प्राचीन भारतीय चित्रकलेतील रंग

Home \ अतिथीसूत्र \ प्राचीन भारतीय चित्रकलेतील रंग

सतराव्या शतकातली, हिमाचल मधल्या गुलेर या लहानशा गावातली एक सकाळ. तिशीच्या वयातला तरुण, शिडशिडीत चित्रकार नैनसुख, दगडाळ, तीव्र उताराच्या रस्त्यावरुन मार्गक्रमणा करतो आहे, रावीच्या खळाळत्या, वेगवान पात्राच्या वाहत्या दिशेने. सपाटीवरच्या जसरोटा संस्थानाच्या दरबारात लघुचित्रकार म्हणून रुजू होण्याकरता तो निघाला आहे. राजकीय उलथापालथ, नवे काम मिळवणे अशा अनेक कारणांनी लघुचित्रकार स्थलांतरित होत होते. नैनसुखच्या हातातल्या काठीला लटकवलेली एक पडशी आणि पोटाशी घट्ट कवटाळलेली एक लाकडी पेटी ज्यात त्याचे सर्वस्व आहे. खारीच्या पोटावरल्या केसाचा पातळ कुंचला आणि रंगांची भुकट्या ठेवलेल्या काही लाकडी, काही शंखांच्या डब्या. डब्यांमधे राजवर्ती निळा, हिरवट राखाडी मालकाईट, चमकदार मातकट तपकिरी, जर्द कुशुंबी लाल, उजळ पिवळा, काळाशार अशा रंगांसोबत काही झळाळती सुवर्ण पाने, रजत भस्म सुद्धा आहेत. गुलेरमधल्या आपल्या वडिलांच्या, प्रख्यात लघुचित्रकार पंडित शिऊ यांच्या कारखान्यात कित्येक दिवसांच्या परिश्रमातून, दगडांची चूर्णे, वनस्पतींची पाने-फ़ुले-बिया-मुळ्या, भिजवून, घोटून, खलून, गाळून, धातूवर रासायनिक प्रक्रिया करुन बनवलेले बहुमोल रंग. जायचं ठरलं त्यावेळी त्याने सर्वात प्रथम अतिशय काळजीपूर्वक बांधाबांध केली ती या बहुमोल रंगांची. हे रंग त्याचं आयुष्य आहे. त्याची पुढची, जसरोटाच्या राजा बलदेवरायच्या दरबारातली प्रख्यात लघुचित्रकार म्हणून कारकीर्द गाजणार आहे ती या रंगांच्या भरोशावर. लघुचित्रकाराची वैशिष्ट्यपूर्ण ओळख रंगांच्या वापरातून बनत होती, वापरलेले रंग ही त्या चित्रकाराची एक प्रकारे अलिखित सही होती.

त्या काळातल्या कोणत्याही लघुचित्रकाराची चित्र, किंवा त्याही आधीच्या काळातील भित्तीचित्र, मंदिर-लेण्यांमधील चित्र असोत, ती पहाताना त्या चित्रकाराने जीवापाड जपलेल्या, कष्टाने बनवलेल्या या रंगांची जादू किती विलोभनीय आहे, आजही किती तजेलदार, टवटवीत आहे ते जाणवतं, मन थक्क होतं. भित्ती-लघुचित्रामधली गोष्ट जाणून घेताना, त्यातल्या लयदार, मनमोहक आकृत्यांचं सौंदर्य न्याहाळताना सर्वात महत्वाची वाटते ती प्राचीन रंगांची किमया. ते रंग नेमके कसे बनले, ती नेमकी छटा मिळवण्याकरता त्या चित्रकारांनी नेमक्या काय क्लुप्त्या वापरल्या, कोणते घटकपदार्थ, तंत्र वापरले इत्यादी बारकावे जाणून घेतल्यावर तर ही जादू आणि आदर शतपटीने वाढते. नैसर्गिक रंगांमधे जास्तीतजास्त झळाळ, दाटपणा, टिकावूपणा, प्रवाहीपणा येण्याकरता विविध प्रयोग केले जात. पक्ष्यांचे, भुंग्यांचे पंख, अभ्रकाचा चुरा, मौल्यवान रत्न, दगडांचे चूर्ण, विविध खनिजद्रव्ये मिश्रित रंगीत माती, गेरु, काव, तुरटी, नीळ, फ़ुलांच्या पाकळ्या, सोने, चांदी..असंख्य गोष्टींचा वापर केला जाई. भारतीय चित्रकलेत रंगांचं खरं वैभव, उधळण पाहिला मिळते लघुचित्रकलेमधे. मग ती पहाडी, बशोली, बुंदी असोत, गीतगोविंद, रागमाला, बनीठनी, मोगल, राजस्थानी.. निळंगर्द मखमली आभाळ, गुलाबी चोचींचे सप्तरंगी पक्षी, कोवळ्या, पोपटी, ताम्रलालस पालवी पासून गर्द शेवाळी, परिपक्व काळसर हिरव्या पानांच्या शेकडो छटा, रसाळ फ़ळे.. 

उदा. गीतगोविंदातल्या काही लघुचित्रांवरची पिवळट छटा कोणत्या रंगाचा दिलेला हात नाही, तर ती नेमकी छटा सुकलेल्या गोमुत्रामुळे आलेली आहे, वस्त्रांचा दाट केशरी रंग पलाशच्या फ़ुलांचा आहे. कृष्णाच्या मुकुटातला निळा मोरपिशी चमकदार खडा भुंग्याच्या पंखांमधला तुकडा आहे. 

दहा हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन मानवाने भीमबेटकाच्या गुहांमधल्या चित्रांमधे वापरलेले अगदी प्राथमिक मातीचे, दगडांचे पांढरे, लाल, हिरवे, तपकिरी रंग, पाच हजार वर्षांपूर्वीच्या हरप्पन संस्कृतीत मातीच्या भांड्यांवरील नक्षीतले,विलोभनीय लाल काळे रंग चमकदार, त्याकाळातल्या वस्त्रांवर सापडलेला निळा रंग, अजिंठ्यातली रंगांची मोहक आभा, मंदिरांमधील भित्तीचित्रे, धार्मिक चित्रे, वस्त्रांवरील चित्रे, काचेवरील, धातूवरील, कागदावरील, पोथ्यांमधील, लघुचित्रे, लोकचित्रे, निसर्गचित्रे.. भारतीय चित्रकलेच्या इतिहासातली रंगांची खुमारी अवर्णनीय आहे. 

कुठून आले हे रंग? कोणी बनवले हे रंग?

भारतीय पर्यावरणातही सर्वात महत्वाचे आहेत ते रंग. निसर्गात, मातीत, माणसांच्या अंगावर, कपड्यांवर रंग आहेत. पाचव्या सहाव्या शतकातल्या अजिंठ्याच्या चित्रांमधे रंगांची मनोहारी उधळण जाणवते, मात्र त्यातले मुळ रंग मोजके आहेत, आणि इतर या रंगांच्या कमी जास्त मिश्रणातून बनलेल्या गडद, उजळ छटांचा कौशल्यपूर्ण वापर केला आहे. हे सर्व रंग वस्त्रगाळ माती, खनिज दगडाच्या चूर्णापासुन बनलेले आहेत. उदा. गेरुपासून बनलेला तांबडा आणि पिवळा रंग, फिकट हिरवा, पांढरा, काळा, निळा, काळा रंग दिव्याची काजळी धरून तयार केलेला आहे. काही वनस्पती पासून तयार केलेले रंग देखील असावेत. लापिज लाजुली या बहुमोल खनिज दगडाचा राजवर्तू निळा रंग हे अजिंठ्याच्या भित्तीचित्रांचे विलोभनीय वैशिष्ट्य आहे, लापिज लाजुली स्थानिक दगड नाही, अफ़गाणीस्तानाशी असलेल्या व्यापारी संबंधांतून तो उपलब्ध करुन दिला जाई, अर्थातच तो बहुमोल होता.  

रंग हे भारतीय चित्रकलेतलं अत्यंत महत्त्वाचं अंग. वात्सायनाने चित्रकलेची जी षडांगे सांगीतली आहेत त्यात रंगाला प्रमुख स्थान आहे. विष्णूधर्मोत्तर पुराणातील चित्रसूत्रामधे रंग आणि रंगनिर्मितीवर सविस्तर प्रकरणे आहेत. 

सर्वप्रथम कापड, कागद, दगड असा आपल्या चित्रांकरता योग्य पृष्ठभाग निवडून त्यानुसार रंग निवडीची प्रक्रिया सुरु होत असे.  कारखान्यातील चित्रकारांचे कौशल्य, अनुभव, अभ्यास, तंत्रक्षमता याकरता पणास लागे. प्रत्येक चित्रकाराची आणि त्याच्या हाताखाली तयार होणा-या शिष्यवर्गाची रंगनिर्मितीची आपापली एक खासियत होती. एका परीने चित्रकारांचे ’घराणे’ त्यानुसार ठरे. स्थान, दरबार, समाज, परंपरा यांना महत्व देऊन त्यानुसार चित्रांचा विषय आणि रंगांची निवड ठरवण्यात येई. प्राचीन परंपरेतून आलेली रंगनिर्मितीची कला आणि काही नवे प्रयोग त्याकरता वापरले जात. रंगांकरता नैसर्गिक साहित्याचा वापर केला जाई कारण बहुतांशी त्यावाचून पर्यायही नव्हता. 

पलाश आणि इतर लाल रंगांची फ़ुले वाटून, मंजिष्ठा, त्यात इतर झाडांच्या मुळ्या उकळवून मिळवलेला लाल, केशरी रंग, अधिक गडद छटेकरता, म्हणजे लाल तपकिरी रंग मिळवण्याकरता मेंदीची पाने वापरली जात. वाळूत उगवणा-या फ़ळांच्या बिया दळून त्यात अरबी समुद्राजवळच्या होर्मुझ बंदरातली माती मिसळून बनवलेला जांभळा, हळदीपासून पिवळा, निळ्या रंगाकरता अफ़गाणीस्तानातल्या बदकशान खाणीतील लापिज लाजुली उर्फ़ राजावर्त या बहुमोल दगडाचे बारीक चूर्ण वापरले जाई. रंगांच्या गडद, फ़िक्या छटांकरता त्यात पक्ष्यांची विष्ठा, चूनखडी इत्यादी मिसळले जाई.  

लघुचित्रांच्या काठावरील नक्षीमधे सोन्याच्या वर्खाचा वापर करण्याची पद्धत लघुचित्रशैलीसोबतच पर्शियावरुन आली होती. लाखेपासून बनवलेले रसायन (व्हार्निश) जे पिवळट लाल रंगाचे असे, तेही लघुचित्रांमधे, तसेच भित्तीचित्रांमधे वापरले जाई. पाण्यात मिसळल्यावर त्याला निळसर छटा येत असल्याचाही उल्लेख आढळतो. तेलांमधे खलायचे, पाण्यात मिसळायचे, वृक्षांच्या चिकांमधे मिसळून वापरण्याचे रंग वेगवेगळ्या गुणधर्मांचा परिणाम देत. 

चित्रसूत्रामधे रंगाची संकल्पना वर्गवारी, वापर, गुणधर्म यांची तपशिलवार चिकित्सा आहे. वेगवेगळ्या छटांची निर्मिती, रंगाच्या वापरातून खोलीचा आभास कसा साधायचा, बारीक नक्षीकाम कसं करायचं, रेखाकृतींमधे रंग भरुन आकार कसा उत्पन्न करायचा याचे वर्णन आहे.  “चित्रातील रेखाकृतींच्या कौशल्याने गुरु समाधानी होतो, प्रकाश-सावलीच्या खेळामुळे उच्च दर्जाचा रसिक लोभावतो, स्त्रिया कलाकुसरीने मोहीत होतात, तर रंगांच्या समृद्धीमुळे सामान्य रसिक आनंदित होतो.” असं त्यातील एका संस्कृत वचनामधे मांडलं आहे.

रंगांना चित्रकलेत अतिशय महत्वाचे स्थान आहे, चित्राचा तो अविभाज्य भाग आहे. त्यामुळे रेखाकृतीला जिवंतपणा येतो. “ज्यावेळी कुशल चित्रकार सुवर्णासारख्या झळझळीत रंगाचा वापर कौशल्याने करतो, आणि मृदू रेषांनी वस्त्रांमधे रंग भरतो, सौंदर्य, समतोल, ताल आणि उर्जा यांचा रंगांशी योग्य मेळ साधतो, त्यावेळी चित्राला ख-या अर्थाने सुंदरता लाभते.” असं चित्रसूत्रात म्हटले आहे.

चित्रांमधली सहा अंगे- ज्यात वर्णिका-भंग हे एक आहे, त्यामधे रंगांचे वैविध्यपूर्ण मिश्रण, मेळ, छटा आणि वर्ण यांचे वर्णन आहे. त्यात इतर अनेक गोष्टींसोबत, नाजूक आणि कौशल्यपूर्ण रित्या केलेला कुंचल्याचा आणि इतर रंगसाधनांचा वापर कसा करावा याचे वर्णन आहे. चित्रकाराचे तंत्रावरील, रंगलेपनावरील प्रभुत्व केवळ अनुभवाअंती प्राप्त होते असा त्यात उल्लेख आहे. 

रंग हा चित्रांचा अविभाज्य भाग आहे; भावना आणि मनस्थिती हे रंगाच्या योग्य वापरातून, त्यांची घनता, छटा, उजळपणा, रंगरेषेची जाडी-पातळपणा, गडदपणा यातून दाखवता येणे शक्य आहे. कल्पकता, कुशलता आणि हुषारीने रंगाचा वापर करताना चित्रकाराला आपल्या मर्यादांची जाणीव असायला हवी अशी खबरदारीही त्यात आहे. सूत्र-पट-रेखा ही बाह्याकारातली पहिली रेषा आणि शुभवर्ती रेखा ही चित्राचे रेखाटन पूर्ण झाल्याचे दर्शवणारी रेषा, चित्रांमधे रंग भरायला सुरुवात करण्याची ही खूण. रंगांचा पहिला थर हा पातळ असायला हवा (विरल विलेपन) आणि त्यानंतरच त्यात वर्तन म्हणजे सघनता आणता येते.  

वर्णक्रमामधे चित्रामधील रंगयोजनेचा विचार आहे, छटांच्या मेळातून रंगांचे समायोजन कसे साधावे. हिरवा, पिवळा आणि मग इतर (वर्णक्रमो हरित, पित आदी वर्ण-विन्यास). वर्ण-स्थिती मधे चित्रातले रंगाचे योग्य स्थान. योग्य जागी योग्य रंग चित्रामधे असणे गरजेचे आहे, निदान रंगलेपनाच्या सुरुवातीला, ज्यावेळी एका रंगावर दुस-या रंगाचे लेपन, विरुद्ध रंगलेपन, समतोल, छटा आणि इतर गोष्टी ठरवायच्या असतात. त्यानंतर रंगरेखनातली सफ़ाई, मिश्रण इत्यादी जे योग्य वेळ आणि स्थिती साधून करणे गरजेचे. 

रंगाची प्रतिकात्मकता आणि सूचन

चित्रांमधे रंगांच्या वापराला सांकेतिक महत्व आहे. रंगांमुळे रेखाटनाला वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व मिळते आणि चित्राचा स्वभाव, मनस्थिती तपशिलवार विषद करता येऊ शकते. चित्रांमधले सत्व, रज, तामसी गुण रंगांमधून प्रतित होतात.

काही विशिष्ट वैश्नव परंपरेमधे, राधा, जी प्रेम आणि सौंदर्याचे मूर्तिमंत प्रतिक आहे, तिला तिच्या प्रिय रंगांमधे रंगवले जाते, म्हणजे कृष्णाचा मोहक निळा, आणि कृष्णाच्या अंगावर चमकदार सुवर्णतेजाची झळाळी असणारे पितांबर असते, जो राधेचा रंग आहे, त्यातून सान्निध्याचे प्रकटीकरण होते, म्हणजे राधा-कृष्णाचे परस्परांमधे मिसळून जाणे.  

रस-चित्र, भावनादर्शक चित्रे, त्याला वर्ण्यलेख्य असेही म्हटले आहे, ज्याचा अर्थ रंगांच्या अर्थाची अभिव्यक्ती. वास्तवदर्शी चित्रांहून ही वेगळी मानली गेली आणि केवळ रंगांच्या माध्यमातून भावनाअभिव्यक्ती होणे महत्वाचे मानले. या प्रकारच्या चित्रांमधे प्रत्येक रसाकरता विशिष्ट रंगाची निवड. उदा. शृंगार रसाकरता श्यामवर्ण (हलका आकाशी वर्ण), हास्य रसाकरता श्वेतवर्ण, करुणा रसाकरता राखाडी, रौद्र रसाकरता लाल, वीररसाकरता पिवळट पांढरा, भयानक रसाकरता काळा, अद्भुत रसाकरता गडद पिवळा, आणि बिभत्स रसाकरता निळा रंग. 

पौराणिक चित्रांमधले रंग, प्रतिकात्मकता वेगळी आहे. सर्वोच्च गुण असलेल्या पवित्र देवतेला आकाशी रंग, त्यातून त्याचे अपरिमित अवकाश व्यक्त होते, शिव गौरांग असलेला, जवळपास पारदर्शी, विरंगी व्यक्तिमत्वाचा, हनुमान आणि गणेश रक्तवर्णी,प्रचंड उर्जा, उत्साह आणि जीवनाचे प्रतिक; कालीमातेचा काळा रंग हा सर्व रंगांचा समुच्चय, अवकाशातील सर्व उर्जेचे एकत्रीकरण त्यात आहे. 

रागमाला चित्रांमधे रंगांमधली भावनोत्कटता, आवेग ख-या अर्थाने दृश्यात्मकतेकरता वापरला गेला. प्रत्येक रागाचे व्यक्तिमत्व विशिष्ट रंग, स्वभाव आणि वातावरणातून व्यक्त होते. नायक-नायिकेद्वारे. कोणता ऋतू, दिवस अथवा रात्रीचा कोणत्या प्रहरी हा राग गायला जातो त्यानुसार हे ठरवले जाते. रागाचा स्वभाव, संदर्भ त्यातून व्यक्त होते. कला, रंग, काव्य, संगीत या सर्वांची मनमोहक अभिव्यक्ती रागमालेतून होते.      

चित्रसूत्रामधले रंग

प्राथमिक रंग आणि त्यांचे उपप्रकार:
चित्रसूत्रात मुळ वर्ण (रंग) पाच सांगीतले आहेत, श्वेत, पित, कृष्ण, हरित आणि रक्त. तर इतर ठिकाणी फ़क्त चार (लाल, पिवळा, निळा, पांढरा); मात्र पांढरा रंग दोन्ही ठिकाणी प्राथमिक आहे.
पिवळ्या सहित चार रंगांची कल्पना गोरोचना; शुभ्र चंदनी, केशरी, गडद कस्तुरी, रत्नवर्णिय छटा असलेले, नीलवर्णी, हिरण्यवर्णी, माणिक, गोमेद. 
निसर्गामधे जितक्या रंगछटांचे अस्तित्त्व आहे तितके रंग निर्माण करणे ही चित्रकाराच्या रंगलेपनाच्या कौशल्याची कसोटी आहे असे चित्रसूत्रात म्हटले आहे. मात्र रंगमिश्रण हे नैसर्गिक दिसायला हवे, त्यात भडकपणा नको.  

चित्रसूत्रामधे रंगलेपनाच्या चार पद्धती सांगीतल्या आहेत त्या अशा- निसर्गाचे यथादर्शी चित्रण, अचूक मापन पण वस्तुचा अवास्तव मोठा आकार, कृत्रिम गुण आणि वस्तुचे पर्स्पेक्टीव, तिन्हीचे मिश्रण शुभ्र, गौर रंगाच्या पाच छटा- श्याम वर्णाच्या बारा छटा सौम्य गौर- सुवर्णवर्णी रुक्म, हस्तिदंती, स्फ़ुट चंदन गौरी, शारदीय घनासारखा शुभ्र, शारदीय चंद्रिकेसारखा गौर , मानसोल्लासात शुभ्र रंगाकरता दूध, मोती, चांदी, चांदणे, शंख, काश्यपशिल्प, फेसासारखा शुभ्र, चंपक आणि कर्णिकर फ़ुलांसारखा, लिंबासारखा कांतिमान श्याम वर्णीय रंगछटा या शुभ्र रंगामधे इतर रंग मिसळून तयार होतात, उदा. रक्त-श्याम, मुद्ग-श्याम (लालसर तपकिरी), दुर्वांकुर-श्याम, पंडू-श्याम, हरित-श्याम, पित-श्याम, प्रियांगु-श्याम, कपि-श्याम (माकडाच्या तोंडासारखे लाल), निलोत्पल-श्याम (निलकमलासारखे), चाश-श्याम (चाश पक्ष्यासारखा फ़िकट निळा), रक्तोत्पल-श्याम, घन-श्याम. वस्तुला विशेषत्व आणि दिशा ही रंगाच्या योग्य, अचूक वापराने येते. 

निळा रंग तीन प्रकारचा- ज्यामधे श्वेत प्रबळ आहे, श्वेत किंचित आहे, किंवा सम प्रमाणात आहे. निळ्यामधून हिरवा, निळ्याचे प्रमाण किती त्यावर रंगछटा अवलंबुन. निळ्यामधे काळा आणि लाल मिसळून निल-लोहित वर्ण, निळ्याचा ठिपका असलेला पिवळा आणि पांढरा असंख्य रंगछटा निर्माण करतो. 

“दुर्वांकुराचा हिरवा, बेलफ़ळासारखा पिवळा, मुदगासारखा गडद तपकिरी रंग वापरुन सुंदर चित्र निर्माण करता येते.”

मानसोल्लासामधे आणि काश्यपशिल्पामधे- लाल शिसे (दरदा), जांभळा (सोन), लाखेचा रस (अलक्तरस), रक्त, मृदू-रक्त, लोहित याबद्दल सविस्तर लिहिले आहे. लाल आणि रक्तवर्ण कमळासारखे चित्र तेव्हाच सुंदर दिसते ज्यावेळी त्यात शुभ्र लाख वापरली जाते, चित्रांवर लाख आणि रेझिनचा थर द्यायला हवा अशी त्यात सूचना आहे.

काश्यपशिल्पामधे पिवळ्याचे चार प्रकार सांगीतले आहेत-: सुवर्ण, पित, हरिद्र (हळदी), कमलतंतुसारखा (पिसांग)

काळ्याकरता काश्यपशिल्पामधे चार छटा: निल घनासारखा, जंगलातल्या कावळ्यासारखा श्याम मोरासारखा काळा, भुंग्यासारखा कृष्ण. बाणाने त्यामधे म्हशीसारखा हलका काळा, माकडासारखा काळतोंड्या, गडद काळा, काळोख्या रात्रीसारखा दाट काळा. 

रंग योग्य ताल आणि सूर चित्रामधे निर्माण करतात. योग्य वापर आणि अचूकता आणि रंगछटेचा समतोल महत्त्वाचा. 

रंगद्रव्ये खनिजांपासून, पाने-फ़ुले-कळ्या-बिया-मुळ्या इत्यादींपासून बनलेली, म्हणजेच वनस्पतीजन्य असत. सुवर्ण, रजत, ताम्र, अभ्रक, राजावर्त, सिंदुर, हरितल- झळझळीत पिवळा, आर्सेनिक सल्फाईड खनिजापासून बनलेला, चुनखडी, लाख, हिंगुळ, मंजिष्ठा, नीळ  इत्यादी रंगद्रव्यांचा उल्लेखही विपुल आढळतो. सर्व रंगद्रव्यांमधे सिंदूर सर्वात आकर्षक रंगद्रव्य असल्याचाही विशेष उल्लेख आहे. 

लोह किंवा इतर धातूचा रंगप्रक्रियेमधे कसा वापर करुन घेता येतो याचेही मार्गदर्शन आहे. धातूचा पातळ पत्रा करुन, तसेच त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करुन तो रंगाकरता उपयुक्त करुन वापरता येतो.

रंग बनवताना रंगद्रव्यांना प्रथम दगडी खलामधे अथवा खळगा असलेल्या लांब पाट्यावर दीर्घ काळ सावकाश खलून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण बनवले जाई. त्यानंतर पाण्यामधे गोंद मिसळून त्यात ते चूर्ण एकत्र केले जाई. मग ते गाळले जाइ. मातीचा एकही कण, गढूळ द्रव्ये त्यातून दिसेनाशी होईपर्यंत ही गालण्याचॊ प्रक्रिया चालू राही. त्यानंतर पाणी अलग करुन हा रंग सुकवला जाई आणि त्याचा गोळा बनवून ठेवला जाइ. गरज असेल त्यानुसार सुकलेला गोंद पाण्यात मिसळून मग त्या चिकट द्रवामधे बोटांच्या अथवा अंगठ्याच्या साहाय्याने थोडा रंग खलला जाइ. हवी तितकी प्रवाहिता आणि घनता मिळाली की रंग चित्रामधे लावण्याकरता सिद्ध होई. या प्रक्रियेत रंगाला घट्टसर पेस्टचे स्वरुप आले असे. अंगठ्याने दाब देऊन रंगाला योग्य ती घनता आणण्याच्या या प्रक्रियेला “टेम्परिंग” म्हणतात, त्यातूनच टेम्पेरा पद्धत प्रचलित झाली. 

प्रत्येक देशात असे काही ना काही, वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक साहित्य उपलब्ध असते, जेव्हा नसेल तेव्हा व्यापारी मार्गाने ते उपलब्ध करुन घेतले जाई. 

काश्मिर प्रांतामधले लघुचित्रकार विशिष्ट झ-याचे नैसर्गिक खनिजमिश्रित पाणी साठवून ते सुकल्यावर खाली जे क्षार उरतात त्यांचा वापर रंगामधे करतात. 

ब्रशकरता मेंढी, उंट, खार, मुंगूस यांचे केस वापरले जातात.   

वस्त्रांवरही चित्रनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होत होती, त्यामुळे कापड रंगवण्याच्या प्रक्रियेचाही तपशिल दिलेला आहे. चित्रकारांनी वस्त्र रंगवण्याचे तंत्र विकसित केल्याचा फ़ायदा हातमागावरच्या विणकरांना झाल्याचा उल्लेख आहे.  

सोन्याचा पातळ पत्रा (वर्ख) आणि भुकटी दोन्हीचा विपुल वापर चित्रनिर्मितीमधे होत होता. शुद्ध सोनं महाग असल्याने, अत्यंत काळजीपूर्वक दगडी पाट्यावर तुंड या उपकरणाच्या साहाय्याने त्याचे चूर्ण बनवण्याची प्रक्रिया कुशल रंगकर्मीकडे सोपवण्यात येई. या उपकरणाच्या अग्रावर विराना गवताचे दर्भ रोवलेले असे. सुवर्णाची भुकटी ताम्रपात्रामधे ठेवून उच्च उष्णतेखाली ती वितळवली जाई. त्यात वेळोवेळी पाणी ओतून घोटले जाई. त्यानंतर वरचे पाणी काळजीपूर्वक बाजूला केल्यावर खाली घन स्वरुपातली सोन्याची भुकटी शिल्लक उरे जिचे तेज उगवत्या सूर्यासारखे झळाळते असे. सुवर्णाच्या या भुकटीचे लेपन वज्रलेपासहित योग्य पृष्ठभागावर त्यानंतर विशिष्ट कुंचल्याच्या मदतीने केले जाई. सोन्याचा हा लेप सुकल्यावर त्याच्यावर जंगली रानडुकराच्या सुळ्याच्या चकतीने घर्षण करुन तो पक्का केला जाई. त्याची झळाळी या प्रक्रियेत जराही उणावत नाही असे लिहिले आहे. 

शिल्परत्न ग्रंथामधे चित्रामधे सुवर्णाचा वापर भुकटी वज्रलेपात मिसळून किंवा वर्खरुपात केला जातो असा उल्लेख आहे. 

कुशल चित्रकाराने रंग हळूवारपणे, डाग, ठिपका न पाडता रेखाकृतीमधे भरुन त्यात त्रिमिती परिणाम कसा साधला जाउ शकतो याचे वर्णनही शिल्परत्नामधे आहे. अजिंठ्याच्या चित्राकृतींमधे या तंत्राचा फ़ार सुरेख वापर झालेला पहायला मिळतो. गडद आणि उजळ रंगांचा, कठीण आणि मऊ पोताचा त्याकरता योग्य वापर करणे गरजेचे आहे. चित्राकृतीची बाह्यरेषा काजळीच्या कृष्ण रंगात बारीक कुंचल्याने रेखाटली जाते.  वर्तन क्रमाच्या म्हणजेच चित्राला सघनता आणण्याच्या तीन तंत्राचा उल्लेख त्यात आहे- पत्रज, बिंदुज आणि रेखिका. 

चार प्रमुख रंगांचे प्रकार

खनिज रंग- दगडांपासून बनलेले. काळा रंग बनवताना मातीच्या भांड्याचा पृष्ठभाग मोहरीच्या तेलाच्या दिव्याच्या ज्योतीवर धरुन काजळी जमवली जाई. बाभुळ गोंद आणि पाण्याच्या मिश्रणात ही काजळी बोटाने खलून मऊ काजळ काळा रंग बनवला जाई. जयपूरच्या लघुचित्रकारांची अजूनही हीच पद्धत आहे. लिहिण्याच्या शाईकरता जास्त गोंद मिसळला जाई. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा रंग जरी पाण्यात मिसळून बनवलेला असे, तरी कागदावर लावला गेला आणि सुकला की त्यावर पाण्याचा परिणाम होत नसे. 

वनस्पतीजन्य रंग- वनस्पती अथवा वृक्षाच्या वेगवेगळ्या भागांपासून बनवलेले रंग. उदा. लाल रंगाकरता पिंपळाच्या झाडाची साल, ती पाण्यात भिजवून स्वच्छ करतात. त्यात बोरॅक्स- सुहागा मिसळून कुटतात आणि लोहपात्रामधे तापवतात. त्यामुळे लाल रंग बाहेर येतो. हा रंग कापसाच्या वस्त्रामधे रंगाच्या वड्या करुन त्या ठेवतात.

ऑक्साईड किंवा रसायनप्रक्रियेतून मिळालेले रंग- विविध रासायनिक प्रक्रियेतून ज्यात जाळणे, कुटणे किंवा वेगवेगळे पदार्थ मिसळणे अंतर्भुत असते. यामधे पदार्थांचे प्रमाण मोजूनमापून घेतले जाते. हिरव्या रंगाकरता एक शेर तांब्याची भुकटी आणि नवसादर (साल-अमोनिए) दोन शेर एकत्र करुन तांब्याच्या भांड्यात सठवले जाते. त्यात मिश्रणाच्या दोन बोटे वर येईल इतका लिंबाचा रस मिसळला जातो. भांड्याचे तोंड कापडाने बांधून ठेवले जाते, चाळीस दिवस. त्यानंतर आतले मिश्रण अंगच्या रसामधे कुटले जाते, सावलीमधे सुकवले जाते. त्यानंतर उत्तम प्रतीचा जंगल, म्हणजे हिरवा रंग मिळतो. गरज असेल त्यानुसार खळीमधे मिसळून हा रंग उपयोगात आणला जातो. गोंदाचा वापर त्याकरता करत नाहीत. 

धातू रंग- सुवर्ण, रजत, शिसे यांची वस्त्रगाळ पूड तसेच अभ्रकाचे चूर्ण चित्रांमधे रंगवण्याकरता वापरली जाते. या धातूंची भुकटी इतकी बारीक, मऊ असते की त्यांचे लेपन रंगाइतकेच सहजतेनं होते. सोन्याचा वर्खही वापरला जातो. हा वर्ख चित्रामधे जिथे लावायचा असतो तिथे गोंद आणि साखर यांचे मिश्रण लावून त्यावर वर्खाचे पान चिकटवले जाते. त्यानंतर त्यावर तोंडाची वाफ़ सोडून वर्ख पक्का केला जातो. अतिशय सूक्ष्म आणि लहान पृष्ठभागाकरता सोन्या-चांदीची पेस्टही वापरली जाते, या पद्धतीला हिलकारी म्हणतात, त्याकरता गोंद अथवा खळीचे जाड मिश्रण किंवा मध धातूच्या पट्टीवर लावला जातो. त्यावर सोन्याचा वर्ख चिकटवून चार बोटांनी भराभर चोळला जातो आणि मग मळण्याच्या प्रक्रियेतून त्याची पेस्ट बनवली जाते. सोन्याच्या वर्खाच्या गोळ्या होऊ न देणे महत्वाचे असते. ही पेस्ट नंतर पाण्यात मिसळून जोरात मिश्रण हलवले जाते. त्यानंतर 24 तास ठेवून त्यातले पाणी वेगळे केले जाते. तळाशी जमलेली सोन्याची अथवा चांदीची अतिशय सूक्ष्म जराशा गोंदात मिसळून चित्रावर लावली जाते. त्यावर अगेट हा मौल्यवान दगड चोळला जातो, त्यामुळे रंग झळाळून येतो आणि कायमस्वरुपी टिकतो. 

संदर्भाकरता आभार

  • द आर्ट ऑफ़ पेंटींग इन एनशियन्ट इण्डिया- श्रीनी वसावराव मार्ग इंडिया
  • चित्रसूत्र ऑफ़ द विष्णूधर्मोत्तरपुराण- पारुल दवे
  • भारतीय कला पर निबंध- क्षेमराज गुप्ता
  • सिम्बॉलिक कलर्स ऑफ़ इंडिया- सिम्थ केन्ट
  • चित्रकला- मराठी विश्वकोश- प्रथमावृत्ती
  • वर्तमान चित्रसूत्र- सडवेलकर, बाबुराव

टीप – सदर लेखातील मते, विचार आणि लेखाची मांडणी ही संबंधित लेखकाची आहे.

ABOUT THE AUTHOR: Sharmila Phadke मुक्त लेखिका, कला-इतिहास अभ्यासक आणि अनुवादक. चिन्ह या कला-प्रकाशनाशी प्रमुख लेखक आणि संपादन सहाय्याच्या नात्यातून त्या जोडलेल्या आहेत. चित्रकार राजा रविवर्मा यांच्या संपूर्ण कला-कारकिर्दीचा वेध घेणा-या पुस्तक प्रकल्पावर त्या सध्या काम करीत आहेत.

RELATED POSTS

One thought on “प्राचीन भारतीय चित्रकलेतील रंग

  1. चित्रांचा चित्रलेख खुप छान चितारला आहे .

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.