कऱ्हाडकन्या - अभिनव सरस्वती चन्द्रलेखा

Home \ अभिलेखसूत्र \ कऱ्हाडकन्या – अभिनव सरस्वती चन्द्रलेखा
karad-princess-chandralekha

कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या प्रीतिसंगमावर वसलेले गावं म्हणजे कऱ्हाड. सध्या कऱ्हाड किंवा कराड या नावाने परिचित हे गावं, प्राचीन करहाट किंवा करहाटक या नावाने ओळखले जात होते. ही कऱ्हाडकन्या अभिनव सरस्वती चन्द्रलेखा, शिलाहार राजवंशातील राजकन्या म्हणजे साक्षात कला, ज्ञान आणि सौंदर्य यांचा त्रिवेणी संगम होती. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात शिलाहार राजवंशाची एक शाखा ही कऱ्हाड-कोल्हापूर इथे राज्य करीत होती. किंबहुना या शाखेला कऱ्हाडचे शिलाहार म्हणून ओळखले जात होते. कऱ्हाडकन्या चंद्रलेखा ही नृत्यनिपुण होती, संगीत स्वरसरिता होती, इतकेच नाही तर तिच्या लावण्याची गाथा सर्वदूर पसरलेली होती.

इ.स. 11 व्या शतकात रचलेल्या विक्रमांकदेवचरित् या महाकाव्यात कवी विद्यापती बिल्हण याने, चन्द्रलेखेच्या या अलौकिक सौंदर्याला काव्यबद्ध केले आहे. चन्द्रलेखेति नामस्याश्चन्द्रलेखासमत्विषः म्हणजे चंद्रलेखा ही नावाप्रमाणेच नाजूक आणि तेजस्वी अशी सौंदर्या होती. करहाट मध्ये चंद्रलेखा या विदुषी, रूपवती आणि गुणवती राजकन्येच्या स्वयंवरासाठी भारतभरातून अनेक राजकुमार त्यावेळी उपस्थित होते. चेदी, कान्यकुब्ज, मालव, कालांजर, गुर्जर, पांड्य, चोल असे भारतातील सर्व प्रदेशातील आणि राजवंशातील राजे या स्वयंवरासाठी आले होते. मात्र चन्द्रलेखा ही चालुक्य सम्राट त्रिभूवनमल्ल विक्रमादित्य सहावा याच्यावर प्रभावित झाली आणि त्याचा पती म्हणून तिने स्वीकार केला.

बिल्हणाच्या विक्रमांकदेवचरित् मधील चंद्रलेखेच्या सौंदर्याचे अलौकिक वर्णन ऐतिहासिकदृष्ट्या अतिशयोक्ती वाटू शकते, पण तरीही चालुक्य सम्राट विक्रमादित्य सहावा याने एका अपूर्व सौंदर्यवती शिलाहार राजकन्येशी विवाह केला होता, याची माहिती काश्मीरपर्येंत पोहोचली होती. काश्मीर कवी कल्हण याच्या राजतरंगिणीमध्ये तसे काही उल्लेख येतात. चंद्रलेखा हीची तसबीर पाहून राजा हर्ष मदनपरावश झाला आणि त्याने पर्माण्डि म्हणजे विक्रमादित्याला हरवून चन्दलेला म्हणजे चन्द्रलेखेला मिळवण्याची प्रतिज्ञा केली होती. अर्थात कवी कल्हणाने या काव्यात हर्षाच्या या मूर्खपणाची चेष्टा केली आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या सर्वगुणसंपन्न चंद्रलेखा हीचा शोध घेतला, तर अनेक अभिलेखांमध्ये तसेच ताम्रपटात तिचा विशेष उल्लेख येतो. कवी बिल्हण चंद्रलेखा हीचा करहाटपतेः पुत्री असा उल्लेख करतो. त्यामुळे तिच्या वडिलांच्या नावाचा स्पष्ट संकेत मिळत नाही. त्यामुळे तत्कालीन करहाटपतीचा विचार करता, त्या काळातील समकालीन शिलाहार राजा जो कऱ्हाड प्रांतात राज्य करीत होता तो म्हणजे मारसिंह. त्यामुळे मम. मिराशी यांनी राजा मारसिंह हा चंद्रलेखेचा पिता असल्याचे प्रतिपादन केले आहे.

कऱ्हाडकन्या चंद्रलेखा विवाहानंतर चालुक्य सम्राज्ञी झाली. चालुक्य सम्राट त्रिभूवनमल्ल विक्रमादित्यची श्रीमत् पिरीयरसी चन्दलादेवी बनली. इ.स.1096 सालचा विक्रमादित्याचा एक त्रुटित शिलालेख, काटेगिरी तालुका (बिजापूर) बदामी इथे सापडला आहे. जेव्हा चालुक्य सम्राट त्रिभूवनमल्ल विक्रमादित्य हा कल्याण मध्ये राज्य करीत होता, तेव्हा त्याची राणी अभिनव सरस्वती चन्दलादेवी हिने ऋग्वेद खण्डिका आणि शास्त्र खण्डिका यांसाठी दानं केले होते, असे या अभिलेखातून समजते.   

चालुक्य सम्राट विक्रमादित्याच्या सहा राण्या होत्या, परंतु चन्दलादेवी ही त्याची अग्रमहिषी म्हणजे पट्टराणी होती. तिचे अनेक अभिलेखीय उल्लेख येतात, ज्यातून तिच्या पुत्रांची माहिती मिळते. चन्दलादेवीला जयकर्ण, सोमभूप आणि तैलपा तृतीय हे पुत्र होते. चन्दलादेवीचा थोरला मुलगा जयकर्ण याचा अकाली मृत्य झाला. त्यानंतर विक्रमादित्याच्या दुसऱ्या पत्नीचा पुत्र मल्लिकार्जुन याने प्रशासनाचा भार सांभाळला. मल्लिकार्जुनानंतर विक्रमादित्य आणि चन्दलादेवी यांचा कर्तृत्ववान पुत्र सोमभूप, जो सोमेश्वर तृतीय म्हणून कीर्तीरूपास आला, याने राज्य केले. चन्दलादेवीचा पुत्र सोमेश्वर हा आईप्रमाणे सर्वज्ञ आणि वडिलांप्रमाणे चक्रवर्ती होता. विद्वान आणि व्यासंगी अश्या या सोमेश्वराने मानसोल्ल्हास सारख्या विविध विषयांना स्पर्श करणारा बृहत् ज्ञानकोशाची निर्मिती केली. चन्दलादेवीचा सर्वात धाकटा मुलगा तैलपा तृतीय याचा चन्दलादेवी नयना सरसिज सूर्यः असा अनेक अभिलेखांत उल्लेख येतो.

अभिलेखांमधील एक लक्षणीय बाब म्हणजे चन्दलादेवीचा उल्लेख करताना तिच्यासाठी वापरली गेलेली आदरयुक्त वचने. प्राचीन अलंदपूर म्हणजे अलंदे 1000 येथील अभिलेखात अतिशय सुंदर अश्या सन्माननीय शब्दांमध्ये चन्दलादेवीचा उल्लेख येतो. हा लेख संस्कृत आणि कन्नड अश्या मिश्र भाषेत आहे. या अभिलेखात लेखाचा दानकर्ता चौधरी रकासय्य, हा त्याचा दानाचे श्रेय चन्दलादेवी हिला समर्पित करतो आहे.
द्वितीया लक्ष्मी समाने म्हणजे जी लक्ष्मी स्वरूपा आहे. कला हंस याने म्हणजे हंस वाहन असलेली कला म्हणजे साक्षात सरस्वती आहे.  श्रीमत् त्रिभुवनमल्लदेव विशाल वक्षस्थला निवासिनी म्हणजे त्रिभुवनमल्लदेव विक्रमादित्याच्या हृदयात जी निवास करते अशी श्रीमत् पिरीयरसी चन्दलादेवीयरु.  

विविध अभिलेखीय नोंदी आणि ताम्रपटात तिच्यासाठी योजलेल्या उपाधींवरून तिचे शास्त्र-कला नैपुण्य आपल्याला सहज लक्षात येते. अनेक लिपी आणि भाषांवर तिचे खास प्रभुत्व होते, त्यामुळे तिला अभिनव शारदा आणि अभिनव सरस्वती यांसारख्या उपाधींनी गौरवीत केले होते. नृत्यामधील तिच्या अलौकिक कौशल्यामुळे तिचा नृत्यविद्याधारी असा उल्लेख आला आहे. सर्व कलांमध्ये तिची निपुणता असल्याने तिला सकळ कलाधारी असेही संबोधले आहे. कला आणि विद्या यांच्या सोबतच चन्दलादेवीमध्ये दुर्बल, असाह्य लोकांसाठी अपार करुणा होती. दुष्टा दर्पिष्टा सवती शिरो वज्र मुष्टी | दीनः अनाथः कथकः वैतालिकः सुवर्ण वृष्टी म्हणजे दुष्टांच्या डोक्यावर वज्र मुष्टी आणि दीन, अनाथ, कथाकार आणि स्तुतिपाठक यांच्यावर स्वर्णवृष्टी करणारी ती सम्राज्ञी होती. चन्दलादेवीच्या कारकिर्दीत तिने हिंदू आणि जैन धर्मासाठी अनेक दानं दिल्याच्या नोंदी आहेत. या अभिलेखामध्ये तिच्या वतीने पार्श्वनाथ मंदिर आणि शांतीनाथ मंदिराच्या डागडुजीसाठी दान दिल्याचे उल्लेख आहेत. मंदिरांशिवाय तिने निरनिराळ्या विद्यास्थाने आणि विविध खण्डिकांसाठी दाने दिली आहेत.

एक सामर्थ्यवान आणि कुशल प्रशासक स्त्री म्हणूनही, चन्दलादेवीची ओळख आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. चालुक्यांच्या प्रदेशातील राज्यकारभार चन्दलादेवी लीलया सांभाळत होती. विक्रमादित्यने कलचुरी राजा जोगम याला महामंडलेश्वर हे पद बहाल करून त्याच्याकडे कराड 4000 चे प्रशासन  सोपवले होते. जोगमचा पुत्र पेर्मार्डीदेव हा चालुक्य राजा सोमेश्वर तृतीयच्या कारकिर्दीत महामंडलेश्वर म्हणून तारदावाडी मण्डलाचे प्रशासन चालवत होता. पेर्मार्डीदेवचा विवाह हा विक्रमादित्य आणि चन्दलादेवीच्या कन्येशी झाला, त्यामुळे चालुक्य आणि कलचुरी राजवंशात वैवाहिक नातेसंबंध प्रस्थापित झाले. पेर्मार्डीदेवचा मुलगा कलचुरी बिज्जल हा चालुक्य विक्रमादित्य आणि चन्दलादेवी यांचा नातू कराड 4000 मण्डलाचा प्रशासक म्हणून काम करीत होता. त्यावेळी बिज्जलाची आजी चन्दलादेवी ही कऱ्हाड विषयातील कलम्बड 300 आणि वळसंग उपविभागाचे प्रशासन चालवीत होती.  

चंद्रलेखा जी नावाप्रमाणे लावण्यवती होती, उत्तम विदुषी आणि ज्ञानग्राही होती, नृत्य-संगीत-काव्य आणि विविध कलांची उपासक होती, सर्व सामर्थ्यानिशी राज्यकारभार सांभाळणारी कर्तबगार स्त्री, या महाराष्ट्र भूमीची कन्या होती. महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या प्रभावी आणि कर्तबगार स्त्री शासक म्हणून सातवाहन सम्राज्ञी नागनिका, वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्ता यांच्या खालोखाल, या कऱ्हाड कन्येच्या रूपातील चालुक्य सम्राज्ञी अभिनव सरस्वती चन्दलादेवी ऊर्फ चंद्रलेखा हिचे नाव अवश्य घ्यावे लागेल. कन्या, भार्या आणि माता इतकेच नाही तर आपल्या नातवासोबतही राजकीय कारकिर्दीत आयुष्य घालवणारी, ही त्याकाळातील एक प्रभावी शासक स्त्री आहे. केवळ पतीसोबतच स्वतःच्या अस्तिवाचा मार्ग बनवणारी ही कऱ्हाडकन्या चन्द्रलेखा, काही अभिलेखांतून तिच्या जीवनाचा एक पट आपल्यासमोर उलगडून ठेवते.
जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान आणि सर्वगुणसंपन्न महिलांचा आदर्श वारसा आपल्याला लाभलेला आहे, हे चन्द्रलेखा आणि तिचे संपूर्ण आयुष्य बघताना निश्चितच आपल्याला जाणवेल.

जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..!!

खास महिला दिन विशेष लेख वाचा –

  1. सामान्यातील असामान्य – डॉ. शोभना गोखले
  2. परमवैष्णवी श्रीमत् त्रिभुवनमहादेवी
ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

6 thoughts on “कऱ्हाडकन्या – अभिनव सरस्वती चन्द्रलेखा

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.