आपला वारसा आपली संस्कृती भाग 1 मध्ये वारसा म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व आपण जाणून घेतले. आपला वारसा आपली संस्कृती भाग 2 मध्ये पुरातत्त्वीय स्थळे आणि अवशेष, लेणी आणि संग्रहालये ह्या वारसा घटकांची माहिती करून घेतली. आज तश्याच काही वेगळ्या मुद्दांवर आपण नजर टाकूया.
ऐतिहासिक वास्तू आणि अवशेष
ऐतिहासिक वास्तू आणि अवशेष यांचा विचार केला तर त्यामध्ये हवेली – राजवाडे, किल्ले आणि स्मारके ह्यांचा समावेश होतो. ह्या प्रत्येक वास्तुप्रकाराची स्वतःची काही स्वतंत्र वास्तूवैशिष्ट्ये असतात. तत्कालीन काळात स्थापत्याच्या ज्या शैली आत्मसाद करून ह्या वास्तू बांधल्या जातात, त्यामध्ये काळाच्या ओघामध्ये निश्चितच बदल दिसायला लागतात. ह्या वास्तूंच्या स्थापत्यावरून तत्कालीन इतिहासाची पाने पुन्हा चाळली जातात. त्यादृष्टीने वारसा म्हणून ऐतिहासिक वास्तू आणि अवशेष ह्यांचे महत्त्व अधिक आहे.
हवेली – राजवाडे
ह्या गृह-वास्तुप्रकाराच्या वैविध्यपूर्ण व विपूल रचना झाल्याचे आढळून येते. हवेली – राजवाडे ह्या स्थापत्याचे तीन महत्वाचे कालखंड म्हणता येतील, जे त्याच्या शैलींमधील विविधता दर्शवतात. बहुपर्णी कमानी, चबुतरे, अष्टकोनी किंवा गोलाकार स्तंभरचना, पाषाणी छज्जे, सूक्ष्म नक्षीकाम केलेल्या संगमरवरी जाळ्या, भव्य अवकाशरचना, भिंतीवरील गिलाव्यात केलेले जडावकाम, लांबट, षट्कोनी, अष्टकोनी, गोल घुमटरचना आणि या विविध वास्तुघटक ह्यांमुळे ह्या शैलीला हिंदुस्थानी शैलीचा भव्यपणा येतो. पुढे मोगल राज्यकर्त्यांनी त्यात इस्लामी शैलीची काही वैशिष्ट्ये मिसळली. त्यातून हिंदु-मोगल अशी संमिश्र शैली रूढ झाली. त्यानंतर इंग्रज राज्यकर्त्यांनी यूरोपीय गॉथिक व प्रबोधनकालीन वास्तुशैलींत भारतात विविध ठिकाणी अश्या वास्तू बांधल्या. त्यांच्या निर्मितीतही इंग्रजांनी अनेक ठिकाणी भारतीय वास्तुशैली-वैशिष्ट्यांचा आधार घेतलेला आढळतो.
किल्ले
किल्ले हे शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ जावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून बांधलेला वास्तूप्रकार. ज्या काळी अनपेक्षित हल्ल्याची भीती असे, त्या काळी घरे, मंदिरे, नगरे हे तटबंदी किंवा कोट बांधून सुरक्षित ठेवण्याची प्रवृत्ती होती. शत्रूचा हल्ला झाल्यास नागरिकांना त्वरित संरक्षण मिळावे आणि शत्रूशी मुकाबला करण्यास सोयीचे व्हावे, म्हणून बहुतेक नगरे किल्ल्याच्या आसपास किंवा अनेक वेळा किल्ल्यातच वसवली जात. किल्ल्यात पाणीपुरवठा, गुप्त खजिने, धान्यगोदामे, शास्त्रागारे, दारूची कोठारे, गुप्त मार्ग ह्यांचा विचार आणि स्थापत्यदृष्टीने त्यांची आखणी ह्या दोनही गोष्टींना अतिशय महत्त्व होते. किल्ला अभेद्य रहावा, म्हणून त्या वेळच्या युद्धपद्धतीनुसार बुरूज, दरवाजे, तटबंदी, तटबंद माची, खंदक वगैरेंची रचना केलेली दिसते.
स्मारके
व्यक्ती, प्रसंग किंवा घटना यांच्या स्मरणार्थ बांधलेली वास्तू म्हणजे स्मारक (Monument/Memorial). या प्रत्येक वास्तूला एक स्वतंत्र इतिहास असतो. एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्रसंगाच्या आठवणी जपण्यासाठी स्मारके महत्त्वाची असतात.
तुम्हाला हे माहित आहे का
- जयपूरमध्ये स्थित महाराज सवाई प्रतापसिंह ह्यांचा हवा महाल, हा राजवाडा प्रकारातील एक वास्तुप्रकार आहे. ह्या महालामध्ये एकूण 953 छोट्या खिडक्या आहेत ज्यांना झरोका म्हणतात. हे झरोके खासकरून राज घराण्यातील स्त्रियांसाठी होते. महालाबाहेरील जनजीवन त्या खिडकीमधून त्या राण्या बघू शकत होत्या.
- महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी येथील यशवंतगड, महिपतगड, गोपाळगड, पुणे येथील संगणदुर्ग, रायगड जिल्ह्यातील मानगड, ठाण्यातील घोडबंदर गड, वाशीम येथील पोहा दरवाजा, अमरावती येथील पायरी विहीर हे सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
- बौद्ध स्तूप हे भारतामधील सर्वांत प्राचीन स्मारके म्हणता येतील.
- थडगी, स्तंभ, देवळे, मिनार, कमानी, स्तूप, स्तंभलेख, वीरगळ, सतीचे दगड, पुष्करिणी, हौद ही ऐतिहासिक स्थळे आणि अवशेष स्मारक वारसा म्हणून महत्त्वाचे आहेत.
माझा वारसा माझी जबाबदारी
- आपण हवेली- राजवाडे ह्यांचे छायाचित्रे काढून आपल्या हितचिंतकांसाठी छोटासा संदेश पाठवू शकता.
- पुरातत्त्वशास्त्र विभाग, इतिहास तज्ञ, किल्लेप्रेमी व सामाजिक संस्था गड संवर्धन प्रयत्नांत मोलाचे काम करीत आहेत.
- दुर्गप्रेमी गड,किल्ले परिसर स्वच्छ करणे, तिथल्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे अशी अतिशय महत्त्वपूर्ण कामे करीत आहेत. त्यामुळे अश्या ठिकाणांना भेटी देताना आपण भान ठेवून तिथे प्लास्टिक, कचरा, दारूच्या बाटल्या टाकू नये.
- अश्या ठिकाणी तिथला जाज्वल्य इतिहास अनुभवायला जा. धूम्रपान किंवा मद्यप्राशन करू नका.
मंदिर स्थापत्य आणि मूर्ती
वेगवेगळ्या प्रांतांमध्ये अनेक वर्षे उभी असलेली मंदिर वास्तू सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व ठेवणारी आहे. त्यामुळे त्या जागेचे पावित्र्य ठेवणे, हे वारसा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मंदिराचे प्रकार, त्यावरील शिल्पं आपल्या इतिहासाचे साक्षी असतात. हे स्थापत्य भारतीय प्रस्तर कलेचा नमुना आहेत. आजही अनेक परदेशी पर्यटक इथली प्राचीन वास्तुकला बघण्यासाठी भारतातील अनेक मंदिरांना भेटी देतात. प्रत्येक मंदिराचा इतिहास, त्याची शैली, त्यावरील शिल्पांची जडणघडण ही अतिशय कल्पकतेने आपल्या पूर्वजांनी योजली आहेत, हे ते मंदिर बघून लक्षात येतेच.
मंदिराच्या संदर्भात त्याचाच दुसरा भाग म्हणजे मंदिरावरचे शिल्पवैभव. मंदिरामधील मूर्ती आणि त्याच्या बाह्यभिंतींवर कोरलेले शिल्पपट हेही आपला वारसाच आहेत. कालौघात किंवा यवनी आक्रमणात मूर्ती आणि काही मंदिरांची तोडफोड झाली आहे. तरीही जे शिल्पवैभव आजही आपल्याला बघायला मिळतंय त्याचे जतन करणे आपल्या हातात आहे.
तुम्हाला हे माहित आहे का
- प्रत्येक मंदिराच्या काही कथा परंपरेने चालत आलेल्या असतात. मंदिर निर्मितीच्या अनेक दंतकथा आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु या मंदिरांमध्ये किंवा मंदिर परिसरात काही शिलालेख आढळतात, ज्यांच्या मदतीने त्या मंदिराच्या स्थापनेचा इतिहास बांधता येतो.
- 1927 सालापर्येंत खिद्रापूर येथील कोप्पेश्वर हे मंदिर पूर्णपणे जमिनीखाली होते. तिथे एक चाचणी खड्डा घेतल्यानंतर तिथे मंदिर असल्याचा पुरावा मिळाला आणि आज त्या मंदिराचे शिल्पवैभव आपल्याला बघता येते.
- मंदिरातील अनेक शिल्पांवर तेलाने अभिषेक केला जातो. अनेक वर्ष तेलाच्या अभिषेकामुळे त्या मूर्ती गुळगुळीत होतात. याशिवाय मंदिरातील मूळ मूर्ती या अनेक वर्ष पूजेत असल्याने त्यांची झीज होते. त्यामुळे त्यांची झीज किंवा डागडुजी करण्यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक प्रक्रियांचा वापर करून त्या मूर्तींचे संवर्धन केले जाते.
माझा वारसा माझी जबाबदारी
- आपल्या गावांत अनेक प्राचीन मंदिरे असतात. अशी मंदिरे गावाचा इतिहास सांगतात. अश्या मंदिरांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.
- घराजवळ असलेल्या मंदिराला भेट द्या. तिथे येणाऱ्या लोकांना त्या मंदिराविषयी माहिती द्या.
- अनेक सण आणि उत्सवाच्या दरम्यान मंदिराभोवती मांडव टाकताना त्या मंदिर स्थापत्याला किंवा त्यावरील शिल्पकामाला इजा होणार नाही याची काळजी घ्या.
- मंदिराच्या आवारात अतिशय सुंदर अश्या जलकुंड (बाराव) असतात. त्या जर स्वच्छ ठेवल्या तर निश्चितच त्यांचे पाणी दैनंदिन कामांसाठी वापरता येईल.
भाषा
कोस कोस पर बदला पानी कोस कोस पर वाणी
अशी एक कहावत म्हणजे म्हण आहे. भारतात खरोखरच तशीच परिस्थिती आहे. अनेक भाषा आणि त्या बोलण्याच्या अनेक पद्धती, ही आपली ओळख आहे. संस्कृतीचा प्रसार हा आपल्या भाषेतून होतो. आपण आपल्या विचारांची अभिव्यक्ती, ज्ञानाचे आदानप्रदान हे भाषेच्या सहाय्याने करत असतो. त्यामुळे आपल्या मातृभाषेची ओळख आपल्या असणे गरजेचे आहे. भाषेचे एक खास वैशिष्ट्य आहे. प्रांताप्रांतानुसार या भाषा, बोलण्याची शैली वेगळी होत जाते. उदा. महाराष्ट्रामध्ये बोलल्या जाणाऱ्या मराठी या भाषेमध्ये प्रांतिक विविधता आढळते. जसे पुणेरी मराठी, सातारी मराठी, कोल्हापुरी मराठी , नागपुरी मराठी, सोलापुरी मराठी. यांमध्ये स्वरांचा उच्चार आणि हेल यांच्यात बदल होत जातो. पण प्रांतांमुळे भाषेमध्ये आलेल्या या शैली, त्या भाषेची गोडी जास्त वाढवतात. त्यामुळे तो वारसा तसाच जपणे खरंतर महत्त्वाचे आहे.
बोली भाषा ही कधीच एकसारखी नसते. तिच्यामध्ये बदल, परिवर्तन झालेले दिसतात. दुसऱ्या भाषांचे वेगवेगळे प्रभाव आणि त्यांचे परिणाम होऊन ती भाषा काळाच्या ओघात बदलते. उदा.पर्शियन भाषेचा मराठीवर पडलेला प्रभाव. मूळ पर्शियन असलेले अनेक शब्द आजही आपल्या व्यवहारात आहेत. जादू हा पर्शियन शब्द आहे. जादुलाच मराठीमध्ये यातू, चमत्कार, चेटूक असे पर्यायी शब्द येतात. तसेच हुश्यार या पर्शियन शब्दाचे हुशार हे मराठीकरण आपल्याला माहितीच आहे. भाषातज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ यांच्या मते, भाषा हे मानवाच्या अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे, त्यामुळे आपली स्वतःची भाषा, मातृभाषा शिकण्यावर त्यांचा भर अधिक असतो.
तुम्हाला हे माहित आहे का
- भारतामध्ये एकूण 1673 मातृभाषा आहेत आणि त्यापैकी 850 भाषा या रोजच्या जीवनात वापरल्या जातात.
- संस्कृत ही भारतातील सर्वांत प्राचीन भाषा आहे.
- प्राचीन काळात संस्कृत सोबत पाली, प्राकृत, पैशाची, महाराष्ट्री, शौरसेनी अश्या विविध भाषांमध्ये साहित्य निर्मिती झालेली दिसते.
माझा वारसा माझी जबाबदारी
- आपली भाषा वापरात ठेवा.
- मुलांना, इतरांना शिकवा.
- मातृभाषेत साहित्य निर्मिती करा.
- आपल्या भाषेतून मुलांना गोष्टी सांगा. गोष्टी हे समाजाचे सांस्कृतिक अंग दाखवणारे महत्त्वाचे माध्यम आहे. गोष्टींमधून भावी पिढीकडे संस्कृती अपोआप प्रवाहित होत असते. शिवाय मनोरंजन होते आणि ज्ञानातही भर पडते.
- बोली भाषा संरक्षित करण्यासाठी, रेकॉर्डिंग माध्यमातून त्यांचे जतन करा.
- आपली भाषा सोडून, नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करा. हे देखील सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्याचे एक उत्तम माध्यम आहे. कारण नवीन भाषा शिकताना नवीन संस्कृतीचा परिचय होतो आणि ती भाषा आत्मसाद करणे ही सोपे जाते.
- भाषा हा संघर्षाचा विषय न बनू देता तो आपल्याला एकमेकांशी जोडणारा सांस्कृतिक बंध बनवण्याचा प्रयत्न करावा.
लिपी
संस्कृतीचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणाऱ्या भाषांसोबतच, लिपी ह्याही वारसा म्हणून तितक्याच महत्त्वाच्या असतात. लिपी म्हणजे शब्द लेखनाची पद्धत. प्राचीन काळापासून मानवाने लिपीच्या सहाय्याने त्याचे विचार चिरकाळ प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी त्या मनुष्याच्या पश्चातही ह्या लिपींच्या आधारे मानवाचा इतिहास बांधणे शक्य झाले आहे. भारतातील सर्वांत प्राचीन लिपी म्हणायचे झाले तर हरप्पा – मोहें-जो-दडो येथे सापडलेली चित्र लिपी ही म्हणावी लागेल. अर्थात अजून ह्या लिपीचा अर्थ समजू शकला नसला तरी त्यावर अनेक अभ्यासक अभ्यास करीत आहेत. त्यानंतर अशोकाच्या काळातील शिलालेख हे प्राचीन कोरीव लेखांचे आणि इतिहासासाठी विश्वासार्ह पुरावे म्हणून महत्त्वाचे आहेत. त्या काळात ब्राह्मी आणि खरोष्टी ह्या लिपींचा वापर झालेला दिसतो. आठव्या शतकापासून हळूहळू नागरी लिपी दिसायला सुरुवात होते. महाराष्ट्रामध्ये यादव काळापासून मोडी ह्या लिपीचा वापर सुरु झालेला दिसतो. ह्याशिवाय भारतामध्ये मैथिली, ग्रंथ लिपी, शारदा, गुरुमुखी, उडिया, देवनागरी, गुजराती, तमिळ, मल्याळी, कन्नड, उर्दू अश्या अनेक लिपी सापडतात. लिपी ही आपले विचार व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम असल्याने ती जतन आणि संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.
तुम्हाला हे माहित आहे का
- बौद्ध ग्रंथामध्ये 64 लिपी, तर जैन ग्रंथामध्ये 18 लिपींची यादी आली आहे.
- मौर्य सम्राट अशोक ह्याचे शिलालेख हे भारतातील प्राचीन शिलालेख मानले जातात.
- मूर्ती, नाणी, प्रस्तर, धातूचे पत्रे, ताडपत्र, भूर्जपत्र, वस्त्र आणि कागद ह्यांवर वेगवेगळ्या लिपींमधील लेख बघायला मिळतात.
माझा वारसा माझी जबाबदारी
- प्राचीन लिपींचा मुळाक्षरे, वर्णाक्षरे लिहून सराव करा.
- कला हे लिपी संवर्धनाचे प्रभावी माध्यम बनू शकते. कलेच्या माध्यमातून म्हणजे calligraphy ह्या कला प्रकाराच्या सहाय्याने नामशेष होत असलेल्या लिपिंना पुन्हा नव्याने श्वास घेता येईल.
- शुभेच्छा पत्रे देताना, तुमच्या आवडीच्या लिपीचा वापर करून तुमच्या भावना व्यक्त करा. सोबत तुम्ही त्याचे भाषांतरही पाठवू शकता.
आपला वारसा आपली संस्कृतीच्या पुढच्या भागात वारसा म्हणता येतील अश्या अजून काही वेगवेगळ्या घटकांचा विचार करू.
(क्रमशः)
One thought on “आपला वारसा आपली संस्कृती (भाग 3)”