वारसा म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व आपला वारसा आपली संस्कृती या लेखाच्या कालच्या भागात बघितले. आज आपण प्रत्यक्ष वारसा आणि त्याच्याशी निगडीत इतर घटकांची माहिती बघणार आहोत. या घटकांची, स्थळांची काही परिचित- अपरिचित वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, तो वारसा जतन करण्याच्या दृष्टीने आपली कर्तव्ये आणि जबाबदारी काय आहे, हे बघणार आहोत. छोट्या-छोट्या गोष्टीही वारसा जतन करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असतात, हे आपल्याला या लेखाद्वारे समजू शकेल.
पुरातत्त्वीय स्थळे आणि अवशेष
पुरातत्त्वीय स्थळे आणि अवशेष म्हणजे सर्वेक्षण, उत्खनन आणि संशोधनात सापडलेल्या वस्तू आणि वास्तू. या स्थळ-अवशेषांतून भूतकाळातील मानवी जीवनाचा अंदाज बांधता येतो. मानवाच्या भोवतालची परिस्थिती, त्यातून निर्माण होणाऱ्या त्याच्या गरजा, यांचा मानवाने मागे ठेवलेल्या पुराव्यांच्या आधारे अर्थबोध केला जातो. मानवी मन आणि संस्कृती यांचे प्रतिबिंब पुरातत्त्वीयशास्त्राच्या आधारले स्पष्ट करता येते. ही पुरातत्त्वीय उत्खनने संपुर्ण मानवजातीच्या दृष्टीने महत्वाची असतात. आपली संस्कृती, इतिहास शास्त्रीयदृष्ट्या पाहण्याची गरज असते, त्यात पुरातत्त्वशास्त्र उपयोगी ठरते. या उत्खननात मृत्पात्रे, हत्यारे, अलंकार, दफने, प्राचीन लेख, धान्य, जनावरांची हाडे, मानवाने घडवलेली विविध आकाराची भांडी, खापरे, मंदिरे, गुंफा, शिल्पे, प्रस्तरलेख, चैत्य, विहार, नगरावशेष अश्या अनेक गोष्टी मिळतात. हा प्राचीन वारसा जतन करण्याच्या दृष्टीने काही शास्त्रीय पद्धतींचाही वापर केला जातो.
अनेक महत्त्वाच्या उत्खनन स्थळांवर स्थानिक वस्तूसंग्रहालय तयार केले जाते. त्यांना स्थळ संग्रहालय किंवा क्षेत्रीय संग्रहालय म्हणतात. या संग्रहालयामध्ये उत्खननात सापडलेल्या वस्तू किंवा काही महत्वाचे अवशेष ठेवले जातात. याशिवाय वारसा जतन करण्याच्या दृष्टीने भूदृष्य पुरातत्त्वशास्त्र (Landscape Archaeology) उपयोगी ठरते. याचा अवलंब करून पुरातन वास्तुंच्या आजूबाजूचा भौगोलिक परिसराचा विचार केला जातो. भूदृष्य पुरातत्त्व म्हणजे पूर्वी एखाद्या वास्तूभोवती असलेल्या जागेचा किंवा भोवतालच्या वातावरणाचा वापर, पूर्वी ज्या पद्धतीने केला गेला असेल, त्याप्रमाणे अवलंब करून ती वास्तू पुन्हा तशीच विकसित करणे, जतन करणे.
उदा. पुण्यामधील शनिवारवाडा या वास्तूमधील कारंजी, बगीचे यांची डागडुजी करून, त्यांची पेशवे काळात होती तशी मांडणी केली जाते. त्यामुळे पेशेवेकालीन संपन्नता, तत्कालीन स्थापत्य यांच्याशी आपल्याला एकरूप होता येते.
तुम्हाला हे माहित आहे का
- खजुराहो, सांची, कोणार्क, मथुरा, हम्पी, नागार्जुनकोंडा अश्या अनेक मंदिर आणि स्तूपांच्या परिसरामध्ये स्थळ संग्रहालये बघायला मिळतात.
- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण ASI अंतर्गत 46 स्थळ संग्रहालय आहेत. आपण या संग्रहालयाला भेट देताना आपल्याला मोफत सेवा किंवा अल्प दर आकारला जातो.
- अँटिक्किटीज अँड आर्ट ट्रेझरर्स अँक्ट -1972 या कायद्याप्रमाणे, कोणतीही शंभर वर्षांइतकी जुनी वस्तू पुरातत्त्वीय अवशेष मानली जाते.
आपला वारसा समजून घेऊन जतन करणे हे जितके महत्वाचे आहे, तितके तो पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे हेही महत्वाचे आहे. त्यामुळे लहान मुलांचा सहभाग मोलाचा आहे. त्यांना अवश्य अश्या उपक्रामध्ये सहभागी करा.
माझा वारसा माझी जबाबदारी
- तुमच्या गावांतील स्थळ संग्रहालयांना भेटी द्या.
- काळाच्या पोटात लपलेल्या अनेक गोष्टींची माहिती पुरातत्त्वशास्त्र आपल्याला करून देते. त्यामुळे उत्खननांत सापडलेले नगर अवशेष, वसाहती बघायला जा.
- स्थळ संग्रहालयातील प्राचीन अवशेष आणि वस्तूंचा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करा.
- कागद, वस्त्र, नैसर्गिक रंग, तैलचित्रे, भित्तीचित्रे, लाकूड, हाडे, हस्तीदंत हे सर्व प्रकार अति संवेदनशील प्रकारात येतात. त्यामुळे त्यांची छायाचित्रे घेताना तीव्र प्रकाश, फ्लॅश वापरणे टाळावे.
- स्थळ संग्रहालयांसारख्या वास्तूंमध्ये सेल्फी काढू नका.
- जागतिक वारसा दिनानिमित्त तेर, उस्मानाबाद या ठिकाणी तेरचाप्राचीन समृद्ध वारसा दाखवण्यासाठी तगर इतिहास दर्पण या नावाने प्रदर्शन भरवण्यात आले आहे. अश्या प्रदर्शनांना अवश्य भेटी दया.
- अनेकांना जुन्या वस्तू जमा करण्याचा छंद असतो, त्यांना खाजगी संग्राहक म्हणतात. या पुरातन वस्तूंमध्ये, मूर्ती, नाणी, ताम्रपट, शस्त्रे, हस्तलिखिते, चित्रं, कलाकुसरीच्या वस्तू आणि अश्या गोष्टी ज्या वास्तूपासून विलग आहेत यांचा समावेश होतो.
- आपल्याकडे असलेल्या अश्या पुरातन वस्तूंची अधिकृत नोंद शासकीय नोंदणी कार्यालयात करावी. या नोंदी, पुरातन वस्तूंची तस्करी अश्या अवैध गोष्टींवर आळा घालण्यासाठी आवश्यक आहेत. आपल्याकडे असलेला पुरातन वस्तूंच्या वारसा संरक्षण आणि जतन या दोनही दृष्टीने या नोंदी अतिशय महत्त्वपूर्ण असतात.
लेणी आणि शैलगृहे
भारताची भौगोलिक संपन्नता दाखवणारा एक घटक म्हणजे इथले पर्वत. या पर्वतश्रेणीत प्रस्तर खोदून तयार केलेली जागा म्हणजे लेणी किंवा शैलगृहे. लेणी हा शब्द संस्कृत लयन या शब्दावरून आला आहे. लयन म्हणजे गृह. या पर्वतीय खडकांमध्ये काही ठिकाणे नैसर्गिकरीत्या तयार झालेली असतात तर काही मानवाने डोंगर खोदून ती तयार केलेली असतात. लेणी हा शब्द मानवनिर्मित गुंफांसाठी वापरला जातो. सुरुवातीच्या काळात खोदलेली लेणी ही त्या डोंगरांच्या पायथ्याशी असून ती साधी, लहान व ओबडधोबड अशी होती. नंतरच्या काळातील लेणी पर्वतश्रेणीच्या वरच्या भागांत आढळतात. अखेरच्या टप्प्यातील लेणी मात्र माथ्यावर कोरलेली आहेत असे दिसते. या लेण्यांमध्ये काही दानलेख आणि काही आश्रय दात्यांची नावे कोरलेली असतात. हे लेख प्राचीन लिपींमध्ये आहेत. त्यामुळे प्राचीन भाषा आणि लिपीच्या दृष्टीनेही लेणी हा वारसा महत्त्वाचा आहे.
तुम्हाला हे माहित आहे का
- भारतात खडकांतून कोरलेली सुमारे 1200 हून अधिक लेण्या आहेत. त्यांपैकी जवळजवळ 80 टक्के लेण्या महाराष्ट्रात आढळतात.
- भारतामधील लेणी हिंदू , बौद्ध आणि जैन अशा विविध धर्मपंथीयांनी कोरलेली आहेत. त्यांत बौद्ध धर्मीयांच्या लेण्यांची संख्या सर्वाधिक आहे.
- बिहार येथील बाराबर आणि नागार्जुन ह्या लेण्या भारतामधील सर्वांत प्राचीन लेण्या आहेत.
- महाराष्ट्रातील भाजे ही लेणी सर्वांत प्राचीन आहे.
- सांस्कृतिक वारसा यादृष्टीने लेणी महत्त्वाच्या ठरतात. या लेण्यांतील स्थापत्य, शिल्प व त्यांतील लेखांवरून भारताच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक परिस्थितीवर प्रकाश पडतो.
माझा वारसा माझी जबाबदारी
- आपल्या गावांतील किंवा आजूबाजूच्या भागांतील लेण्यांना भेट द्या.
- लेण्यांच्या भिंतीवर सुंदर शिल्प आणि कोरीव लेख असतात. वारसा म्हणून आणि आपला इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पुरावे आहेत. त्यामुळे त्या सुस्थितीत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.
- या लेण्यांनाही एक स्वतंत्र इतिहास असतो. अश्या ठिकाणी जाऊन मद्यपान, मांसाहार करून आजूबाजूचा परिसर अस्वच्छ होणार नाही याची खबरदारी घ्या.
- चहाचे कप, प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, कागद यांसारख्या गोष्टी लेणी परिसरात टाकू नका.
- निसर्गाने वेढलेल्या या लयन स्थापत्याच्या सौंदर्याचा आनंद घ्या.
संग्रहालये
अतिशय दुर्मिळ आणि नाविन्यपूर्ण वस्तू आणि सामग्री या संग्रहालयामध्ये जतन केल्या जातात. वेळोवेळी या सामग्रीचे परीक्षण, संवर्धन आणि प्रदर्शन केले जाते. संशोधक, विद्यार्थी आणि सोबतच समाजामधील सर्व लोकांसाठी संग्रहालय सेवा उपलब्ध असते. ही संग्रहालये सांस्कृतिक वारसाचे अधिरक्षक व अन्वेषक असतात.
भारतात दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालय हे सर्वांत केंद्रस्थानी मानले जाते. या संग्रहालयात 320 पाषाणशिल्पे, विविध चित्रशैलींची 8 हजार रंगीत चित्रे, 615 ब्राँझमूर्ती, 1 हजार वस्त्रे, 4200 फार्सी व अरबी हस्तलिखिते, 2500 संस्कृत, प्राकृत, पाली हस्तलिखिते, 10 हजार नाणी आणि जवाहिरांचा एक संग्रह आहे. यांशिवाय शस्त्रास्त्रे, हस्तिदंती व काष्ठशिल्पे आणि असंख्य मृत्पात्रे असून त्यात दरवर्षी दुर्मिळ वस्तूंची भर पडत आहे. आज तेथे विविध प्रकारच्या कलावस्तू , सर्व प्रकारची शिल्पे व अन्य सामग्री अशी दोन लाखांहून अधिक साहित्य-सामग्री आहे.
तुम्हाला हे माहित आहे का
- शासकीय आणि अशासकीय संग्रहालया व्यतिरिक्त भारतामध्ये अनेक वैशिष्टपूर्ण संग्रहालये आहेत.
- अहमदाबाद मध्ये दोन अतिशय सुंदर आणि नाविन्यपूर्ण संग्रहालये आहेत. एक म्हणजे वेचार युटेन्सिल्स म्यूझीयम हे भांड्यांचे आणि काइट म्यूझीयम हे पतंगांचे संग्रहालय आहे.
- कलकत्ता येथे गॅलरी ऑफ म्यूझिकल इन्स्ट्रूमेंट्स ह्या संग्रहालयात संगीत साधने बघायला मिळतात.
- दिल्ली मधील नॅशनल पोलीस म्यूझीयम ह्या संग्रहालयात पोलिसांनी प्रदर्शित केलेल्या गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे बघायला मिळतात.
- ज्यूट म्यूझीयम, वेस्ट बेंगॉल फॉरेस्ट म्यूझीयम, एअर फोर्स म्यूझीयम, नॅशनल रेल ट्रान्स्पोर्ट म्यूझीयम, स्पोर्ट म्यूझीयम, हेल्थ म्यूझीयम अशी वैविध्यपूर्ण संग्रहालये भारतात आहेत.
माझा वारसा माझी जबाबदारी
- संग्रहालये ही मनोरंजन आणि त्यातून ज्ञान मिळवण्याचे उत्तम साधनं असतात. त्यामुळे संग्रहालयांना भेटी अवश्य द्या.
- संग्रहालायची माहितीपर पुस्तिका येते किंवा काही पोस्ट-कार्ड रूपात छायाचित्र संच मिळतो. असे संच हितचिंतकांना भेट द्या.
- संग्रहालयात आवडलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल आपण सविस्तर माहिती लिहू शकता.
- संग्रहालयातील चित्रांचा वापर करून एक छोटी माहिती पुस्तिका तुम्ही स्वतः तयार करू शकता.
- लहान मुलांकडून संग्रहालयातील वस्तूंचे हस्तलिखित बनवून घेऊ शकता.
आपला वारसा आपली संस्कृतीच्या पुढच्या भागात वारसा म्हणता येतील अश्या अजून काही वेगळ्या घटकांचा विचार करू.
(क्रमशः)
mastach