बनावटिकरण किंवा खोटेपणा हा आपल्याला आज प्रत्येक गोष्टीमधे पहावयास मिळतो आणि चलनही त्याला अपवाद नाही. चलन नवे असो किंवा जुने त्याचे बनावटिकरण होतेच. आज आपण वापरत असलेल्या नाण्यांचे, नोटांचे देखील बनावटीकरण होते. त्याचे हेतु वेगवेगळे असु शकतात. पण या सर्वात एक उद्देश सारखा आहे आणि तो म्हणजे नफा कमविणे. नविन नाण्यांच्या बनावटीकरणामुळे देशाचे आर्थिक स्थैर्य ढासळु शकते आणि ऐतिहासिक नाण्याच्या बनावटिकरणाने इतिहासाला तडा जाऊ शकतो. आज चलनात असलेल्या नाण्यांच्या बनावटीकरणाबरोबरच ऐतिहासिक नाण्यांचे देखील बनावटीकरण होते. ऐतिहासिक चलनाबाबत उत्सुकता आणि संग्राहकांची वाढती मागणी हे बनावटिकरणाचे कारण बनले असल्याचे आपल्याला दिसते. आज चलनात असलेल्या नाण्यांचे, नोटांचे होत असलेले बनावटीकरण हे आत्ताच होते आहे का ? याआधीहि बनावट नाणी होती का ? प्राचीन काळीही बनावट नाणी बनवली जात का ? हे प्रश्न या पाठोपाठ आपल्या मनात येऊ शकतात. याच प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्याचा प्रयत्न आपण या लेखाच्या माध्यमातुन करुया.
फसवण्याच्या किंवा जास्तीचा फायदा करुन घेण्याच्या हेतुने अनुकरण करुन बनवलेल्या वस्तुला बनावट म्हटले जाते. चलनाबद्दल बोलायचे झाले तर अधिकृतरित्या न बनवलेल्या किंवा न टांकसाळीत केलेल्या चलनास आपण बनावट म्हणु शकतो. पण त्याला बनावट म्हणावे की नाही हे बनवणाऱ्याच्या उद्देशावरुन ठरवले जाऊ शकते.
बनावट चलन बनवण्याची प्रक्रीया काही आज आपल्याकडे जन्माला आलेली नाही, सत्य तर असे आहे की जेव्हापासुन चलन भारतात सुरु झाले त्या साधारण इ.स.पु 600 पासुनच आपल्याकडे खोटी नाणी बनायलाही सुरुवात झाली. प्राचीन काळातील लेखकांच्या लेखनात या खोट्या नाण्यांबद्दल उल्लेख मिळतात, कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही बनावट नाण्यांबद्दल उल्लेख दिलेले आहेत. अर्थशास्त्रात कौटिल्य म्हणतात की,
- नाणी तपासानंतर शुद्ध घोषीत केलेली सोन्याची नाणीच कर म्हणुन स्विकारावीत.
- खोटी किंवा बनावट ठरवलेल्या नाण्यांचे तुकडे करावे.
- जो ही अशी खोटी नाणी बनवेल त्याला कडक शिक्षा केली जाईल.
पुढे राज्याच्या सुवर्णकाराची कर्तव्ये या पाठात ते सांगतात ती अशी –
- राज्याच्या सुवर्णकाराला सोने चांदि यांबद्दल पुर्ण ज्ञान असले पाहिजे. सुवर्णकारास हिरे, मौल्यवान दगड (मणी), मोती, शंख-शिंपले आणि नाणी यांच्या प्रजाती, वैशिष्ट्ये, रंग, वजन आणि निर्मितीबद्दल पुर्ण माहिती असली पाहीजे.
- जर एखाद्या व्यक्तीने बनावट नाणे तयार केले किंवा ते स्वीकारले किंवा त्याचे आदानप्रदान केले तर त्याला एक हजार पन दंड ठोठावला जाईल; जर कोणी कोषागारात बनावट पैसे घेईल तर त्याला अवश्य जिवे मारावे.
ही माहीती कौटील्याने खोट्या नाण्यांबद्दल त्याच्या अर्थशास्त्रात दिलेली आहे. पाली भाषेत असलेल्या बुद्ध साहित्यातही नाण्यांबद्दल सांगीतले आहे की, नाणी बनवणाऱ्या सुवर्णकारास नाण्यांबद्दल त्याच्या प्रजाती, वैशिष्ट्ये, रंग, वजन आणि निर्मिती बद्दल पुर्ण माहीती असते जी सामान्य माणसाला नसते.
भारतात प्राचीन, मध्ययुगीन तसेच अर्वाचीन या तिनही काळात बनावट नाणी बनत आलेली आहेत, त्या त्या काळात त्यावर नियंत्रण करण्यासाठी उपायही केलेले आहेत पण या गोष्टिवर कुठल्याही काळात पूर्ण आळा बसलेला नाही.
प्राचीन काळात लिहीलेल्या याज्ञवल्क्य-स्मृती मधे देखील बनावट नाण्याबद्दल एक उल्लेख आहे, त्यात नाणे बनवणाऱ्याला कूटक्रितनाणक असे म्हटलेले आहे. आणि हि नाणी तपासणाऱ्याला परिक्षी असे म्हटलेले आहे. नाणकशास्त्रातील नाणक या शब्दाचा देखील यात उल्लेख आलेला आहे. प्राचीन अथवा मध्ययुगीन काळात सोने व चांदी धातुमधे देखिल बनावट नाणी बनत. या बनावट नाण्यांमधे विविध स्वस्त धातुंची भेसळ करुन किंवा चांदिचे नाणे असल्यास ते तांब्याचे बनवून व त्यावर चांदिची परत चढवून वगैरे हि समकालीन बनावट नाणी बनवली जात. प्राचीन काळातील काही नाणी सापडलेली आहेत कि जी मुळ नाणी तांब्याची करुन त्यावर चांदीचा मुलामा चढवलेला आहे.
इ. स. पू 200-300 मधील हे आहत प्रकारातील नाणे. ही अस्सल आहत नाणी चांदी धातुची असतात. पण हे नाणं त्याकाळी नफा कमावण्याचा हेतुने आतुन तांबे धातुचे बनवून वरुन चांदीचा मुलामा दिलेला आहे. हा आहे प्राचीन काळातील बनावट नाण्याचा एक नमुना.!
प्राचीन काळातील नाण्यांचा काही मातीच्या आवटी मिळालेल्या आहेत त्यादेखील बनावट नाणी बनवण्याच्या हेतुनेच केल्या असाव्या. नालंदा येथील उत्खननात कुशान आणि गुप्त नाण्यांच्या अशा काही मातीच्या आवटी सापडलेल्या आहेत, ज्या त्याकाळी सोन्यात भेसळ करुन कमी प्रतीची नाणी या आवट्यांद्वारे बनवली जात. पंजाबमध्ये यौधेय राज्याच्या नाण्यांच्या देखील अशा प्रकारच्या काही आवटी सापडलेल्या आहेत. या आवट्यांमधे धातु ओतुन नाणी बनवली जात असंत. चलनाचे बनावटीकरण फार प्राचीन काळापासुन चालु असल्याचे आपल्याला या पुराव्यांवरुन दिसुन येते. चलनाचे हे बनावटीकरण मध्ययुगीन काळातही चालुच होते.
मध्ययुगीन काळात बनावट नाणी बनवणे अत्यंत सोपे होते, नाणे अंतर्मुल्याधारित असल्याने वजनावरच किंमत ठरत असे आणि याचाच फायदा घेउन बनावट नाणी बनवणारे लोक धातुत भेसळ करुन त्यातुन नफा लाटत असत.
उदाहरण म्हणुन खालील औरंगजेबाचे नाणे. अस्सल आणि बनावट अशी दोनही नाणी खाली दाखवली आहेत.
त्याकाळी कुणीतरी या नाण्यांची डाय बनवून किंवा चोरून स्वतःच तांब्याची नाणी बनवून त्यावर चांदीचा मुलामा चढवून (जेणे करून ती अस्सल वाटावीत) ती चलनात आणली. ही नाणी त्याकाळी किती लोकांना कळाली आणि किती काळ चालली ते माहिती नाही. नाण्याचे वजन अगदी बाकी रुपयांचे असते तेवढेच आहे 11 ग्राम. हे नाणे सुरत टांकसाळीच्या आवटी ने पाडलेले आहे. ही सर्व नाणी हातोडा डाय वर मारून बनवली जायची ज्याला इंग्लिश मध्ये Die struck Technique म्हणतात.
औरंगज़ेब आणि त्यानंतरच्या मुघलांची नाणी अगदी सुटसुटीत आहेत. याच नाण्याबद्दल बोलायचं झालं तर नाण्यावर पुढील बाजूनी सिक्का झद दर जहान चू बद्र इ मुनीर बादशाह औरंगजेब आलमगीर लिहिलेले असून औरंगजेब आलमगीर या शब्दात नाणे पाडले ते हिजरी वर्ष 1098 म्हणजेच इ.स . 1686 दिलय. तर मागील बाजूनी झर्ब सुरत सनह 30 जुलूस मैमनत मानूस असून सनह 30 हे नाणे औरंगजेबाचे राजवर्ष 30 सुरु असताना पाडले असल्याचे दर्शवते.
मुघलांच्या उतरत्या काळात विविध संस्थानिक राज्यदेखील भारतात राज्य करित होते. त्यातील अवध या राज्यात चांदीची रुपया नाणी चालायची. या नाण्यांचेही त्याकाळी काही प्रमाणात बनावटीकरण झालेले आहे. काही मातीच्या आवटी उपलब्ध झालेल्या आहेत ज्यावरुन आपण हे म्हणु शकतो. बनावट नाणी बनवण्यासाठी वापरात असलेली मातीची आवटी आणि अस्सल नाणे खाली दाखवलेले आहे.
यावरुन मध्ययुगीन काळातील नाण्यांच्या झालेल्या बनावटीकरणावर प्रकाश पडतो. बनावटीकरण ही समाजात घडणारी एक घटना म्हणुन याचे प्रतिबिंब हे समकालीन संत साहित्यातही पडलेले आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांनी लिहीलेल्या अभंगातही बनावट नाण्यांचे काही उल्लेख आलेले आहेत. प्राचीन काळापासुनच समकालीन बनावट नाण्यांमधे एक प्रकार प्रचलीत आहे आणि तो म्हणजे भारी नाण्यासाठी हलक्या धातुचा वापर करुन नाणे बनविणे आणि त्यावर भारी धातुचा मुलामा चढवून अस्सल म्हणुन चलनात आणणे.
तुकाराम गाथेत 3146 क्रमांकाच्या अभंगाची पहिली ओळ आहे,
तांबियाचे नाणे न चाले खर्या मोले | जरी हिंडवीले देशोदेशी ||
यात तुकाराम महाराजांच्या भोवताली अशी बनावट नाणी चलनात असावी आणि त्यावरुन तुकाराम महाराज म्हणतात की तांब्याच्या नाण्याला सोन्याचा किंवा चांदिचा मुलामा देवून तुम्ही लोकांना फसवन्याचा प्रयत्न कराल पण त्या त्या ठिकाणी त्याचे तज्ञ लोक आहेतच त्यामुळे तुमची योजना सफल होणार नाही आणि तुम्ही ते बनावट नाणे देशोदेशी जरी हिंडवीले तरी ते खऱ्या नाण्याच्या मुल्याने चालणार नाहि. अजुन एका ठिकाणी असाच उल्लेख येतो त्यात तुकाराम महाराज म्हणतात की –
मुलाम्याचे नाणे | तुका म्हणे नव्हे सोने ||
इथेहि महाराज तेच सांगतात की नाण्यास फक्त मुलामा दिलेला असेल तर ते अस्सल सोन्याचे होत नाही, त्यावर फक्त सोन्याचा मुलामा असतो आणि तो मुलाना निघाला तर त्याची सत्यता सर्वांसमोर येते. असे विविध संदर्भ साहित्यात आहेत.
समकालीन बनावट चलनाचा अत्यंत संक्षिप्त स्वरुपात आढावा घेण्याचा हा प्रयत्न होता. इतिहासात चलनाच्या बनावटीकरणाचे असे अनेक संदर्भ आहेत. समकालीन परिस्थिती तसेच नफा कमावण्याच्या हेतुने झालेल्या बनावटीकरणाची माहिती आपल्याला या संदर्भांतून मिळते.
संदर्भ–
- Nanak- a study, Manjiri Bhalerao.
- Treasures of Gupta Empire, Shivleekumar Gupta.
- Standard Guide to Coin Collecting, Asif Zumkhawalla.
- Introduction to Indian Coin Forgeries, Shastri JC Philip.
- Kautilyas Arthshastra, R. Shamasastry.
- भारतीय सिक्के, अमितेश्वर झा.
- नाणी, संग्रह आणि संग्राहक, आशुतोष पाटील.
- https://coincoin.com/I069.htm
टीप – सदर लेखातील मते, विचार आणि लेखाची मांडणी ही संबंधित लेखकाची आहे.