कला म्हणजे अभिव्यक्ती असते. कलेच्या माध्यमातून माणूस त्याच्या अव्यक्त भावनांना अभिव्यक्त करून अर्थपूर्ण संकेतांचे आदानप्रदान करतो. मग ही अभिव्यक्ती त्याच्या धार्मिकतेशी निगडीत असले किंवा त्याला वाटणाऱ्या भीतीशी निगडीत असेल, त्याच्या सृजनात्मक विचारांचा अविष्कार असेल किंवा त्याच्या सौंदर्यदृष्टीची साकार प्रतिमा असेल. मानव कायमच त्याच्या चित्रांच्या सहाय्याने व्यक्त होत आला आहे. ह्याच चित्रांचे बारकाईने निरीक्षण केले तर प्रत्यक्ष त्या माणसाचा जीवनपट आपल्या समोर उभा राहतो. माणसाचे विचार, त्याची जीवनशैली, त्याने जपलेली मूल्ये, त्याची भीती, त्यांच्या इच्छा-आकांक्षांना चित्रातील रेषा बोलक्या करतात.
अश्याच काही रेषा तब्बल 30,000 वर्षांनी पुन्हा जिवंत झाल्या. 1957 साली पुरातत्वशास्त्रज्ञ वि. श्री. वाकणकर, भोपाळ रेल्वेने इटारसीला जात होते. त्यांना ह्या प्रवासात खिडकीतून बाहेर काही विशिष्ट संरचनेचे खडक दिसले. लगेचच पुढच्या स्टेशनला उतरून त्यांनी त्या स्थळाकडे प्रस्थान केले. दुरून दिसलेले ते विशिष्ट संरचनेचे खडक म्हणजे अश्मयुगीन मानवनिर्मित शैलाश्रयाचा आणि गुंफा चित्रांचा उत्कृष्ट नमुना भीमबेटकाच्या रूपात समोर दिसू लागला.
भीमबेटका किंवा भीमबैठका म्हणून सध्या प्रसिद्ध असलेले मध्यप्रदेशातील रायसन जिल्ह्यात स्थित मानवनिर्मित शैलाश्रये. ह्या शैलाश्रयाचे महाभारतातील भीमाशी नावं जोडले गेले आहे. भीमाची बैठक किंवा बसायची जागा म्हणून ह्याला भीमबैठका असेही नाव आहे. जवळजवळ 642 शैलगृहांपैकी 400 गुंफांमध्ये चित्रांचे नमुने सापडतात. ही चित्रे एकाच काळातली नसून वेगवेगळ्या काळातली आहेत. ह्या चित्रांचा, त्याच्या शैलींचा वि.श्री. वाकणकर, यशोधर मतपाल (1974) आणि एर्विन न्युमेअर (1983) ह्यांनी चिकित्सक अभ्यास केला. चित्रशैली आणि तंत्र या आधारांवर वाकणकरांनी या चित्रांचे सात कालखंडात वर्गीकरण केले.
- उत्तर पुराश्मयुग (इ. स. पू. 25000 – 15000)
- मध्याश्मयुग (इ. स. पू. 15000 – 6000)
- ताम्रपाषाणयुग (इ. स. पू. 6000 – 3000)
- नवाश्मयुग (इ. स. पू. 3000 – 2500)
- आद्य-एतिहासिक काळ (इ. स. पू. 2500 – 1800)
- मध्य ऐतिहासिक काळ (इ. स. पू. 18000 – 900)
- उत्तर ऐतिहासिक काळ (इ. स. पू. 900 – 500)
यशोधर मतपाल ह्यांनी भीमबेटकाच्या चित्रशैलीवरून त्याचे तीन विभाग निश्चित केले.
- मध्यपाषाणयुगीन चित्रशैली
- पारंपारिक चित्रशैली आणि
- ऐतिहासिक चित्रशैली
अभ्यासकांनी त्यांच्या पद्धतीने इथल्या चित्रांची विभागणी तर केली, पण पुढे काय? पुढील भागात आपण बघू प्रत्यक्ष ती चित्र त्यांची काय कथा सांगतायेत ते. त्यांचे रंग, रंगाची माध्यम, त्या चित्रातून तयार होणारे भौतिक, सांस्कृतिक संकेत आणि त्यांचे अर्थ काय. आणि एकूणच त्या चित्रांमधून उमटलेली भारतीय चित्रकलेच्या वाटचालीतील हे पहिले पाऊल कसे होते ते जाणून घेऊया, पण प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास भाग 2 मध्ये.
(क्रमशः)
भाग 2 – प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास
3 thoughts on “प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास (भाग 1)”