भारतविद्या सारखा विषय, म्हणजे खरतर अनेकविध विषयांचा एक समुच्चय. ही विद्याशाखा अंतःविषय (Interdisciplinary) म्हणजे अनेक वेगवेगळ्या ज्ञानशाखा संगठीतपणे अभ्यासण्याची, अश्या स्वरूपाची आहे. मी खरतर दृश्यकलेमुळे, प्राचीन भारतीय कलेकडे अधिक ओढली गेले. त्यातूनच आज प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्य आणि प्रतिमा विज्ञान या विषयामध्ये संशोधन करते आहे. औंढा नागनाथ देवालयासारखे बृहद् देवालय अभ्यासायला घेणे, ही माझ्या वैचारिक क्षमतांना पर्वणीच ठरली. स्वाध्याय सुधा हे त्यातूनच निर्माण झालेले एक वैचारिक मंथन म्हणता येईल.
पूर्वपीठिका
देवालयाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी कलेची नजर लागते हे खरे, पण देवालयाचे अंतरंग समजून घेण्यासाठी अंतःदृष्टीची आवश्यकता असते. भारतीय विद्या या विषयांत पारंगत पदवी मिळाल्यानंतर एक नवे विश्व, नवी आव्हाने समोर उभी राहिली आणि इथूनच हा प्रवाह विस्तारत गेला. मंदिर स्थापत्य आणि शिल्प यांचे स्वयं-अध्ययन सुरु झाले.
गेली तीन वर्ष सुरु असलेला हा मंदिराचा अभ्यास मला वेगवेगळ्या ज्ञानशाखेशी ओळख करवून देतच होता. यात काही तत्त्व, संज्ञा समजण्यासाठी आणि माझ्या वैचारिक कक्षा रुंदावण्यासाठी काही शास्त्रांचा अभ्यास आवश्यक होता. त्यादृष्टीने संस्कृत, उपनिषद वर्ग, दर्शनशास्त्र, आगामशास्त्र या गोष्टी मला उपयोगी पडत आहेत. केवळ कला आणि त्या कलेतील सौंदर्य हा दृष्टीकोन न राहता त्या कलेमागील प्रयोजन, तत्त्व आणि त्यातून होणारे ज्ञान, यांचा अंतर्भाव या अभ्यासातून मला साधता येतो आहे, तोच आपल्यासमोर मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयास आहे.
क्वचित असे वाटेल, की हा प्रपंच आज-आत्ता सुरु केला आहे, पण तसे मुळीच नाही. विचारांना स्थिर करण्यासाठीही एक बैठक लागते आणि तीही परीश्रमानेच प्राप्त होते. त्यामुळे कोणताही विषय मांडताना त्यात माझा काही विचार असतो, चिंतन असते. मंदिराच्या संशोधनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून काही ग्रंथ वाचणे, समजणे क्रमप्राप्तच होते, त्याशिवाय या मंदिराचा अर्थ मला लागला नसता असे वाटते. त्यामुळे या अव्याहत सुरु असलेल्या चिंतन प्रक्रियेत अनेक ग्रंथ माझे गुरु झाले. याशिवाय अनेक विद्वान लोकांच्या सानिध्यात मिळणाऱ्या ज्ञानदानाने माझ्या अभिव्यक्तीला सुंदर आकार प्राप्त होत आहे.
आरंभ
भारतविद्या म्हणजे वर म्हणाले तशी अंतःविषय विद्याशाखा, त्यामुळे कोणत्याही विषयाचे ज्ञान करून घेण्यासाठी इतर विषयांची मदत ही अनिवार्य आहे. भारतीय दर्शनशास्त्र परंपरा म्हणजे आपल्या संस्कृतीला लाभलेले हे एक वरदान आहे. शास्त्रीय दृष्टीकोनातून जीवनातील विविध तत्त्वांचे सारभूत ज्ञान ग्रहण करण्याची ही प्रक्रिया अत्यंत समृद्ध करणारी आहे. त्यादृष्टीने दर्शनशास्त्रातील काही विचार समजून घेणे मला श्रेयस्कर वाटले आणि दर्शनशास्त्राचे स्वयं-अध्ययन सुरु केले.
दि.25 डिसेंबर 2020 रोजी, मोक्षदा एकादशीला मी भावार्थदीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी समजून घेण्याच्या दृष्टीने त्यातील एक-एक श्लोक लिहिण्यास सुरुवात केली, आजही लिहित आहे. जानेवारी 2021 पासून वैदिक संशोधन मंडळ, पुणे यांच्याद्वारे घेतले जाणारे उपनिषद् वर्गांना माझी उपस्थिती लावत आहे. या वर्गांमधील तज्ञ आणि अधिकारी मंडळींच्या अनुभवातून आणि ज्ञानसंपदेतून अनेक छोट्या गोष्टी समजत आहेत. वैदिक संशोधन मंडळ, पुणे या संस्थेचे सातत्याने सुरु असलेले हे ज्ञानदानाचे कार्य खरोखरची बहुमुल्य आहे. त्यासाठी मी त्यांची सदैव ऋणी राहीन.
आज संपूर्ण विश्व एक वैश्विक संकटाच्या विळख्यामध्ये जखडून गेले आहे. त्यामुळे सध्याचा काळ अत्यंत बिकट आहे. एक अश्या विचित्र संकटाशी आपण सर्वच लोक झुंज देत आहोत आणि क्वचित त्यात होरपळले ही आहोत. ही माझीही व्यथा आहे. पण काळोख जितका गढद होतो तितकीच सूर्योदयाची घटिका समीप असते, हा आशावाद ठेऊन ही लेखन साधना देवी सरस्वतीच्या चरणी अर्पण करण्याचा मानस आहे.
या वैश्विक महामारीसारख्या कठीण काळाने मला अंतर्मुख करून, माझ्या आतमध्ये बघायला शिकवले आहे, शिकवत आहे. आज माझी ही पावले बाळबोध असली तरी उद्या या पावलांमध्ये दृढता असेल, त्यासाठी नित्य स्वाध्याय मी सुरु ठेवला आहे. जवळपास तीन वर्ष या वेगवगेळ्या ज्ञान लहरींवर मी हिंदोळे घेत आहे. पण या लाटा अश्याच ओसरून जाऊ नये असे मनापासून वाटते.
स्वाध्याय सुधा कशासाठी ?
स्वाध्याय सुधा हे याच स्वाध्याय अनुभवांवर आधारित आहे. श्रवण आणि मनन करून काही तत्त्वांचे माझ्यापरीने केलेले हे आत्मचिंतन म्हणजे स्वाध्याय सुधा आहे. इथे मी नम्रपणे हे सांगू इच्छिते की, मी काही सर्वज्ञ नाही. मी उपदेश करीत आहे, हे सर्व माझेच ज्ञान आहे किंवा मी ज्ञान देत आहे वैगेरे असा कोणताच अभिनिवेश नाही.
प्राचीन भारतीय चिंतन परंपरेचे स्वरूप समजून घेणे आणि आपल्या दृष्टीकोनाला अधिकाधिक चिकित्सक दृढता कशी प्राप्त होईल या दृष्टीने प्रयत्नपूर्वक घेतलेली ही मेहनत आहे. त्यादृष्टीने हे मार्गक्रमण सुरु आहे. एक सामान्य विद्यार्थिनी म्हणून माझी जाणण्याची, शिकण्याची, समजून घेण्याची इच्छाशक्ती आहे. ती कार्यरत ठेऊन जाणलेले शब्दबद्ध करावे असे वाटले. त्यासाठी केवळ हा प्रपंच आहे. हे कोणत्याही प्रकारचे धार्मिक प्रवचन नाही, अर्थात तेवढा माझा अधिकारही नाही. पण हो यांत धर्म, दर्शन, कला, संस्कृती, परंपरा अनुषंगाने चिंतन असेल.
स्वाध्याय सुधा म्हणजे नेमके काय ?
स्वाध्याय सुधा या नावातच त्याचा खरा अर्थ आहे, पण तरी माझ्यादृष्टीने मी केलेला त्याचा अर्थ थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळात स्वाध्याय या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक सामान्य अर्थ म्हणजे शास्त्रांचा स्वतः अभ्यास करणे. पण इतक्यावर थांबून चालणार नाही. स्वाध्याय या संज्ञेचा अर्थ समजण्यासाठी सखोल विचार करून दर्शनशास्त्राचा आधार घ्यावा लागतो.
पातञ्जल योगसुत्रामध्ये स्वाध्याय या संज्ञेचा गहिरा अर्थ आहे, तो योगशास्त्राच्या दृष्टीने सांगितला असला तरी इथे अधिक समर्पक वाटतो. साधनपादचा पहिलाच श्लोक ‘क्रियायोग‘ विषयी सांगतो. या क्रियायोगातील एक भाग म्हणजे स्वाध्याय. स्व+अध्याय म्हणजे स्वतःचे अध्ययन, थोडक्यात स्वतःला जाणणे. हे स्वतःला जाणणे एका विशिष्ट उदिष्ट साध्य करण्यासाठी आहे, त्यामुळे निश्चयपूर्वक जाणणे हे अधिक महत्त्वाचे मानले आहे.
मला हा अर्थ स्वाध्याय सुधा मधील स्वाध्याय या संज्ञेचा अधिक श्रेयस्कर वाटला. आणि अर्थात सुधा म्हणजे अमृत, जे तृप्ती देते. हा स्वाध्याय म्हणजे माझ्यादृष्टीने चिंतन तृष्णेला तत्त्वज्ञान रुपी सुधा देऊन, अर्थांना नवचैतन्य देणारा अनुभव ठरल्याने स्वाध्याय सुधा हे नावं मला अधिक समर्पक वाटले.
चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजे हिंदू नववर्षारंभ, या दिवशी स्वाध्याय सुधाची संकल्पना प्रसूत झाली, पण काही कौटुंबिक कारणास्तव विलंब झाला. त्यामुळे अक्षय्यतृतीया या शुभमुहूर्तावर, ही संकल्पना शब्दबद्ध करण्यास आरंभ करत आहे.
बोधसूत्र वरील लेखन प्रपंचाला आजवर आपण वाचकांनी भरभरून प्रतिसाद आणि स्नेह दिलाच आहे. आशा करते स्वाध्याय सुधा ही संकल्पना आणि त्याच्या अंतर्गत केलेले लेखनही आपल्या सर्वांच्या पसंतीस पडेल. आपले अभिप्राय निश्चितच महत्त्वाचे असतील.
– वैशाख शु. 3 शके 1943, अक्षय्यतृतीया (14 मे 2021, शुक्रवार).