देवालयात प्रवेश घेताना विविध शाखांनीयुक्त अशी अलंकृत द्वारे आणि त्यांचे विशिष्ट ललाटबिम्ब आपले लक्ष वेधून घेतात. ललाटबिम्ब म्हणजे या द्वारांच्या ललाटपट्टीवर मध्यभागी असलेले देवतेची प्रतिमा. या ललाटबिम्बावर गरुडारूढ विष्णू, उमामहेश्वर, गजलक्ष्मी, गणेश अश्या विविध देवतांच्या प्रतिमा असतात. परंतु पट्टदकल येथील गलगनाथ मंदिराच्या ललाटबिम्बावर नृत्यरत शिवाचे नटराज स्वरूपातील शिल्पांकन दिसते.
ऐहोळे पासून जवळच असलेले पट्टदकल येथील मंदिरांच्या समूहातील एक मंदिर म्हणजे गलगनाथ. या नागर शैलीतील मंदिराचा काळ हा इ.स.7 व्या शतकाचा शेवट ते 8 शतकाचा मध्य मानला आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारावर ललाटबिम्बावर हे नटराज शिल्प दिसते. चतुर पदन्यास करणाऱ्या चतुर्भुज नटराजाचे हे शिल्प आहे. चतुर्भुज नटराजाच्या या प्रतिमेची काही प्रमाणात झीज झाली आहे. नटराजाचे पुढचे दोन हस्त हे नृत्यहस्त आहेत. उजवा हात सिंहकर्ण किंवा कटकमुख मुद्रेत तर डावा हात करीहस्त मुद्रेत आहे. मागच्या दोन हातांमध्ये शिवाची आयुधे आहेत. मागच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल तर डाव्या हातामध्ये नंदीध्वज असावा. दोन्ही पायाशी वाद्यवृंद वादन करीत आहे. उजव्या पायाशी सुशीर वाद्य वाजवणारा तर डाव्या पायाशी घटम् वाजवणारा गण अंकित केले आहेत.
(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल तृतीया शके १९४४.)