच्या ठायी रसिक हृदय असावेच लागते. निसर्गातून अभिव्यक्त होणारे साकार रूप कलाकार हळुवार टिपून घेतो. हे निसर्ग प्रेरणेतून टिपलेले सौंदर्य, त्याच्या कलाकृतीमध्ये तो अलगद उतरवत असतो. 

निसर्गाचे हे सौंदर्य आणि त्यातील विविध घटक हे कुठे आणि कसे वापरायचे, याचे कलाकाराला यथायोग्य ज्ञान असते. निसर्गातील योग्य आणि सुरूप रचनांची मांडणी कलाकार त्यांच्या स्वयंकौशल्याने अधिक समर्पक करतो. कलाकार त्याच्या मनोवृत्तीशी त्याने ग्रहण केलेले दृश्य एकरूप करून कलात्मक सृजन करतो. त्यामुळेच एकाच विषयावरील अनेकविध चित्रे वा शिल्पे ही भिन्न स्वरूपात अभिव्यक्त केलेली दिसतात. याचाच दुसरा भाग असा की कलाकरही त्याच्या कौशल्याच्या, तंत्रांच्या आणि आत्मचिंतनाच्या पातळीवर, जसजसा प्रगल्भ होत जातो तसतसे त्याच्या अभिव्यक्तीमधून नैपुण्य अधिक झिरपत जाते. 

रुपभेद म्हणताना भारतीय परंपरेमध्ये रेखा (Line),  वर्त्तना (Application), रंग आणि छटा (Color) आणि अलंकरण (Ornamentation) या विविध तत्त्वांचा विचार केला गेला आहे. कला हा सदरीकारणाचा विषय असल्याने रसिकांच्या दृष्टीने कलाकृती कशी स्वीकृत केले जाते, हे पुढील चित्रसूत्र सांगते.

रेखां प्रशंसन्त्यार्चा वर्तनां च विचक्षणाः
स्त्रियो भूषणमिच्छन्ति वर्णाढ्यामित्तरे जनाः

आचार्य लोकांसाठी रेखा, चाणाक्ष रसिकांसाठी वर्त्तना, स्त्रियांसाठी अलंकरण तर इतर सर्व लोकांसाठी वर्ण हा त्या कलाकृतीमधील प्रशंसेचा विषय ठरतो. 

चित्ररूपाचे सौष्ठव हे रेखा, वर्त्तना, रंग-छटा आणि अलंकरण या विविध तत्त्वांमधून साकार होत असते. चित्रकला आणि शिल्पकला यांची माध्यमे भिन्न असली असली तरी ‘रुपभेद’ साकारण्यासाठी दोनही कलांनी ‘रेखा’ या तत्त्वाला विशेष महत्त्व दिलेले आहे, असे मला वाटते. शिल्पकलेमध्ये मूर्तीकाराला स्थापक म्हटले आहे, परंतु ज्या स्थापकाला रेखाज्ञान सर्वार्थाने अवगत असेल त्यास ‘स्थापकोद्गीथ’ असा लौकिक प्राप्त करेल, असे विधान सांगितले आहे. म्हणजेच रेखाज्ञान हे रुप निर्मितीमधील प्राथमिक आणि अत्यंत महत्त्वाचे असे तत्त्व मानले आहे. या रेखाज्ञानाने चित्रामध्ये, किंवा शिल्पामध्ये रुपभेद निर्माण करताना लयबद्धता, संवेग, चंचलता, तेजस्वितता, निर्मळता अश्या अनेक भावरचना कलाकाराला साधणे शक्य होते. 

याच रूपभेदासाठी आवश्यक म्हणजे कलेचे दुसरे महत्त्वाचे अंग, प्रमाण. या प्रमाणाच्या सहाय्याने रूपामध्ये होणारे परिवर्तन आणि त्यातून निर्माण होणारे वैविध्य, हे कसे सध्या होते याच आढावा कलादेवी नमस्तुभ्यं या लेखाच्या पुढील भागाद्वारा घेऊया. 

क्रमशः

– आषाढ शु.7 शके 1943, शुक्रवार (16 जुलै 2021).

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.