मातृकांसह नृत्यरत शिव

Home \ बोधसूत्र \ मातृकांसह नृत्यरत शिव

ताण्डवप्रिय शिवाच्या एकशे आठ करणांचा उल्लेख भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात येतो. तामिळनाडू येथील चिदंबरम्, तंजावूर येथील बृहदिश्वर, कुम्भकोणम् येथील सारंगपाणी मंदिर आणि सातारा येथील नटराज मंदिर येथे या करणांची शिल्पांमधील अभिव्यक्ती बघायला मिळते. भरतमुनी करण लक्षण सांगताना म्हणतात – 

हस्तपादसमायोगो नृत्यस्य करणं भवेत्

म्हणजे हस्त आणि पदन्यास यांचे एकत्रित संचलन म्हणजे करण. प्रत्येक करणाचे स्वतःचे असे सौंदर्य आहे, त्यापैकी एक करण म्हणजे कटीसमम्. 

कर्नाटकातील ऐहोळे येथील रावणफडी इथे सप्तमातृकांसह नटराज बघायला मिळतो. कटीसम करण मधील नटराज मध्यभागी नर्तन करीत आहे, तर त्याच्या आजूबाजूचा गणेश, पार्वती, नैगमेश आणि सप्तमातृका आहेत. रावणफडी हे पल्लव शैलीतील गुंफा मंदिर आहे. या मंदिराचा काळ हा इ.स. 6 शतक मानला जातो. बदामी आणि त्याच्या आसपासचा भागावर चालुक्यांची सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी पल्लव राजे राज्य करीत होते. त्याच काळामध्ये या गुंफा मंदिराचा निर्माण झाला असावा असे मत आहे. पल्लव राजा नरसिंह वर्मन महामल्ला नंतर चालुक्य राजा विक्रमादित्य प्रथम (655-681) याने हा भाग त्याच्या अधिपत्याखाली आणला. रावणफडी या मंदिराच्या निर्मितीचा काळ हा विक्रमादित्य प्रथम किंवा त्याच्या पूर्वी धरला जातो. 

गुंफेत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला नृत्यमग्न शिव आणि मातृका यांचा शिल्पपट आहे. या शिल्पपटाची सुरुवात होते ती ब्राह्मी या मातृकेपासून. ब्राह्मी, माहेश्वरी आणि कौमारी तिघी शिवाच्या नृत्याचे अवलोकन करीत शिवाप्रमाणे काही हस्त-पादविन्यास करीत आहेत. मध्यभागी असलेल्या शिल्पपटामध्ये वैष्णवी, गणेश मध्यभागी नटराज शिव, नैगमेश आणि पार्वती आहेत. वैष्णवीने शिवाप्रमाणे कटीसम करण प्रस्तुत केले आहे. वैष्णवीचा उजवा हात अर्धचंद्र मुद्रेमध्ये मांडीवर ठेवलेला आहे तर डाव्या हाताची सिंहकर्ण मुद्रा आहे. तीचा उजवा पाय हलका उचललेला आहे. शिवाच्या उजव्या पायाजवळ मोदकपात्र घेतलेला सालंकृत द्विभुज गणेश आहे. या शिल्पपटाच्या मध्यभागी नृत्यरत शिवाचे सुंदर शिल्प आहे. 

नृत्यरत शिव

दशभुज नटेशाच्या हातामध्ये कटकमुख मुद्रा, त्याच्या मागचा हात बघ आहे, परशु, डमरु आणि मागच्या दोन हातांमध्ये सर्प धरलेला आहे. डाव्या हातांपैकी एक हात अलपल्लव मुद्रेत असून एक हात अर्धचंद्र मुद्रेत मांडीवर ठेवला आहे. पुढचा डावा हात करीहस्त मुद्रेत आहे. त्रिनेत्र शिवाच्या शीर्षावर उंच असा किरीट मुकुट आहे आणि त्यामागे प्रभावलय आहे. एका कानामध्ये सर्प कुंडल आहे तर दुसऱ्या कानामध्ये वृत्तकुंडल आहे. दंडामध्ये केयूर आहे आणि हातांमध्ये कंकण आहेत. गळ्यात ग्रेवेयक आहे. पोटाला उदरबंध आहे. डाव्या खांद्यावरून यज्ञोपवीत घेतले आहे. कमरेला वस्त्र आहे. शिवाच्या डाव्या पायाशी नैगमेश आहे. त्याच्या बाजूलाच द्विभुजा पार्वती द्विभंग स्थितीत उभी आहे. तिच्या डोक्यावर उंच असा किरीट मुकुट आहे आणि मागे प्रभावलय आहे. कानामध्ये कुंडले आहेत. गळ्यात माळा आहेत, स्तनसूत्र आहे. कटीला सुंदर असे वस्त्र नेसलेले आहे. दंडामध्ये केयूर आणि हातांमध्ये भरगच्च कंकण आहेत. तिच्या पायामध्ये वलय आहेत. पुढे वाराही, इंद्राणी आणि चामुण्डा यांची शिल्पे आहेत. यांपैकी चामुण्डेचा डावा हात चतुर मुद्रेत असून उजवा हात अलपल्लव मुद्रेत आहे. उजवा पाय कुट्टित म्हणजे किंचित उचलेला असल्याने याला चतुर करण म्हणतात. 

वाराही, इंद्राणी आणि चामुण्डा
ब्राह्मी, माहेश्वरी आणि कौमारी

या शिल्पपटावरील पल्लव शैलीचा प्रभाव अधोरेखित होतो. पल्लव शैलीमध्ये तालमानाचा विचार केला तर त्यांची शिल्प ही उंचपुरी भासतात. त्यामुळे त्यांच्या शिल्पामध्ये एक वैशिट्यपूर्ण आणि आकर्षक सुडौलपणा येतो. या शिल्पातील सप्तमातृका, शिव आणि पार्वती या सर्वांच्या डोक्यावरील मुकुट हे त्यांच्या चेहऱ्याच्या दीड ते दोन पट उंच दाखवले आहेत. 

शिवाचे नर्तन आणि त्याच्या तालाशी ताल जुळवून नर्तन करणाऱ्या सप्तमातृका काही क्षण आपले चित्त मोहित करतात आणि या दिव्य नृत्याच्या लयीशी आपण समरस होतो.

(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल द्वितीया शके १९४४.)

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.