बहरीनमधील मनामा येथे 30 जून 2018 रोजी संपन्न झालेल्या 42 व्या सत्रात, मुंबईचा सांस्कृतिक वारसा म्हणून मुंबईच्या व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. जवळजवळ 94 इमारती आणि 1500 पृष्ठसंख्या असलेले तीन भागांमधील दस्ताऐवज या सत्रात सादर केले गेले. या इमारतींच्या स्थापत्य शैलींंची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. या इमारती युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित झाल्या आहेत. त्यानिमित्ताने व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको यांच्या संबधित माहिती जाणून घेऊया. 2004 मध्ये मुंबमधील व्हिक्टोरिया टर्मिनस या नावाने परिचित असलेले, सध्याचे छत्रपति शिवाजी टर्मिनस हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नोंदवले गेले होते. हे व्हिक्टोरियन इटालीयन गॉथिक रीव्हायवल स्थापत्याचा प्रभाव असलेले एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. इ.स. 19 व्या शतकातील रेल्वेस्थानक स्थापत्यामधील ही ब्रिटीशकालीन वास्तू एक आधुनिक आणि कलात्मक संरचना यांचे प्रतिक आहे. अश्याच अनेक इमारती मुंबईच्या सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवणाऱ्या आहेत.
मुंबई हे सात बेटाच्या शहर, एक प्राचीन व्यापारी केंद्र तर होतेच आणि आजही ते आहे. त्यामुळेच इथल्या स्थापत्यावरून सांस्कृतिक समन्वयाची कल्पना येते. व्हिक्टोरिया शैली, गॉथिक आणि डेको या तीनही शैलींचा मिलाफ महाराष्ट्रातील मुंबईच्या कुशीत आजही श्वास घेताना दिसतो तो या इमारतींच्या रूपात. सध्या समावेश झालेल्या व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेकोतील इमारती यांची काही वैशिष्ट्ये आहेत. साधारण १९ व्या आणि २० व्या शतकातील या इमारती मूर्त रूपाला आल्या आणि आजही त्या माणसांच्या रेलचेलीने गजबजलेल्या आहेत. या इमारती त्यांचा जिवंतपणा आजही टिकवून आहेत. मुंबई शहर आणि महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बाब म्हणता येईल. पण तरी जागतिक वारसा म्हणजे नेमके काय? व्हिक्टोरिया गॉथिक म्हणजे काय ? आर्ट डेको काय असते? असे काही प्रश्न आपल्या मनात अनुत्तरीत राहतातच. त्यामुळे या सर्व प्रश्नांचे टप्याटप्याने निरसन करते.
जागतिक वारसा म्हणजे काय?
सर्वप्रथम जागतिक वारसा म्हणजे काय हे जाणून घेऊया. युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील एखादे स्थान, ज्याला सांस्कृतिक व भौगोलिकदृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे, त्याला जागतिक वारसा असे म्हणतात. युनेस्कोने या जागतिक वारश्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे जतन, संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी 1972 मध्ये जागतिक वारसा अधिनियम (1972 World Heritage Convention) प्रसारित केला. हा अधिनियम विशेषतः जागतिक वारश्याचे संरक्षण आणि त्याची वैविध्यता टिकवण्यासाठी करण्यात आला आहे. या नियमातील सांस्कृतिक वारसा याच्या अंतर्गत मुंबईमधील व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको यांचा समावेश करण्यात आला आहे.
सांस्कृतिक वारसा म्हणजे काय?
वारसा स्थळे ही त्या विशिष्ट प्रांताच्या, देशाच्या, प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करीत असतात. त्यामुळे हा वारसा त्या स्थानाचे महत्त्व तर दर्शवतोच परंतु याशिवाय तिथे राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या जीवनमानाचा एक अविभाज्य भाग असतो. तिथे नांदणाऱ्या संस्कृती, परंपरा या वारसा रूपात त्यांच्या पाऊलखुणा स्पष्ट दाखवतात. या सांस्कृतिक वारश्यामध्ये स्मारके, इमारतींचे समूह आणि साईट येतात.
मुंबईमधील सांस्कृतिक वारसा म्हणून व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे तो इथल्या इमारती आणि त्यांचे समूह यांमुळे. याचे कारण असे आहे की, या इमारतींची स्थापत्यशैली, त्यांच्या एकजिनसीपणा किंवा त्या इमारतींच्या बाजूचा परिसर हा इतिहास, कला आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान दृष्टिकोनातून सार्वत्रिक मौल्यवान आहे. हा सांस्कृतिक वारसा जगासमोर येणे आणि तो जपणे महत्त्वाचे असल्याने व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेकोच्या नामांकनाला जागतिक वारसा म्हणून स्विकृती मिळाली आहे.
बॉम्बे गॉथिक म्हणजे काय?
इ.स. 18 व्या आणि 1 9 व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईमध्ये व्हिक्टोरिया गॉथिक शैली प्रथम आली ती ब्रिटिश राज्यात. ब्रिटीश शैलीची ही वास्तुकला भारतमध्ये बहरायला लागली. वास्तूनिर्मितीचे सुरुवातीचे पर्व निओ-क्लासिकल शैलीच्या नावाने ओळखले जात होते. पुढे या शैलीत सुधारणा होऊन एक नवीन शैली निर्माण झाली. या वास्तूशैलीवर आधुनिक युरोपियन पद्धतीचा प्रभाव होता. त्याला गॉथिक रीव्हायवल शैली असे म्हणतात.
क्लासिकल शैली पेक्षा ही भिन्न असण्याचे कारण हे होते की, गॉथिक शैली ही निओ-क्लासिकल शैलीच्या तुलनेने अधिक अर्थपूर्ण, कोरीव काम असलेली, कथा घटकांसह सुशोभित असलेली आणि सुंदर अश्या खिडक्या असलेली अशी होती. भारतीय आणि ब्रिटीश वास्तूविशारदांनी भारतीय वातावरणाशी जुळवून घेणारी आणि इथला स्थानिक समाज संरचना आणि संवेदना लक्षात घेऊन वास्तुनिर्मिती केली, त्यामुळे या गॉथिक आणि समकालीन शैलीचे मिश्रणातून निर्माण झालेल्या नवीन शैलीला बॉम्बे गॉथिक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याच इमारती म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या समवेश केलेल्या मुंबईच्या व्हिक्टोरिया गॉथिक इमारती.
मुंबईतील व्हिक्टोरिया गॉथिक इमारती कोणत्या?
व्हिक्टोरिया गॉथिक इमारतींमध्ये उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, राजाभाई क्लाॅक टॉवर, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिस्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, ओव्हल मैदान यांसारख्या अनेक वास्तूंचा समावेश केला आहे.
आर्ट डेको म्हणजे काय?
Art Nouveau ही स्थापत्यामधील अलंकारिक (ornamental) शैली मागे पडली, तेव्हा 1910 मध्ये डेकोचा प्रारंभ झाला असे म्हणता येईल. आर्ट डेको शैलीमध्ये स्थापत्यविशारद यांनी अनेकविध स्त्रोतांतून प्रेरणा घेतली. मुंबईमधील डेको या अतिशय वैविध्यपूर्ण शैली दाखवणाऱ्या इमारती असल्याने त्यांचे वारसा म्हणून स्वतंत्र असे एक अस्तित्व आणि महत्त्व आहे. इस्लामिक आणि हिंदू स्थापत्यशास्त्रातील शैलीचे मिश्रण या आर्ट डेको मध्ये आपल्याला बघयला मिळते. या शैलीला डेको सारसिनीक (Deco-Saracenic) असे म्हणतात. उठावदार रंगीत इमारती ज्या त्यांच्या रंगांमुळे, त्यांच्या वैशिट्यपूर्ण आकारामुळे आपले लक्ष वेधून घेतात, त्या आर्ट डेको इमारती मुंबईचा सांकृतिक वारसा आहेत.
मुंबईतील आर्ट डेको इमारती कोणत्या?
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्लमेन्सनची पहिली रांग, दिनशॉ वाछा रोडवरील राम महल, इरॉस व रिगल सिनेमा हॉल तसेच मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती यासारख्या वास्तूंचा समावेश यात करण्यात आला आहे. आर्ट डेको मुंबई ट्रस्ट यांच्या अधिकृत संकेतस्थळी या विषयी आपण अधिक माहिती वाचू शकता.
भारतमध्ये विविध कालखंडात निर्माण झालेल्या या संमिश्र वास्तूशैली तत्कालीन भारतीय इतिहास, कला, तंत्रज्ञान यांची साक्ष देणाऱ्या आहेत. जागतिक वारसा यादीत मुंबईचा वारसा म्हणून या इमारतींचा समावेश होणे हे मुंबईच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतिक आज जगासमोर येत आहे. युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणाऱ्या स्थळांना त्यांच्या संरक्षांसाठी, संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देते. त्यामुळे भविष्यात या इमारतींचे वेगळेपण जपणे शक्य होऊ शकेल. याशिवाय जागतिक पातळीवर जेव्हा या इमारतींचे वारसा म्हणून नामांकन स्वीकारले जाते तेव्हा स्वाभाविकच मुंबईला आणि त्या अनुषंगाने देशाला पर्यटन आणि व्यापार या दोनही दृष्टीने आर्थिक फायदा होऊ शकतो.
याविषयावर आपले विचार ऐकायला मला नक्कीच आवडतील.