स्वाध्याय सुधा सूत्र 5. योगश्चित्तवृत्तिनिरोधः (भाग 1)

Home \ बोधसूत्र \ स्वाध्याय सुधा सूत्र 5. योगश्चित्तवृत्तिनिरोधः (भाग 1)

योगशास्त्र म्हणजे भारतीय संस्कृतीला लाभलेली अत्यंत व्यापक आणि विज्ञानाधीष्टीत अशी दीर्घ परंपरा आहे. केवळ भारतच नव्हे तर हे संपूर्ण विश्व या योग शक्तीने एकजूट होत आहे. योगशास्त्राचे मर्म केवळ जाणून समजणार नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून योग म्हणजे नेमके काय? हे समजेल.

योग हा शब्द युज् या धातूपासून बनला आहे. युज् धातूचा अर्थ होतो, जोडणे किंवा जोडले जाणे. ही जोडण्याची एक क्रिया आहे, जी शारीरिक स्थरावर सुरु होते. देहाने चित्ताला जोडणे, चित्ताने आत्म्याला जोडणे, आत्म्याने परमात्म्याला जोडणे असा हा प्रदीर्घ योग प्रवाह आहे.

जगभरामध्ये 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस‘ म्हणून साजरा केला जातो, हे आपण जाणतोच. परंतु यावर्षी हा योग दिवस अनेकांसाठी संजीवन दिवस ठरेल. सध्या आपण सर्वच ज्या वैश्विक महामारीच्या संकटाला सामोरे जात आहोत, अश्या संकटामध्ये योग हा शारीरिक आणि मानसिक समतोल साधण्याचा उत्तम पर्याय बनून आपले आयुष्य निरोगी आणि स्वस्थ बनवेल. ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दरूप गणेशाच्या एका हाताचे वर्णन करताना, तो हात पातंजलकृत योगदर्शनाचा हात आहे, असे म्हटले आहे. हेच योग दर्शन देह आणि चित्त यांचे सौष्ठव प्रदान करणारा गणेशाचा अभयहस्त ठरेल, असे वाटते.

योग परंपरेचा संक्षिप्त इतिहास

योग परंपरेचा प्रदीर्घ कालखंड भारतीय संस्कृतीमध्ये आकार घेत आज इथवर आला आहे. सिंधू संस्कृतीमध्ये पशुपती शिवाचे एक सील उपलब्ध आहे. त्यामध्ये योग मुद्रेमध्ये धनस्थ बसलेल्या शिवाचे अंकन आहे. परंतु त्याचे उर्ध्वरेतस स्वरूप त्याचे योगबल निश्चित प्रदर्शित करीत आहे. वेद, ब्रह्मणे, उपनिषदे, महाभारत आणि श्रीमद्भगवतगीता यांमध्ये योगाचे अनेक उल्लेख आले आहेत. वेद काळापासूनच योग आणि त्यासंबंधी आवश्यक तत्त्वांचा अनेकदा विवेचन येत असले तरी अजून समग्र रूपाने ही योग तत्त्वे संघटीत झाली नव्हती.

योगची सूत्रबद्ध बांधणी महर्षी पतञ्जली यांनी ती केली. या योगसूत्र रचनेचा काळ हा साधारण इ. स. पूर्व तिंसरे ते दुसरे शतक मानला जातो. पातञ्जलकृत योगसूत्रे हाच योग दर्शनाचा प्रधान ग्रंथ झाला. याच योग सूत्रांवर व्यासांनी भाष्य लिहिले, जे व्यास-भाष्य म्हणून परिचित आहे.

महर्षी पतञ्जली यांच्या योगसूत्र ग्रंथामधील ‘योगश्चित्तवृत्तिनिरोधः’ ही संकल्पना, हा आजच्या स्वाध्याय सुधाचा विषय आहे. योगाच्या दार्शनिक तत्त्वांचा विस्तृत विचार महर्षी पतञ्जली यांनी योगसूत्रांच्या आधारे मांडला आहे. योगाच्या शास्त्रीय आणि व्यावहारिक व्याख्यांचे सर्वांगीण वर्णन या दर्शनात आपल्याला बघायला मिळते.

योगदर्शनाचे स्वरूप

महर्षी पतञ्जली यांना योगदर्शनाचे प्रणेते मानले जाते. सांख्य दर्शनाप्रमाणेच योग दर्शन हे द्वैतवादी दर्शन आहे. सांख्य दर्शनातील तत्त्वे योगदर्शनात मान्य आहेत याशिवाय ईश्वर सत्ता या दर्शनाने मान्य केली आहे. त्यामुळे योग दर्शनाला सेश्वर सांख्य असेही म्हटले जाते.

योग दर्शनाचे सिद्धांत सूत्र रूपात असले तरी प्रत्यक्ष योग साधनेला अधिक महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे योगशास्त्र हे क्रियात्मक अधिक आहे. योग दर्शनांत चित्त, चित्ताचे स्वरूप, आत्मा, आत्म्याचे स्वरूप, चित्त आणि आत्मा यांचा परस्पर संबंध, त्याच्या क्रिया, साधनेसाठी चित्ताची शुद्धता कश्या प्रकारे करावी आणि कैवल्यप्राप्ती म्हणजे मोक्ष यांचा समग्र विचार याचा मूलाधार आहे.

योगदर्शन हे चार भांगामध्ये विभक्त आहे. हे चार भाग म्हणजे योगक्रियेचे चार आधार असल्याने त्याला पाद ही संज्ञा वापरली आहे. योगसूत्रात समाधिपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद हे चार पाद आहेत.

योग साधण्याचे अनेक मार्ग आपल्याला परंपरेने ज्ञात आहेत. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, हठयोग, लययोग, मंत्रयोग आणि अष्टांगयोग. यांपैकी महर्षी पतञ्जलींनी अष्टांग योगाचे महत्त्व या योगसूत्रांच्या आधारे सांगितले आहे. याच अष्टांग योगालाच राजयोग असे म्हणतात. योगसूत्रांच्या सुरुवातीलाच म्हणजे समाधीपादामध्ये समाधीची अष्टांगे सांगितलेली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांना अष्टांग योग असे म्हणतात.

योगश्चित्तवृत्तिनिरोधः

पातञ्जल योगसूत्रातील समाधीपदातील प्रथम सूत्र अथ योगानुशासनम् ॥ असे आहे. या योगानुशासनम् मध्ये योग, अनु हा उपसर्ग आणि शासन अश्या तीन संज्ञा येतात. अनु हा उपसर्ग, महर्षींनी, परंपरेने आलेले किंवा आधीपासूनच अस्तित्वात असलेलेल्या योगशास्त्राचे अनुसरण करण्याच्या अर्थाने योजला आहे. शासन या संज्ञेचा एक अर्थ नियम किंवा निग्रह असाही होतो. म्हणजे परंपरेने आलेल्या योगशास्त्राचे निग्रहपूर्वक अनुसरण करूया, असा अर्थ इथे अभिप्रेत आहे, ज्याने योगसुत्राचा आरंभ होतो.

पातञ्जल योगदर्शनानुसार चित्त हे स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे. चित्ताला म्हणजे मनाला कोणताही आकार नसतो. चित्त ज्या विषयाच्या संपर्कामध्ये येते त्या विषयकारतेलाच ‘वृत्ति’ असे म्हटले आहे. या चित्तवृत्ती अष्टांग योगाभ्यासाने कमी करून अंततः त्या विलीन होतात. पंचक्लेशांपासून मुक्ती होऊन कैवल्यप्राप्ती होते. चित्तवृत्तींचा हा अविरत सुरु असलेला प्रवाह खंडित करणे कठीण आहे, त्यासाठी दृढ अभ्यास आणि वैराग्याची आवश्यकता असते.

या चित्त वृत्तींच्या निरोधाचे दोन उद्देश आहेत. प्रथम उद्देश म्हणजे क्लेशांना नष्ट करणे आणि दुसरा म्हणजे स्वस्वरूपामध्ये स्थित होणे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वृत्तिनिरोधाने साधकाचे क्लेश, कर्म आणि कर्माशय हे नष्ट होतात. कर्माशय नष्ट झाल्यामुळे जन्ममरणाचा बंध तुटतो आणि विवेकख्यातीच्या उदयासोबातच चित्त स्वस्वरूपामध्ये स्थिर होते. हीच कैवल्याची अवस्था असते. मोक्षालाच योगदर्शनात ‘कैवल्य’ म्हणतात. या कैवल्यप्राप्तीच्या मार्गामध्ये सर्वांत प्रथम चित्तवृत्ति स्थिर करणे अत्यंत महत्त्वाचे असते. चित्ताच्या वृत्ति अनेक आहेत, परंतु पतञ्जली मुनींनी पाच प्रकारच्याच वृत्तींचे योगसुत्रामध्ये वर्णन केले आहे.

पाच प्रकारच्या चित्तवृत्ती

वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाSक्लिष्टा: ॥ 1.5॥

वृत्ती या पाच प्रकारच्या असतात. त्यापैकी काही क्लिष्ट वृत्ती मानल्या आहेत, ज्या योगसाधनेत बाधा निर्माण करतात. तर काही क्लिष्ट वृत्ती मानल्या आहेत, या वृत्ती विवेक उत्पन्न करून सत्व, रजस आणि तमस प्रभावांना बांध घालतात. 

प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतयः ॥ 1.6 ॥

पातञ्जल योगसूत्रामध्ये प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या वृत्ती मानल्या आहेत. या क्रमशः जाणून घेणे श्रेयस्कर ठरेल. 

 1. प्रमाण वृत्ती

प्रमाण वृत्ती म्हणजे चित्तामध्ये यथार्थ किंवा जशी परिस्थिती आहे, त्याच्या अनुरुप ज्ञान होणे ज्याला आपण वस्तुनिष्ठ ज्ञान म्हणतो. 

प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि ॥1.7॥

या प्रमाण वृत्तीचे प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम असे तीन प्रकारही सांगितले आहेत. 

चित्तवृत्तींचे प्रकार

 • प्रत्यक्ष प्रमाण – चित्ताच्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून कोणत्याही विषयासोबत सम्पर्क आल्यास चित्त त्या विषयाच्या आकाराला प्राप्त होऊन त्याचे ज्ञान चित्तामध्ये निर्माण होते. त्याला ‘प्रत्यक्ष प्रमाण‘ असे म्हणतात.
 • अनुमान प्रमाण – कोणत्याही प्रत्यक्ष दर्शनाच्या आधारावर तर्काद्वारे जे अप्रत्यक्ष पदार्थाच्या स्वरुपाचे ज्ञान होते त्याला ‘अनुमान प्रमाण’ असे म्हणतात.
 • आगम प्रमाण – आप्त वचन आणि श्रुती वचन म्हणजे आगम. त्यामुळे वेदशास्त्र आणि आप्त (यथार्थ वक्ता) पुरूषांच्या वचनांना ‘आगम प्रमाण’ म्हणतात.
 1. विपर्यय वृत्ती

कोणत्याही वस्तुच्या योग्य स्वरूपाला न समजता त्याचे वेगळेच रूप समजणे अश्या प्रकारच्या मिथ्याज्ञानाला ‘विपर्यय वृत्ती’ असे म्हणतात. 

विपर्ययो मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् ॥ 1.8 ॥

उदा. अंधारामुळे दोरीला सर्प समजणे किंवा उलटपक्षी सर्पाला दोरी समजणे. अर्थात यात दोनही वस्तूंचे ज्ञान असते आणि पुरानुभवही असतो परंतु दोरीला सर्प समजणे यात ज्ञानाचा अभाव असल्याने विपर्यय वृत्ती निर्माण होते.

 1. विकल्प वृत्ती

फक्त शब्दांच्या आधारावर असलेल्या पदार्थाची कल्पना करणारी जी चित्ताची वृत्ती आहे ती ‘विकल्प वृत्ती‘ होय. 

शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः ॥ 1.9 ॥

कल्पित वस्तूंचा वास्तवात अभाव असतो. उदा. सोन्याचा पर्वत. म्हणजे ज्या वस्तू सत्यामध्ये नाहीत पण त्यांची कल्पना केली आहे अश्या.

 1. निद्रा वृत्ती 

ज्या वेळेला मनुष्याला कोणत्याही विषयाचे ज्ञान राहत नाही. फक्त ज्ञानाच्या अभावाचीच प्रचिती राहते. अश्या ज्ञानाच्या अभावाचे ज्ञान ज्या चित्तवृत्तीच्या आश्रित राहते ती, ‘निद्रावृत्ती‘ होय.

अभावप्रत्ययालम्बना वृत्तिर्निद्रा ॥ 1.10॥

 1. स्मृती वृत्ती

वरील प्रमाण, विपर्यय, विकल्प आणि निद्रा या चार प्रकारच्या वृत्तींमुळे अनुभवामध्ये आलेल्या विषयाचे संस्कार चित्तामध्ये पडून राहतात. ते संस्कार पुन्हा कोणते तरी निमित्त पाहून स्फुरित होऊन जाणे ही ‘स्मृती वृत्ती होय.

अनुभूतविषयासंप्रमोष: स्मृतिः ॥ 1.11 ॥

चित्तामध्ये पाच प्रकारचे परिणाम किंवा स्पंदन नेहमी होत राहतात. हा त्याचा स्वभाव आहे. यालाच चित्ताची चंचलता किंवा अस्थिरता म्हणतात. योगाच्या अभ्यासाने वृत्ती क्षीण व्हायला लागतात. चित्ताची चंचलता नष्ट झाल्यावर त्यामध्ये स्थिरता किंवा एकाग्रता निर्माण होते. यामुळे चित्त निर्वृत्तिक, वृत्तिशून्य किंवा क्षीणवृत्ती होऊन जाते. परंतु या वृत्तींपैकी ज्या क्लिष्ट वृत्ति मानल्या आहेत त्या पंचक्लेशांना कारण ठरतात.

पंचक्लेश 

अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशाः क्लेशाः ॥ 2.3 ॥ 

व्यास भाष्यानुसार वृत्ति या पाच क्लेश म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश यांना जन्म देतात. विवेकख्याती प्राप्त होण्यासाठी समाधी सिद्ध करावी लागते, त्यासाठी क्लेशांचे तनूकरण म्हणजे क्लेशांना हलके करणे आवश्यक असते. सुसंपादित क्रियायोगामुळे क्लेश हलके होतात. 

 1. अविद्या

अविद्याक्षेत्रमुत्तरेषां प्रसुप्ततनुविच्छिन्नोदाराणाम्॥ 2.4 ॥

अविद्या हे चार क्लेशाचे मूळ कारण मानले आहे. हे पाचही क्लेश प्रसूप्त, तनु, विच्छिन्न व उदार या चार अवस्थांमध्ये असू शकतात.

अविद्येच्या अवस्था

 • प्रसूप्त अवस्था – ही अवस्था म्हणजे जो क्लेश चित्तामध्ये विद्यमान असूनही आपले कार्य करू शकत नाही.
 • तनु अवस्था – संस्कार रूपाने ते क्लेश साधकात असले तरी त्याची तो साधकावर प्रभाव पाडत नाही. तनु अवस्था समाधीत पीडा देत नाही.
 • विच्छिन्न अवस्था – थांबून-थांबून प्रकट होणारा जेव्हा आणि एका प्रबळ क्लेशाच्या जोराने दुसरा क्लेश दाबल्या जातो आणि पुन्हा ती शक्ती आली की प्रकट होतो तो विच्छिन्न क्लेश.
 • उदार अवस्था – म्हणजे विषयांप्रती जो क्लेश स्वरूपत: प्रकट असतो.

अनित्याशुचिदुःखानात्मसु नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या॥ 2.5 ॥

जे अनित्य आहे त्याला नित्य समजणे जे अपवित्र आहे त्याला पवित्र समजणे, जे दुःखदायक आहे त्याला सुखकारक समजणे. जे अनात्मरूप आहे तेच आत्मरूप समजणे अशाप्रकारची चित्ताची विपर्यय बोधवृत्ती म्हणजे अविद्या होय.

 1. अस्मिता 

दृग्दर्शनशक्त्योरेकात्मतेवास्मिता॥ 2.6 ॥

दृक शक्‍ती म्हणजे आत्मतत्त्व ज्याला आपण चेतन पुरुष म्हणतो आणि दर्शन शक्ती म्हणजे बुद्धी तत्त्व ज्याला अचेतन प्रकृती म्हणतो, यांची एकात्म भावना हीच अस्मिता होय. अस्मितेमुळे चेतन पुरुषाचे ठायी ‘मी अचेतन बुद्धी आहे’ अशी भावना निर्माण होते. ही भावना समाधी योग्य साध्य होऊन पुरुषाला कैवल्याचा अनुभव घेण्यास प्रतिबंध निर्माण करीत असते. अविद्यारूप कारणाचा नाश झाला म्हणजे कार्यरुप अस्मिता आपोआपच नाश पावते.

 1. राग

सुखानुशयी रागः ॥ 2.7॥

सुखाच्या अनुभूतीची ओढ असणे म्हणजे राग होय. व्यासभाष्यानुसार सुखाची स्मृती ही सुख उत्पन्न करणार्‍या वस्तुविषयी तृष्णा उत्पन्न करते, असे म्हटले आहे. ही तृष्णा म्हणजेच राग.

 1. द्वेष

दुःखानुशयी द्वेषः॥ 2.8 ॥

दुःखाच्या अनुभूतीचा त्याग करण्याची प्रवृत्ती ही म्हणजे द्वेष. दु:खाची स्मृती ही दुःख उत्पन्न करणा-या त्या वस्तुविषयी क्रोध, घृणा या भावना उत्पन्न करते. त्यातून निर्माण होणारा द्वेष हा तमोगुणांची वृद्धी करून चित्ताला क्षिप्त, मूढ इ. अवस्थांकडे नेणारा, तसेच समाधीच्या अभ्यासात विक्षेप आणणारा ठरतो.

 1. अभिनिवेश

स्वरसवाही विदुषोऽपि तथारूढोऽभिनिवेशः॥ 2.9 ॥

स्वभावाचा एक अविभाज्य अंग घेऊन सातत्याने चालत आलेला तसेच विद्वानांचे ठायी देखील येणारा क्लेश म्हणजेच अभिनिवेश होय.

त्यामुळे या क्लेशांचे स्वरूप समजून घेऊन क्लेशांचा त्याग करणे आवश्यक आहे.  तप, स्वाध्याय, ईशवरप्रणिधान या क्रियायोगाच्या साधनाने क्लेशांचे तनुकरण होऊन क्लेशांना सूक्ष्मावस्था प्राप्त होईल. या सुक्ष्मावस्थेतील क्लेश उदार अवस्थेतून विच्छिन्न पुढे तनु अवस्थेत आणि नंतर प्रसूप्त अवस्थेत आणून विदेह व प्रकृतीलय या उच्चस्तरावरील अवस्था प्राप्त होऊ शकते. क्रियायोगाने आचरणात्मक परिवर्तन होते. तप, स्वाध्याय, ईशवरप्रणिधान, यम-नियम यांचे आचरण बलपूर्वक जे होते ते सहज घडायला लागते आणि सर्व चित्तवृत्ती निरोधाद्वारे निर्बीज समाधी सिध्द होते. हाच योगश्चित्तवृत्तिनिरोधः संकल्पनेचा योगदर्शनानुसार अर्थ होतो.

पुढील भागामध्ये योगश्चित्तवृत्तिनिरोधः साध्या करण्याचे प्रत्यक्ष मार्ग यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

(क्रमशः…)
– ज्येष्ठ शु.1 शके 1943, शुक्रवार (11 जून 2021).

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

3 thoughts on “स्वाध्याय सुधा सूत्र 5. योगश्चित्तवृत्तिनिरोधः (भाग 1)

 1. सुधा म्हणजे अमृत स्वाध्याय सुधा मुळे खरोखर अमृतानुभव येतो

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.