भाग 1 – प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास
भीमबेटकातील चित्रांची अभिव्यक्ती
प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास भाग 1 मध्ये आपण बघितलं की वि.श्री. वाकणकरांना भीमबेटका ह्या शैलाश्रयांचा शोध कसा लागला. त्यांनी आणि इतर अभ्यासकांनी भीमबेटकाचा एक नवा पैलू कसा मांडला. ह्या भागात आपण ह्या शैलाश्रयांमधील चित्रांविषयी माहिती बघणार आहोत. इथली कला आपल्याला तत्कालीन माणसाविषयी नेमकं काय सांगू बघते आहे ह्याचा शोध घेणार आहोत.
- चित्रातील रंग
भीमबेटकातील गुहांमध्ये काढलेल्या चित्रांमध्ये जवळजवळ 16 रंगांच्या छटा मिळतात ज्या विविध खनिजांपासून बनवल्या गेल्या आहेत. तरी त्यात मुख्यत्वे लाल आणि पांढऱ्या रंगाचा अधिक वापर दिसतो. रंग बनवण्याची प्रक्रिया बघितली तर हे रंग पाण्यात घोळवून किंवा प्राण्यांच्या चरबीत घोळवून वापरले आहेत. ह्या भागात गेरू आणि चुनखडीची मुबलकता अधिक असल्याने लाल आणि पांढरा रंग जास्त वापरलेला दिसतो. हिरव्या रंगाचा वापर करताना हिरव्या रंगाच्या चकचकीत दगडाचा वापर केला आहे ज्याला Green Chalcedony म्हणतात. काही चित्र ही एकाच रंगत रंगवली आहेत ज्याला आम्ही चित्रकलेच्या भाषेत Monochromatic Color Scheme म्हणतो. तर काही चित्रांत एकापेक्षा अधिक रंगाचाही वापर दिसतो. ही चित्र काढताना ब्रश म्हणून झाडाच्या फांद्यांचा योग्य आकार देऊन वापर केलेला दिसतो आणि त्याला पुढे प्राण्यांच्या केसांचा झुपका वापरला आहे.
- चित्रातील निरीक्षणे
कुठलेही चित्र किंवा चिन्ह हे एका प्रकारे संदेशाचे माध्यम असते. ह्या चिन्हांद्वारा किंवा चित्राद्वारे माणसाच्या अंतरंगाचे मनोगत आपल्या समजत असते, फक्त त्याचा अर्थ आपण समजून घ्यावा लागतो. हे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला कि ही चित्रे आपल्याशी संवाद साधू लागतात. अशीच कथा आहे भीमबेटकाच्या चित्रांची. ह्या चित्रांमध्ये दैनंदिन जीवन, समाज, सामाजिक समारंभ किंवा विधी आणि एकूणच त्या काळातील माणसाचे राहणीमान दिसते. ह्या चित्रात लढाई, शिकार, समूह नृत्य, खेळ, चिकित्सा असे अनेक प्रसंग चित्रित झाले आहेत. ह्याशिवाय काही प्रगत तंत्रज्ञानाची माहिती ह्या लोकांना असावी हे दाखवणारी काही चित्र आहे. वनांचे प्रमाण अधिक असल्याने जैवविविधताही आहे त्याचे दर्शन चित्रातून होते. इथे राहणाऱ्या माणसाच्या भौतिक जीवनाचा आढावा ह्या गुंफा चित्रातून समजून घेता येतो.
- चित्रातील तंत्रज्ञान
भीमबेटकाच्या चित्रांमधील एक विशीष्ट म्हणजे त्या काळातही मानवाला असलेली सूक्ष्म जाणीव त्याने चित्रबद्ध केली आहे. काही नुसत्या रेखाचित्रांचा आधार घेतला आहे तर कधी खरोखरीच भरीव आकारात चित्र काढलेले आहे. नुसत्या आजूबाजूच्या दिसणाऱ्या गोष्टी काढायच्या असं नाही तर त्या काळच्या मानवाने X-ray Technique चा वापर करून गर्भवती स्त्री आणि त्याच्या पोटात बाळ आणि तिच्या समोर एक प्राणी आहे ज्याच्या पोटातही त्या प्राण्याचे बाळ आहे अशी चित्रांकने तिथे बघायला मिळतात.
- चित्रातील जैवविविधता
चितळ, हरीण, काळवीट, गेंडा, बिबट्या, वाघ, हत्ती, चित्ता, खारी, म्हैस, डुक्कर, नीलगाय, मोर, सांभर अश्या 29 प्रजातीच्या विविध प्राणी आणि ह्या शिवाय विविध पक्षी, मासे, पाली, बेडूक, खेकडे, विंचू हे तिथल्या जैवविविधतेची साक्ष देतात. एक महत्वाचे म्हणजे इतके असूनही इथे साप चित्रात कुठेच दिसत नाही. प्राण्यांची चित्र बघत असताना हे समजते कि मासेमारी मोठ्या प्रमाणात चालत असावी कारण त्या चित्रात मासेमारी सुरु आहेच शिवाय माश्यांच्याही विविध प्रजाती काढायचा प्रयत्न केला आहे.
ही चित्रे आकर्षक का वाटतात असा प्रश्न जर आपल्या डोक्यात डोकावला असेल तर त्याचे उत्तर अतिशय सोप्पे आहे. ही चित्रे तशी नुसतीच रेखांकाने असली तरी चित्रात जिवंतपणा आहे. सर्व चित्रांचा प्राण आहे गती किंवा Motion त्यामुळे ही सर्व चित्रे जिवंत वाटतात. शिकारीच्या प्रसंगात अनेक लोकं प्राण्यावर हल्ला करतायेत आणि त्या भीतीने प्राण्यांची गती वाढली आहे हे जाणवते. हरणाला पाठीत बाण लागल्यानंतर स्वभाविक त्याचे मागे वळून आर्त ओरडणे चित्रित केले आहे.
आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांचे पसरलेले पंख आणि त्या पंखांची पिसे चित्रित केली आहेत. ह्याच पक्ष्यांचा उडणारा थवा जर बारकाईने बघितला तर काही पक्षी छोटे काढले आहेत तर काही आकाराने मोठे. चित्रातून जवळ आणि लांबच्या गोष्टींचा आभास निर्माण करता यावा ह्यासाठी हे कौशल्य वापरले आहे.
ह्या चित्रांमध्ये वेगवेगळ्या हत्यारांचा वापर केलेला आहे जसे की भाला, धनुष्य, बाण, ढाल, काठ्या इ. शिकारीच्या चित्रांमध्ये कधी एकट्याने तर कधी सामुहिक शिकार करताना दिसतात. शिवाय शिकाऱ्यासोबत क्वचित कुत्रा तत्सम प्राणीही चित्रित केला आहे. प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेले गळ, सापळे आहेत. प्राण्यांच्याही आयुष्यातील घडामोडी चित्रांत दिसतात, जसे की चित्ता हरणाच्या पाडसाच्या मागे त्याची शिकार करण्यासाठी धावतो आहे. काही म्हशी कुरण चरतायेत. उड्या मारणारी माकडं आहेत.
- चित्रातील भौतिक संस्कृति
मध्याश्मयुगीन चित्रांमध्ये माणसांचे अनेक समूह दिसतात ज्यात पुरुष, स्त्रिया, तरुण आणि वृद्ध चित्रित केले आहेत. त्यांचे पोशाख, दागदागिने, डोक्यावरील आभूषणे बघायला मिळतात. ह्यातील पुरुष केवळ रेखेनी चित्रित करतात तर स्त्रिया मात्र पूर्ण काढलेल्या आहेत. एखादी व्यक्ती ही आकाराने मोठी, दागिने घातलेली, डोक्यावर मुकुटाप्रमाणे उंच शिरोभूषण त्याला तुरे किंवा पक्ष्यांचे लांब पंख लावून सुशोभित केले आहे. चेहऱ्यालाही एक विशिष्ट पद्धतीचा मुखवटा घातला आहे, ह्यावरून ती व्यक्ती नक्कीच त्या गटातील महत्वाची व्यक्ती असणार हे समजते. ह्या व्यक्ती चित्रांतून कामांचे वर्गीकरणही दिसते ज्यात पुरुष शिकार करतायेत तर स्त्रिया अन्न जमा करून ते शिजवणे, दळणे किंवा कुटणे अश्या कामात अंकित केले आहेत.
सामाजिक समारंभात अनेक स्त्रिया एकत्रित येऊन नृत्य सदर करतायेत. त्यातही एक स्त्री ही त्यांच्यातील मुख्य असणार कारण तिच्या चेहऱ्यावर विशिष्ट पद्धतीचा मुखवटा आहे आणि डोक्यावर दोन शिंगे. हे नृत्य कदाचित ह्यांच्या धार्मिक विधीशी निगडीत असण्याची शक्यता आहे.
माणसाच्या भावभावना, संवेदना, मूल्य ही ह्या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला आज दिसतायेत. ही चित्र चित्रित करून ठेवण्याची गरज तत्कालीन माणसाला वाटली आणि त्या गुहेच्या भिंतींना चक्क त्याचा कॅनव्हास बनवून गुहाचित्रांच्या रूपात संकलित केली. त्याचे दैनंदिन जीवन, त्यातले अडथळे काही धार्मिक संकल्पना किंवा संकटे चित्रीत करणे हे केवळ त्याचे कलाप्रदर्शन नसून त्यांचा संबंध त्याच्या त्यावेळच्या काही समजुतींशी निगडीत असावा. काही चित्रे त्याच्या स्मरणातील सगळ्यात चांगले प्रसंग म्हणून त्याने ते चित्रांमार्फत जपण्याचा प्रयत्न केला असावा. काहीही असो पण तत्कालीन मानवाच्या कलात्मक वाटचालीची पहिली खुण म्हणून भीमबेटका महत्वाचे आहे. UNESCO च्या निकष क्र. 3 ज्यात भीमबेटका हे स्थान मानव आणि तेथील निसर्गामध्ये असलेला परस्पर संवाद तिथे असलेल्या गुहा चित्रांच्या माध्यमातून दर्शवतो. आणि निकष क्र. 5 ज्यात शिकारी आणि भटक्या जातीच्या जीवनशैलीचे आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्रीकरण येथे आहे. ह्यांच्या आधारे UNSECO ने 2003 साली भीमबेटकाला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले आहे.
Photo Credits : A History of Acient and Early Medival India – Singh Upinder
One thought on “प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास (भाग 2)”