ग्रीक आॅलीम्पियन देवांपैकी एक महत्त्वाचा देव म्हणजे पाॅसीडॉन (Poseidon). रोमन दैवतशास्त्रामध्ये भूकंप निर्माण करणारा असे त्याचे प्राथमिक स्वरूप आहे. पाॅसीडॉन पुढे समुद्र देव किंवा पाण्याचा संरक्षक देव म्हणून प्रस्थापित झाला. तो समुद्राच्या लाटा नियंत्रित करून इतर विपत्तींपासून खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे कार्य करतो. त्यामुळे खलाशी, व्यापारी यांच्यासाठी तो महत्त्वाचा देव झाला होता. मात्र पाॅसीडॉन कोपला तर तो जमिनीमध्ये कंप निर्माण करू शकतो, अशी धारणा होती. भूकंप निर्माण करण्यासाठी पाॅसीडॉन त्याच्या हातामधील त्रिशूळ किंवा तीन टोक असलेला भाला जमिनीत रोवतो आणि कंप निर्माण करतो, त्यामुळे Earth-shaker म्हणून त्याला ओळखतात. तर असा हा समुद्रदेव पाॅसीडॉन, याचा ब्राँझ पुतळा महाराष्ट्रातील कोल्हापूर परिसरात ब्रह्मपुरी येथे उत्खननात अचानक सापडला. १९४५-४६ साली प्रा. ह. धी. सांकलिया आणि प्रा. दीक्षित यांनी कोल्हापूर येथे उत्खनन केले होते. या ब्राँझ पुतळ्याची ओळख झाली तेव्हा लक्षात आले की, हा पुतळा रोमवरून भारतात इथपर्यंत आला आहे. ब्रह्मपुरीला प्राचीन स्थळ म्हणून एक महत्त्व आहेच, कारण येथे पहिली वस्ती सापडते तीच मुळी इ.स.पू. २ शतकाच्या आसपासची. या काळातील अनेक पुरात्तवीय अवशेष ब्रह्मपुरी येथील उत्खननातून सापडले आहेत. पण हा रोमन देवतेचा पुतळा काही वेगळ्या गोष्टी उजेडात आणतो आहे. भारताचा रोमशी व्यापार इ.स.पू. १ल्या शतकापासून सुरूच होता. ब्रह्मपुरीत मात्र साधारण इ.स.२ आणि ३ ऱ्या शतकात व्यापारदृष्टीने अधिक भरभराट झालेली दिसते. रोमन बनावटीची भांडी, ब्राँझची भांडी, रोमन नाण्याच्या मातीच्या बनवलेल्या प्रतिकृती यांसारख्या अनेक गोष्टी आपल्याला ब्रह्मपुरी इथे सापडतात. अर्थात या सर्व गोष्टी रोमन व्यापाराची साक्ष देणाऱ्या आहेत. उत्तर सातवाहन काळात रोमन संपर्कामुळे या वस्तू आणि अर्थात रोमन समुद्र-देव पाॅसीडॉन व्यापारीमार्गाने कोल्हापूर परिसरात आला हे दिसते. त्यामुळे स्वाभाविकच हे उत्खनन महत्त्वपूर्ण ठरले.