आपला वारसा आपली संस्कृती (भाग 1)

Home \ बोधसूत्र \ आपला वारसा आपली संस्कृती (भाग 1)

आपला वारसा, आपली परंपरा, आपली संस्कृती असे अनेक शब्द आपल्या कानावरून अनेकदा गेले आहेत. त्यामुळे वारसा हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाही. पण हा वारसा म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे परंपरेने चालत आलेली एखादी गोष्ट. मग ती मूर्त रूपामधली एखादी वास्तू जसे की एखादा वाडा किंवा एखादे घर असेल, मूर्ती असेल किंवा कोणताही दृश्य स्वरूपाची वस्तू असेल. किंवा ती अमूर्त रूपामधली एखादी परंपरा असेल, कला असेल, किंवा एखाद्या विषयाचे ज्ञान असेल. अगदी बोलण्याची लकब, काही सवयी आणि स्वभाव सुद्धा आपला वारसाच असतो. आपल्या वाडवडीलांनाकडून मिळालेला वारसा आपण अभिमानाने जपतो आणि आपल्या पुढच्या पिढीला तो सुपूर्त करतो. तसाच समाजाचा एक भाग म्हणून, आपल्या पूर्वसुरींनी संस्कृतीचा वारसा आपल्या हाती सोपवला आहे. परंपरेने आपल्या पिढ्यांमध्ये चालत आलेल्या वारश्यापेक्षा अनेक हजारो वर्ष चालत आलेल्या सांस्कृतिक वारश्याचे परीघ निश्चितच मोठे आहे. पण हा सांस्कृतिक वारसा, व्यक्ती म्हणून आपल्याला उन्नत करतो. सगळ्याच जुन्या गोष्टी वारसा म्हणता येतील का असं विचारलं तर त्याचे उत्तर नाही असे द्यावं लागेल. कारण वारसा म्हणजे अश्या गोष्टी ज्यांचे महत्त्व त्या व्यक्तीला, कुटुंबाला, जमातीला, परिसराला, प्रदेशाला किंवा देशाला आहे. या प्रत्येक घटकाला एकत्रित किंवा त्यापैकी कोणा एकासाठी स्वतंत्र तरी तो वारसा महत्त्वपूर्ण असला पाहिजे.

उदा. महाराष्ट्र भागातील वारली ही एक आदिवासी जमात आहे. या जमातीचा वारली चित्रं हा एक सांस्कृतिक ठेवा आहे. ही चित्रं, त्यांच्या सण- समारंभ, त्यांच्या चालीरीती, परंपरा यांचा एक भाग आहेत. थोडक्यात त्यांच्या जीवनातले महत्त्वाचे अंग म्हणता येईल. त्यांची घरे याचित्रांनी सुशोभीत केलेली असतात. ही लोककला असल्याने त्यात त्यांच्या जीवनातले भावभावनांचे उत्स्फूर्त रंग दिसतात. ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर असताना, त्यांच्यातील एकाला या कलेचे जतन करून, त्याची माहिती जगाला देण्याचे महत्त्व वाटले. पद्मश्री सन्मानित जिव्या सोमा मशे यांनी त्यांच्या जमातीचा हा वारसा जगासमोर आणला. त्यांंने वारली चित्रांचे रोज रेखाटन करून त्यातून पर्यावरण, जैवविविधता, संस्कृती, परंपरा, खेळ आणि समाज-दर्शन घडवले. या जमातीचे अस्तित्व किंवा वेगळेपण म्हणून ही चित्रं त्यांचा सांस्कृतिक वारसा आहेत आणि त्याचे त्यांना महत्त्व वाटले. इतकंच काय तर ही चित्रशैली महाराष्ट्र आणि भारताच्या आदिवासी दृश्यकलेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरली.

आपला भारत देश, हा खरोखरीच वैविध्यतेने संपन्न असा देश आहे. आपल्या देशाला नैसर्गिक संपत्ती, वनराई, जैवविविधता विपुल प्रमाणत लाभल्या आहेत. याशिवाय धर्म, कला, खाद्य-संस्कृती, पाककला, परंपरा, बोली-भाषा, लिपी, साहित्य, नाट्य, लोकसंस्कृती अश्या अनेक गोष्टींची विविधता वर्षानुवर्षे इथे एकत्रित नांदत आहे. हीच खरी आपली ओळख आहे. हाच खरा आपला संस्कृतीक वारसा आहे. भारतीय नागरिक म्हणून या वैभवशाली संस्कृतीचे आपण उत्तराधिकारी आहोत. पण अधिकारांसोबत येते ती जबाबदारी. आपले हे वैभव वैयक्तिकदृष्ट्या, प्रांतिकदृष्ट्या आणि जागतिकदृष्ट्याही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे हा वारसा सांभाळण्याची जबाबदारी आपलीही आहे.

वारसा संदर्भात तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. जागरुकता, जतन आणि संवर्धन. आपला वारसा जाणून घेणे ही झाली पहिली पायरी आहे. ही जागरूकता आपल्याला आपल्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींचे भान देते. या जाणीवेतून वारश्याचे जतन आणि संवर्धन करण्यास सहाय्य होते. हा वारसा खरचं इतका महत्त्वाचा असेल तर तो जपणे ही तितकेच महत्त्वाचे आहे का? हा स्वाभाविक प्रश्न आहे. त्यामुळे वारसा आपल्याला नेमकं देतो तरी काय हे समजल्यावर तो जतन करण्याचे आपण प्रयत्न करू शकतो.    

वारसा आपल्याला काय देतो
  • ओळख

परंपरेने आलेला वारसा असो किंवा समाजाचा एक भाग म्हणून आलेला, वारसा आपल्याला स्वतःची ओळख मिळवून देतो. आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्याला निश्चित मार्ग दाखवतात.   

  • जाणीव

वारसा आपल्या जाणीव देतो. जाणीव, समाजाचा एक भाग असल्याची. जाणीव, समाजात दडलेलं वैभव बघण्याची आणि जाणीव, समाजाने आपल्याला दिलेले परत समाजाला देण्याची.

वारसा म्हणजे आपला इतिहास. त्यामुळे भूतकाळातील चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी त्यासोबत येतात. पण इतिहासातून हेच शिकायचं, की चांगल्या गोष्टींचे अनुकरण आणि वाईट गोष्टींचे दमन.

  • प्रेरणा

इतिहासातील राज्यांच्या शौर्यगाथा आपल्याला प्रेरणा देतात. त्याच राज्यांची धर्मनिष्ठता आणि करुणा आपल्याला सन्मार्ग दाखवतात. मौर्य सम्राट अशोकाच्या शिलालेखांतून धर्मतत्त्वांचा प्रसार केलेला दिसतो. त्याकाळी त्याने सांस्कृतिक ऐक्य साधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची नोंद तो या लेखांमध्ये करतो. प्राचीन काळात भारतामध्ये आलेल्या कुषाण, क्षत्रपांसारख्या परकीय राज्यांनीही इथल्या संस्कृतीचा स्वीकार करून आपल्या परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या गोष्टी आपल्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आहेत.

  • अस्मिता

अस्मिता म्हणजे आपले स्वतंत्र अस्तित्व असल्याबद्दलची आणि ते महत्त्वपूर्ण असल्याबद्दलची भावना. आपली कार्यक्षेत्र भिन्न असतात. तरी संस्कृतीच्या वेगवेगळ्या पैलूंनी, आपल्या सर्वांना एकत्रित बांधले आहे. हा एकी भाव म्हणजेच अस्मिता जी या वारसा रूपाने आपल्याला मिळते.

वारसा किती महत्वाचा आहे हे आपल्याला आत्तापर्यंत समजले असेलच. पण कोणकोणत्या गोष्टींना वारसा म्हणायचे? हा प्रश्न तसाच राहतो. याही प्रश्नाचे उत्तर आपण बघणार आहोत, पण पुढच्या भागात.

(क्रमशः)

आपला वारसा आपली संस्कृती (भाग 2)

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS