नृत्यप्रिय शिवाची पञ्चकृत्य ही पाच तांडवातून अभिव्यक्त होतात. सृष्टीचे सृजन करण्यासाठी ललित ताण्डव, स्थितीसाठी संध्या ताण्डव, लयासाठी संहार ताण्डव, तिरोधनसाठी त्रिपुर ताण्डव आणि अनुग्रहसाठी ऊर्ध्वताण्डव हे पाच प्रकार आहेत. चिदंबरम् महात्म्यात ऊर्ध्व ताण्डवाशी निगडीत एक कथा येते. या कथेचा प्रभाव हा शिल्पांवरही दिसतो. कथा अशी आहे की, एकदा शिव आणि काली यांच्यामध्ये नृत्याची स्पर्धा लागते. ज्याप्रमाणे शिव नर्तन करेल त्याच प्रमाणे कालीनेही करणे अपेक्षित आहे. शिव प्रत्येक करण करीत होते त्याचप्रमाणे कालीही नृत्य करीत होती परंतु सर्वांत कठीण असलेला करण म्हणजे दण्डपाद जेव्हा शिवाने केला तेव्हा कालीने तीचा पराभव स्वीकार केला.
दण्डपाद करणाची शिल्पे अनेक मंदिरामध्ये बघायला मिळतात. या करणाचे लक्षण नाट्यशास्त्रामध्ये पुढीलप्रमाणे आले आहे-
नूपुरं चरणं कृत्वा दण्डपादं प्रसारयेत् |
क्षिप्राविध्दकरं चैव दण्डपादं तदुच्यते||
म्हणजे नुपूर चारी मधून पाऊल दण्डपाद चारी मध्ये परावर्तीत केले जाईल आणि तयेवेळी हात अविध्द केले जातील त्याला दण्डपाद करण म्हणतात.
कांचीपूरम येथील मंदिरामधील शिल्प (प्रतिमा क्र.1) ही संकल्पना सुस्पष्ट करण्यास सहय्यक ठरेल. देवकोष्टामध्ये अष्टभुज नटराज प्रतिमा आहे. नटराज शिल्पाच्या उजव्या देवकोष्टामध्ये सपत्नी ब्रह्मदेव आणि डाव्या देवकोष्टामध्ये विष्णू आणि लक्ष्मी हे दिव्य नर्तन पाहत आहेत. उजव्या पायाजवळ एक गण शिवाप्रमाणे नर्तन करीत आहे. डाव्या बाजूला नंदिकेश्वर ताण्डव नृत्य करीत आहेत. नंदिकेश्वराचा पादस्वस्तिक मुद्रेत नर्तन करीत असून एक हात हा गजहास्त आहे. नंदिकेश्वराच्या शीर्षावर छोटा मुकुट आहे. नटराज शिल्पाच्या खालील भागांत असलेल्या वाद्यवृंद भग्नावस्थेत असल्याने स्पष्ट दिसत नाही.
नटेश्वर समस्थानात उभा असून त्याने उजवा पाय उचलला आहे. अभय, अर्धचंद्र, अलपल्लव यांसारख्या विविध नृत्यमुद्रा या शिल्पामध्ये बघायला मिळतात. याशिवाय अग्नी, सर्प यांसारखी विविध आयुधे आहेत. नटराजाच्या डोक्यावर उंच जटामुकुट आहे. गळ्यांत सुंदर कोरीव ग्रेवेयक, खांद्यावर कोरीव यज्ञोपवीत आहे. दंडात केयूर आणि हातांमध्ये कंकण आहे. कटीला वस्त्र आणि त्यावर मेखला आहे.
दण्डपाद करण नर्तकाला साधायला कठीण असला तरी नृत्याचा ईश्वर असलेल्या नटेश्वरासाठी सहज आहे. शिवाच्या चर्येवर सुंदर हास्य इथे त्याच्या नर्तनातील सहजभाव अभिव्यक्त करीत आहे.
छायाचित्र – प्रतिमा क्र. 1 व 2 – साभार अंतरजाल.
(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल दशमी शके १९४४.)