सामान्यातील असामान्य - डॉ. शोभना गोखले

Home \ बोधसूत्र \ सामान्यातील असामान्य – डॉ. शोभना गोखले

पुराभिलेखविद्या आणि त्याच अनुषंगाने मी सध्या शिकत असलेला नाणकशास्त्र  ह्या विषयांच्या आधारे आपल्याला तत्कालीन सामाजिक स्थिती, राजकीय घडामोडी, धार्मिक व्यवस्था आणि आर्थिक उलाढालींची कल्पना येते. शिवाय हे लेख आणि नाणी विश्वासार्ह्य असल्याने त्यांच्या अभ्यासाचे अतिशय महत्व आहे, किमान भारतीय इतिहासासाठी तरी. पण प्राच्यविद्या शिकताना केवळ जुन्या अवशेषांची, लेखांची, नाण्यांची, मूर्तींची मदत होते असे नाही तर ह्या विषयांसाठी काम केलेल्या संशोधकांच्या शोधांचेही महत्त्व थोर आहे. अनेक विद्वानांनी अश्या विषयांवर प्रचंड काम करून आमच्यासारख्या भावी अभ्यासकांना पुढच्या संशोधनासाठी एक नवीन वाट तयार करून दिली आहे. अश्या अभ्यासकांमध्ये देखील स्त्रियांनी त्यांच्या प्रेरणादायी वाटचालीच्या पाऊलखुणा मागे ठेवल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे डॉ. शोभना गोखले.

सुप्रसिद्ध पुरातत्वज्ञ डॉ. शोभना गोखले यांनी पुरातत्वशास्त्र, पुराभिलेखविद्या, नाणकशास्त्र ह्यांसारख्या विषयांचा दीर्घ अभ्यास करून भारताच्या इतिहासाच्या पुनर्रचनेत आणि विशेषतः प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासात खूप मोलाचा वाटा उचलला आहे, हे तर सर्वश्रुत आहेच. पण हा अभ्यास, हे चिंतन करत असताना त्यांना अनेक महादिव्यातूनच पार व्हावं लागलं आहे. डॉ. शोभना गोखले ह्याचं एक पुस्तक, ललाटलेख 1 म्हणजे त्यांच्या जीवनाचा एक अभिलेखच आहे. माझ्या दुर्दैवाने माझी आणि डॉ. शोभना गोखले ह्यांची प्रत्यक्षात कधी भेट झाली नाही, पण हो पुस्तक रूपांनी त्या मला भेटल्या. त्यांच्या सारख्या अनेक गुरुतुल्य लोकांचे कार्य जेव्हढे मोठे तितक्याच बिकट त्यांच्या अडचणीही होत्या. त्यामानाने माझ्या अडचणी शुल्लकच वाटतात मला. पण ज्या ज्या वेळी माझे मनोधैर्य खचतं त्यावेळी गोखले बाई आणि त्यांच्यासारखे इतर अनेक थोर विद्वत्त, अभ्यासंकांचे शब्द माझ्या पाठीवर हात फिरवतात आणि पुन्हा मला उभं करतात.

शोभना बाई मुळच्या सांगलीच्या. त्याचं लहापण सुखांत आणि आनंदात गेलं. एकत्र कुटुंबपद्धती आणि एकूणच भरलेलं घर अश्या वातावरणात त्या मोठ्या झाल्या. 8 जून 1952 ह्या दिवशी बापटांची लेक गोखल्यांकडे आली. त्यांच्या लग्नानंतर त्यांनी प्राचीन भारतीय संस्कृती ह्या विषयाचे अध्ययनाला सुरुवात केली. ह्या विषयांचे तास त्याकाळी पुणे विद्यापीठ, भांडारकर प्राच्यविद्यामंदिर आणि डेक्कन कॉलेज इथे चालत. त्यामुळे अश्या तीन ठिकाणी जाऊन हा विषय त्या शिकत होत्या. शिवाय भांडारकर प्राच्यविद्यामंदिरात त्यांना अर्ध्या दिवसाची नोकरीही होती. डॉ. हसमुख धीरजलाल सांकलिया – प्रागैतिहास, डॉ. रामचंद्र नारायण दांडेकर- संस्कृत साहित्याचा इतिहास, प्रा. आर. डी. करमरकर – धर्म आणि तत्वज्ञान तर त्यांचे काका पु. वी. बापट ह्यांच्याकडून बौद्ध धर्म आणि त्याचा इतिहास आणि आर्थिक इतिहास त्या शिकत होत्या. इतर विषयांसाठी शिक्षक नसल्याने स्वयंअध्ययन त्यांनी केले. शोभना बाईंचे पती ल. ना. गोखले हे विख्यात पत्रकार होते. त्यांच्या परिचयातून ग. ह. खरे ह्यांच्याकडून त्या मुर्तीशास्त्र हा विषय शिकल्या. ह्या M.A. च्या प्रवासात त्यांच्या गरोदरपणाची गोड बातमी आली. एक वर्षाचा ड्रॉप पडला खरा पण भारत इतिहास संशोधक मंडळात बसून त्यांनी पुन्हा अभ्यास सुरु केला. डॉ. हसमुख धीरजलाल सांकलिया ह्यांच्या मार्गदर्शनाने Historical Geography and Ethnography of Madhya Pradhesh या विषयात Ph.D. केली.

डेक्कन कॉलेज मध्ये काम करताना त्यांना श्रीलंकेच्या प्रवासाचा योग आला. भारतीय अभिलेखांमधील श्रीलंका आणि तिचे योगदान ह्या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. पुढे लंडन, इटली, ब्रिटन, बेल्जियम, अमेरिकेतही त्यांनी त्यांचे संशोधन सादर केले. अमेरिकेत तर भारतीय संस्कृती परिषदेत त्यांनी पंढरपूरची वारी आणि तिचा धार्मिक आणि सामाजिक अर्थ हा शोधनिबंध सादर केला.

बाईंच्या लिखाणावरून त्यांची शिस्त आणि कामाचा ओघ लक्षात आल्याशिवाय राहत नाही. एकीकडे कुटुंब आणि दुसरीकडे नोकरी सांभाळत जीवनातला उन्ह-पावसाचा खेळ सांभाळत ह्या श्रावणसरी त्या जगल्या. कोकणामधील एक शिलालेख वाचण्यासाठी कंबरेइतक्या पाण्यातून जाऊन लेखांच वाचन त्यांनी केलं. कान्हेरीच्या गुंफांमधील शिलालेख हे उंचावर होते, ते वाचण्यासाठी शिड्यांवर चढून त्या लेखांचे ठसे बाईंनी घेतले. कान्हेरी येथील बौद्धलेण्यांजवळच्या दरीमध्ये बौद्धभिक्षूंच्या स्मारकशिळा त्यांना सापडल्या त्यावरून त्या बौद्ध आचार्यांची नावे, त्यांचे गुणविशेष इतकेच नाही तर कान्हेरीत नांदणारी एक गुरुपरंपराच त्यांच्या संशोधनातून समोर आली. नाणेघाटातील नागणिकेचा लेख आणि त्या लेखाच्या आधारे नागणिकेने केलेल्या यज्ञात हजारो कार्षापणांच्या दक्षिणा दिलेल्या दिसतात. सध्याचे वाशिम ही वाकाटकांची राजधानी होती. त्यांचे गुरु डॉ. सांकलिया ह्यांच्या सांगण्यावरून ऐतिहासिक पुराव्यांच्या शोधात त्या विदर्भातील वाशिमला गेल्या. वाकाटक राजा देवसेन याचा हिस्सेबोराळा, वाशिम येथला शिलालेख तर बाईंना वत्सगुल्मा नावाच्या लहानश्या नदीच्या काठी सापडला होता. पण ह्या लेखामुळे वाकाटक राजवंशातील महत्त्वाचा पुरावाच हाती लागला. वाकाटक राज्यांची वंशावळ आणि काल्लोलेख ह्यांवर प्रकाश पडला. कच्छमधील अंधौ इथला लेख वाचण्यसाठी वाळवंटातून, ऐन उन्हाळ्यात भर दुपारी घोड्यावरून प्रवास केला.

मध्यंतरी इतिहास संशोधन मंडळातील एका कार्यक्रमातील बाईंची एक संग्रहित मुलाखत बघायला मिळाली. त्यामध्ये त्यांच्या भारताचे सांस्कृतिक वैभव ह्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांना ऐकायला मिळाले. 1973 साली बाई कान्हेरीला गेल्या होत्या. पायथ्याशी त्यांना एक छोटीशी खोली मिळाली होती जिच्या दरवाज्याला कडी नव्हती. अक्षरशः टेबल लाऊन दार बंद करावे लागत होते. अश्या परीस्थितीत रात्री अचानक तिथेच ऑफिसमागे राहणारे लोक ताटं वाजवायला लागले आणि बाईंना ओरडून सांगत होते ‘गोखले बाई घाबरू नका वाघ आला आहे.’ तो वाघ जाईपर्येंत बाई टेबलाला घट्ट धरून उभ्या होत्या. अश्याही कठीण प्रसंगाला त्या खरोखरच धीराने सामोऱ्या गेल्या.

बाईंच्या शोधनिबंधांचे, संशोधांचे अभ्यासकांच्या कडून वेळोवेळी पत्र लिहून किंवा प्रत्यक्ष कौतुक होत होते. सातवाहनकालीन नाण्यांच्या अभ्यासाबद्दल त्यांना सर बिडूल्फ परितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. 2008 साली त्यांना परमेश्वरीलाल गुप्ता हे पारितोषिक मिळाले. ह्याशिवाय त्यांना  गार्गी पुरस्कार, सप्तर्षी पुरस्कार ह्यांसारखे अनेक पुरस्कार आणि अनेक मान्यांकित फेलोशिपच्या त्या मानकरी ठरल्या.

अनेक डोंगरदऱ्या, घाटमाथे, नदीकिनारे पार करून संशोधनाचा अविरत ध्यास हा त्यांनी सोडला नाही, आणि तोही संसार आणि नाती सांभाळत. स्वतःला त्या चारचौघींप्रमाणे सामान्य म्हणवतात खऱ्या पण त्यांच्या ललाटलेखांतून मात्र एका असामान्य शोभना बाईंचे दर्शन घडते. जिज्ञासा, कल्पकता, धाडस, चिकाटी, धैर्य  आणि एक स्त्री म्हणून नात्यांमधला मार्दव जपत जीवनाची वाटचाल करणाऱ्या या नारी शक्तीला माझा सलाम.

बाईंचा जीवनप्रवास त्यांनीच त्यांच्या शब्दांत काही काव्यपंक्तीमध्ये समर्पक साठवला आहे.

जीवनगाथा

विश्वमोहिनी सरस्वतीचे मंदिर
मज वाटे क्षितिजावरती दूर
मुग्धमोगरा मनमोहित करी
चाफा मनगाभा भरून राही उरी

1.
गोखले, डॉ. शोभना . ललाटलेख (आत्मवृत्त) . काॅन्टिनेन्टल प्रकाशन; 2014.
ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

One thought on “सामान्यातील असामान्य – डॉ. शोभना गोखले

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.