Tag: #Sharavana

  • दशावतार लेणीतील नटराज

    दशावतार लेणीतील नटराज

    वेरूळ मधील लेणी क्र.15 म्हणजे दशावतार लेणी. पहिला मजल्यावर चढून गेलो की शिल्पांनी संपन्न असा एक भव्य सभामंडप दृष्टीस पडतो. या लेणीमध्ये दक्षिण दिशेला ओळीने विष्णूच्या विविध अवतार शिल्पित केले आहेत. याच सभामंडपाच्या उत्तर दिशेला शिवाचे विविध विग्रह दिसतात. त्यापैकी दुसरा शिल्पपट हा नृत्यरत शिवाचे नर्तन दाखवणारा आहे. 

    नटराजाचे शिल्प काही अंशी हे क्षतिग्रस्त आहे. अष्टभुज शिवाच्या दक्षिणक्रमाने संदर्शन मुद्रा, त्रिशूल, डमरू असून डाव्या हातांमध्ये हंसपक्ष हस्त, सर्प, एका हातातील आयुध भग्न असावे, आणि पुढचा हात करीहस्त मुद्रेत आहे. शिवाचा जटामुकुट असून तो ब्रह्मकपालाने सुशोभित केला आहे. खांद्यावरून वैकक्षक रुळत आहे तर पोटाला उदरबंध आहे. हातामध्ये कंकण आणि दंडामध्ये त्रिवलययुक्त केयूर आहेत. याशिवाय शिवाच्या डाव्या पायातील अत्यंत सुरेख असे पैंजण आपल्याला दिसते. सुंदर अश्या पद्मपीठावर मध्यभागी त्रिभंगावस्थेत नटेश्वर नर्तन करतानाचे हे शिल्प आहे. शिवाच्या पायाजवळ शिवाप्रमाणे नर्तन करणारे तण्डू मुनी असावेत. उजवीकडे तालवाद्य तर डावीकडे सुशीर वाद्य वाजवणारे वाद्यवृंद आहेत. 

    वेरूळ मधील दशावतार लेणी ही विशेष आहे. पर्यटकांचा ओघ या लेणीकडे काहीसा कमी असल्याने कदाचित इथे शिल्प-संवाद अधिक प्रखर उमटतो. ही लेणी बघताना आपण भारावून जातो. हा माझा स्वानुभव आहे, अत्यंतिक शांतता या लेणीतील शिल्पांना जिवंत करते. प्रत्येक शिल्प, त्यांच्या कथा, त्या कथांतील भाव साकार होत राहते. हा सोहळा केवळ अनुभवावा असाच आहे. एक एक शिल्पातून नाद उमटायला लागतात आणि आपण स्तब्ध आणि निशब्द होऊन केवळ ही अनुभूती आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत राहतो. इथला नटराज बघताना या दिव्य नृत्याचा अनुग्रह आपल्यावरही होत आहे, या भावनेने साश्रु या शिल्पांना न्याहाळत राहतो आणि तृप्त मनाने या लेणीमधून बाहेर येतो. 

    छायाचित्र –  © धनलक्ष्मी म. टिळे

    (पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष अष्टमी शके १९४४.)

  • मकर तोरणावरील नृत्यरत शिव

    मकर तोरणावरील नृत्यरत शिव

    मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंडपातून गर्भगृहात जाताना मध्ये अंतराळाची रचना केलेली असते. या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या वर ‘मकरतोरण’ हा मंदिर स्थापत्यातील एक घटक आपल्याला बघायला मिळतो. प्रवेशाच्या दोन कमानी या तोरणाला तोलून धरतात. दोन मकरमुखातून नानाविध लता-वेलींनी हे तोरण बनते त्यामुळे त्याला मकर तोरण असे म्हणतात. या तोरणाच्या मध्यभागी विविध देवतांचे शिल्पांकन केलेले असते, त्यापैकी मकर तोरणावरील नृत्यरत शिव अवलोकन आज करायचे आहे.

    प्रतिमा क्र. 1 – उमरगा

    चालुक्य शैलीतील मकर तोरण (प्रतिमा क्र. 1) – उमरगा येथील शिवमंदिर हे त्रिदल म्हणजे तीन गर्भगृहयुक्त आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यप्रवेशद्वार आणि तीनही गर्भगृहांची प्रवेशद्वार यांवर तीन अशी एकूण चार मकर तोरणे आहेत. यांपैकी एका मकर तोरणावर चतुर्भुज शिव नृत्यमग्न असल्याचे शिल्पित केले आहे. सर्व हस्त मुद्रा या नृत्यमुद्रा आहेत. दक्षिणाधक्रमाने अलपल्लव, लताहस्त, हंसपक्ष आणि एका हाताची करीहस्त मुद्रा करून आशीर्वचनाप्रमाणे एका उद्दकी वाजविणाऱ्या गणाच्या मस्तकावर हात ठेवला आहे. त्रिभंग अवस्थेतील शिव ऊर्ध्वजानु पदन्यास करीत आहे. शिवाच्या पायाशी वृषभ बसलेला आहे. शिवाच्या उजव्या बाजूला वेणुवादक आहे. वेणुवादकाच्या मागे किन्नर युगुल शिल्पांकित केले आहेत. शिवाच्या डाव्या बाजूला एक मृदुंग वादक असून त्याच्याही बाजूला किन्नर युगुल शिल्पित केले आहेत. या तोरणावर काही आकाशगमी गन्धर्व पुष्पमाला घेऊन येताना दाखवले आहेत.

    प्रतिमा क्र. 2 – दिल्ली राष्ट्रीय संग्रहालय

    काकतीय शैलीतील मकर तोरण (प्रतिमा क्र. 2) – सध्या हे मकरतोरण दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे. या मकर तोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यभागी नृत्यरत शिव आहेच पण सोबतच ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूही शिवासोबत नृत्य करीत आहेत. दोन मकरांच्या मुखातून निघालेल्या लता दाखवल्या आहेत. दशभुज शिवाच्या उजव्या हातांमध्ये अक्षमाला, डमरू, खट्वांग, बाण आणि खड्ग आहे तर डाव्या हातांमध्ये खेटक, धनुष्य, त्रिशूल, सर्प आणि बिजपुरक ही आयुधे आहेत. शिवाच्या पायाशी वृषभ बसलेला आहे.  उजव्या बाजूला असलेले ब्रह्मदेव त्रिमुखी चतुर्भुज शिल्प्त केलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये अक्षमाला, स्रुक, पाश आणि कमंडलू आहे. ब्रह्मदेवाच्या पायाशी त्यांचे वाहन हंस दाखवलेला आहे. भगवान विष्णू चतुर्भुज असून त्यांच्या हातांमध्ये गदा, पद्म, शंख आणि चक्र आहे. विष्णूच्या पायाशी हात जोडून बसलेला गरुड शिल्पित केला आहे. त्रिदेव हे सर्वाभरणभूषितम् म्हणजे सर्व अलंकारांनी युक्त असे आहेत. दोन्ही बाजूला असलेले वादकांनी त्यांच्या तालवाद्यांनी ठेका धरलेला आहे. 

    या मकर तोरणाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तोरणावर दोन्ही बाजूंना अष्टदिक्पाल त्यांच्या वाहनावर आरूढ होऊन हा या नर्तन सोहळ्यास उपस्थित झाले आहेत. यामध्ये उजवीकडे इंद्र, अग्नी, यम आणि निरुत्ती तर डावीकडे वरूण, पवन, कुबेर आणि ईशान हे शिल्पित केले आहेत. 

    याशिवाय भारतभर अनेक मंदिरामध्ये अशी विलक्षण सुंदर आणि लक्षवेधी कोरीव मकरतोरणे आपल्याला बघायला मिळतात.

    छायाचित्र –  © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- प्रतिमा क्र. 1 – उमरगा येथील शिवमंदिर, प्रतिमा क्र. 2 – दिल्ली राष्ट्रीय संग्रहालय

    (पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष षष्ठी शके १९४४.)

  • कैलास मंदिराच्या मार्गिकेवरील नटराज

    कैलास मंदिराच्या मार्गिकेवरील नटराज

    ही नटराज प्रतिमा कैलास मंदिराच्या मार्गिकेवर आहे. हातामध्ये सर्प धरलेल्या अपस्मार पुरुषाच्या अंगावर दोन्ही पाय ठेऊन मण्डल स्थानात नृत्यरत शिवाचे हे शिल्प आहे. अष्टभुज नटेशाच्या हातामध्ये करीहस्त मुद्रा, कट्यावलंबित हस्त, डमरू, सर्प आणि कटकमुद्रा आहे. डोक्यावर मुकुट आहे. त्रिनेत्र शिवाची चर्या रौद्र भाव दर्शवणारी असली तरी चेहऱ्यावर स्मित आहे. गळ्यात ग्रेवैयक आहे, डाव्या खांद्यावर रुळणारे यज्ञोपवीत आहे. पोटाला उदरबंध आहे. दंडामध्ये केयूर तर हातांमध्ये केयूर आहे. कटीला वस्त्र आहे. नटराजाच्या पायाखाली दाबल्या गेलेला कुरूप, बेढब शरीरयष्टी असलेला मूलयकही लक्षवेधी आहे.

    वेरूळ मध्ये अनेक नटराज प्रतिमा आहेत. कैलास मंदिराच्या मार्गीकेवरील हे दुसरे नटराज शिल्प काहीसे भिन्न आहे. कैलास मंदिराच्या मार्गिकेवर कोरीव देवकोष्टामध्ये असलेल्या दक्षिणाभिमुख अश्या नटराजाचे दर्शन होते. अपस्मार पुरुषाच्या अंगावर डावा पाय रोवून आवेशपूर्ण नर्तन करणाऱ्या चतुर्भुज नटेश या शिल्पामधून दिसतो. या चार भूजांपैकी काही भग्न झालेल्या आहेत. मात्र उजव्या मागच्या हातामध्ये डमरू आहे तर मागचा डावा हात शिवाने कमरेवर ठेवला आहे. भुजंगत्रसित पदन्यासात शिवाने त्याचाउजवा पाय उचललेला असून डावा पाय अपस्मार पुरुषावर रोवलेला आहे. या शिल्पामध्ये आ-वासलेला भुजंग शिवाच्या उजव्या बाजूला दाखवलेला आहे. शिवाच्या डोक्यावरील जटा या रत्नपट्टाने बांधलेल्या आहेत. त्रिनेत्र शिवाची चर्या रुद्र भाव दर्शवणारी आहे. गळ्यात ग्रेवैयक आहे, डाव्या खांद्यावर रुळणारे यज्ञोपवीत आहे. नटराजाच्या पायाखाली दाबल्या गेलेला जाड-जुड शरीरयष्टी असलेला मूलयकही लक्षवेधी आहे. त्याच्या गळ्यात एक माळा आहे. त्याच्या केसांच्या कुरळ्या बटाही शिल्पकाराने बारकाईने कोरल्या आहेत. त्यामुळेच हे शिल्प लक्षवेधी झाले आहे.

    छायाचित्र –  © धनलक्ष्मी म. टिळे

    (पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष पंचमी शके १९४४.)

  • औंढ्या नागनाथ मंदिरातील नटराज

    औंढ्या नागनाथ मंदिरातील नटराज

    महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण शैव क्षेत्र असलेल्या औंढ्या नागनाथ मंदिराच्या जंघाभागावरील एक नटराज प्रतिमा आज बघणार आहोत. औंढ्या नागनाथ मंदिर द्विजंघायुक्त असल्याने शिल्पवैभवाने संपन्न असे हे मंदिर आहे. या मंदिराचा अभ्यास करीत असताना याच्या जंघा भागावर एकूण चार नटराज प्रतिमा मला नोंदवता आल्या आहेत. त्यापैकी एक अत्यंत सुंदर अशी प्रतिमा आज बघणार आहोत.

    मंदिराच्या खालाच्या म्हणजे प्रथम जंघा भागात, दक्षिण दिशेकडील बाह्यांगावर असलेली ही नटेश्वराची अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिमा आहे. शिवाच्या या वैश्विक नृत्याचे दर्शन या शिल्पामधून होते. या विग्रहामध्ये नटेश्वर षोडशभुज म्हणजे सोळा हातांचा असून त्याच्या हातामध्ये अभयमुद्रा, भग्नावस्थेत असलेले त्रिशूल, शंख, एका हातातील आयुध भग्न आहे, वज्र, डमरू आणि मागच्या दोन हातांमध्ये सर्प धारण केला आहे. डाव्या हातामधील आयुधे भग्नावस्थेत असल्याने आयुधांचा आढावा घेता येत नाही, परंतु पुढचा हात हा करीहस्त मुद्रेत आहे. सर्वाभरणभूषितम् म्हणजे सर्व अलंकारांनी युक्त असे हे नटराज स्वरूप आहे. शिवाच्या डोक्यावर सुंदर जटामुकुट आहे. हा मुकुट छोट्या कवट्यांनी सुशोभित केला आहे. कानांमध्ये सर्पभूषणे आहेत. गळ्यात रत्नजडित ग्रेवेयक आहे. डाव्या खांद्यावर गोल मणी किंवा रुद्राक्षाचे यज्ञोपवीत रुळत आहे. दंडामध्ये असलेल्या मण्यांच्या केयुरामध्ये सिंहमुखाचे अलंकरण आहे. हातांमध्ये कंकण आहे. पायांमध्ये पादकटक आणि पादवलय आहेत. कटीवस्त्र हे तलम शेल्याने बांधून त्याचा सोगा हा नृत्याच्या लयीमध्ये हेलकावे खात आहे. शिवाच्या पदन्यासाचा विचार केला तर मण्डल स्थानामधील शिवाने डावा पाय कमरेपर्येंत उचलून ऊर्ध्वजानु करण साधले आहे. 

    या शिल्पामध्ये शिवाच्या या दिव्य नृत्याला संगत करण्यासाठी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूही वाद्यांचा ताल देत नृत्य करीत आहेत. विशेष म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेही मृदुंगम् हे तालवाद्य वाजवत आहेत. शिवाच्या उजव्या पायाजवळ ब्रह्मदेव तर डावीकडे विष्णू आहे. ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेही चतुर्बाहु असून त्यांच्या पुढच्या दोन हातांनी ते मुदुंग वादन करीत आहेत. मागच्या दोन हातांमध्ये ब्रह्माने स्रुक आणि पुस्तक धारण केले असून विष्णूच्या मागच्या दोन हातांमध्ये शंख आणि चक्र ही आयुधे आहेत. ब्रह्मदेवाचा उजवा पाय भग्नावस्थेत आहे. विष्णू भगवान स्वस्तिक पदन्यासात शिल्पीत केले आहेत. शिवाच्या डाव्या पायाशी त्याचे वाहन वृषभ विराजमान आहे. आपली मान उंचावून वृषभही या दिव्य नृत्याचे अवलोकन करीत आहे. 

    ज्याप्रमाणे नाट्य आणि नृत्य या कलांमध्ये शिवाचे नटराज स्वरूप पूजनीय आहे, त्याचप्रमाणे दार्शनिकदृष्ट्या शैव साधकांच्या, योगीजनांच्यादृष्टीने नटराज हे तत्त्व महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने ही नटराज प्रतिमा अलौकिक आणि महत्त्वपूर्ण आहे.

    छायाचित्र –  © धनलक्ष्मी म. टिळे

    (पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष चतुर्थी शके १९४४.)

  • ऊर्ध्वरेता नटराज

    ऊर्ध्वरेता नटराज

    छत्तीसगढ राज्याची जीवनधारा इथे महानदीच्या रूपाने वाहते. या महानदीच्या काठावर सिरपुर येथील गन्धेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवाची ही अष्टभुज नटराज प्रतिमा आहे. गन्धेश्वर महादेव मंदिरात शिवाचे विविध विग्रह, महिषासुरमर्दिनी आणि काही जैन, बौद्ध प्रतिमांचे अवशेष आहेत. या मंदिराचा काळ साधारण 5 वे शतक मानला जातो. या मंदिरामध्ये नृत्य करणाऱ्या अष्टभुज नटराजाची अत्यंत विशेष अशी ही प्रतिमा आहे. यामध्ये शिवाचे शीर्ष हे जटामुकुटाने मंडित असून त्यावर सुंदर अशी चंद्रकोर आहे. दोन्ही कानांमध्ये कुंडले आहेत. गळ्यात मोत्याची एकावली आहे. डाव्या खांद्यावरून रुळणारे यज्ञोपवीत आहे. कमरेला मेखला आहे. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यात नृत्यरत शिव ऊर्ध्वरेतस स्वरूप शिल्पित केला आहे. शिवाच्या दोन पायांमध्ये त्याच्याप्रमाणे नृत्य करणाऱ्या एका व्यक्तीचे शिल्प आहे. डॉ.सि.शिवराममूर्ती यांच्या मते ते तण्डू मुनी किंवा भरत मुनी असावेत. नृत्यरत नटेशाच्या उजवीकडे गणेश असून डावीकडे मयुरावर आरूढ कार्तिकेय आहे. डावीकडे पार्वती बसलेली दाखवली आहे, जी शिवाच्या या नृत्य लीलेचे अवलोकन करीत आहे. नटेशाचा उजवा पुढचा करीहस्त असून, उर्वरित हातांमध्ये त्रिशूल, डमरू, सर्प, कपाल आणि एका हाताने शिवाने पार्वतीच्या हनुवटीला स्पर्श केला आहे. डावीकडील पुढचा हात भग्न झाला आहे. पदन्यासाचा विचार केला तर एका पद्म पीठावर शिव मंडल स्थानात आहे. शिवाचा उजवा पाय त्याने उचललेला असून निकुट्टकम् करणात आहे. या पद्म पीठाखाली शिवाचे वाहन वृषभ या नृत्याचे अवलोकन करण्यासाठी मान वर करून बघताना शिल्पित केला आहे. 

    महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये शिवाच्या सहस्र नावांचा उल्लेख येतो. त्यामध्ये शिवाला ऊर्ध्वरेता म्हटले आहे. मुळात ऊर्ध्वरेता या स्वरूपातील शिव भारतीय परंपरेमध्ये पूजनीय आहे. याचे कारण, ऊर्ध्वरेतस ही उच्चतम योगिक स्थिती मानलेली आहे. शिव पशुपती, लकुलीश, क्वचित अर्धनारीश्वर अश्या विविध विग्रहांमध्ये शिवाचे ऊर्ध्वरेता योगी स्वरूप शिल्पांमधून अभिव्यक्त केले आहे, तसेच या नृत्यरत शिवाच्या शिल्पातही बघायला मिळते. 

    छायाचित्र –  साभार अंतरजाल

    (पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष तृतीय शके १९४४.)

  • अपस्मार पुरुषावर नर्तन करणारा नटराज

    अपस्मार पुरुषावर नर्तन करणारा नटराज

    कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम इथली ही नटराजाची प्रतिमा आहे. यामध्ये आक्राळ अश्या अपस्मार पुरुषावर शिव नृत्य करतो आहे. त्याचा उजवा पाय हा अपस्माराला दाबतो आहे तर दुसरा ऊर्ध्वजानु करणामध्ये वर उचललेला आहे. या शिल्पामध्ये शिवाची चर्या काहीशी भयानक झाली असली तरी चेहऱ्यावर स्मित आहे.  या शिल्पामध्ये नटराज चतुर्भुज आहे. त्याच्या हातामध्ये त्रिशूल, पाश, अलपल्लव मुद्रा आणि सूची मुद्रा आहे. त्याच्या डाव्या पायाशी फणा काढलेला भुजंग आहे. नटराजाच्या डोक्यावर जटामुकुट आहे. कानात गोल कुंडले आहेत. खांद्यावर कोरीव यज्ञोपवीत आहे. दंडात त्रिवलय केयूर आणि हातांमध्ये कंकण आहे. कटीला वस्त्र आणि त्यावर मेखला आहे. पायामध्ये नुपर दाखवले आहेत. त्रिनेत्र नटराजाचे डोळे गोल व मोठे आणि दात बाहेर आलेले दाखवून यातील उग्र भाव सहज प्रदर्शित होत आहे. या नटराजाने त्याचा उजवा पाय या जाडजूड, बेढब मूलयकावर ठेवला आहे. शिवाची सूची मुद्रा ही अपस्मार पुरुषासाठी चेतावनी देणारी आहे. या अपस्मार पुरुषाच्या चेहऱ्यावर त्याची हतबलता स्पष्ट दिसत आहे. शांत चित्ताने या शिल्पाकडे पहिले तर, शिवाच्या नृत्यावस्थेतील संवेग, शिल्पातून अभिव्यक्त होणारे भाव एखाद्या कथेप्रमाणे आपल्या मनात झिरपत जातात. 

    छायाचित्र –  साभार अंतरजाल

    (पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष द्वितीय शके १९४४.)

  • वेरूळमधील निकुट्टकम् करण

    वेरूळमधील निकुट्टकम् करण

    निकुट्टितौ यदा हस्तौ स्वबाहुशिराशोsन्तरे|
    पादौ निकुट्टितौ चैव ज्ञेयं तत्तु निकुट्टकम् ||

    भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये निकुट्टन करणाचे लक्षण सांगितले आहे. जेव्हा दोन्ही हात हे बाहू आणि मस्तक यांच्यामध्ये निकुट्टित पद्धतीने संचालित केले जातात आणि त्याच वेळी पाय निकुट्टित होतो त्याला निकुट्टकम् म्हणतात. अभिनवगुप्तपादाचार्य, निकुट्टन याची परिभाषा करताना कोहीलकृत परिभाषेचा आधार घेतात आणि सांगतात, ‘उन्नमनं विनमनं स्यादङ्गस्य निकुट्टनम्’| म्हणजेच निकुट्टनचा अर्थ ऊर्ध्व आणि अधः संचलन. आचार्य अभिनवगुप्त यांच्या मते एका पायाद्वारा निकुट्टकम् प्रकट केले जाते.     

    वेरूळ लेणी समूहांपैकी रावण की खाई या लेणीमध्ये दक्षिणेकडील मंडपामधील तिसऱ्या शिल्पपटात नटराज स्वरूप शिव नृत्य करताना शिल्पित केला आहे. त्रिभंग अवस्थेमधील अष्टभुज नटराज इथे बघायला मिळतो. उजवा पुढचा हात करीहस्त मुद्रेत आहे, त्याचा मागचा हात भग्नावस्थेत आहे, उर्वरित हातांमध्ये अंकुश आणि डमरू आहे. तर डाव्या वरच्या हातामध्ये अग्नी, अलपल्लव हस्त, डोलाहस्त, पातक मुद्रा आणि कटकमुख मुद्रा इत्यादी नृत्यहस्त आहेत. शिवाच्या डोक्यावर जटामुकुट आहे. कानात कुंडले आहेत, हातामध्ये कंकण असून, दण्ड हे त्रिवलय असलेल्या केयुरांनी सुशोभित केले आहेत. कटीला एक सर्प  गुंडाळलेला आहे. व्याघ्रचर्माचे कटीवस्त्र असून शिवाच्या जंघेवर वाघाचे मुखही शिल्पित केले आहे. इथे मध्यभागी शिव एका उंच पीठावर निकुट्टकम् करणाप्रमाणे त्याचा उजवा पाय किंचित उचललेला शिल्पित केला आहे. नटराजाच्या उजव्या पायाशी वाद्यवृंद असून यामध्ये मृदुंग, बासरी आणि झांज वाजवताना काही गण दाखवले आहेत. शिवाच्या उजव्या पायाशी हाडांचा सापळा झालेला भृंगी ही दाखवलेला आहे. डावीकडे पार्वती असून शिल्पपटाच्या वरच्या बाजूला अन्य देवता, ऋषी, दिक्पाल आणि आकाशगामी गन्धर्व हे हा दिव्य नर्तन सोहळा अनुभवण्यासाठी उपस्थित झाले आहेत.

    छायाचित्र –  © धनलक्ष्मी म. टिळे

    (पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल पौर्णिमा शके १९४४.)

  • भुजंगत्रसितम्

    भुजंगत्रसितम्

    नटराज शिल्पांमध्ये भुजंगत्रसितम् करण हे अत्यंत लोकप्रिय आणि महत्वाचे करण आहे. या करणात पदन्यास करणारी शिवाची असंख्य सुंदर शिल्पे किंवा धातु प्रतिमा आपल्याला बघायला मिळतात. ‘भुजंगत्रसित’ या करणामध्ये पायाजवळ भुजंग आल्याच्या कल्पनेने लगबगीने पाय कुञ्चित अवस्थेत उचला जातो. चोल शैलीमधील नृत्यरत शिव हा भुजंगत्रसित करण करताना शिल्पित केला आहे. परंतु आगम काळामध्ये याच करणाला आनंद ताण्डव ही संज्ञा रूढ झाली. आगम शास्त्रामध्ये नृत्यमूर्ती करताना भुजंगत्रसितम् करणावर अधिक भर दिला गेला आहे. 

    गंगैकोंडचोलपूरम् येथील चोल राजवंशाचा राजेंद्र चोल याच्या काळात निर्मित झालेले बृहदिश्वर मंदिरमध्ये नृत्यरत शिवाच्या अनेक प्रतिमा बघायला मिळतात. इ.स.11 शतकातील हे द्राविड शैलीतील मंदिराच्या जंघाभागावर अपस्मार पुरुषावर नर्तन करणाऱ्या नटराजाची सुंदर अशी प्रतिमा आहे. अत्यंत सुबक आणि प्रसन्न चर्या, अर्धोन्मेलीत डोळे, स्मित हास्य असलेले हे नटराज शिल्प आहे. देवकोष्टामध्ये असलेल्या या नटेशासोबत डावीकडे ऊर्ध्वकेशी अष्टभुजा भद्रकाली देवीही नृत्य करताना शिल्पित केली आहे. उजव्या पायाशी भृंगी ऋषी असावेत. या शिल्पाच्या खाली चामुण्डा, शिवगण आणि वाद्यवृंद दाखवले आहेत. 

    चतुर्भुज नटराजाच्या हातामध्ये भक्तांना अभय प्रदान करणारी अभय मुद्रा, शब्दब्रह्माचे प्रतिक म्हणून डमरू, लय कार्यान्विन करण्यासाठी अग्नी आहे आणि डावा पुढचा हात करीहस्त मुद्रेत म्हणजेच तिरोधन क्रियेत आहे. शिवाने त्याच्या संपूर्ण शरीराचा भार हा उजव्या पायावर घेत डावा पाय कुञ्चित अवस्थेत उचलेला आहे. उजवा पाय गुडघ्यात वाकवून तो अपस्मार पुरुषावर ठेवला आहे. अपस्मार पुरुषाच्या हातामध्ये भुजंग आहे. हा अपस्मार पुरुष किंवा मूलयक म्हणजे खरतर अपस्मृतीचे प्रतिक मानले आहे. अपस्मृती ही मनुष्याच्या मोहावस्थेशी निगडीत आहे. थोडक्यात अज्ञानरूपी अपस्माराला भगवान नटराज आपल्या पायाखाली दाबून जिज्ञासु भक्तांच्या जीवनमार्ग प्रशस्त करीत आहेत. 

    त्रिनेत्र शिवाची चर्या प्रसन्न भावाने तेजाळली आहे. त्याचे मस्तकावरील जटामुकुट अतिशय बारकाव्याने शिल्पकाराने सुशोभित केला आहे. शिवाच्या शीर्ष पट्टाने जटा या सर्पवेष्टानाने मंडित करून त्यावर कवटी आहे. ही कवटी म्हणजे ब्रह्मकपालाचे निदर्शक आहे. सुंदर अशी कोरीव चंद्रकोर या जटामुकुटामध्ये आहे. नृत्याच्या संवेगामध्ये एका सर्पाचे वेष्टन सैल झाले आहे आणि यापैकी काही जटा या मुक्त होऊन दोन्ही बाजूला पसलेल्या आहेत. शिवाच्या एका कामानाध्ये सिंहकुंडल असून दुसऱ्या कानामध्ये पत्रकुंडल आहे. गळ्यात ग्रेवेयक आहे. उदारबंध आणि डाव्या खांद्यावर यज्ञोपवीत आहे. दंडावर वलयांकृत नक्षीयुक्त केयूर आहे, हातांमध्ये कंकण असून बोटांमध्ये अंगुलिका आहेत. मांडीपर्येंत तलम कटीवस्त्र नेसलेले असून त्यावर तलम शेला आणि अलंकृत मेखला आहे. पायामध्ये पादवलय आणि सुंदर अशी नुपूरे आहेत. या नटराज प्रतिमेतून धर्म, कला आणि तत्त्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम दिसून येतो.

    छायाचित्र –  साभार अंतरजाल

    (पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल चतुर्दशी शके १९४४.)

  • कांस्य (ब्राँझ) नटराज प्रतिमा

    कांस्य (ब्राँझ) नटराज प्रतिमा

    भारतीय कला इतिहासात धातु प्रतिमांची एक उज्ज्वल परंपरा कायमच गौरवलेली आहे. यामध्येही विशेष करून चोल यांच्या कांस्य प्रतिमा या विशेष लोकप्रिय झाल्या. चोलांप्रमाणेच पल्लवांच्याही कांस्य किंवा धातु प्रतिमा बघायला मिळतात. कांस्य हा तांबे आणि कथिल या धातूंच्या मिश्रणातून तयार होणारा धातु आहे. त्यामुळे दोनही धातु हाताळताना कलाकाराचे शास्त्रशुद्ध ज्ञान आणि पारंपारिक कौशल्य यांची पराकाष्ठा या प्रतिमांमधून अभिव्यक्त होते. मुळात धातु प्रतिमा निर्मितीचा विचार का झाला असावा असा मागोवा घेतला तर लक्षात येते, की काळाच्या ओघामध्ये देवालयामध्ये काही चल मूर्तींची आवश्यकता भासू लागली आहे. अश्या प्रतिमा या उत्सव पर्वामध्ये उत्सव मूर्ती म्हणून वापरत. चोल शैलीतील कांस्य प्रतिमांची कीर्ती जगभर पसरलेली आहे. शिवाय कांस्य प्रतिमांमध्ये शिवाचे विविध विग्रह निर्माण केले आहेत. जसे भिक्षाटन, कल्याणसुंदर, सोमास्कंद अश्या अनेक प्रतिमा आहेत त्यातील नटराज प्रतिमा हा आजचा विषय आहे.

    कडलांगुडी, तंजावूर येथील चोल शैलीतील ही नटराजाची कांस्य प्रतिमा आहे. एका पद्मपीठावर अपस्मार पुरुष असून त्यावर नटराज नर्तन करीत आहे. भुजंगत्रसित पदन्यासात शिव पञ्चक्रिया करीत आहे. या नटराज प्रतिमेमध्ये त्याच्या भोवती असलेले अग्निचे तेजोवलय नाही. शिवाच्या मस्तकावर केवल शीर्षपट्ट असून मोकळ्या सोडलेल्या जटा या नृत्याच्या लयीनुसार रुळत आहेत. चतुर्भुज नटराजाच्या हातामध्ये अभय मुद्रा, डमरू, अग्नी आणि करीहस्त मुद्रा आहे. चर्येवर प्रसन्न आणि समतोल भाव आहे. गळ्यात ग्रेवेयक नसून सर्प आहे. तसाच अभय हस्तावरही सर्प आहे. उदरबंध आहे. दंडामध्ये केयूर तर हातांमध्ये कंकण आहे, बोटांमध्ये अंगुलिका आहेत. कटीला वस्त्र आहे. पायामध्ये पादवलय आहे. पार्श्वदर्शनी या प्रतिमेमध्ये अतिशय सुंदर अश्या शिवाच्या मुक्तजटा दिसतात.

    कलेमध्ये माध्यम हे महत्वाचे असल्याने पाषाणातून धातु या माध्यमामध्ये येताना अधिक सुबकता, सुडौलपणा कलाकारांना अचूक साधता आली आहे, हे या प्रतीमांवरून दिसते.  

    छायाचित्र – © AIIS Photo Archive

    (पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल द्वादशी शके १९४४.)

  • मल्लिकार्जुन मंदिरावरील नटराज

    मल्लिकार्जुन मंदिरावरील नटराज

    पट्टदकल येथील मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे द्रविड शैलीतील उत्तम स्थापत्याचा अविष्कार. या मंदिराचा निर्माण हा चालुक्य राजा विक्रमादित्य द्वितीय (इ.स. 733-44 ) याची पत्नी लोकमहादेवी हीची बहिण त्रिलोकमहादेवी हिच्याकडून झाला आहे. या मंदिराच्या जंघा भागावर नटराज प्रतिमा बघायला मिळते. अतिशय रेखीव अशी प्रसन्न चर्या असलेली नटराज प्रतिमा आपल्याला मंदिराच्या बाह्यभिंतीवर एका कोनाड्यात शिल्पित केलेली दिसते. शिव त्याचा उजवा पाय उचलून उर्ध्वजानू पद्धतीने पदन्यास करीत आहे, त्याचा उजवा पाय हा अपस्मार पुरुषावर रोवलेला आहे. चतुर्भुज शिवाचे पुढचे दोन हात भग्न पावलेले आहेत. तरी शिवाचा पुढचा उजवा हात सिंहकर्ण किंवा कटकमुख मुद्रेत असावा तर डावा हात करीहस्त मुद्रेत आहे. मागच्या हातामध्ये डमरू आणि वृषभध्वज दिसतो आहे. शीर्ष जटामुकुटाने मंडित असून, त्यावर कवटीचे अलंकरण म्हणून वापर केला आहे. नर्तनातील संवेगाप्रमाणे रुळणाऱ्या जटाही शिल्पकाराने सुंदर कोरल्या आहेत. कानामध्ये सुंदर कोरीव कुंडले आहेत. गळ्यात ग्रेवेयक आहे. डाव्या खांद्यावरील यज्ञोपवीत ही नर्तन क्रियेमध्ये हलले आहे. कोरीव उदरबंध आहे. दंडामध्ये केयूर आणि हातामध्ये कंकण आहे. कटीला सुंदर असे तलम वस्त्र असून त्यावर मेखला आहे. पायामध्ये नुपूर आहेत. नटराजाच्या उजव्या पायाशी ताल वाद्य म्हणून घट आणि डाव्या पायाशी सुशीर वाद्य म्हणून बासरी वाजवणारे दोन गण आहेत. या शिल्पपटाच्या वर आकाशातून नटेशाला पुष्पमाला अर्पण करण्यासाठी येणारे दोन आकाशगामी आहेत. त्यांच्या वर दोन गन्धर्व युगल ही आकाशमार्गाने गमन करताना या शिवाच्या दिव्य नृत्याच्या अनुग्रहासाठी काही क्षण थांबले आहेत, असे हे अत्यंत सुबक आणि विलोभनीय असे शिल्प आपल्याला बघायला मिळते. 

    छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- मल्लिकार्जुन मंदिर, पट्टदकल.

    (पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल एकादशी शके १९४४.)