भारतीय परंपरेचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे प्राचीन वैदिक संस्कृती आणि या वैदिक संस्कृतीने आपल्याला दिलेले वैदिक वाङ्मय. वैदिक परंपरा ही भारतीयांच्या जीवनशैलीचा, संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग होता आणि आजही आहे. म्हणूनच ही वेद पठण परंपरा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंदवली गेली आहे. या वेद परंपरेतून लाभलेले वाङ्मय म्हणजे अलौकिक ज्ञानाची अमुल्य रत्न, गर्भात धारण केलेला सागर आहे. भारतीयांसाठी जीवनाचे मर्म म्हणजेच वेद, त्यामुळे इथे राहणाऱ्या प्राचीन माणसांच्या मनाचा वेध घेण्यासाठी वेदांची माहिती करून घ्यावी लागेल.
प्राचीन काळात डोकावताना काही निकष हे समजून घ्यावे लागतात. या निकषांचा अर्थ विविध ऐतिहासिक साधनांमधून व्यक्त होत असतो. त्या साधनांपैकी एक महत्त्वाचे साधन म्हणजे वाङ्मय. जे जे वाणीद्वारा प्रकट होते ते म्हणजे वाङ्मय. असाच एक अलौकिक मौखिक ठेवा आपल्याला मिळालेला आहे तो म्हणजे ऋषितुल्य वेद. हे वेद ऋषितुल्य का? असं काय ज्ञान त्यात लपलेलं आहे? असे प्रश्न जिज्ञासूंना पडतातच आणि सुरु होतो एक प्रवास, तो वेद म्हणजे काय, त्यांची रचना काय आहे, प्रणाली काय आहे हे जाणून घेण्याचा.
वेदोऽखिलो धर्ममूलम् (मनूस्मृती) – सम्पूर्ण वेद हे धर्माचे मूळ आहे
यावरून वेदांचे महत्त्व लक्षात येतेच पण वेदांच्या अभ्यासावरून तत्कालीन समाजदर्शन होते, धार्मिक स्थित्यांतरांचा आढावा घेता येतो. इतकच नाही तर त्यावेळी कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, रूढी- परंपरा, अनुशासन आणि एकूणच त्या काळाचा अंदाज बांधणे शक्य होते.
वेद शब्दाची व्युत्पत्ती बघितली तर विद् या धातूपासून वेद हा शब्द तयार होतो. याचा अर्थ होतो ज्ञान. वेदांना अपौरुषेय म्हटले आहे. अपौरुषेय म्हणजे हे कोणा एका पुरुषाने लिहिलेले वाङ्मय नाही, त्याचा कर्ता सांगता येत नाही. लिखित स्वरूपात नसलेल्या या वेदांची ज्ञान-परंपरा मौखिक पद्धतीने प्रवाहित होत आपल्यापर्येंत येऊन पोहोचली आहे, हेच याचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल. सुरुवातीला एकच वेद अस्तित्वात होता. हा काळ म्हणजे वेदांचा प्राथमिक काळ म्हणावा लागेल ज्यात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांच्या संहिता तयार झाल्या नव्हत्या.
वेदांची संरचना समजून घेतली तर त्यातील अनेक गोष्टींचे अर्थ समजण्यास आपल्याला मदद होते. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या तीन वेदांना वेदत्रयी म्हणतात. परंतु अथर्ववेदही तितकाच महत्त्वाचा आहे. वेदांचे चार प्रकारचे ग्रंथ असतात. ते म्हणजे संहिता, ब्राह्मणे, अरण्यके, उपनिषदे. त्यापैकी शेवटचे दोन म्हणजे आरण्यके आणि उपनिषदे एकच भाग मानतात. या चार ग्रंथांची माहिती करून घेऊ.
संहिता
प्रत्येक वेदाच्या शाखा असतात आणि त्या शाखांच्या स्वतंत्र संहिता असतात. त्या त्या संहितेमध्ये त्या वेदाच्या मंत्रांचा संग्रह असतो. जसे की ऋग्वेद संहितेमध्ये ऋग्वैदिक मंत्र एकत्रित केले जातात ज्यांना ऋचा म्हणतात.
ब्राह्मणे
ब्राह्मणे हे दुसऱ्या प्रकारचे ग्रंथ आहेत. इथे ब्राह्मण ही जातीवाचक संज्ञा घेऊन चालणार नाही. ब्राह्मणग्रंथ हे गद्य स्वरूपात आहेत. ब्राह्मणग्रंथात वेदाच्या संहितेमध्ये आलेला मंत्र, प्रार्थना, ऋचांचा अर्थ किंवा उपयोग सविस्तर मांडलेला असतो. प्रसंगी एखादा विधी किंवा ऋचा समजवण्यासाठी छोट्या कथांचाही अंतर्भाव ब्राह्मण ग्रंथात होतो.
आरण्यके
आरण्यके म्हणजे आरण्यामध्ये जाऊन ऋषींनी केलेलं आत्मिक चिंतन. आरण्यके स्वतंत्र ग्रंथ म्हणून नसतात कारण आरण्यके हा भाग ब्राह्मण ग्रंथाचा शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे आरण्यके ही ब्राह्मणग्रंथ आणि उपनिषदे यांंना जोडणारा दुवा मानतात.
उपनिषदे
उपनिषदे ही वेदांचा अंतिम भाग असल्याने त्यांना वेदान्त म्हणतात. या वेदान्तामध्ये ब्रह्म आणि जगत् या संदर्भातील तत्वज्ञान आणि त्याचे चिंतन मांडलेले असते.
भारतीय धर्म आणि धार्मिक संकल्पनांचे ज्ञान श्रुतीद्वारा होते. गुरु आपल्या शिष्यांना हे वेदांचे ज्ञान मौखिक पद्धतीने देत असत. गुरुवाणीतून हे ज्ञान श्रवण करून शिष्यांनी वेद जाणले. म्हणून या वेदांना श्रुती वाङ्मय असही म्हणतात. या वेदांचा प्राचीनतम भाग म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेदाची सविस्तर माहिती मात्र पुढच्या लेखात बघूया.
(क्रमशः)
2 thoughts on “वेदोऽखिलो धर्ममूलम्”