सत् युगामध्ये विष्णूच्या ध्यानाने, त्रेता युगामध्ये यज्ञीय समर्पणाने, द्वापार युगामध्ये भगवंताच्या चरण सेवेने जे फळ प्राप्त होईल तेच कलीयुगामध्ये केवळ संकीर्तनाने साध्य होईल, हे मानणारी परंपरा म्हणजे मणिपुरमधील संकीर्तन. इ.स. 15 शतकात मणिपूरचा राजा भागचन्द्र सिंह ह्याने संकीर्तन जनसामान्यात रुजवले.
संकीर्तन म्हणजे ज्ञानाचे माध्यम मानणाऱ्या वैष्णव पंथीय लोकांची परंपरा आहे. मणिपुरी लोक यज्ञीय समर्पण किंवा कोणत्याही विधीविधावतांना मनात नाहीत. प्रार्थना किंवा धार्मिक सण-समारंभासाठी संकीर्तन हेच महत्वाचे मानले जाते.
संकीर्तानाचे अनेक प्रकार असले तरी त्यांची सुरुवात ही अतिशय क्लिष्ट अश्या धार्मिक विधींनी होते, ज्यात चंदन, दिवा, धूप आणि वस्त्र दानं दिले जातात. संकीर्तानाच्या सादरीकरणाची सुरुवात ही संगीत प्रस्तावनेने होते. ही सुरुवात राग चंद्रिकेत संगीतबद्ध असते.
मुख्य कथाभाग सांगण्यासाठी कमीत कमी तीन तासांचा कालावधी लागतो. संकीर्तनाच्या कथा ह्या राधा आणि कृष्ण ह्यांवर आधारित असतात. संकीर्तन करताना सादरकर्ते नृत्यही करतात. हे नृत्य करत असताना काही विशिष्ट कल्पनांसाठी विशिष्ट संकेत योजना केली जाते त्याला कर्तालचोलम म्हणतात. वाद्यवृंद विविध प्रकारच्या ताल आणि ठेक्यांद्वारा विविधता प्रस्तुत करतात.
स्त्रिया आणि पुरुष दोघांचेही संकीर्तन असते. त्यापैकी स्त्रियांचे संकीर्तन हे विलक्षण असून उच्च स्वरात ते गायले जाते. संकीर्तानातील विधी आणि अनुष्ठान इतके सरळ असतात कि प्रेक्षकही त्यांना नेमून दिलेल्या जागांवर बसतात आणि सादरीकरणाच्या मधे उठून जाऊ शकत नाही. प्रेक्षक हे संकीर्तन सदर करणाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यसाठी त्यांना वाकून नमस्कार करतात. कलाकार संकीर्तन सादर करण्याचे पैसे ठरवत नाहीत. लोकं स्वइच्छेने पैसे किंवा इतर गोष्टी, जे अर्पण करतात ते हे कलाकार घेतात. ही गुरु-शिष्य परंपरा आहे.
पुरुषांच्या संकीर्तन एकूण 14 मृदुंग वादक सादरीकरण करतात. संकीर्तन मणिपुरी वैष्णव पंथी लोकांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगी गायले जाते. जसे लहानपणी कान टोचण्याचा विधी, यज्ञोपवीत धारण करताना, लग्नात वधु संकीर्तनाच्या संगीतावर तालबद्ध पावले टाकते आणि अंत्यविधी साठीही. ह्याशिवाय हिंदू कालनिर्णयाप्रमाणे सर्व सण साजरे करताना संकीर्तन केले जाते. जगन्नाथ रथयात्रेच्या वेळी संकीर्तानाची प्रस्तुती होते त्यावेळी कलाकार नृत्य आणि हाताने टाळ्या वाजून संकीर्तन सदर करतात.
झुलन यात्रा पावसाळ्यात साजरी केली जाते, त्यावेळी कलाकार मृदुंग आणि मंजिऱ्या संकीर्तानासाठी वापरतात. तर हिवाळ्यात सोयोन संकीर्तन केले जाते ज्यात कलाकार मृदुंगासह झांज ह्या वाद्यांचा वापर करतात. होलीपाला संकीर्तन हे वसंतऋतूमध्ये सदर करतात, ह्यात वेगवेगळ्या ढोलांचा समावेश असतो.
मणिपूरचे संकीर्तन हे तिथल्या उत्स्फूर्त जीवनाचे प्रतिक आहे जे लोकांमध्ये एकात्म भाव टिकवून आहे. संपूर्ण समाज संकीर्तन जपण्याच्या दृष्टीने कार्यरत असतो. त्यामुळेच 2013 साली संकीर्तनाला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले.
भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात पारंपारिक तांबे पितळीची भांडी बनवणारे थाथेर ह्यांची माहिती घेऊया.
(क्रमशः)
Photo Credits : UNESCO
2 thoughts on “संकीर्तन”