विश्वाच्या उत्पत्ती विषयी असलेले कुतूहल अगदी प्राचीन काळापासून मानवाला आहेच. शुद्ध विज्ञानाधीष्टीत आणि तर्कशुद्ध बुद्धीने मानवाने विश्वोत्पत्तिचे महास्फोट (Big Bang Theory) सिद्धान्त, स्थिर स्थिती (Steady State Theory) यांसारखे विविध सिद्धान्त जगासमोर वेळोवेळी मांडले आहेत. संस्कृतीच्या कवडस्यातून बघितले तर जगातील सर्वच संस्कृतींमध्ये विश्व निर्मितीला धरून विविध मिथकांचाही जन्म झालेला आहे, असे दिसते. भारतीय परंपरेत दार्शनिक आणि धार्मिक अश्या दोनही अंगाने विश्व, त्याची संरचना, निर्मिती यांचे तात्त्विक चिंतन झालेले आहे. विश्व संचालनाचे अत्युच्य प्रतिक म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये भगवान शिवाचे ‘नटराज’ हे स्वरूप परम वंदनीय आहे.
18 जून 2004 रोजी, आण्विक ऊर्जा विभाग, भारत सरकार (The Department of Atomic Energy, Government of India.) ने CERN, जिनेव्हा येथील युरोपियन सेंटर फॉर रिसर्च इन पार्टिकल फिजिक्सला 2 मी. उंच इतकी धातूची नटराज प्रतिमा भेट केली. सध्या ही नटराज प्रतिमा Physics lab च्या दर्शनी भागात आहे.भारताशी असलेले संशोधन क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही प्रतिमा भेट केली गेली. शिवाच्या वैश्विक नृत्याचे पदार्थ विज्ञानाशी साधर्म्य दाखवणारे रूपक म्हणून नटराज प्रतिमा निवडली गेली. इच्छा आणि क्रिया यांच्या निरन्तर नर्तनाचे दिव्य प्रतिक म्हणजे नटराज. संपूर्ण ब्रह्मांड, प्रभामंडळात असलेल्या ग्रह-गोल, ताऱ्यांचे नियमन आणि लय, शिव त्याच्या नटराज स्वरूपातून संचलित करीत असतो. CERN च्या भौतिकशास्त्रज्ञांनी या नटराज प्रतिमेचे निरीक्षण आणि विश्लेषण केले आहे. 1972 मध्ये ‘The Dance of Shiva: The Hindu View of Matter in the Light of Modern Physics,’ शीर्षकाचा लेख Fritjof Capra यांनी प्रकाशित केला. आनंद कुमारस्वामी म्हणतात त्याप्रमाणे, नटराज म्हणजे अतुलनीय सौंदर्य, लय, सामर्थ्य आणि कृपाशीर्वाद अभिव्यक्त करणारे तत्त्व आहे. आनंदताण्डव दर्शविणाऱ्या या भव्य नटराज प्रतिमेकडे प्राचीन भारतीय धर्म,तत्त्वज्ञान, कला आणि आधुनिक भौतिकशास्त्र यांचा समन्वयाचे प्रतिक म्हणून आज बघितले जाते.
(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल प्रतिपदा शके १९४४.)