बिहारमध्ये बाराबार आणि नागर्जुनी या टेकड्यांचा एक समूह आहे. तिथे लोमाश ऋषी, सुदामा, विश्वामित्र, गोपी, कर्ण चौपार, वापियका आणि वादथिका अश्या इथे एकूण सात गुंफा आहेत. ग्रानाईट या खडकात या गुंफा खोदवल्या आहेत. दगडात कोरलेल्या मानवनिर्मित गुफांचा उगम, विकास आणि त्यांची कलाशैली यादृष्टीने बाराबार येथील गुंफा अतिशय महत्त्वाच्या मानाव्या लागतात. त्यातही सर्वांत महत्त्वाची गुंफा म्हणजे लोमश ऋषीगुंफा, कारण मौर्यकालीन कला अवशेषांमध्ये ही गुंफा देखील एक महत्त्वाचा कलावशेष आहे. धार्मिकदृष्टीनेही या गुंफेचे महत्त्व आहे. तत्कालीन समाजातील लोकांवर आणि राजसत्तेवर आजीविक पंथाचा प्रभाव प्रस्थापित करण्यात या पंथाला यश आले होते. प्राचीन भारतीय दर्शन परंपरेतील नियतीवाद यावर आधारित या पंथाचा मक्खलि गोसाल हा आद्य प्रवर्तक मानला जातो. इ स.पू 252 ते इ. स.पू 214 या काळात सम्राट अशोक आणि त्याचा नातू दशरथ यांनी आजीविक पंथीयांसाठी केलेल्या गुंफा निर्मितीतून या पंथाची लोकप्रियता दिसून येते.
स्थापत्यदृष्टीने लोमश ऋषी या गुंफेचा विचार केला तर, या मानवनिर्मित गुंफेचे स्थापत्य हे प्राचीन भौतिक पुराव्यांपैकी एक आहे. गुंफेची रचना साधी आहे. एक वर्तुळाकार दालन आणि त्याला लागूनच आयताकार मंडप. या गुंफेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंफेच्या आतील भिंती घासून गुळगुळीत आणि चमकदार केल्या आहेत. दगडावर दिसणारी अशा प्रकारची झिलई हे मौर्यकालीन कलावशेषांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. याशिवाय लोमश ऋषी गुंफेशी संबंधित अजून एक महत्त्वाची आणि आकर्षक गोष्ट म्हणजे त्याचे मुखदर्शन (facade). याच्या प्रवेशकाराची वरची बाजू ही खालच्या बाजूपेक्षा थोडी अरुंद आहे. दाराच्या दोन्ही बाजूंना दोन अर्धस्तंभ कोरले आहेत. हे दोन्ही अर्धस्तंभ वरच्या बाजूने आत झुकलेले आहेत. त्यावर कमानदार छप्पर आहे. या कमानीच्या आणि दरवाजाच्या मध्ये अर्धवर्तुळाकार जाळ्या दिसतात. एका जाळीत मध्यभागी असणाऱ्या स्तूपाकडे दोन्ही बाजूने आत प्रवेश करणऱ्या मकर आणि हत्तीच्या रांगा आहेत. हे सर्व मुखदर्शन हे तत्कालीन लाकडी बांधकामाचे तंतोतंत अनुकरण म्हणता येईल. पुढे जेव्हा भारतातील इतर भागात गुंफा तयार झाल्या, तेव्हा लोमश ऋषी गुंफेच्या मुखदर्शनाचे अनुकरण अनेक ठिकाणी झाले असे दिसते. मौर्यांच्या काळातील या गुंफा म्हणजेच मानवनिर्मित गुंफा परंपरेतील आद्य निर्मिती ठरल्या आहेत.