भारताच्या वायव्येकडे स्थित, एक प्रांत म्हणजे गांधार. या प्रांतात बहरलेली कला गांधार कला या नावाने ओळखली जाते. ही कला, म्हणजे पूर्वेकडील भारत आणि पश्चिमेकडील ग्रीक, रोम, इराण आणि शक कलांची सांस्कृतिक समन्वितता आहे. भारताच्यादृष्टीने गांधार या प्रांताचे एक विशीष्ट स्थान आहे. प्राचीन काळात डोकावताना गांधार क्षेत्र राजकीय, धार्मिक आणि कलात्मक स्थित्यांतरचे ते एक प्रमुख केंद्र होते हे समजते. या प्रांताच्या प्राचीन भौगोलिक सीमारेषा बघता गांधारच्या वायव्येला पाकिस्तान आणि पश्चिमेला हिंदूकुश होता. त्यामुळे भारतातील सांस्कृतिक प्रवाह गांधारच्या कलेवर उमटलेले स्पष्ट दिसतात. कुषाण काळात या कलेला अधिक बहर आलेला दिसतो. विशेषतः कुषाण राजा कनिष्क याच्या काळात म्हणजे इ.स.2-3 शतक हे गांधार कलेचा सर्वोच्चबिंदू ठरले.कनिष्काच्या काळापर्येंत बौद्धधर्मात नवीन विचारप्रवाह वाहायला सुरुवात झाली होती आणि खरतर बौद्ध महायान पंथाचा प्रभाव वाढत होता. बौद्ध कलेच्या प्राथमिक टप्प्यामध्ये बुद्धाचे अंकन हे मनुष्य रूपात न करता ते चिन्ह (anionic) रूपात होत होते. मात्र महायान पंथाच्या वाटचालीमुळे बुद्ध मूर्ती विकसित होऊ लागल्या होत्या. याच काळात बहरलेली गांधार शैली आणि त्यात निर्माण झालेले एक अप्रतिम कथन शिल्प जे बुद्धजन्म यथादृश्य आपल्या समोर साकारते. तेच कथनशिल्पं आज आपण बघणार आहोत.
एक वेगळीच शैली, तिचे वेगळेच अस्तित्व आणि त्या कलेने काही वर्ष सर्वांवर घातलेली सात्विक मोहिनी या सर्वांचे शिल्पाच्या माध्यमातून विवेचन साधण्याचा हा एक प्रयत्न बुद्धजन्माच्या निमित्ताने आज मी करत आहे.
भारतीय परंपरेतील एक अतिशय महत्त्वाचे आणि प्राचीन माध्यम म्हणजे इथली कथनशिल्पं. कथनशिल्पं यांची वैशिष्टे आहेत. ही मुख्यतः एका कथानकावर आधारित असतात, जी लोकांना ज्ञात आहेत हेच अभिप्रेत असते. त्यामुळे ते संपूर्ण कथानक शिल्पाद्वारा मांडण्यापेक्षा कथानकातील एखादा महत्त्वाचा प्रसंग शिल्पांकित केला जातो. कथन शिल्पांमधेही वैविध्य आहे. ते मांडण्याच्या पद्धत्ती या शैलीनुसार बदलल्या जातात. भारतीय संस्कृतीमध्ये कथन शिल्पांची परंपरा सुरु होते ती शुंग काळामध्ये. भारहूत येथे आपल्याला अनेक कथनशिल्पं बघायला मिळतात ज्यांचा विषय बुद्ध आणि बौद्ध धर्मावर आधारलेला आहे. तशीच कथनशिल्पं कुषाण काळात गांधार शैलीत निर्माण झाली. गांधार शैलीत निर्माण झालेल्या कलाकृतींनी बौद्ध धर्मावर आधारित अनेक भारतीय विषय हाताळले. बुद्धाशी निगडीत जातक कथा, मायादेवीचे स्वप्न, बुद्ध जन्म, सर्वसंगपरित्याग, बोधीप्राप्ती, बुद्धाचे पहिले प्रवचन, महापरीनिर्वाण अश्या बुद्धाच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचे शिल्पांकन गांधार शैलीत बघायला मिळते.
आज जे कथनशिल्पं आपण बघणार आहोत ते दैवी बुद्धजन्म दर्शवणारे आहे. कुषाण काळातील म्हणजे इ.स. 2 शतकाचा शेवट आणि इ.स. 3 शतकाची सुरुवात हा या शिल्पाचा साधारण काळ म्हणता येईल. गांधार शैलीचे अनेक टप्पे आहेत, त्यापैकी हे शिल्प गांधार कलेच्या अंतिम टप्प्यातील आणि कौशल्यपूर्ण कलाकृतीची साक्ष देते. गांधार शैलीची स्वतःची काही वैशिष्ट आहेत जी या शिल्पाकृतींमध्येही बघायला मिळतात. गांधार कला हा एक सविस्तर आणि स्वतंत्र अभ्यासाचा विषय असल्याने केवळ आजच्या कथनशिल्पाच्या दृष्टीने गांधार शैलीची वैशिष्ट्य जाणून घेऊया, पण तत्पूर्वी या कथन शिल्पाचा कथाभाग बघू.
बुद्ध जन्माची कथा
भारतातील जनपदांपैकी एक जनपद म्हणजे शाक्य. या शाक्य कुळाचा राजा शुध्दोधन आणि त्याची पत्नी देवी महामाया यांचा पुत्र म्हणून बुद्धाचा जन्म निहित होता. बुद्धजन्माची कथा ललितविस्तर या पाली साहित्यातून येते. त्यानुसार बुद्ध जन्म होण्यापूर्वी तुषित स्वर्गाचे अधिपतीत्व भविष्यातील बोधिसत्व विश्वपाणी याला देण्यात आले. जो पुढे जाऊन मैत्रेय बुद्ध म्हणून जन्म घेणार आहे. बुद्धजन्माची सर्व सूत्रे विधिलिखित घडत होती. त्याप्रमाणे देवी महामाया हीच्या स्वप्नात एक श्वेत हत्ती ज्याच्या सोंडेमध्ये त्याने कमळ धरले आहे, तो प्रकट झाला आणि त्याने तिच्या उजव्या कुशीतून तिच्या गर्भात प्रवेश केला. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला देवी महामाया तिच्या वडिलांच्या घरी जात असताना लुंबिनी इथल्या वृंदावनात काही क्षण सगळे थांबले. देवी महामायाला प्रसूतीवेदना सुरु झाल्या. देवीने शालवृक्षाच्या एक फांदीचा आधार घेतला आणि तिच्या उजव्या कुशीतून दिव्य अश्या बालकाचा जन्म झाला. त्या बालकाला घेण्यासाठी शक्र म्हणजे इंद्र स्वतः, ब्रह्मा तिथे उपस्थित होते. जन्मल्या जन्मल्या तो बालक सात पावले चालला. त्या दिव्य बालकाच्या पदस्पर्शाने जमिनीवर त्या सात ठिकाणी सात कमळे उमलली.
कथनशिल्प
या शिल्पामध्ये केवळ बुद्धजन्म शिल्पांकित केला आहे. पुढे जाऊन तो सात पाऊले चालतो असे शिल्पांकित केलेले काही कथनशिल्पेही आहेत.
- शिल्पपटामधील पात्रे
- देवी महामाया, महाप्रजापती, शक्र, ब्रह्मा, दोन स्त्रिया, इंद्र आणि ब्रह्मा सोबत एक व्यक्ती आणि दोन आकाशगामी पुरुष.
- वृक्ष
- शालवृक्ष आणि अश्वथ (पिंपळ)
- माध्यम
- रंगाने हिरवट असलेला सिस्ट हा दगड.
- कथनशिल्प
- देवी महामाया हीने शालवृक्षाच्या फांदीचा आधार घेतला आहे. महामायाच्या मदतीला तिची बहिण महाप्रजापती शेजारी तिला आधार देऊन उभी आहे. शेजारी दोन स्त्रिया त्यापैकी एकीच्या हातामध्ये आरसा आहे आणि ती दुसऱ्या हाताने माया देविकडे निर्देश करीत आहे. दुसऱ्या स्त्रीच्या एका हातामध्ये चौकोनी डबा आहे (गांधार शैलीतील इतर काही शिल्पपटांमध्ये या स्त्रीच्या हातात चौकोनी डब्याच्या ऐवजी एक पाण्याचा तोटी असलेला छोटा घडा किंवा भांडे दिसते, साहजिकच ते प्रसुतीला आलेल्या देवी महामायाच्या सुश्रुतेसाठीचे साधन म्हणून किंवा पवित्र पाण्याचा घडा म्हणून येते) आणि दुसऱ्या हातामध्ये वारा घालण्यासाठी लागणारे मयूर पिसांचा पंखा घेतला आहे. देवी महामायाच्या उजव्या कुशीतून बुद्ध जन्माला आला आहे, ज्याच्या डोक्यामागे गोल प्रभावलय दिसते. उजवीकडे हातामध्ये रेशमी वस्त्र घेऊन इंद्र बुद्ध जन्मासाठी तिथे उपस्थित झाला आहे. सोबत मागे ब्रह्मा आणि त्याच्या मागे एक व्यक्ती बुद्धजन्माचा आनंदाने शिट्या वाजवत आहे आणि त्याने त्याचे उपरणे हवेत उडवले आहे. वरती आकाशगामी देवता बुद्धाच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत. काही हात जोडून उभे आहेत तर काहींनी पुष्पवर्षावासाठी हातामध्ये फुले घेतली आहेत.
- कथनशिल्पातील गांधार शैलीची वैशिष्ट्ये
- गांधार शैलीवर असलेला Greco- Buddhist कलेचा प्रभाव या कथनशिल्पात दिसतो. Greco- Buddhist कलाशैली म्हणजे ग्रीक तंत्राने घडवलेल्या मूर्ती पण त्यांचे आशय बौद्ध धार्मिक सरणीचे होते.
- आदर्शवादी वास्तववाद जो आपल्याला Greco- Buddhist कलेत बघायला मिळतो तोच या कथन शिल्पाला उठाव देणारा महत्वाचा घटक ठरला आहे.
- या कथन शिल्पातील बारकाव्यांकडे बघितले तर सर्व पात्रांची वेशभूषा ही भारतीय पद्धतीची आहे. स्त्रियांनी साडी, लांब कंचुकी आणि कमरेला पट्टा घातला आहे. शिवाय डोक्यावर उष्णीष किंवा गोल शिरोभूषण परिधान केले आहे.
- पुरुषांच्या वस्त्रांमध्ये उत्तरीय आणि धोतर आणि डोक्यावर उष्णीष किंवा नक्षीदार टोपी आहे.
- अलंकार तसे कमी असले तरी देवी महामाया आणि इंद्र यांना इतरांपेक्षा अधिक अलंकरण आहे. स्त्रियांच्या गळ्याभोवती एक आणि त्यापेक्षा एक मोठा अलंकार आहे. सर्व स्त्रियांच्या कानामध्ये एकाच प्रकारची कर्णभूषणे आहेत. हातामध्ये दोन बांगड्या आणि पायामध्ये दोन तोडे आहेत. दास्यांच्या पायांमध्ये मात्र एक-एक तोडा दिसतो. त्यांच्या अलंकरणावर कमी काम केले आहे. हे त्यांची कनिष्ठता दर्शवते.
- पुरुषांनाही अलंकार दिले आहेत. त्यापैकी इंद्राचे अलंकार अधिक कोरीव आहेत.
- इंद्राचे विशेषत्व दाखवण्यासाठी त्याला नक्षीयुक्त शिरोभूषण, अधिक अलंकरण आणि कपाळावर तिसरा डोळा दाखवला आहे. (इथे अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे इथे इंद्राचा तिसरा डोळा उभा दखवल आहे आपण अजिंठा येथील गुंफा क्र. 2 मधील चित्रणात मात्र तो डोळा आडवा चित्रित केला आहे.)
- या कथन शिल्पांत उष्णीष किंवा शिरोभूषणाचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात.
- सर्वांच्या वस्त्रांना पडलेल्या चुण्या आणि त्यातून निर्माण होणारा वास्तवतेचा आभास हे गांधार शैलीचे आणखी वैशिष्ट या कथनशिल्पातही कायम आहे.
- वृक्षांची समर्पक मांडणी यात दिसते. शालवृक्ष हे या कथाशिल्पाचा गाभा असल्याने मध्यभागी आणि उजवीकडे दाखवले आहे. शिवाय डावीकडे अश्वथही सुरेख कोरलेला आहे, हे त्याच्या पानांच्या सुबकतेवरून समजते.
- सर्व पात्रांची चेहेरेपट्टी ही भारतीय ठेवलेली दिसते. त्यांच्या चेहऱ्यावरील वेगवेगळे भाव कलाकाराने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
- देवी महामाया, बुद्ध, इंद्र आणि आकाशगामी देवतांच्या चर्येवर सात्विक भाव प्रकट होतो. तर ब्रह्मा, महाप्रजापती, तिच्या बाजूची एक स्त्री आणि उजविकडील एक पुरुष जो अतिशय आनंदात आहे त्यांच्या चेहऱ्यावर हलके स्मित उठून दिसत आहे.
- गौतम बुद्धाचे मानवी अंकन आणि तेही अश्या दिव्यस्वरूपाचे आहे दर्शवण्यासाठी त्याच्या डोक्यामागे प्रभावलय दाखवले आहे. जे त्याचे दैवत्व दर्शवते.
समारोप
काही अभ्यासकांच्या मते गांधार शैली ही जरी भारताबाहेरील कलाशैली ते मानत असले, तरी गांधार या प्रांतात झालेल्या अनेक वर्षांच्या राजकीय आणि धार्मिक स्थित्यांतरच्या प्रभावात बहरलेली ही कला, आपल्या दृष्टीने महत्वाची म्हणावी लागेल. तिथले कलाकार कदाचित ग्रीक, रोमन, इराण प्रभावात तयार झाले असले तरी त्यांनी भारतीय विषयांना तितक्याच समर्पकपणे हताळलेले आहे. गांधार कलेचे भारतीय कलेतील योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे कलेच्यादृष्टीने इतर भारतीय कला शैलींप्रमाणेच गांधार शैली ही देखील तितकीच महत्त्वाची आहे.
संदर्भ
- देगलूरकर, डॉ. गो.बं. प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती. अपरांत प्रकाशन; 2015.
- Singh Upinder. A History of Ancient and Early Medieval India. Pearson ; 2015.