पाल- सेन शैली म्हणून कीर्ती पावलेल्या शिल्पशैलीतील विलक्षण सुंदर नटराज प्रतिमा आज बघणार आहोत. बंगाल, बिहार आणि बांग्लादेश या प्रांतामध्ये या पाल शैलीतील अनेक शिल्पं बघायला मिळतात. या शैलीमध्ये शिल्पांमधील नाजूकपणा आणि सहजता दिसते. विशिष्ट पद्धतीचे गोल चेहरे, बारीक डोळे ही या शैलीची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. नटराजाचे एक भिन्न स्वरूप या प्रतिमांमधून अभिव्यक्त होते. पाल शैलीमधील नटराज हा वृषारूढ असून नंदिकेश्वराच्या पाठीवर नर्तन करीत आहे.
अशीच एक प्रतिमा दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात माझ्या पाहण्यात आली. पद्मपिठावर शिवाचे वाहन नंदिकेश्वर आहे. या नंदिकेश्वराच्या पाठ नटराजाच्या नर्तनाच मंच झाला आहे. दशभुज नटराजाच्या हातामध्ये दक्षिणाधक्रमाने अभयमुद्रा, वज्र, डमरू, त्रिशूल, खड्गं असून डाव्या हातांमध्ये खट्वांग, पाश, खेटक, कपाल आणि एक हात नृत्यमुद्रेत आहे. त्रिनेत्रधारी नटराजाचे मस्तक जटामुकुटाने मंडित आहे. कानामध्ये वृत्तकुंडले आहेत. गळ्यात हार आणि डाव्या खांद्यावरून येणारे यज्ञोपवित आहे. कमरेपासून घुडघ्यापर्यंत सुंदर तलम वस्त्र गुंडाळलेले असून त्यावर रुंदामाळा रुळत आहे. नंदिकेश्वरानेही भगवानांचे हे विलक्षण नृत्य बघण्यासाठी आपली मान वळवून या दिव्य नृत्याचे अवलोकन करीत आहे. नंदीच्या डाव्या पायाशी भगवान विष्णू झांज वाजवत या नर्तनात ताल धरला आहे. तसेच उजवीकडे ब्रह्मदेव मृदुंगाच्या नाद लहरींमध्ये डोलत आहेत. सोबत गणेश आणि इतर देवताही नर्तन करताना दिसत आहेत.
अशीच एक पाल शैलीतील धातूची प्रतिमा चिदंबरम येथील मेल्लकदंबुर मंदिरात आहे. राजेंद्र चोल राजाने पाल- सेन यांच्या प्रांतावर विजय प्राप्त केला आणि बंगाल प्रांतातून अनेक धातु प्रतिमा त्याच्या सोबत आणल्याचे उल्लेख येतात. त्यापैकी ही एक नटराज प्रतिमा. परंतु ही प्रतिमा कुलोत्तुंग चोल याच्या काळामध्ये या मंदिरामध्ये प्रतिष्ठापित केली. त्यानंतर आजमितिपर्यंत ही वृषभ ताण्डव नटराज प्रतिमा नित्य पूजेत आहे.
छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- राष्ट्रीय संग्रहालय – नवी दिल्ली
(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल चतुर्थी शके १९४४.)