Year: 2018

  • कालिदास दिन – आषाढस्य प्रथमदिवसे

    कालिदास दिन – आषाढस्य प्रथमदिवसे

    आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानु वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।

    आज आषाढाचा पहिला दिवस. काळ्या मेघांनी आसमंत भरून जाणार आणि विद्युल्लतेसह अमृतधारा बरसवणार. रामगिरीच्या उत्तुंग पर्वतावर उतरलेला काळा ढग, म्हणजे जणू मदमस्त हत्ती त्याच्या शक्तीनिशी ढूश्या मारतो आहे. हे दृश्य डोळ्यात साठवत विरहव्याकुळ यक्षाला त्याच्या पत्नीची आठवण येते. सृजनाचा सोहळ्याचा प्रत्यक्ष साक्षी असलेला यक्ष त्याची व्याकुळ अवस्था मेघाला कथन करतो आणि सुरु होतो मेघदूताचा काव्यप्रवास.

    मेघदूत हे खण्डकाव्य कवीकुलगुरु पदवीने विभूषित कालिदास यांनी रचले आहे. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असे दोन भाग असलेले हे भावकाव्य म्हणजे संस्कृत खण्डकाव्यामधील मुकुटमणी. इतर कविंप्रमाणे कालीदासही स्वतः विषयी मौन बाळगतो त्यामुळे त्याचा जन्म, जन्मस्थान, काळ अश्या गोष्टींची निश्चित माहिती मिळत नाही. परंतु वि.वि.मिराशी यांनी त्यांच्या कालिदास या ग्रंथामध्ये संदर्भासह अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. मन्दाक्रान्ता वृत्तामध्ये १२० श्लोकांची रचना या काव्यामध्ये आहे. मन्दाक्रान्ता वृत्ताचाही स्थायीभाव हा मंद गतीने जाणारा असल्याने काव्यातील भावना सुस्पष्ट होण्यास सहाय्यक ठरतात. एका शापित यक्षाचा विहार आणि सकारात्मक विवेक बुद्धीने स्विकारलेले परिस्थिती यांचा समन्वय काव्यातून दिसतो. मेघाला आपला दूत बनवून यक्ष त्याच्या प्रियेला संदेश पाठवतो. हा संदेश घेऊन अलकानगरीत जाण्याचे तपशीलवार वर्णन काव्यामध्ये केले आहे, त्यामुळे या प्रवासातील अनेक लहान मोठे भौगोलिक क्षेत्र, संस्कृती, रिती इ. कालिदासाच्या समृद्ध कल्पक बुद्धीतून अवतरली आहे. काव्यात्मक वर्णने इतकी समर्पक आहेत की ती चित्ररूप बनून आपल्यासमोर साक्षात आकार घेताना दिसतात. कालिदासाला उज्जयिनी नगरी दिवः कान्तिमत्खण्डमेकम् म्हणजे  साक्षात स्वर्गाचा झळाळणारा तुकडा भासते. चर्मण्वती नदीचे वर्णन करताना कृष्णवर्णीय मेघ या नदीच्या शुभ्र प्रवाहात, पाणी प्राशन करण्यास उतरल्यावर एखाद्या इंद्रनीलमण्याच्या माळेप्रमाणे भासेल अशी उपमा दिली आहे. हिमालयात वसलेल्या अलकापुरीची आणि यक्ष स्वतः राहत असलेल्या स्थळाचे वर्णन अधिकच प्रभावी केले आहे. भव्य वास्तू, इंद्रधनुषी तोरण, फुलांनी बहरलेले मंदार वृक्ष, सोनेरी कर्दळीचे कुंपण अश्या अनेक मोहक गोष्टी हा यक्ष सोडून एकांतवासात आला आहे. त्याहीपेक्षा वर्षा ऋतूचा प्रारंभ म्हणजे प्रणयी जीवांच्या मिलनाचा संकेत आणि त्यात यक्षाला दण्डस्वरूप मिळालेला पत्नी वियोग त्याच्यासाठी वेदनादायी आहे. कालिदासाने काव्यातून साकारलेली यक्षाची पत्नी ही रूपवती तर आहेच पण ती प्रेमळ, पतिव्रता आणि आदर्श गृहिणी पण आहे. मेघदूत या काव्याला प्रतिभासंपन्न सौंदर्यदृष्टी आणि कलाभिज्ञता यांची सुंदर अशी किनार लाभली आहे. मोजक्या शब्दांमध्ये रम्य काव्य निर्मिती करून कालिदासाचे मेघदूत हे अक्षरकाव्य झाले आहे. मेघदूत रूपाने रसिक मनाचे एक एक पटल हळुवार उलगडून मधुर काव्याचा स्वर्गीय आनंद रसिकांमध्ये प्रस्थापित करण्यास कालिदास यशस्वी ठरला आहे. त्यामुळेच आजचा आषाढाचा पहिला दिवस काव्य प्रतिभासंपन्न कवीकुलगुरू कालिदास यांच्या स्मरणात कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो.

    चित्र आभार – चित्रकार नाना जोशी

  • मुंबईचा वारसा – व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको

    मुंबईचा वारसा – व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको

    बहरीनमधील मनामा येथे 30 जून 2018 रोजी संपन्न झालेल्या 42 व्या सत्रात, मुंबईचा सांस्कृतिक वारसा म्हणून मुंबईच्या व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. जवळजवळ 94 इमारती आणि 1500 पृष्ठसंख्या असलेले तीन भागांमधील दस्ताऐवज या सत्रात सादर केले गेले. या इमारतींच्या स्थापत्य शैलींंची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. या इमारती युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित झाल्या आहेत. त्यानिमित्ताने व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको यांच्या संबधित माहिती जाणून घेऊया. 2004 मध्ये मुंबमधील व्हिक्टोरिया टर्मिनस या नावाने परिचित असलेले, सध्याचे छत्रपति शिवाजी टर्मिनस हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नोंदवले गेले होते. हे व्हिक्टोरियन इटालीयन गॉथिक रीव्हायवल स्थापत्याचा प्रभाव असलेले एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. इ.स. 19 व्या शतकातील रेल्वेस्थानक स्थापत्यामधील ही ब्रिटीशकालीन वास्तू एक आधुनिक आणि कलात्मक संरचना यांचे प्रतिक आहे. अश्याच अनेक इमारती मुंबईच्या सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवणाऱ्या आहेत.

    मुंबई हे सात बेटाच्या शहर, एक प्राचीन व्यापारी केंद्र तर होतेच आणि आजही ते आहे. त्यामुळेच इथल्या स्थापत्यावरून सांस्कृतिक समन्वयाची कल्पना येते. व्हिक्टोरिया शैली, गॉथिक आणि डेको या तीनही शैलींचा मिलाफ महाराष्ट्रातील मुंबईच्या कुशीत आजही श्वास घेताना दिसतो तो या इमारतींच्या रूपात. सध्या समावेश झालेल्या व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेकोतील इमारती यांची काही वैशिष्ट्ये आहेत. साधारण  १९ व्या आणि २० व्या शतकातील या इमारती मूर्त रूपाला आल्या आणि आजही त्या माणसांच्या रेलचेलीने गजबजलेल्या आहेत. या इमारती त्यांचा जिवंतपणा आजही टिकवून आहेत. मुंबई शहर आणि महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बाब म्हणता येईल. पण तरी जागतिक वारसा म्हणजे नेमके काय? व्हिक्टोरिया गॉथिक म्हणजे काय ? आर्ट डेको काय असते? असे काही प्रश्न आपल्या मनात अनुत्तरीत राहतातच. त्यामुळे या सर्व प्रश्नांचे टप्याटप्याने निरसन करते.

    जागतिक वारसा म्हणजे काय?

    सर्वप्रथम जागतिक वारसा म्हणजे काय हे जाणून घेऊया. युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील एखादे स्थान, ज्याला सांस्कृतिक व भौगोलिकदृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे, त्याला जागतिक वारसा असे म्हणतात. युनेस्कोने या जागतिक वारश्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे जतन, संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी 1972 मध्ये जागतिक वारसा अधिनियम (1972 World Heritage Convention) प्रसारित केला. हा अधिनियम विशेषतः जागतिक वारश्याचे संरक्षण आणि त्याची वैविध्यता टिकवण्यासाठी करण्यात आला आहे. या नियमातील सांस्कृतिक वारसा याच्या अंतर्गत मुंबईमधील व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको यांचा समावेश करण्यात आला आहे.

    सांस्कृतिक वारसा म्हणजे काय?

    वारसा स्थळे ही त्या विशिष्ट प्रांताच्या, देशाच्या, प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करीत असतात. त्यामुळे हा वारसा त्या स्थानाचे महत्त्व तर दर्शवतोच परंतु याशिवाय तिथे राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या जीवनमानाचा एक अविभाज्य भाग असतो. तिथे नांदणाऱ्या संस्कृती, परंपरा या वारसा रूपात त्यांच्या पाऊलखुणा स्पष्ट दाखवतात. या सांस्कृतिक वारश्यामध्ये स्मारके, इमारतींचे समूह आणि साईट येतात.  
    मुंबईमधील सांस्कृतिक वारसा म्हणून व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे तो इथल्या इमारती आणि त्यांचे समूह यांमुळे. याचे कारण असे आहे की, या इमारतींची स्थापत्यशैली, त्यांच्या एकजिनसीपणा किंवा त्या इमारतींच्या बाजूचा परिसर हा इतिहास, कला आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान दृष्टिकोनातून सार्वत्रिक मौल्यवान आहे. हा सांस्कृतिक वारसा जगासमोर येणे आणि तो जपणे महत्त्वाचे असल्याने व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेकोच्या नामांकनाला जागतिक वारसा म्हणून स्विकृती मिळाली आहे.

    बॉम्बे गॉथिक म्हणजे काय?

    इ.स. 18 व्या आणि 1 9 व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईमध्ये व्हिक्टोरिया गॉथिक शैली प्रथम आली ती ब्रिटिश राज्यात. ब्रिटीश शैलीची ही वास्तुकला भारतमध्ये बहरायला लागली. वास्तूनिर्मितीचे सुरुवातीचे पर्व निओ-क्लासिकल शैलीच्या नावाने ओळखले जात होते. पुढे या शैलीत सुधारणा होऊन एक नवीन शैली निर्माण झाली. या वास्तूशैलीवर आधुनिक युरोपियन पद्धतीचा प्रभाव होता. त्याला गॉथिक रीव्हायवल शैली असे म्हणतात.
    क्लासिकल शैली पेक्षा ही भिन्न असण्याचे कारण हे होते की, गॉथिक शैली ही निओ-क्लासिकल शैलीच्या तुलनेने अधिक अर्थपूर्ण, कोरीव काम असलेली, कथा घटकांसह सुशोभित असलेली आणि सुंदर अश्या खिडक्या असलेली अशी होती. भारतीय आणि ब्रिटीश वास्तूविशारदांनी भारतीय वातावरणाशी जुळवून घेणारी आणि इथला स्थानिक समाज संरचना आणि संवेदना लक्षात घेऊन वास्तुनिर्मिती केली, त्यामुळे या गॉथिक आणि समकालीन शैलीचे मिश्रणातून निर्माण झालेल्या नवीन शैलीला बॉम्बे गॉथिक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याच इमारती म्हणजे  युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या समवेश केलेल्या मुंबईच्या व्हिक्टोरिया गॉथिक इमारती.

    मुंबईतील  व्हिक्टोरिया गॉथिक इमारती कोणत्या?

    व्हिक्टोरिया गॉथिक इमारतींमध्ये उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, राजाभाई क्लाॅक टॉवर, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिस्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, ओव्हल मैदान यांसारख्या अनेक वास्तूंचा समावेश केला आहे.

    आर्ट डेको म्हणजे काय?

    Art Nouveau ही स्थापत्यामधील अलंकारिक (ornamental) शैली मागे पडली, तेव्हा 1910 मध्ये डेकोचा प्रारंभ झाला असे म्हणता येईल. आर्ट डेको शैलीमध्ये स्थापत्यविशारद यांनी अनेकविध स्त्रोतांतून प्रेरणा घेतली. मुंबईमधील डेको या अतिशय वैविध्यपूर्ण शैली दाखवणाऱ्या इमारती असल्याने त्यांचे वारसा म्हणून स्वतंत्र असे एक अस्तित्व आणि महत्त्व आहे. इस्लामिक आणि हिंदू स्थापत्यशास्त्रातील शैलीचे मिश्रण या आर्ट डेको मध्ये आपल्याला बघयला मिळते. या शैलीला डेको सारसिनीक (Deco-Saracenic) असे म्हणतात. उठावदार रंगीत इमारती ज्या त्यांच्या रंगांमुळे, त्यांच्या वैशिट्यपूर्ण आकारामुळे आपले लक्ष वेधून घेतात, त्या आर्ट डेको इमारती मुंबईचा सांकृतिक वारसा आहेत.

    मुंबईतील आर्ट डेको इमारती कोणत्या?

    क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्लमेन्सनची पहिली रांग, दिनशॉ वाछा रोडवरील राम महल, इरॉस व रिगल सिनेमा हॉल तसेच मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती यासारख्या वास्तूंचा समावेश यात करण्यात आला आहे. आर्ट डेको मुंबई ट्रस्ट यांच्या अधिकृत संकेतस्थळी या विषयी आपण अधिक माहिती वाचू शकता.

    भारतमध्ये विविध कालखंडात निर्माण झालेल्या या संमिश्र वास्तूशैली तत्कालीन भारतीय इतिहास, कला, तंत्रज्ञान यांची साक्ष देणाऱ्या आहेत. जागतिक वारसा यादीत मुंबईचा वारसा म्हणून या इमारतींचा समावेश होणे हे मुंबईच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतिक आज जगासमोर येत आहे. युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणाऱ्या स्थळांना त्यांच्या संरक्षांसाठी, संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देते. त्यामुळे भविष्यात या इमारतींचे वेगळेपण जपणे शक्य होऊ शकेल. याशिवाय जागतिक पातळीवर जेव्हा या इमारतींचे वारसा म्हणून नामांकन स्वीकारले जाते तेव्हा स्वाभाविकच मुंबईला आणि त्या अनुषंगाने देशाला पर्यटन आणि व्यापार या दोनही दृष्टीने आर्थिक फायदा होऊ शकतो.
    याविषयावर आपले विचार ऐकायला मला नक्कीच आवडतील.

  • डॉ. मधुकर केशव ढवळीकर – स्मृतिकोश

    डॉ. मधुकर केशव ढवळीकर – स्मृतिकोश

    भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर मध्ये 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2017 दरम्यान गणेश – आशियाचे दैवत या डॉ. मधुकर केशव ढवळीकर सरांच्या पुस्तकावर आधारित चित्रप्रदर्शन सादर करण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी मला स्वयंसेवी सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अर्थात ही संधी मिळाली पेक्षा ही संधी मी घेतली म्हणणे अधिक उचित ठरेल. ढवळीकर सरांना प्रत्यक्ष भेटण्याआधीच त्यांच्या वलयाची मला कल्पना आणि जाणीव होती. जागतिक कीर्ती संपादन केलेले पुरातत्त्वज्ञ, सांस्कृतिक मंत्रालय यांच्या टागोर शिष्यवृत्तीचे मानकरी आणि पद्मश्रीने सन्मानित डॉ. मधुकर केशव ढवळीकर म्हणजे भारतीय पुरातत्त्वातील एक अधिकारी नावं होते. भारतीय पुरातत्त्व या विषयांत एम.ए. ही पदवी सुवर्णपदकासह त्यांनी प्राप्त केली होती. सरांसारखे असे मूर्तिमंत ज्ञानपीठ मला प्रत्यक्षात दर्शन देणार होते. स्वयंसेवी सहाय्यकांसाठी एक पर्वणी म्हणजे, आम्हाला आधी सर स्वतः हे प्रदर्शन समजावून सांगणार होते. एका क्षणाचाही विलंब न करता मी या कामासाठी तयार झाले. इंडोलॉजी शिकताना अगदी पहिल्या सत्रापासून ते शेवटच्या सत्रापर्येंत ढवळीकर सर मला फक्त पुस्तकातून भेटत होते. काही व्याख्यानांच्या दरम्यान त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा, ऐकण्याचा योग आला इतकंच. पण सरांच्या अधिकारापुढे त्यांच्याशी जाऊन काय बोलावे हा प्रश्न कायमच पडत होता. त्यामुळे बोलण्याची संधी अनेकदा हातातून निसटून जात असे. ढवळीकर सरांच्या परिचयाच्या काही व्यक्तींजवळ मी सरांना भेटण्याची इच्छा प्रकट केली, पण हा योग कधी जुळून आलाच नाही. ‘गणेश – आशियाचे दैवत’ या चित्रप्रदर्शनाने मला ती संधी दिली. ते सात दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय राहतील, हे खरे.

        मी भारतीय विद्या या अभ्यासाकडे आले तेच मुळात कलेच्या प्रेमापोटी. १४ ते १७ व्या शतकापर्यंत झालेल्या कला क्षेत्रातील पुनरुज्जीवनाची चळवळ याविषयी मी स्वयं-अध्ययन करीत होते. तिथून मी फ्लॉरेन्स, युरोप येथील कला, त्यांच्या शैली अभ्यास करत थेट पोहोचले ते अजिंठापर्यंत. त्यावेळी जाणीव झाली की, अजिंठ्यासारखी कलाकृती भारतामध्ये पाश्चिमात्य रेनेसांसच्या कित्येक शतके आधी निर्माण झाली आहे. याच काळात Gladstone Solomon यांचे The Bombay Revival Of Indian Art, The Charm Of Indian Art यासारखी अनेक पुस्तके वाचनात आली. भारतीय आणि पाश्चिमात्य कलाकारांनाही भारतीय कलेनी जी मोहिनी घातली ती समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत होते. त्यातून भारतीय संस्कृतीतील कलेचा मागोवा घेण्याचा माझा शोधप्रवास सुरु झाला. पुढे मी इंडोलॉजीला प्रवेश घेऊन माझा अभ्यास सुरु झाला. माझ्यासाठी भारतीय कला जगतातील अजिंठा हा त्यामानाने परिचयाचा विषय होता, त्यामुळे तो माझ्या कला अभ्यासाचा आरंभ बिंदू ठरला. या दरम्यान लाईफ इन द डेक्कन अज डेपिक्टेड इन द पेन्टिंग्ज ऑफ अजंठा हा ढवळीकर सरांच्या PhD चा प्रबंध हातात पडला. डॉ. ह.धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी हा प्रबंध पूर्ण केला होता. आजपर्येंत कलेचा आस्वाद घेण्यासाठी कलेकडे बघण्याचा एक दृष्टीकोन तयार झाला होता, त्याला छेद देत आपली सांस्कृतिक ओळख शोधण्यासाठी कलेकडे बघायला मी शिकले, ते सरांमुळे. वस्त्रालंकार, केशभूषा, फर्निचर यासारख्या भौतिक साधनांच्या आधारे तत्कालीन सामाजिक जीवनाचा परामर्श सरांनी या प्रबंधामध्ये घेतला आहे.

    कोणतेही नियतकालीक असो, पुस्तक असो, शोधपत्रिका असो त्यात ढवळीकर सरांचा एकतरी लेख असेच. भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्व अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक विषयाला स्पर्शून त्यांनी केलेलं लेखन बघून मी थक्क झाले. ताम्रपाषणयुगीन संस्कृती असो, पर्यावरण आणि संस्कृती असो, गणेश या देवतेची वाटचाल असो, महाराष्ट्राची प्राचीनता असो अगदी भारतीय नाणकशास्त्र असो सरांनी त्याच अधिकाराने ते विषय हाताळलेले आहेत. अफाट वाचन आणि तितकेच, किंबहुना थोडे अधिकच लेखन या दोन्हीच्या सहाय्याने समृद्ध जीवनाचे एक उदाहरण सरांनी माझ्यासारख्या भावी संशोधकांसमोर ठेवले आहे. नियमित वाचन, चिंतन आणि लेखनाने त्यांच्या संशोधनातील वाटा अधिक प्रगल्भ होत गेल्या, हाच ठेवा ते आज सुपूर्त करून गेले आहेत असं मला वाटतं.

    नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशे, जळगाव जिल्ह्यातील बहाळ आणि टेकवडे, संगमनेर जवळील दायमाबाद येथे झालेल्या उत्खननात त्यांचा सहभाग होता. याशिवाय महाराष्ट्रातील पवनार, पंढरपूर , वाळकी, कंधार , आपेगावं यासारख्या स्थानांबरोबर गुजरात, प्रभास-पाटण, मध्य प्रदेशामधील कायथा, आसाममधील गुवाहाटी येथे त्यांनी उत्खनन केले. ताम्रपाषाणयुगीन वसाहतीचा शोध घेताना इनामगावं येथील उत्खनन हे अतिशय महत्वपूर्ण ठरले. गार्डन चाईल्ड व अन्य पाश्चात्य विद्वानांनी मांडलेल्या सिद्धांताचा भारतीय संस्कृतीच्या अंगाने पडताळा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाराष्ट्रातील पहिला शेतकरी व त्याची वसाहत, प्रागैतिहासिक खेडे आणि त्यांचे आकृतीबंध, तेथील वसाहत आणि त्यांची संरचना, ग्रामप्रमुख व इतरांचे जीवन, दैवत विषयक संकल्पना यासारख्या अनेक बाबी त्यांनी बारकाव्यानिशी नोंदवल्या आहेत. 

    पर्यावरण आणि संस्कृतीचे नाते सांगणारा विषय त्यांनी हाताळला. जागतिक पर्यावरणाचा मानवी संस्कृतीवर होणारा परिणाम व निसर्गाबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न म्हणजे संस्कृती असे समीकरण मांडले. अनुकूल पर्यावरण असेल तर मानवी संस्कृतीच्या विकासाला चालना मिळते ही बाब अधोरेखित करताना भारतीय संस्कृतीच्या संदर्भात त्यांनी त्यांची मते व्यक्त केली. आर्यप्रश्न हा त्यांच्या दृष्टीने भारतीय इतिहासातील एक न सुटणारे कोडे वाटत होते. आर्यांनी विशेषतः इंद्राने सिंधू संस्कृतीच्या विध्वंस केला नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे. आर्य हे भारतीय होते व इथून ते बाहेर गेले यासारख्या मतांचे प्रतिपादन करण्याकडे त्यांचा अधिक कल होता. अलीकडील बऱ्याच उत्खननांतून आणि संशोधनातून तसे सिद्धही झाले आहे. अश्या संस्कृतीच्या अनेक विषयांना स्पर्श करून त्यांनी समाजाला त्यांचे बहुमुल्य योगदान दिले आहे.

    27 मार्च 2018 ला ढवळीकर सरांचे देहावसन झाले. त्यांची शेवटची भेट घ्यायला त्यांच्या ‘श्रीवत्स’ या निवासस्थानी जाऊन आले. त्यावेळी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे खरोखरच शब्द नव्हते. पण आज 16 मे सरांचा जन्मदिवस असतो, त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळाही मिळाला. सरांचे संशोधन कार्य, त्यांची जिद्द, चिकाटी आणि त्यांच्या शिस्तीला माझा प्रणाम.  

  • वारसा दत्तक योजना – स्मारक मित्र की वैरी

    वारसा दत्तक योजना – स्मारक मित्र की वैरी

    13 एप्रिल 2018 रोजी जाहीर झालेल्या लाल किल्ला दत्तक योजनेवर बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मिडियामध्ये वाचायला मिळाल्या. त्यामध्ये बऱ्यापैकी अनेक लोकांचा नावडतीचा सूर होता. त्यात अनेक प्रतिक्रिया वारसा दत्तक योजना म्हणजे काय आहे हे माहित नसताना आलेल्या दिसत होत्या. राष्ट्रीय पर्यटन मंत्रालय आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने एकत्र येऊन वारसा दत्तक योजना (अपनी धरोहर, अपनी पेहचान – Adopt a Heritage) सार्वजनिक-खाजगी भागीदारीसाठी 2017 मध्ये जागतिक पर्यटन दिनी जाहीर केली आहे. वारसा दत्तक योजने अंतर्गत बरीच स्मारके आणि वारसा स्थळे देखरेख आणि व्यवस्थापनासाठी उपलब्ध करून दिली आहेत. अशीच अजून एक योजना 1996 पासून सुरु आहे, ती म्हणजे ‘राष्ट्रीय संस्कृती निधी’. या योजने अंतर्गत मूर्त-अमूर्त वारसा संवर्धनासाठी निधी दिला जातो. त्या योजनेमध्ये देखील एक मोठी यादी आहे. पुणे महानगरपालिकेने शनिवार वाड्याचे केलेले संवर्धन व देखरेख हे या राष्ट्रीय संस्कृती निधी द्वारेच केले आहे. तसेच हुमायूनची कबर (Humayun’s Tomb)चे संवर्धन आणि देखरेख – आगा खान ट्रस्ट आणि ओबेरॉय हॉटेल्स यांनी संयुक्तपणे केले. शिवाय अनेक वारसा स्थळांना या निधीमुळे जीवदान मिळाले आहे.

    खरंतर, या योजनांची उद्दिष्टे ही वारसा जतन आणि संवर्धन हीच असतात. फक्त त्याच्या अंमलबजावणीचे प्रकार वेगवेगळे आहेत, त्यामुळे प्रथम अश्या योजनांची उद्दिष्टे, प्रक्रिया, कालमर्यादा, परिणाम यांचा सर्वांगाने परामर्श घेणे गरजेचे असते. त्याकरिता वारसा दत्तक योजना नक्की काय आहे हे जाणून घेणे इष्ट ठरेल. वारश्यासंबंधी योजनेचा आढावा घेणारे बरेच लेख वाचण्यात आले, परंतु येथे मी पर्यटनाच्या दृष्टीने योजनेचा आढावा घेणार आहे.

    वारसा दत्तक योजनेची उद्दिष्टे –

    दत्तक घेतलेले वारसा स्थळ विकसित करून पर्यटनासाठी अनुकूल करणे, पर्यटनाला प्रोत्साहन देऊन, त्या वारसा स्थळाचा दिलेल्या मर्यादित वेळेत टप्प्याटप्प्याने विकास करून त्याचे सांस्कृतिक महत्त्व वाढविणे, हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

    याशिवाय इतर काही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे:

    • दत्तक घेतलेल्या वारसा स्थळावरील, पर्यटकांसाठी अत्यावश्यक असलेल्या मुलभूत सुविधांचा विकास करणे. जसे की, स्वच्छतागृहे, पाणपोई, वाहतूक व्यवस्था इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव यात होतो.
    • पर्यटकांसाठी वारसा स्थळाची माहिती पुरविणे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे माहिती पुरवठ्यामध्ये सुलभता आणणे.
    • स्थानिक लोकांकरिता, सांस्कृतिक मूल्यांवर आधारित रोजगार उपलब्ध करून देणे. जसे की, हस्तकला, हातमाग, स्थानिक फळे, फुले यांची विक्री-खरेदी.
    • जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध पायाभूत सुविधा व गोष्टींचा विकास करणे.
    • पर्यटनाद्वारे आर्थिक आणि सामाजिक विकास करून रोजगार वृद्धी करणे.
    • शाश्वत पर्यटनाचा (Sustainable tourism) विचार करून दत्तक घेतलेल्या वारसा स्थळाचा विकास आणि त्याची कार्यप्रणाली सुनिश्चित करणे.

    एकंदरीत वरील उद्दिष्टांवरून हे दिसून येते की, या दत्तक घेतलेल्या वारसा स्थळाचे जतन आणि पर्यटन-पूरक विकास हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

    वारसा दत्तक योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतात?

    कोणतीही सार्वजनिक अथवा खाजगी संस्था, याशिवाय कोणतीही एखादी व्यक्ती या योजनेद्वारे स्मारके किंवा वारसा स्थळे दत्तक घेऊ शकतात. विशेषतः पर्यटन संस्था आणि संघटनांना यामध्ये प्राधान्य असते.

    वारसा दत्तक योजनेमध्ये कोण-कोणती स्थळे येतात?

    सध्या एकूण 93 वारसा स्थळांची यादी या योजनेसाठी राष्ट्रीय पर्यटन मंत्रालयाने उपलब्ध करून दिली आहे. त्यापैकी 4 स्थळे आजमितीस दत्तक गेली आहेत. त्या चारपैकी – लडाख, जम्मू-काश्मीर मधील माउंट स्टोक कांगरी ट्रेक मार्ग आणि उत्तराखंड मधील गंगोत्री मंदिर परिसरगोमुख मार्ग ही दोन नैसर्गिक वारसा स्थळे Adventure Tour Operators Association of India (ATOAI) ने 31 जानेवारी 2018 ला दत्तक घेतली आहेत. तर दिल्लीचा लाल किल्ला आणि आंध्रप्रदेशातील गंडिकोटा किल्ला, ही दोन ऐतिहासिक वारसा स्थळे दालमिया भारत लिमिटेडने 13 एप्रिल 2018 रोजी दत्तक घेतली आहेत.

    वारसा दत्तक योजनेची प्रक्रिया काय आहे?

    राष्ट्रीय पर्यटन मंत्रालयाने एकूण तीन विभागात वारसा स्थळांची विभागणी केली आहे. ही विभागणी पर्यटक भेटीच्या संख्येवरून हिरव्या, निळ्या आणि केशरी अशा गटात केली आहे. त्यामध्ये हिरव्या गटातील वारसा स्थळ निवडल्यास त्यासोबत निळ्या अथवा केशरी गटातील अजून एका वारसा स्थळास दत्तक घेणे अनिवार्य आहे. परंतु निळ्या अथवा केशरी गटातील वारसा स्थळासाठी, हिरव्या अथवा इतर गटातील वारसा स्थळ दत्तक घेण्याची सक्ती नाही.

    या योजनेसाठी महाराष्ट्रातून बिबी-का-मकबरा (औरंगाबाद) आणि कान्हेरी गुंफा (मुंबई) यांचा हिरव्या गटामध्ये समावेश आहे. तर दौलताबाद किल्ला (औरंगाबाद), कार्ले लेणी, आगा खान पॅलेस, शनिवारवाडा (पुणे) यांचा निळ्या गटात व केशरी गटामध्ये भाजेलेण्याद्री लेण्यांचा समावेश आहे.

    वारसा दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या संस्थेने अथवा व्यक्तीने प्रथम त्यास दत्तक हव्या असलेल्या वारसा स्थळाचा अभ्यास करून आवडीचा प्रस्ताव (Expression of Interest – EoI) सादर करावा लागतो. आलेल्या सर्व प्रस्तावाचा विचार करून राष्ट्रीय पर्यटन मंत्रालय, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि सांस्कृतिक मंत्रालयाने नियुक्त केलेल्या समितीकडून योग्य अश्या प्रस्तावाचा विचार केला जातो. त्यानंतर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून वारसा दत्तक दिला जातो. हा सामंजस्य करार पाच वर्षांसाठी असेल व एकूण कामगिरी पाहून त्यात वाढ केली जाऊ शकते.

    वारसा दत्तक योजना ही सार्वजनिक-खाजगी भागीदारी (Public-Private Partnership) या तत्त्वावर आधारित आहे, आणि वारसा दत्तक घेणारी संस्था किंवा व्यक्ती ही स्मारक मित्र (Monument Mitra) म्हणून गणली जाईल. या संस्था या योजने मध्ये सहभागी होणं म्हणजे, त्या संस्थेच एक व्यवसाईक-सामाजिक जबाबदारीच कार्य (CSR – Corporate Social Responsibility) असेल. त्यामुळे वारसा दत्तक घेणाऱ्या संस्था या आर्थिक मिळकतीपेक्षा, सांस्कृतिक मूल्यांवर भर देणाऱ्या असतील हे पाहूनच त्यांना सहभागी करून घेतले जाते. वारसा स्थळांचे प्रवेश मूल्य हे ASI ने ठरवलेलेच असेल.

    सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्व ही थोडीफार बांधा-वापरा-हस्तांतरित करा (Build–Operate–Transfer – BOT) या प्रणाली प्रमाणेच कार्य करते. या BOT योजने अंतर्गतच राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचा विकास केलेला आहे त्यामुळे आज भारतातील सर्व खेडी-शहरे जोडली जात आहेत.

    वारसा दत्तक योजना – फायदे व तोटे –
    • पर्यटकांसाठी आवश्यक त्या मुलभूत सुविधांचा विकास होईल आणि त्यामुळे जागतिक व स्थानिक पर्यटकांमध्ये वाढ होण्याची शक्यता दिसते.
    • वारसा स्थळाची देखभाल आणि माहिती प्रसारण होईल.
    • मोफत WiFi, ई-वाहन व त्यासाठी लागणारे चार्जिंग पाॅइंट्स उपलब्ध होतील.
    • कचरा व्यवस्थापन, बाग-बगीचा, विद्युतीकरण, सूचना व मार्गदर्शक फलके, फर्निचर, माहिती केंद्र यासारख्या इतर आवश्यक घटकांचा विस्तार व विकास होईल.
    • मोबाईल App, 3D mapping, AR/VR यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला जाईल, जी आधुनिक युगाची गरज आहे.
    • विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करुन, विद्युत रोषणाई, संगीत व नृत्य यासारख्या कार्यक्रमांची आखणी व अंमलबजावणी सुरु होईल.
    • 2022 साली भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यात विविध कला व कलाकृतींचे विशेष सादरीकरण करणे हे दालमिया भारत उद्योगसमूहास सक्तीचे केले आहे.

    सद्यस्थितीला तोट्यापेक्षा फायदेच अधिक दिसत आहेत. जर या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थितपणे नाही झाली तर मात्र त्याचे तोटे दिसायला सुरु होतील. परंतु या योजनेमुळे बेजबाबदार पर्यटकांस मात्र चांगलीच चपराक बसेल. वारसास्थळी अस्वच्छ व अश्लील वर्तन करण्यास मज्जाव येईल. स्मारकांवर लिखाण करणे, निषिद्ध भागात वाहतूक करणे, स्मारकांवर चढून छायाचित्र काढणे, स्वच्छतागृहाची नासधूस करणे या कृतींना आळा बसेल.

    शिवाय आजपर्यंत दुर्लक्ष केलेल्या घटकांचा अंतर्भाव अश्या वारसा स्थळी असेल. जसे की, लहान मुलाबाळांसाठी कपडे बदलण्यासाठी विशेष जागा असेल, अपंगासाठी ये-जा करण्यासाठी विशेष मार्ग, CCTV, अपंगाना पिता येईल अश्या उंचीवर शुद्ध पाणी असेल. उपहारगृह व हस्तकला विक्री केंद्र असेल. अश्या अनेक छोट्या-मोठ्या घटकांची दखल घेऊन दत्तक घेतलेल्या वारसा स्थळाचा पर्यटनपूरक विकास हेच या योजनेचा हेतू आहे.

    स्मार्ट-आयडी द्वारे केली जाणारी तिकीट विक्री आणि त्याद्वारे मिळणारी पर्यटन प्रवाह व पर्यटक प्रोफिलिंगची माहिती, ही आम्हा पर्यटन अभ्यासकांसाठी नक्कीच सुलभता आणेल. स्मार्ट-आयडीमध्ये राष्ट्रीय ओळखपत्र व आंतरराष्ट्रीय पासपोर्टचा समावेश असेल, त्याद्वारे वय, राष्ट्रीयत्व, ओळख क्रमांक यासारख्या माहितीची नोंद ठेवली जाईल.

    2025 पर्यंत भारत – जागतिक प्रवास आणि पर्यटनाच्या यादीत चाळीसाव्या स्थानावरून उच्चांकी आघाडी घेईल असा विश्वास आहे. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये पर्यटनपूरक सुविधांची उपलब्धता, अपुऱ्या मनुष्यबळामुळे सरकारी यंत्रणेस अशक्य आहे. त्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी हाच एक पर्याय पर्यटन विकासासाठी सुलभ व सुरक्षित आहे. भारताने गतवर्षी सांस्कृतिक संपदा आणि व्यावसायिक प्रवासामध्ये 5.3 गुणांक मिळवून 136 पैकी नववे स्थान मिळवले आहे. आपला सांस्कृतिक वारसा ही एक जागतिक स्तरावर पर्यटकांना आकर्षित करणारी उपलब्ध मालमत्ता आहे. येत्या काळात अजून बऱ्याच योजनांद्वारे वारसा व पर्यटन-पूरक विकास कार्याचे प्रयोग केले जातील. त्यामुळे सर्वांनी जागरूकपणे भारतीय पर्यटन विकास कार्यास अडथळा येणार नाही याची खबरदारी घ्यावी.

    [लेखक पर्यटन अभ्यासक आहेत.]

  • परमवैष्णवी श्रीमत् त्रिभुवनमहादेवी

    परमवैष्णवी श्रीमत् त्रिभुवनमहादेवी

    ९ | यशःशेषतां [|* ] देवी शेषफणावलीव सकलक्ष्मापीठभारं हरेः [*]
    १० | पादाम्भोजरजः पवित्रितशिरामाता तदियादधेऽ [||*] स्वधाममहिमप्रताप्तभु-
    ११ | -वनतृ[त्रि]तयोन्नतिः या जगत्सु श्रीतृ[त्रि]भुवनदेवीति विश्रुता [*]

    [शुभकारा देव ४ याचा तालचेर ताम्रपट]

    जेव्हा तो [शुभकारा देव २] आपल्या यशाच्या अंतिम चरणात पोहोचला तेव्हा, त्याची माता जी त्रिभुवनमहादेवी या नावाने तीनही जगात प्रसिद्ध आहे, तिने राज्याचा सगळा भार (राज्य प्रशासनाचा) लीलया पेलला. ज्याप्रमाणे संपूर्ण पृथ्वीचा भार शेष त्याच्या दिव्य फण्यावर पेलतो.

    इ.स. ८४६ साली भारतातील ओडिशा राजगादीवर परमवैष्णवी श्रीमत् त्रिभुवनमहादेवी सिंहासनाधिष्टीत होऊन तिने प्रभावीपणे राज्यशासनाची धुरा सांभाळली, याचा पुरावा शुभकारा देव ४ याच्या तालचेर ताम्रशासनातून येतो.  

    माता, पुत्री, पत्नी, भगिनी, सखी – स्त्रीच्या अश्या वेगवेगळ्या रूपातून तिचे वात्सल्य, प्रेम, करुणा अनुभवायला येतात. परंतु राज्यकर्त्या स्त्रीच्या रूपात तिची शक्ती, सामर्थ्यवान वाटचाल, तिची यशोगाथा, तिचे कर्तृत्व, दातृत्व, धर्मशील आचरण यांचे ही दर्शन होते. प्राचीन काळापासून ते अगदी आजही प्रशासन, राज्यव्यवस्था यांसारख्या कार्यक्षेत्रात आपली कुशलता दाखवण्यात स्त्रियांही अग्रेसर आहेत. प्राचीन भारतीय राज्यव्यवस्थेत अश्या अनेक स्त्रियांचे योगदान आहे, ज्यांचा मागोवा घेणे सार्थ ठरेल. भारतीय इतिहासात सातवाहन सम्राज्ञी नागणिका, वाकाटक राजघराण्यातील प्रभावती गुप्ता अश्या अनेक कुशल सम्राज्ञींच्या, राजमहिषींच्या गाथा आपल्याला परिचित आहेतच. अशीच एक प्रभावी स्त्री प्रशासक म्हणजे भौमा-कारा राजघराण्यातील परमभट्टारिका परमेश्वरी महाराजाधीराज परमवैष्णवी श्री त्रिभुवनमहादेवी. जिने ओडिशा राज्याचे वैभव वृद्धिंगत केले.

    पूर्व भारतातील ओडिशा येथे इ.स. ८ व्या शतकापासून ते इ.स.१० व्या शतकापर्यंत भौमा-कारा या राजघराण्याने प्रभावी प्रशासन केले. तब्बल २०० वर्ष राज्य करणाऱ्या या भौमा-कारा घराण्याने भारतीय इतिहासाला १८ राजे आणि ६ प्रभावी स्त्री प्रशासक दिले. भारतीय राज्यव्यवस्थेत पतीच्या मृत्यूनंतर किंवा अल्पवयीन मुलाच्या वतीने, स्त्रिया राज्य करीत असत. पण भौमा-कारा राजघराण्यातील अनेक स्त्रिया स्वतंत्र राज्य करीत होत्या असे दाखले मिळतात. त्रिभुवनमहादेवी १ नंतर पृथ्वीमहादेवी उर्फ त्रिभुवनमहादेवी २, गौरी महादेवी, वकूला महादेवी आणि दण्डी महादेवी सिंहासनाधिष्टीत झाल्या. यांपैकी काही राण्यांनी प्रत्यक्ष राज्यप्रशासक म्हणून कार्यभार सांभाळला. या सर्वच राण्यांनी त्यांची नाणी प्रचारात आणली होती. स्वतंत्र राज्य प्रशासन आणि सोबत आजूबाजूच्या प्रदेशावरील कार्यकारी सामंत यांच्या सोबतही या स्त्रियांनी राज्यकारभार केला.   

    भौमा घराण्यातील पाचवा राज्यकर्ता ललितभार देव उर्फ शांतीकारा देव १ याची अर्धांगिनी म्हणजे त्रिभुवनमहादेवी १. विविध ताम्रपटांच्या आधारे त्रिभुवनमहादेवी हिच्या कारकीर्दीचा आढावा घेता येतो. ललितभारदेव याच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा शुभकारा देव उर्फ कुसुमहार गादीवर आला. शुभकारा देवच्या मृत्यूनंतर त्रिभुवनमहादेवी राजपदावर आली. भौमा घराण्याच्या राजकीय इतिहासात त्रिभुवनमहादेवी हिचा कार्यकाळ अभूतपूर्व आणि महत्त्वपूर्ण होता.

    शुभकारा  देव २ याचा हिंदोळ ताम्रपट

    ९|………. || तस्य तनयस्तत्पादानुध्यातः श्रीमन्नागो-
    -भ्दवकुलललाममवायाम्म-
    १०| -हादेव्यां श्रीत्रिभुवनामहादेव्यामवाप्तजन्मा ….

    शुभकारा  देव २ याचा चितळपूर येथील हिंदोळ ताम्रपट, नाग घराण्यातील त्रिभुवनमहादेवी ही माता, शांतीकारा देव पिता असल्याचा उल्लेख करतो.

    त्रिभुवनमहादेवी हिच्या अभूतपूर्व प्रशासकीय कारकिर्दीची साक्ष देणारा दुसरा ताम्रपट म्हणजे शुभकारा देव ४ याचा तालचेर ताम्रपट. ओडिशातील तालचेर हे ठिकाण तिथल्या कोळश्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. तिथे जगती नावाच्या ठिकाणी मोठ्या मातीच्या ढिगाऱ्याच्या तळाशी हा ताम्रपट सापडला. या ताम्रपटाची भाषा संस्कृत आहे. शेषाप्रमाणे त्रिभुवनमहादेवी हिने तिच्या खांद्यावर उचललेल्या राज्यभाराचे वर्णन यात येते. शांतीकारा देव, त्याच्या नंतर त्याचा पुत्र कुसुमहार, त्याच्या नंतर त्याची माता त्रिभुवनमहादेवी आणि तिच्या नंतर तिचा नातू लोणभारा उर्फ शांतीकारा २ यांनी राजगादीचा मान स्विकारला. त्रिभुवन महादेवीच्या कार्यकाळात तिचे प्रशासन हे तीन विभागात चालत असे, ज्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. लोकांमध्ये ऐक्य आणि लोकांमध्ये सामंजस्य होते.

    खुद्द त्रिभुवनमहादेवी हिचा धेनकनाल ताम्रपट मात्र तिच्या जीवनाचे अंतरंग उलगडतो. हा ताम्रपट भीमनागरी गढ येथे सापडला. डॉ. हरा प्रसाद शास्त्री यांनी The Jornal of Bihar and Orissa Reserach Society Vol 2 pp.419-427 मध्ये या ताम्रपटाचे वाचन केले आहे. यावर श्रीमत् त्रिभुवनमहादेवी असा लेख आहे. या ताम्रपटाची भाषा संस्कृत आहे. त्रिभुवनमहादेवी हिने गुहेश्वरपटक इथून हा ताम्रपट प्रसारित केला होता.

    त्रिभुवनमहादेवी हिचा धेनकनाल ताम्रपट

    ७| -प्रियेषु प्रसाधितस्वपरमण्डलतया धर्मोपकारिणीक्षताशेषदेशकोशे [षे] षु क्रमेण
       निरान्तरविरचितविवि –
    ८| – धमठविहारप्रासादत्रव [ब] न्धैः पुरन्दरपुरारोहणसोपानव [च] न्धैरिव मण्डितमही –
    -मण्डलेष्वाखण्डलप्रभावेषु-
    ९ | – महाराजेषु व्यतीतेषु || …

    त्रिभुवनमहादेवी हिच्या ताम्रपटाच्या ७-८ ओळींत भौम-कारा घराण्याच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या मठ, मंदिर यांसाठी दानं दिल्याचा उल्लेख आहे. तिचा पिता राजमल्ल देव याच्या सामर्थ्याचे, शौर्याचे वर्णन यात केले आहे. परमभट्टारिका, परमेश्वरी, महाराजाधीराज, परमवैष्णवी ही बिरुदे या लेखांत तिच्यासाठी येतात. [अक्षता क्रता स्थितीः] म्हणजे जिचे स्थैर्य क्षती न पावणारे आहे. त्रिभुवनमहादेवी हिने सामान्य जनतेवर [मृदू-करः] कमी कर लावले होते. तिच्या राज्यकाळात देशात प्रशासनाच्या तीन शाखांमध्ये प्रगती झाली होती. तिने वडील राजमल्ल देव यांच्या मदतीने बंगालचे पाल आणि राष्ट्रकुटांच्या आक्रमणाला सामोरे जाऊन त्यांचा बंदोबस्त केला. येथे त्रिभुवनमहादेवी हिची साक्षात कात्यायनी देवीशी तुलना करून तिच्या शक्तीचे आणि सिद्धीचे दर्शन घडवले आहे. ती तिच्या प्रशासनात हाताखालील अधिकाऱ्यांची वेळोवेळी तपासणी करीत असे. त्यामुळे स्वाभाविकच अधिकाऱ्यांचा सामान्य लोकांना त्रास होत नसे. त्रिभुवनमहादेवी तिच्या राज्यातील महासामंत, महाराज, राजपुत्र, कुमार, अमात्य, उपरिका, विषयपती, आयुक्त, दंडपाशिक, स्थानांतरिक अधिकाऱ्यांना यथायोग्य मानसन्मान देत असे. योग्यवेळी त्यांना सूचना आणि आदेश ती देत असे. तोषल सीमेत असलेले महामात्र, पुस्तकपाल हे देखील तिच्या आदेशास बाध्य होते. वैश्य ग्रामातून विणकर, गुराखी यांसारख्या इतर व्यावसायिक लोकांना वाढीव कर तिने लागू केला होता.

    वरील तीनही ताम्रपटावरून त्रिभुवनमहादेवी संदर्भात काही गोष्टींचे अवलोकन करता येते, ते पुढीलप्रमाणे –

    1. शुभकारा देव २ याच्या हिंदोळ ताम्रपटात त्रिभुवनमहादेवी हिचा केवळ माता म्हणून उल्लेख येतो. तिच्या कार्याचा परामर्श या ताम्रपटामध्ये उल्लेखलेला नाही.
    2. त्रिभुवनमहादेवी हिचा धेनकनाल ताम्रपट हा, ती स्वतः राज्यप्रशासनावर असताना तिने प्रसारित केला आहे.
      • परमभट्टारिका, परमेश्वरी, महाराजाधीराज अशी बिरुदे तिचे उच्च राजकीय स्थान दर्शवते.  
      • परमवैष्णवी या बिरुदावरून तिची विष्णू (हरि) भक्ती प्रदर्शित होते.
      • याशिवाय गोस्वामिनी, देवी श्री सिद्धगौरी ही विशेषण येतात.
      • शत्रू सैन्याचा निःपात करताना त्रिभुवनमहादेवी हिची तुलना देवी कात्यायनीशी केली आहे. त्यावरून तिच्या शौर्याची कल्पना येते.
      • अधिकाऱ्यांच्या विविध पदांवरून तिच्याकडे असलेले विस्तृत प्रशासकीय मंडळ आणि त्यांची कार्यप्रणाली दिसते.
      • सामान्य जनता आणि व्यापारी यांच्यासाठी तिच्या विविध करपद्धती होत्या असे दिसते.
    3. शुभकारा देव ४ याच्या तालचेर ताम्रपटावरून त्रिभुवनमहादेवी हिचे राजकीय कौशल्य दिसते.
      • तिच्या कारकिर्दीतील प्रशासनाचा विस्तार लक्षात येतो.
      • याशिवाय समाजात आणि लोकांच्या मनामधील तिच्याबद्दल असलेला आदर आणि प्रशासक म्हणून असलेला विश्वास दिसतो.

    राज्यव्यवस्था आणि राज्यशासन समर्थपणे पेलण्यासाठी व्यक्तीही तितकीच प्रगल्भ आणि सामर्थ्यवान असावी लागते. शौर्य, बुद्धी, सामंजस्य असे गुण प्रशासकाच्या ठायी आवश्यक असतात. याशिवाय प्रजेविषयी आस्था, धर्म रक्षणार्थ सदैव तत्परताही महत्त्वाची असते. सातवाहन सम्राज्ञी नागणिका, वाकाटक राजघराण्यातील सम्राज्ञी प्रभावती गुप्ता यांच्याप्रमाणेच परमवैष्णवी श्रीमत् त्रिभुवनमहादेवी ही अशीच एक समर्थ प्रशासक म्हणावी लागेल.   

    Bibliography
    Dr. Shastri, H.P. The Journal of the Bihar and Orissa Research Society, Vol II, pp. 419ff, Seven Copper plate Records of Land Grants from Dhenkanal Plates of Tribhuvana Mahadevi.

     

  • वसंतोत्सव- निसर्गाच्या नवलाईचा सोहळा

    वसंतोत्सव- निसर्गाच्या नवलाईचा सोहळा

    हर्ष, उल्हास, आनंद यांचे दुसरे नावं म्हणजे वसंतोत्सव. भारतीय उत्सव म्हणजे आपल्या संस्कृतीच्या लौकिक अंगाचे उत्स्फूर्त दर्शन घडवणारे क्षण. निसर्गाच्या विलोभनीय सौंदर्याची उधळण करत ऋतुराज वसंत येतो. या वसंताचे पहिले पाऊल पडते ते वसंतपंचमीला. मकर संक्रमणानंतर माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला वसंत ऋतूचे शुभागमन होते. या वसंतपंचमीचे वेगवेगळे पैलू आपल्या जीवनात चैतन्य आणि उल्हासाचे रंग भरतात. सृष्टी सौंदर्याने मोहित होऊन, विधात्याच्या सौंदर्यशक्तीच्या कल्पनेत रमणारी ही आपली संस्कृती आहे. निसर्गाच्या नव्या रूपातून मिळणारा हा आनंद मनुष्याच्या सुखाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे स्वाभाविकच, अश्या उत्सवांना एक लौकिक महत्त्व प्राप्त होते. आजच्या युगामध्ये आपण ही नवचैतन्याची दोर मागे टाकत आहोत.

    ऋतुचक्रातील वसंत म्हणजे ऋतूंचा राजा. ऋग्वेदामध्ये वसंत, ग्रीष्म आणि शरद हे तीन ऋतू येतात. पुढे वसंत, ग्रीष्म, शरद आणि हेमंत, शिशिर किंवा वर्षा अशी पाच ऋतूंची संकल्पना विकसित झालेली दिसते. शतपथ ब्राह्मण, यजुर्वेद यांसारख्या वाङ्मयातून ऋतू वर्णने येतात. वाल्मिकी रामायणात वसंत ऋतूची सुंदर वर्णने येतात. निसर्गाशी माणसाचे असलेले अतूट नाते या ऋतूंच्या वर्णानातून अनेकदा अभिव्यक्त होताना दिसते.

    वसंतोत्सव तीन सूत्रांमध्ये गुंफल्यासारखा आहे. वसंतपंचमीला ‘श्रीपंचमी’ म्हटले जाते. श्री म्हणजे लक्ष्मी, तिचा जन्मदिवस म्हणून श्रीपंचमीचे महत्त्व आहे. याच दिवशी ज्ञान आणि कलेची देवता, सरस्वतीचेही पूजन केले जाते. लहान मुलांचा विद्यारंभ या तिथीपासून केला जातो. ऋतूबदलांमुळे निर्माण होणाऱ्या भावभावनांचे प्रतिबिंब या उत्सवामधून डोकावते. त्यामुळे पारिवारिक समृद्ध जीवनासाठी लोकं मदन-रतीचे पूजन करतात. माघ-फाल्गुन हे शेतकऱ्यांच्या दुसऱ्या सुगीचे दिवस असतात. मातीची ऊर्जा टपोऱ्या कणसातून दिसायला लागते. आंब्याचा मोहर, त्याचा उग्र मादक वास दरवळायला सुरु होतो. शेत शिवारांमधून समृद्धीच्या लाटा वाहत राहतात आणि आपण सर्वही त्या आनंदाच्या डोहात तरंगतो. एकूणच नवचैतन्याची चाहूल लागते ती वसंतपंचीमीपासून, आणि सुरु होतो तो वसंतोत्सव.

    फाल्गुन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या वसंतोत्सवाचे अनेक उल्लेख आपल्याला प्राचीन साहित्यांतून आणि शिल्पांतून दिसतात. सुवसंतक उत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव, दोला, नाटक असे अनेक उत्सव आणि क्रीडा या वसंतोत्सवाचा एक भाग म्हणून साजरे होत असत. निसर्ग काया परिवर्तनाची अनुभूती देणारा हा वसंतोत्सव, कवी मनालाच नाही तर चित्रकार, शिल्पकार, नृत्य-संगीत-नाट्य कलाकारांना भुरळ घालणारा विषय ठरला. त्यामुळे अनेक कलाकृतींमधून या उत्सवाचे दुवे सापडतात. वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ जनसामान्य, सुवसंतक उत्सव साजरा करतात, असा उल्लेख वात्सायन कामसुत्रामध्ये येतो. या सुवसंतक उत्सवात लोकं नृत्य-संगीतात तल्लीन असतात. भास रचित चारुदत्त नाटकामध्येही कामदेव पूजन पर्वाचा उल्लेख येतो.

    कुषाण काळापासून भारताचा पूर्व आणि पश्चिम देशांशी व्यापार वाढला होता. स्वाभाविकच हा काळ म्हणजे देशामध्ये आर्थिक सुब्बता नांदत होती. त्यामुळे ऐहिक जीवनाचा दर्जा उंचावून लोकांचा कल, विलास आणि कला यांमध्ये रममाण होणारा होता. त्यामुळे या काळापासून ललितकला आणि वाङ्मय यांना बहर आला. या कलाकृतीतून तत्कालीन समाज जीवनाचे दर्शन आपल्याला घडते. कवी कुलगुरू कालिदास, श्रीहर्ष यांच्या संस्कृत नाटकांतून, काव्यांतून या उत्सवांचे वर्णन आले आहे. कालिदासकृत अभिज्ञानशाकुंतल मध्ये मदनोत्सवाचे वर्णन येते. कामदेवास आंब्याचा मोहर अर्पण करून त्याचे पूजन होत असे, असा उल्लेख येतो.

    ऋतूसंहार या काव्यातून कालिदासाने ऋतूंचा सोहळा साक्षात उभा केला आहे. या ऋतू बदलाचा पशुपक्ष्यांवर आणि मानवी भावभावनांवर होणारा परिणाम या काव्याच्या रूपाने अनुभवता येतो. वसंत हा मदनाचा सखा, त्यामुळे वसंतागमन आणि मदनोत्सव यांचे स्वाभाविकच दृढ नाते स्पष्ट होते. ऋतूसंहार या काव्यामध्ये कालिदास वसंत ऋतूला योद्ध्याची उपमा देतो. वसंत ऋतूच्या निसर्गाच्या सौंदर्याचे वर्णन पुढील श्लोकातून व्यक्त होते.

    द्रुमाः सपुष्पाः सलिलं सपद्मं स्त्रियः सकामाः पवनः सुगन्धिः ।
    सुखाः प्रदोषा दिवसाश्च रम्याः सर्वं प्रिये चारुतरं वसन्ते ।। ऋतू. (६.२)

    वसंत ऋतूमधील फुलांनी लगडलेले वृक्ष, कमळपुष्पांच्या सानिध्यात मोहक दिसणारी जलाशय, वाऱ्यासोबत पसरणारा मोहराचा मादक सुगंध, प्रणयतूर ललना, सकाळचा तेजस्वी सूर्य आणि सुखकर, रमणीय संध्या असे लालित्यपूर्ण अवलोकन कालिदासाच्या काव्यातून दिसते. वसंत वायूचे विलोभनीय अस्तित्व कालिदासाच्या काव्यातून शब्दाकार घेऊन अवतरीत होते.

    आकम्पयन्कुसुमिताः सहकारशाखा विस्तारयन्परभृतस्य वचांसि दिक्षु ।
    वायुर्विवाति हृदयानि हरन्नराणां नीहारपातविगमात्सुभगो वसन्ते ।। ऋतू. (६.२४)

    धुके नाहीसे झाल्यामुळे सुखकर वाटणारा वायू आम्रशाखा हलवीत, कोकिळांचे आलाप सर्व दिशांत पसरवित, जनांची अंतःकरणे आकर्षित करीत वाहत आहे.

    अभिजात संस्कृत साहित्यामधून अशोकोत्सव संदर्भात रोचक माहिती मिळते. अशोकोत्सव हा वसंतोत्सवाचा एक भाग म्हणून साजरा होते असे. रूपवती लावण्याच्या पदस्पर्शाने अशोक वृक्ष मोहरतो, अशी लोकमानसात प्रथा प्रचलित होती. इतकेच नव्हे तर मोहरलेल्या अशोकाचे दर्शन सुद्धा शुभ मानीत असत. याची साक्ष कालिदासकृत मालविकाग्नीमित्र या नाटकामधून होते. दोला हाही वसंत उत्सवाचा भाग होता ज्यात लोकं आनंदाने सहभागी होत. दोला म्हणजेच झोका, आपण त्याला हिंदोळा म्हणतो. प्रियजनाच्या सहवासात हिंदोळा झुलणे, माणसाच्या मनामध्ये बहरलेल्या अनुरागाचे दर्शन घडवतो.

    धार्मिक अनुष्ठानांपेक्षा हे उत्सव मनोरंजन आणि लोकरंजन म्हणून अधिक व्यक्त होत असत. त्यामुळे नृत्य, संगीत, नाटक, क्रीडा यांचा मनमुराद आनंद या उत्सवातून प्रतीत होत असे. वसंतोत्सवाचाच एक भाग म्हणून, रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करून त्याच्या रथाची मिरवणूक काढण्यात येते. महाराष्ट्र आणि राजस्थानात रथसप्तमी साजरी करतात. राजस्थानमध्ये रथसप्तमीला भानुसप्तमी असेही म्हणतात.

    एकूणच निसर्गाच्या रुपामध्ये वसंत आगमन, मनुष्याच्या आयुष्यात नवी उर्मी, नवा उत्साह, नवी प्रेरणा घेऊन येते. सरस्वती साधकास विद्यार्जनास सुरुवात करून ज्ञानामृताचा संचय करता येतो. श्रीलक्ष्मीच्या पूजनाने समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे ऋतुराज वसंत म्हणजे ज्ञान, समृद्धी आणि सुखाचे त्रिवेणी सूत्र आहे.