दीदारगंज यक्षी

Home \ बोधसूत्र \ दीदारगंज यक्षी

20 ऑक्टोबर 1917 रोजी, म्हणजे आजपासून बरोबर शंभर वर्षांपूर्वीची ही गोष्ट असेल. बिहारमधील एका पोलीस निरीक्षकाने एका मूर्तीची गुप्तपणे नोंद केली होती. ह्या पोलिस रिपोर्ट प्रमाणे, जुन्या पटना शहरातील दीदारगंज परिसरात, गंगेच्या किनारी एक धोबी, जमिनीत फसलेल्या एका दगडाच्या स्लॅबवर कपडे धुवत असे. एक दिवस काठावर कपडे धुवत असताना, त्याच्या जवळून एक साप पाण्यात त्या दगडाखाली जाऊन बसला. गावातल्या लोकांनी तो साप काढण्यासाठी त्या दगडाच्या स्लॅबची माती काढायला सुरुवात केली. माती बरीचशी काढल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं, की हा दगड एका अलौकिक भव्य मूर्तीचा एक भाग आहे, जीला आज आपण दीदारगंज यक्षी या नावाने ओळखतो.  

5 फुट 2 इंच उंच, गुलाबी चुनार वालुकाष्मातील ही मूर्ती, 1 फुट 7 ½ इंच पाद-पीठावर उभी आहे. मूर्तीवर झिलईयुक्त चकाकी आहे. चवरीधारी यक्षीची एक खासियत म्हणजे,  इ.स. 1917 साली पटना संग्रहालयाची स्थापना झाली आणि ह्याच वर्षात ही यक्षी प्रतिमा मिळाली. गेली शंभर वर्ष ही दीदारगंज यक्षी तिच्या अलौकिक सौंदर्याने पटना संग्रहालयाची शोभा द्विगुणीत करीत उभी आहे.  ही मूर्ती कशी मिळाली ह्यावर अनेक मते आहेतच. त्यापैकी एक घटना मी वरती नमूद केली आहे. पण पटना संग्रहालयाद्वारा ह्या मूर्तीचा इतिहास थोडा वेगळा सांगितला जातो. तत्कालीन कमिश्नर ई.एच.एस. वाॅल्स (E.H.S. Walsh) ह्यांच्या पत्रामध्ये ह्या मूर्तीच्या उपलब्धीचे श्रेय गुलाम रसूल नामक व्यक्तीला जाते, ज्याने दीदारगंज जवळ, नदीकाठावर चिखलात फसलेल्या ह्या मूर्तीला सर्वप्रथम पहिले आणि ती मूर्ती बाहेर काढण्यासाठी खोदकामही केलं.

कलात्मकदृष्टीने महत्त्व ठेवणारी ही मूर्ती, प्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ते आणि इतिहासकार डॉ. जे एन सामदार (Dr. J N Samaddar) ह्यांच्या नेतृत्वाखाली पटना संग्रहालयात आणली गेली. ह्या यक्षीच्या प्राप्तीनंतर इतिहासकारांच्या समोर अजून एक नवा प्रश्न उभा राहिला. तो म्हणजे ह्या मूर्तीची कालनिश्चिती. ही कलाकृती, त्यासाठी वापरला गेलेला दगड, शिल्पाची शैली त्यावर असलेली कृत्रिम चमक किंवा झिलाई असे काही अलौकिक गुण लक्षात घेता, भारहुत मध्ये मिळणाऱ्या बौद्ध स्तुपांच्या वेदिकांशी समतुल्य अशी ह्या मूर्तीची शैली आहे असा निष्कर्ष आर.पी.चन्द्रा ह्यांनी मांडला आहे. अशोककालीन कला शाखेतील, विदेशी कलाकारांच्या मगध कलाकारांच्याद्वारा रुजवलेल्या शास्त्रीय शिकवणुकीचे संस्कार ह्या मूर्तीवर झालेले दिसतात. ह्या मूर्तीवर असलेली चमक आणि एकूणच मूर्तीची गोलाई ही मौर्यकालीन मूर्तींशी साधर्म्य दाखवणारी असल्याचे एक मत जे.एन. बनर्जी मांडतात. निहार रंजन रे ह्यांच्या मते ही शैली मथुरा शैलीतील यक्षींशी साधर्म्य दाखवणारी आहे. त्यामुळे ह्या मूर्तीला यक्षी म्हणणे अधिक योग्य आहे.

परंतु ह्या मूर्तीचा एकूणच शाही साज, हा मौर्यकालीन एकपाषाणी स्तंभशीर्ष आणि त्यावरील नक्षीकामाशी मिळता-जुळता वाटतो.  त्यामुळे ही मूर्ती कदाचित मौर्यकाळाच्या आसपास जाऊ शकते. अनेक वर्ष जमिनीखाली असल्यामुळे ह्या मूर्तीला थोड्या प्रमाणात नुकसानही सोसावे लागले आहे. ह्या मूर्तीचा वाम हस्त भंजीत अवस्थेत आहे. नाकाचा टवका उडाला आहे. तरीही तिच्या कलात्मक सौंदर्यात यत्किंचितही कमीपणा येत नाही.

इ. स. पू. तिसऱ्या–दुसऱ्या शतकात घडवलेली, म्हणजे जवळपास 2200 वर्षांपूर्वी घडवलेली ही एकपाषाणी मूर्ती, पटना संग्रहालयातील ही सर्वांत आकर्षक मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पटना संग्रहालयाने दिलेले विवृत्ति हे नाव ती सार्थ करते आहे. विवृत्ति ह्या शब्दाचा अर्थ DiscoverPerceiveInterpret असा घेतला आहे. ह्या मूर्तीचे गंगेच्या काठावर पुन्हा मिळणे, तिचे पुन्हा नव्याने ज्ञान करून घेणे आणि तिची पुन्हा नव्याने व्याख्या लावणे हे तिची विवृत्ति दर्शकता सार्थ करतात. 

यक्षी ही प्राचीन भारतीय स्त्री सौंदर्याचे प्रतिक मानली गेली आहे. यक्षी प्रतिमांची वक्षस्थळे आणि नितंब जास्त पुष्ट दाखवलेली असतात. हातात कोपरापर्यंत बांगड्या, कर्णभूषणे, गळ्यात माळा, आणि पायात चांगल्या जडसर तोरड्या असतात जश्या ह्या चवरीधारी यक्षीच्या शिल्पांतही दिसतात. 

मौर्य काळात स्त्री आणि पुरुषाच्याही काही मूर्ती घडवल्या गेल्या. यामध्ये सर्वांत महत्त्वाच्या मूर्तींमध्ये प्रथम उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे दीदारगंज येथे मिळालेल्या ह्या चवरी धारिणीचा. स्त्रीच्या पूर्णाकृती मूर्तीतल्या या स्त्रीने तिच्या वाम हातात चवरी धरली आहे. तिने हातात भरपूर बांगड्या आणि अंगावर पुष्कळ दागिने घातले आहेत. कलाकाराने तिच्या लांबसडक केसांची अतिशय सुरेख केशरचना केलेली दाखवली आहे. तिच्या शरीरावरील वस्त्र, दागिने, केशरचना हे सर्व तपशिलात दाखवल्यानंतर मौर्य काळातील वैशिष्ट्यपूर्ण झिलईही यामूर्तीवर आणली आहे. भारतीय परंपरेने मान्य केलेली स्त्रीसौंदर्याची सर्व लक्षणे या मूर्तीत आहेत. स्त्रीदेहाचे अत्यंत सौष्ठवपूर्ण दर्शन ह्या मूर्तीच्या रूपाने होते. 

वेशभूषा आणि केशविन्यास

मौर्य काळातील वस्त्र, ते धारण करण्याच्या पद्धती आणि केशविन्यासाची माहिती विविध ग्रांथिक साधनांमधून घ्यावी लागते. मेगॅस्थानीसचं इंडिका, एरियन, कौटिल्य अर्थशास्त्र आणि महाभारताचे सभा पर्व ह्या दृष्टीने अभ्यासावे लागते. ह्याशिवाय जातक कथा आणि विनय पिटक ह्यांचीही तत्कालीन वेशभूषा जाणून घेण्यासाठी मदत होते. अर्थशास्त्रामध्ये वस्त्र आणि केशविन्यासाची माहिती येते.

दीदारगंज यक्षी च्या वेशभूषेत कंचुकीचा अभाव आहे. अधोवस्त्र म्हणून साडी धारण केली आहे. एक विशिष्ट पद्धतीची साडी ज्याच्या पद्धतशीर चुण्या घातलेल्या आहेत. हे अधोवस्त्र कमरेपेक्षा थोडेसे खाली नेसलेले आहे. त्या वस्त्रावर पाच लडींचा कमरबंध आहे. साडीमध्ये खोचलेला पटका किंवा वस्त्र ज्याला बौद्ध साहित्यामध्ये फासुका असा शब्द वापरलेला आहे. उत्तरीय वस्त्र उजव्या हातातून पाठीमागे, कंबरेतून थोडं खालून दुसऱ्या हातापर्येंत आले आहे, पण तो हात तुटल्यामुळे त्या हातामधले उत्तरीय दिसत नाही.

ह्या चवरीधारी यक्षीने विशिष्ट पद्धतीचा केश विन्यास केला आहे. त्यावर अलंकरण शिल्पातून लीलया अभिव्यक्त झाले आहे. केशरचना नेटकी असून, केस मागे बांधले आहेत. डोक्याच्या मध्यभागी मोठ्या बिंदीने सजावट केली आहे. गळ्यात दोनच अलंकार आहेत. हातामध्ये मात्र बांगड्या भरपूर आहेत आणि त्याच हातामध्ये तिने चवरी (fly whisk) पकडलेली आहे.

अतिशय सुंदर शैलीत ह्या मूर्तीच्या सौंदर्याची अभिव्यक्ती कलाकाराने साधली आहे. ह्या मूर्तीचे भाव आणि तिची प्रत्यांगातून प्रवाहित होणारे सौंदर्य अनेक वर्ष लोटली तरी आजही आपल्या नजरा खिळवून ठेवते.

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

2 thoughts on “दीदारगंज यक्षी

  1. धनलक्ष्मी खूप छान लिहिलं आहेस.. काही मुद्दे आठवले या संदर्भात .. या यक्शीच्या नाकाचा टवका , मूर्तीची नीट हाताळणी नं झाल्यामुळे उडाला ..कारण ही मूर्ति माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या काळात झालेल्या भारत महोत्सवात परदेशी नेली गेलेली होती. लोकसभेत त्यावर मोठ्ठा वादही झालेला होता. (http://indiatoday.intoday.in/story/priceless-works-sent-to-festivals-abroad-return-damaged/1/323252.html).

    ही चवरीधारिणी आहे म्हणजे दासी पण असू शकते. दासी पूर्वी फक्त कटीवस्त्रच नेसत असत..( डॉ. म.अ. मेहेंदळे यांनी द्रौपदीच्या वस्त्रहरण संदर्भात हे लिहिले आहे.. दुशासन ..’तू आता दासी झालीस तुला आता वरती वस्त्र घ्यायचा अधिकार नाही म्हणून तिचे वस्त्र ओढून घेतो’ ) .. या यक्शीच्या वक्ष अनावृत्त असण्याचा हा देखील अर्थ असू शकेल का?

    1. धन्यवाद माधुरी, तुझ्या प्रतिक्रियेबद्दल.. हो, ह्या मूर्तीच्या नाकाचा टवका भारत महोत्सवात उडाल्यामुळे पुन्हा ती मूर्ती कधीच संग्रहालया बाहेर दिली गेली नाही. वक्ष अनावृत्त असण्या संदर्भात मी दोन मुद्दे लेखातही उल्लेखलेले आहेत. एक मुद्दा असा की, काही इतिहासकारांच्या मते ही यक्षी आहे. प्राचीन भारतीय परंपरेत यक्षी संकल्पना मूर्तीमध्ये जर बघितली तर यक्षी प्रतिमांची काही व्यवच्छेदक लक्षणे असतात. त्यापैकी एक म्हणजे पुष्ट आणि अनावृत्त वक्ष. दुसरा मुद्दा असा आहे, मौर्यकालीन ही मूर्ती असेल तर तत्कालीन वेशभूषेसाठी आपल्याला ग्रांथिक वर्णनाचा आधार महत्वाचा ठरतो. ह्या ग्रांथिक वर्णनाप्रमाणे ह्या मूर्तीतील स्त्रीची वेशभूषा ही दासीची असू शकते. माझ्या मते, तिने हातामध्ये चवरी धारण केली आहे आणि त्यामानाने अलंकार जुजबी आहेत. तिच्या चेहेऱ्यावरचे मंद स्मित कोणताच अधिकार दाखवत नाही. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, ही यक्षी दोनही पायांवर समान भार न देता डाव्या गुडघ्यातून किंचीतशी वाकली आहे. असे काही सूक्ष्म मुद्दे ती दासी असल्याकडे झुकुतायेत. द्रौपदी वस्त्रहरण मुद्द्यावर मी आत्ता काहीच सांगू शकत नाही कारण त्या संदर्भात माझ्या वाचनात काही आलं नाहीये. पण निश्चितच त्यावरही मी वाचन करेन.
      पण तुझ्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद..!! बोधसूत्र वाचत राहा आणि तुझ्या प्रतिक्रिया नक्की देत राहा ☺️

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.