पौष महिना सुरु झाला की लगबग सुरु होते ती मकर संक्रांतीची. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणत नात्यांमध्ये माधुर्य वाढवणारा हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. आत्ता जरी मकर संक्रांतीचे स्वरूप हे सणाचे असले, तरी हे भारतीय धार्मिक व्रतांपैकी एक व्रत होते. सध्या आपण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा तीन दिवस हा सण साजरा करतो. दक्षिण भारतातही याच दिवशी पोंगल नावाचा सण साजरा केला जातो. संक्रांती प्रमाणे तीन दिवस चालणारा हा पोंगल म्हणजे तमिळ वर्षाचा पहिला दिवस असतो.
भारतात सर्वत्रच आपले देशबांधव संक्रांत साजरी करतात. जम्मू-काश्मीरमध्ये शिशिर सेक्रांत, पंजाब मध्ये लोहडी, आसाममध्ये माघ बिहू, बंगालमध्ये पौष संक्रांत, गुजरातमध्ये उत्तरायण, महाराष्ट्रात मकर संक्रांत आणि तामिळनाडू मध्ये पोंगल अश्या विविध नावे आणि काही प्रादेशिक परंपरा यांचे वेगळेपण टिकवून हे उत्तरायण सर्वत्र तितक्याच आनंदाने साजरे केले जाते.
संक्रांत याचा अर्थ सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे संक्रमण. २१ डिसेंबर पासून सूर्याचे उत्तरेकडे जाणे सुरु होते, म्हणजेच दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते. या काळात तीळ आणि तिळाचे पदार्थ आपल्या आहारात येतात. धर्मशास्त्रकार डॉ. पां. वा. काणे म्हणतात, त्यानुसार मकर संक्रांत हा सण प्राचीन असणे शक्य नाही. परंतु अनेक शतकापासून भारतीय आहारात आणि संस्कृतीत वेगवेगळ्या निमित्ताने येणाऱ्या तिळाचे अनेक प्राचीन संदर्भ मोठ्या प्रमाणात सापडतात. पुरात्तत्वशास्त्र, आहारशास्त्र, आयुर्वेद, चिकित्साशास्त्र, धर्मशास्त्र यांसारख्या शास्त्रांच्या आधारे तिळाचा इतिहास, उगम, वापर आणि धार्मिक महत्त्व यांचा परामर्श या लेखाच्या माध्यमातून आज मी घेत आहे.
तिळाचा इतिहास
तिळातील पौष्टिक सत्त्व, स्निग्धपणा आणि त्याची सहज उपलब्धता यांमुळे तिळाचा वापर अनेक ठिकाणी वेगवगेळ्या स्वरूपात आजही होताना दिसतो. अर्थात तिळाचे अनेक औषधी गुणधर्म ही आहेत, ज्याची माहिती आपण पुढे बघूच. भारतासह जगातील अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये तिळाचा वापर झाला आहे, तसे उल्लेख आणि पुरावे आपल्याला मिळतात. तिळाच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर त्याचा पहिला प्राचीन पुरावा सिंधू खोऱ्यात बहरलेल्या संस्कृतीमध्ये मिळतो.
संशोधकांमध्ये तिळाच्या उगमस्थान निश्चितीवर अजून एकमत झाले नसले तरी, उत्खननातून प्राप्त झालेल्या भाजक्या तिळाच्या अवशेषावरून भारतीय संस्कृतीत तिळाचे प्राचीनत्व दिसते. पुरातत्त्वीय उत्खननांमध्ये पंजाब, हरियाणा, मिरी कलात (बलुचिस्थान) येथे भाजक्या आणि उकडलेल्या स्वरूपात, हडप्पाच्या प्रारंभिक ते अंतिम अश्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तिळाचे अवशेष सापडले आहेत. थोडक्यात काळाच्या भाषेत बोलायचे झाले तर इ. स. पू. ३६०० ते इ. स. पू. १७५० दरम्यान. याच काळातील इतर संस्कृतींचा आढावा घेतला तर मेसोपोटेमियामधील नोंदींमध्ये या तिळाचा उल्लेख येतो.
अलीकडील संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, भारतातून तीळ इराणमार्गे, मेसोपोटेमियामध्ये गेले. मेसोपोटेमियमच्या उत्खननात तिळाचे अवशेष अजूनतरी सापडले नाहीत. मेसोपोटेमियन आणि सुमेरिअन संस्कृतीच्या नोंदींमध्ये से-गी-सी हे त्यांचे स्थानिक तेल बी असल्याचा उल्लेख येतो. तिळ असा किंवा त्याच्याशी साधर्म्य दाखवणारा शब्द या नोंदींमध्ये नाही.
भारतामध्ये तिल या संस्कृत नावाशी संबंधीत या शब्दाचे रूप पुढे तैल (तेल) असे होताना दिसते. थोडक्यात तैल म्हणजे तिलोत्पन्न म्हणजे जे तिळापासून निर्माण झाले आहे. अक्केडीअन संस्कृतीत samassammu आणि ellu हे शब्द येतात. प्रत्येक संस्कृतीतील प्रादेशिक भाषेत तिळाचे नावं सापडते. भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये एल्लू, तिल्लू, तैल, तिल असे तिळाचे वेगवेगळे नामनिर्देश आहेत. ग्रीक भाषेत sesamon किंवा sasama, अरेबिक भाषेत मध्ये simsim असा शब्द योजला आहे जो लॅटिन भाषेत sesame असा झालेला दिसतो.
आहारातील तीळ
आहारशास्त्राच्यादृष्टीने तिळाकडे बघताना त्याचे विविध फायदे आपल्या सहज लक्षात येतील. भारतातील खरीप आणि रब्बी लागवडीत असलेल्या सर्वांत प्राचीन धान्यांपैकी एक म्हणजेच तीळ. त्यामुळे पहिल्यापासूनच आहार आणि व्यवहारात तिळाचा मुबलक वापर आपल्याला दिसतो.
तैतरीय संहिता, अथर्ववेद, शतपथ ब्राह्मण, जैमिनीय उपनिषद, छांदोग्य उपनिषद सारख्या प्राचीन वाङ्मयातून आहारातील एक जिन्नस, होमधान्य आणि पितृतर्पणासाठी म्हणून तिळाचा उल्लेख येतो. पायास, खिचडी सारखे पदार्थ बनवताना तिळाचा त्याच समावेश होत असे. तिळापासून बनविलेल्या तेलाचेही अनेक संदर्भ प्राचीन ग्रंथात सापडतात.
तांदूळ आणि तिळाचे मिश्रण वाफवून तयार केलेल्या भाताला तिलोदन म्हणत आणि तो आवडीने खाल्ला जाई. तिलपर्पट म्हणजे तिळाचे पापडाचाही समवेश होता. शष्कुलीका नावाचा एक गोड पदार्थ – ज्यात बारीक केलेला तांदूळ आणि तिळाचा वापर केला जात असे. हा पदार्थ मिष्टांन्नातील एक प्रकार होता.
शष्कुल्यः शालिपिष्टैः सतिलैस्तैलपक्वाः क्रियन्ते| – (चरक संहिता २७.२६५)
तिळापासून बनवलेला शष्कुलीका हा पदार्थ तर बौध्द भिक्षुंनाही अतिशय प्रिय होता, असे उल्लेख चूल्लवग्ग आणि धम्मपद यांसारख्या बौद्ध साहित्यामध्ये येतात. तांदूळ, साखर आणि तीळ वापरून बनवलेल्या या शष्कुलीकाचा मोठा आकार झाला की तिला दीर्घ शष्कुलीका म्हणत. एकदा एका भिक्षूने खास ही शष्कुलीका बनवून मागून घेतली होती, ज्याची परिणीती अशी झाली की बौद्ध भिक्षुंच्या सभेत या कृत्याविषयी त्या भिक्षूला खेद व्यक्त करावा लागला.
याशिवाय तिळाची भुकटी किंवा चूर्ण करूनही आहारात वापरण्याचा प्रघात होता. तिळाच्या या चूर्णाला तिलपीठ किंवा तिलकुट असे म्हणत. आहाराशिवाय वैद्यकीयशास्त्रातही तिळाचा आणि त्यापासून बनणाऱ्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता, असे दिसते.
औषधी तीळ
तिळाच्या बहुगुणत्वाचा उल्लेख सुश्रुत, चरक यांसारख्या प्राचीन संहितांमधून वारंवार येतो. आयुर्वेदामध्ये तीळ त्रिदोष म्हणजे कफ, वात आणि पित्त या तीनही दोषांवर गुणकारी सांगितला आहे.
सर्वेभ्यस्त्विह तैलेभ्यस्तिलतैलं विशिष्यते | – (सुश्रुतसंहिता)
सुश्रुतसंहितेमध्ये दिलेल्या तेलांपैकी – तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ आणि विशेष मानले गेले आहे.
तिळाच्या तेलाचे महत्त्व विषद करताना चरक संहितेत असे वर्णन येते –
तैल संयोगसंस्कारात सर्वरोगापहं परम् | – (चरकसंहिता)
सूज, सांधेदुखी सारख्या गोष्टींसाठी चरक संहितेमध्ये तिळाच्या तेलाचा वापर सांगितला आहे. चिकित्साशास्त्रात कृष्णतिल म्हणजे काळ्या तिळाचे औषधी मूल्य अधिक असल्याचे नमूद केले आहे. शल्यचिकित्सेतही तिळाच्या तेलाचा वापर करावा असे उल्लेख येतात.
सुश्रुत संहितेमध्ये नासिकासंधान म्हणजे नाकाच्या शास्त्रक्रियेनंतर रोगप्रतिकारक घटक म्हणून तिळाच्या तेलाचा उपयोग करीत असत. कोणताही व्रण किंवा जखमेसाठी या तेलाचा वापर होत असे. आयुर्वेद, चिकित्साशास्त्र यांच्या बरोबरीने तिळाचे सर्वाधिक महत्त्व दिसते ते आपल्या भारतीय परंपरेमध्ये. भारतीय परंपरेत तिळाचा वापर धार्मिकदृष्ट्या कशा प्रकारे होत असे याचा अंदाज धर्मशास्त्राच्या आधारे घ्यावा लागतो.
तीळ आणि तिळाचे धार्मिक महत्त्व
धर्म हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, त्यामुळे तिळाचा, धार्मिक व्यवहारात विशेष वावर दिसतो. दानं, तर्पण, श्राद्ध अश्या विधींना भारतीय परंपरेत एक विशेष अर्थ आहे. त्यामुळे धर्मशास्त्र आणि तिळाचे धार्मिक महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे.
पितरांच्या हिताकरिता धर्मशास्त्रातील विधींना अनुसरून श्रद्धापूर्वक जे केले जाते त्याला श्राध्द म्हणतात. संक्रांतीलाही श्राद्ध घालण्याचा निर्देश धर्मशास्त्रात आहे. पितृतर्पण आणि श्राद्ध या दोन्ही विधींना भारतीय संस्कृतीमध्ये एक विशिष्ट स्थान आहे. सूत्रकाळापासून ते मध्ययुगीन काळखंडापर्येंत सर्वच धर्मशास्त्रीय ग्रंथांच्या कर्त्यांनी श्राद्ध संस्थेला महत्त्व दिले असल्याचे दिसून येते.
पितॄणां प्रथमं भोज्यं तिलाः सृष्टाः स्वयंभुवा |
तिलदानेन वै तस्मात्पितृपक्षः प्रमोदते ||
– महाभारत, अनुशासन पर्व १३-१०१-७
श्राद्ध आणि पितृतर्पण विधींमध्ये तिळाच विशेष वापर केला जातो. पितरांना भाताचे पिंड अर्पण केले जातात त्यात तीळ असतो. महाभारत, अनुशासन पर्वानुसार कश्यप ऋषीच्या देहातून तिळाची उत्पत्ती सांगितली आहे. श्राद्ध विधानामध्ये तिलतर्पण हे पापांतून मुक्ती प्रदान करणारे आणि सद्गती प्राप्त करून देणारे मानले आहे.
मध्ययुगीन कालखंडातील धर्मशास्त्रावर आधारित धर्मसिंधु नावाचा एक संग्रह आहे. या ग्रंथामध्ये शनी किंवा राहूच्या प्रभाव कमी करण्यसाठी तीळ किंवा तिळाचे तेल दान करण्याचा निर्देश आहे. विधवा स्त्रियांसाठी पती, पिता आणि पितामह म्हणजे आजोबा यांच्यासाठी दररोज तर्पण सांगितले आहे.
तर्पणं प्रत्यहं कार्ये भर्तुस्तिलकुशोदकैः |
मनुस्मृतीमधील या श्लोकांत कलियुगामध्ये धर्माचे प्रमुख लक्षण दान सांगितले आहे.
तपः परं कृतयुगे त्रेतायां ज्ञानं उच्यते ।
द्वापरे यज्ञं एवाहुर्दानं एकं कलौ युगे । । मनुस्मृती – १.८६
महाभारत, अग्निपुरण, मत्स्यपुरण आणि अनेक सूत्र ग्रंथांमध्ये दानाची महती येते. मकर संक्रांतीच्या वेळी काही विशिष्ट प्रकारची दाने करायची असतात. मत्स्यपुराणात असा उल्लेख येतो की या दिवशी तिलधेनु म्हणजे गाईची तिळाची प्रतिकृती बनवून ती दान करावी. विष्णूधर्मोत्तर पुराणात वस्त्र, तीळ, नांगराला जोडायची बैलांची जोडी दान करावी असा उल्लेख येतो.
शिवरहस्यात असा नियम सांगितला आहे की, शंकराने गोसव यज्ञ केल्यानंतर सर्व लोकांच्या संतोषाकरिता मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळाची उत्पत्ती केली आहे. त्यामुळे या दिवशी पुरुषांनी तिलयुक्त पाण्याने आंघोळ करावी, अंगाला तीळ लावावे, देवांना आणि पितरांना तिलयुक्त पाण्याने तर्पण करावे, ब्राह्मणांना तीळ दान करावेत, तीळ भक्षण करावेत, तिळाचा होम करावा, तिळाच्या तेलाचे दिवे शंकराच्या देवालयात लावावे आणि ब्राह्मणानी तिळतांदूळांनी शिवाची पूजा करावी.
तिलोद्वर्ती तिलस्नायी शुचिर्नित्यं तिलोदकी |
होता दाता च भोक्ता च षट्तिली नावसीदति || – शातातप
तसेच
द्वादश्यां षट्तिलाचारं कृत्वा पापात् प्रमुच्यते॥
तिलस्नायी तिलोद्वर्त्ती तिलहोमी तिलोदकी।
तिलस्य दाता भोक्ता च षट्तिली नावसीदति॥ – शब्दकल्पद्रुमः
उपरोक्त श्लोकामध्ये षट्तिलाचारं म्हणजे तिळाच्या सहा विनियोगांचे वर्णन आले आहे. तिलोद्वर्ती म्हणजे अंगाला तीळ चोळणे, तिलस्नायी म्हणजे तिलमिश्रित पाण्याने स्नान करणे, तिलोदकी म्हणजे तीळ आणि पाण्याने पितरांना तर्पण करणे, तिलाहोमी म्हणजे तिळांचा अग्निहोम करणे, तिळाचे दान देणे आणि भक्षण करणे असे एकूण सहा विनियोग सांगितले आहेत.
दान देण्याच्या उत्तम काळाविषयी निर्देश धर्मशास्त्रात येतात त्यापैकी एक उत्तम काळ म्हणजे संक्रांत. दान देण्याच्या ज्या निरनिराळ्या पद्धत्ती प्रचलित होत्या. मत्स्यपुराणानुसार दहा पद्धतींच्या दानाची एक विशिष्ट पद्धत होती, त्यांना पर्वतदान किंवा मेरूदान असे म्हणत. अश्या प्रकारचे दान करताना दानकर्त्याने ठराविक पदार्थांचे पर्वताच्या आकाराचे ढीग दान करायचे असतात. या प्रकारच्या पर्वत दानांत धान्य, मीठ, गुळ, हेम (सोने), कापूस, तूप, रत्न, चांदी, साखर यांशिवाय तिळाचा समावेश आहे. पातके म्हणजे पापनिवारणाचा एक उत्तम मार्ग म्हणजे तिलदान हा सांगितला आहे.
थोडक्यात, भारतीय संस्कृतीमध्ये असलेले तिळाचे महत्त्व बघता त्याचा इतिहास, उगम, वापर आणि धार्मिक महत्त्व या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला पाहता आला. आजही संक्रातीच्या निमित्ताने तिळाचा वापर टिकून आहे. त्यामुळे मकर संक्रातीच्या सर्वांना शुभेच्छा देत मी हेच म्हणेन तीळगुळ घ्या आणि स्वस्थ रहा!
Refrence
- Om, P. (1961). Food and drinks in ancient India: From earliest times to c. 1200 A.D. Delhi: Munshi Ram Manohar Lal.
- Kane, P. V.(1930). History of dharmaśāstra. Poona: Bhandarkar Oriental Research Institute.
- Dorothea Bedigian, History and lore of sesame in Southwest Asia – Economic Botany, Bedigian, D. Econ Bot (2004) 58: 329. https://doi.org/10.1663/0013-0001(2004)058[0329:AR]2.0.CO;2
- मराठी विश्वकोश