ज्ञानसाधना माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. कुठल्याही गोष्टीचा बोध झाल्याशिवाय त्या गोष्टीची महत्ता समजत नाही. प्राचीन काळापासून अविरत प्रवाहित झालेल्या या भारतीय संस्कृतीशी असलेलं माझं नातं दृढ होण्यामागे माझे आजोबा डॉ. अप्पासाहेब (विठ्ठल) इनामदार, माझे बाबा सिनेअभिनेते प्रकाश इनामदार आणि आई जयमाला इनामदार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याकडून मिळालेला कलेचा वारसा आणि लहानपणीच लाभलेल्या दिग्ग्ज लोकांच्या सहवासामुळे कदाचित आजचा माझा हा प्रवास मला सुखकर भासतो.
लहान बाळाची नाळ त्याच्या आईशी जोडलेली असते, त्यामुळे आई आणि बाळामध्ये एक संवेदनशील नातं, जाणीवा निर्माण होतात. आपल्या आईविषयी वाटणारी ओढ मला आपल्या भारतीय संस्कृती विषयीही कायमच वाटत आली. माता-पिता आणि गुरुजनांनि मला काय करावं, कसं करावं हे शिकवलं पण संस्कृतीने मला काय जपावे ते शिकवलं. भारतीयांना हजारो वर्षांच्या संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. या संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे केवळ आपल्यासाठीच गरजेचे आहे असे नाही, तर आपल्या भावी पिढीला योग्य दिशा देण्यासाठी सुध्दा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आपण जिथे जन्म घेतो तिथल्या संस्कृतीची माहिती आणि जाणीव जपणं हे खरतर प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य असत. ती संस्कृती आपल्याला अनेक गोष्टी देत असते, पण आपल्याला तिचा म्हणावा तितिका बोध झालेला नसतो.
स्वतःच्या संस्कृतीचा परिचय म्हणजे खरंतर आपण स्वतःला स्वतःच्या अस्तित्वाचा परिचय करून देत असतो. बोधसूत्र हे एक असं माध्यम आहे ज्याद्वारा मला ज्ञात झालेल्या आपल्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या सूत्रांना मी एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे. खरतरं हा शोध माझाच आहे, माझ्या अस्तित्वाचा, माझ्या संस्कृतीचा.
एक कलाकार म्हणून, कलाशिक्षक म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक अभ्यासक म्हणून मला जे भारतीय संस्कृतीचे दर्शन झाले आहे तेच सर्वांपर्येंत पोहचावे, त्याचा सर्वांना उपयोग व्हावा म्हणून हा सगळा प्रबंध.