Tag: uma

  • शिवाय नमः – एक अनुभव

    शिवाय नमः – एक अनुभव

    प्रत्येक अनुभव हा आपल्याला समृद्ध करत असतो. शिवाय नमः हाही त्यापैकी एक अनुभव होता. बोधसूत्रच्या माध्यमातून मी श्रावण महिन्यामध्ये शिवाय नमः हे सदर सुरु केले. दर सोमवारी शिवाच्या वेगवेगळ्या रूपांना शब्दबद्ध करत होते. शिवाय नमः – एक अनुभव या शेवटच्या लेखाने मी या शृंखलेला पूर्णविराम देणार आहे. या प्रवासात नेहमीप्रमाणे थोडी धडपड, पडझड आणि नंतर सुंदर लेख संग्रहित होत गेले. कोणत्याही गोष्टीच ज्ञान करून घायचं म्हणजे हे सर्व स्वाभाविकच आहे. शृंखला म्हणजे सातत्याने केलेल्या अनेकविध गोष्टींची एकत्रित गुंफण. श्रावणामध्ये शिव देवतेवर आधारित ही संकल्पना शिवाचे रुद्र, संहारक, मुग्ध आणि महाविलयन स्वरूपाचा वेध घेणारी होती. ही लेखमालिका मी सातत्याने लिहून पूर्ण करू शकले याचा आनंद आहे. रुद्र या संकल्पनेपासून प्रत्येक लेखांमध्ये कधी वाङ्मय आणि पुराणे, कधी दैवतशास्त्र, कधी मूर्तीशास्त्र, कधी नाणकशास्त्र तर कधी अभिलेखांचा आधार घेतला. या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हा वाचकांचा प्रतिसाद ही लेखमालिका पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करत होता. या लेखमालिकेमधील चौथ्या लेखाने बोधसूत्रवर माझे एकूण 25 लेख मी शब्दबद्ध केले. 25 लेख म्हणजे तसे काही फार निश्चितच नाही, पण पुढच्या लिखाणासाठी प्रेरणा देणारे नक्कीच आहेत.

    या संपूर्ण लेखमालिकेचा प्रवास शिवाय नमः मध्ये संकलित करावा म्हणून या लेखाचे प्रयोजन आहे.   

    1. रुद्राय नमः

    रुद्राय नमः

    रुद्राय नमः  या पहिल्या लेखामध्ये शिवरूपाची सर्वांत प्राथमिक अवस्था, प्राचीन वाङ्मयातून येणाऱ्या रुद्रापासून सुरु होताना दिसते. रुद्र ही अमूर्त स्वरूपातील एक संकल्पना. ही अभ्यासताना काही कथांच्या आधारे, काही श्लोकांच्या आधारे रुद्राचा शोध घेण्याचा प्रयत्न मी केला. प्राचीन ग्रंथातून उमटणाऱ्या भयानक रुद्राच्या संकल्पना पुराणकाळापर्येंत येताना शिव या सौम्य स्वरूपात कश्या विलीन होताना दिसतात याचा आढावा या लेखाच्या माध्यमातून मला घेता आला. रुद्राला म्हणून संबोधलेल्या नावांचा अर्थ जाणून घेऊन रुद्र ही संकल्पना हळूहळू साकार होते. हा पिनाकपाणी रुद्र म्हणजे शिवाचे अलौकिक रूप आहे जो विनाश आणि सृजन यांचे एकत्व दाखवतो.

    2. त्रिपुरान्तकाय नमः

    त्रिपुरान्तकाय नमः

    शिवाय नमः मधला दुसरा लेख म्हणजे, त्रिपुरान्तकाय नमः. तीन मायावी पुरांचा सर्वनाश करायला सज्ज झालेला संहारक शिव, त्रिपुरारी बनून या लेखातून अभिव्यक्त झाला आहे. पुराणांमध्ये त्रिपुरान्तक आख्यानाचे अतिशय सुंदर आणि मनोरंजक वर्णन प्रस्तुत केलेले आहे. ते वाचताना किंवा शब्दबद्ध करताना मीही त्या संपूर्ण कथाभागाचा आनंद घेत होते. शिल्पातील निरीक्षणे (Observations) कथानकाशी साधर्म्य दाखवणारी असली तरी शिल्प साकारताना शिल्पकारला येणाऱ्या काही मर्यादाही जाणवल्या. हा लेख संकलित करताना, वेळेच्या अभावी शिल्पातले बारकावे लेखामध्ये समाविष्ट करता आले नाहीत, त्याची थोडी खंत आहे. या लेखासाठी माझ्या एका मैत्रिणीच्या प्रतिसाद आला, की संपूर्ण शिल्प बघयला आवडेल. तर भविष्यात त्रिपुरान्तकाच्या रेखाचित्रांचा संपूर्ण आढावा घेऊन एक लेख पुन्हा लिहीन, अशी इच्छा मी व्यक्त करते. दुर्गांचा विनाश करण्यासाठी बाण सोडण्यपूर्वीचा शिल्पांमध्ये गोठवला तो एक क्षण शब्दांमध्ये उतरवताना संपूर्ण कथाभागाची नाट्यमयता शिल्पाच्या आधारे शब्दबद्ध करणे जास्त सुलभ झाले. 

    3. उमामहेश्वराय नमः

    उमामहेश्वराय नमः

    या लेखमालिकेतील तिसरा लेख उमामहेश्वराय नमः. खरतर हा लेख निशब्द करणारा आहे. उमा महेश्वर या दोन तत्त्वांची भावनिक सुसूत्रता आपल्याला प्रत्येक भौतिक साधनांमधून दिसते. उमा महेश्वर रूपाने, संपूर्ण सृष्टीतील दैवी तत्त्व आणि त्या तत्त्वाशी संधान बांधणाऱ्या मानवी भावभावनांच्या मुग्धतेचे मूर्त रूप या लेखामध्ये शब्दबद्ध करण्याचा एक छोटा प्रयत्न मी केला. एक असा अनुबंध जो सृष्टीतील चैतन्य साकार करतो. काव्यातून, नाणी आणि शिल्पांसारख्या भौतिक साधनांमधून उमेचे स्वतंत्र अस्तित्व जे शिवरूपात एकरूप होणार आहे याचा आढावा या लेखाच्या निमित्ताने मी घेतला आहे.

     4. हरीहाराय नमः

    हरीहराय नमः

    हरीहाराय नमः हा शिवाय नमः  या शृंखलेमधील शेवटचा लेख. या लेखांचे पूर्वनियोजन करतानाच शेवट हरिहर या स्वरूपाने करायचा हे मी ठरवले होते. योगायोगाने श्रावणातील चौथ्या सोमवारी श्रीकृष्ण जयंती आली. त्या दिवशी मी हरीहाराय नमः या शिव रूपावर लेख सादर केला. शिव आणि विष्णू या दैवतशास्त्रातील प्रमुख देवतांची ही संयुक्त मूर्ती. भारतातील आणि भारताबाहेरील ह्या संयुक्त संकल्पनेची लोकप्रियता महाविलयन प्रक्रियेची साक्ष देतात. जी अभिलेखातही उमटली आहेत. शिव आणि विष्णू या दोन स्वतंत्र सिद्धांतांवर आधारित देवतांचे एकीकरण दाखवणारे हरिहर हे स्वरूप आहे.

    शिवाय नमःच्या रूपात शिवाच्या काही स्वरूपाचा थोडक्यात आढावा इथे एकत्रित संकलित केला आहे. वाचकांचा अभिप्राय हा नेहमीच प्रेरणा देणारा असतो, त्यामुळे माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला, हे मला ऐकायला नक्की आवडेल. श्रावणातील या शेवटच्या सोमवारी शिवाय नमः म्हणून या शृंखलेला इथेच पूर्णविराम देते.

  • उमामहेश्वराय नमः

    उमामहेश्वराय नमः

    ऋग्वेद काळापासून शिव देवतेच्या संकल्पनेच्या विकासातील रुद्राचे दैवतशास्त्रीय स्वरूप, शिवाय नमः  या लेख शृंखलेचा पहिला भाग रुद्राय नमः मध्ये बघितले. दुसऱ्या भागात, याच रुद्राने त्रिपुरांचा विनाश करणारा त्रिपुरान्तकाय नमः हा लेख आपण बघितला. आज शिवाचे, उमेसोबत परिवार देवतेत होणारे रूपांतरण बघणार आहोत. 

    शिव अर्धांगिनी उमा म्हणजेच पार्वती. हिमवान आणि मेना यांची कन्या पार्वती आणि शिव यांचा विवाह होतो आणि उमा, त्या महेश्वराची पत्नी होते. शिवतत्त्व हे या मनुष्यरूपी उमापेक्षा खूप भिन्न आहे. उमेचा जन्म शिवतत्त्वाशी एकरूप होण्याकरिता योजला होता. पूर्वजन्मात दक्ष कन्या सती आणि मग तीच पार्वती रूपात पुन्हा जन्म घेऊन शिवपत्नीत्व स्विकारते. शिवा आणि शिव यांच्या एकत्वाची साक्ष अर्धनारीश्वर स्वरूपात साकार होते. पण उमा महेश्वर मूर्तीत उमेचे स्वतंत्र अस्तित्व जे शिवाशी जोडले जात आहे अश्या स्वरूपात साकार होते. उमा महेश्वर म्हणजे संपूर्ण सृष्टीतील दैवी तत्त्व आणि त्या तत्त्वाशी संधान बांधणाऱ्या मानवी भावभावनांच्या मुग्धतेचे मूर्त रूप आहे. एक असा अनुबंध जो सृष्टीतील चैतन्य साकार करतो.

    उमा महेश्वराच्या अश्या अलौकिक प्रेमबंधाला शिल्पकारांनी शिल्पांमध्ये तर कवींनी काव्यबद्ध केले आहे. महाकवी कालिदासरचित कुमारसंभव हे माधुर्ययुक्त काव्य पार्वती-परमेश्वराला समर्पित आहे. चंद्रशेखर रूपातील राजस शिव, कोमलकांती हैमावतीचे पाणिग्रहण करतानाची, कल्याणसुन्दर मूर्ती या दोघांच्या मनातल्या मदनरंगाचे सुंदर चित्रण साक्षात समोर उभे करते. चंद्रशेखर शिव मूर्तीच्या विविध छटा या केवल चंद्रशेखर, कल्याणसुन्दर मूर्ती, उमासहित चंद्रशेखर, आणि सोमस्कंद मूर्तींमध्ये साध्य होतात. परंतु उमा-महेश्वर आलिंगन मूर्ती शिव-पर्वतीमधल्या दिव्य प्रेमाची अभिव्यक्ती करणारी मूर्ती आहे.

    Huvishka Coin Obverse
    Uma-Mahehswara Reverse

    उमा महेश्वराचे प्राचीन अंकन, कुषाण राजा कनिष्क याचा वारस, हुविष्कच्या नाण्यावर येते.  डॉ. मधुकर ढवळीकर यांच्या भारतीय नाणकशास्त्र मध्ये शिव आणि उमा यांची हुविष्कच्या नाण्यावरील अंकनाबद्दल माहिती मिळते. या नाण्याच्या दर्शनी बाजूस शिरस्त्राण आणि अलंकारांनी युक्त राजाचा अर्धपुतळा आहे. त्याच्या हातामध्ये राजदंड आहे. नाण्याच्या कडेने ग्रीक लिपीमध्ये शावनानो शाओ उएष्की कोशानो असा लेख आहे.  दुसऱ्या बाजूस, शिव आणि उमा एकमेकांच्या समोर उभे आहेत. शिवाच्या मागे प्रभावलय आणि डोक्यावर जटाभार आहे. अंतरीय नेसले असून शिव चतुर्भुज आहे. डाव्या हातामध्ये त्रिशूळ, मृग (?) आणि उजव्या हातामध्ये अंकुश आणि कमंडलू आहे. उमेने ग्रीक पद्धतीचा वेश परिधान केला असून ती द्विभुज दाखवली आहे.

    म्हैसूरचे राजा कृष्णराजा 3 ओडेयर इ.स. 1799–1868 यांच्या नाण्यावर उमा महेश्वर आलिंगन मूर्तीचे अप्रतिम अंकन आहे. शिव सव्य-ललीतासनात बसले असून उमा त्यांंच्या मांडीवर आसनस्थ झाली आहे. मागे शिवाकडे त्रिशूल आहे आणि उमेच्या बाजूस एका मृगाचे अंकन आहे. या नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर श्री कृष्णराजा हा लेख आहे.

    डॉ. नि. पु. जोशी यांच्या भारतीय मूर्तीशास्त्र यात गुप्तकालीन शिव-पार्वतीची मूर्ती मथुरा संग्रहालयात असलेल्या मूर्तीचा उल्लेख आहे. तसेच कुमारगुप्ताच्या काळातील अभिलेखीत मूर्ती कौसंबी इथे सापडल्याची नोंद आहे. या दोनही मूर्ती आलिंगन मुद्रेत नसून केवळ जवळ उभ्या आहेत. शिवाच्या डाव्या हातामध्ये कमंडलू आहे. उजव्या हातामध्ये अक्षमालेसह अभय मुद्रा आहे आणि उमेच्या हातामध्ये दर्पण आहे.  डॉ. गो. बं. देगलूकर यांच्या शिवमूर्तये नमः मधेही उमा महेश्वर आलिंगन मूर्तीचे विवेचन येते.

    शिल्पशास्त्र अश्या मूर्तीचा निर्माण करण्याचे निर्देश सांगते ते असे-  

    उमामहेश्वरं वक्ष्ये उमया सह शङ्कर | 
    मातुलिङ्गं त्रिशुलश्च धरते दक्षिणे करे ||
    आलिङ्गीतो वामहस्तें नागेन्द्रं द्वितीये करे | 
    हरस्कन्द उमाहस्ते दर्पणो द्वितीये करे ||  (रूपमंडन – 28)

    पत्नी उमा, शंकरासोबत आहे. ज्याच्या उजव्या हातामध्ये मातुलिंग आणि त्रिशूल आहे. डाव्या हाताने उमेला आलिंगन दिले आहे आणि दुसऱ्या हातामध्ये नागेंद्र आहे. उमेचा एक हात शिवाच्या स्कंदावर (खांद्यावर) स्थिरावला आहे आणि तिच्या दुसऱ्या हातामध्ये दर्पण आहे.

    Uma-Maheshwara 10 C.E. Rani Durgavati Museum, Jabalpur M.P.

    शिल्पकलेतील काही अंकनात उमा आणि महेश्वर त्रिभंग स्थितीत उभे असतात. बऱ्याचदा महेश्वर सव्य-ललीतासनात बसलेले आणि त्यांच्या डाव्या मांडीवर उमा बसलेली दाखवतात. कधी ते नंदीवर आरूढ असतात तर कधी शिवाच्या पायाशी नंदी आणि उमेच्या पायाशी सिंह किंवा गोधा (घोरपड) दाखवतात. शिव चतुर्भुज असून त्याच्या हातामध्ये मातुलिंग किंवा अक्षमाला, त्रिशूळ आणि सर्प असतो. एका हाताने त्याने उमेला आलिंगन दिलेले असते. उमेचा एक हात शिवाच्या खांद्यावर असतो आणि दुसऱ्या हातामध्ये दर्पण किंवा उत्पल असते. क्वचित उमाही चतुर्भुज अंकित केलेले असते. या अश्या अनेक मूर्ती सध्या भग्नावस्थेत आहेत. तरीही या पाषाणांच्या अंतरातले लालित्य शिल्पकाराने साकारलेले होते याची निश्चितच जाणीव होते. काही मूर्तीमध्ये शिव त्याच्या हाताने सलज्ज उमेच्या हनुवटीला हलका स्पर्श करून तिचा चेहरा वर उचलत आहे असे दिसते. उमा महेश्वराच्या लोचनांचे झालेले मिलन होऊन त्यांना पडलेला सृष्टीचा विसर या शिल्पांतून दिसतो. अश्याच उमा महेश्वर मूर्तींच्या अद्वितीय प्रेमाचे साक्षात दर्शन आपल्याला मथुरा, नाचणा, लातूर येथील निलंगा, नांदेड येथील कंधार, घारापुरी, वेरूळ, पट्टडकल आणि उत्तरेपासून अगदी दक्षिण भारतापर्येंत सर्वत्र असंख्य ठिकणी घडत राहते. शिवपार्वतीच्या मुग्ध स्नेहाचे, उमामहेश्वराय नमः हे स्वर काव्यातून, नाणी आणि शिल्पांसारख्या भौतिक साधनांमधून सतत मधून उमटत राहतात.