आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानु वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।
आज आषाढाचा पहिला दिवस. काळ्या मेघांनी आसमंत भरून जाणार आणि विद्युल्लतेसह अमृतधारा बरसवणार. रामगिरीच्या उत्तुंग पर्वतावर उतरलेला काळा ढग, म्हणजे जणू मदमस्त हत्ती त्याच्या शक्तीनिशी ढूश्या मारतो आहे. हे दृश्य डोळ्यात साठवत विरहव्याकुळ यक्षाला त्याच्या पत्नीची आठवण येते. सृजनाचा सोहळ्याचा प्रत्यक्ष साक्षी असलेला यक्ष त्याची व्याकुळ अवस्था मेघाला कथन करतो आणि सुरु होतो मेघदूताचा काव्यप्रवास.
मेघदूत हे खण्डकाव्य कवीकुलगुरु पदवीने विभूषित कालिदास यांनी रचले आहे. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असे दोन भाग असलेले हे भावकाव्य म्हणजे संस्कृत खण्डकाव्यामधील मुकुटमणी. इतर कविंप्रमाणे कालीदासही स्वतः विषयी मौन बाळगतो त्यामुळे त्याचा जन्म, जन्मस्थान, काळ अश्या गोष्टींची निश्चित माहिती मिळत नाही. परंतु वि.वि.मिराशी यांनी त्यांच्या कालिदास या ग्रंथामध्ये संदर्भासह अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. मन्दाक्रान्ता वृत्तामध्ये १२० श्लोकांची रचना या काव्यामध्ये आहे. मन्दाक्रान्ता वृत्ताचाही स्थायीभाव हा मंद गतीने जाणारा असल्याने काव्यातील भावना सुस्पष्ट होण्यास सहाय्यक ठरतात. एका शापित यक्षाचा विहार आणि सकारात्मक विवेक बुद्धीने स्विकारलेले परिस्थिती यांचा समन्वय काव्यातून दिसतो. मेघाला आपला दूत बनवून यक्ष त्याच्या प्रियेला संदेश पाठवतो. हा संदेश घेऊन अलकानगरीत जाण्याचे तपशीलवार वर्णन काव्यामध्ये केले आहे, त्यामुळे या प्रवासातील अनेक लहान मोठे भौगोलिक क्षेत्र, संस्कृती, रिती इ. कालिदासाच्या समृद्ध कल्पक बुद्धीतून अवतरली आहे. काव्यात्मक वर्णने इतकी समर्पक आहेत की ती चित्ररूप बनून आपल्यासमोर साक्षात आकार घेताना दिसतात. कालिदासाला उज्जयिनी नगरी दिवः कान्तिमत्खण्डमेकम् म्हणजे साक्षात स्वर्गाचा झळाळणारा तुकडा भासते. चर्मण्वती नदीचे वर्णन करताना कृष्णवर्णीय मेघ या नदीच्या शुभ्र प्रवाहात, पाणी प्राशन करण्यास उतरल्यावर एखाद्या इंद्रनीलमण्याच्या माळेप्रमाणे भासेल अशी उपमा दिली आहे. हिमालयात वसलेल्या अलकापुरीची आणि यक्ष स्वतः राहत असलेल्या स्थळाचे वर्णन अधिकच प्रभावी केले आहे. भव्य वास्तू, इंद्रधनुषी तोरण, फुलांनी बहरलेले मंदार वृक्ष, सोनेरी कर्दळीचे कुंपण अश्या अनेक मोहक गोष्टी हा यक्ष सोडून एकांतवासात आला आहे. त्याहीपेक्षा वर्षा ऋतूचा प्रारंभ म्हणजे प्रणयी जीवांच्या मिलनाचा संकेत आणि त्यात यक्षाला दण्डस्वरूप मिळालेला पत्नी वियोग त्याच्यासाठी वेदनादायी आहे. कालिदासाने काव्यातून साकारलेली यक्षाची पत्नी ही रूपवती तर आहेच पण ती प्रेमळ, पतिव्रता आणि आदर्श गृहिणी पण आहे. मेघदूत या काव्याला प्रतिभासंपन्न सौंदर्यदृष्टी आणि कलाभिज्ञता यांची सुंदर अशी किनार लाभली आहे. मोजक्या शब्दांमध्ये रम्य काव्य निर्मिती करून कालिदासाचे मेघदूत हे अक्षरकाव्य झाले आहे. मेघदूत रूपाने रसिक मनाचे एक एक पटल हळुवार उलगडून मधुर काव्याचा स्वर्गीय आनंद रसिकांमध्ये प्रस्थापित करण्यास कालिदास यशस्वी ठरला आहे. त्यामुळेच आजचा आषाढाचा पहिला दिवस काव्य प्रतिभासंपन्न कवीकुलगुरू कालिदास यांच्या स्मरणात कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो.
चित्र आभार – चित्रकार नाना जोशी