गंगा अवतरणाला कारणीभूत होता भगीरथ. या भगीरथाने त्याच्या घोर तपोबलाने देवी गंगेला पृथ्वीवर आणले. एकार्थी ती भगीरथाची कन्या झाल्याने गंगेला भागीरथी हे नाव गंगेला प्राप्त झाले. गंगा पृथ्वीवर अवतरीत होण्याचा प्रसंग वेगवगेळ्या कथा भागांतून आपल्या समोर येतो. महाभारतातील वनपर्वात गंगा अवतरणाची कथा येते. गंगा प्रत्यक्ष भूतलावर येणे हा दिव्य अनुभूति देणारा एक सोहळा म्हणता येईल. याचे कारण भगीरथाचे तपाचरण, त्या तपावर गंगेचे प्रसन्न होऊन पृथ्वीवर येणे, गंगेचा प्रचंड प्रवाह पृथ्वीवर हळुवार उतरवणे, तिच्या प्रवाहाची तीव्रता कमी करण्यासाठी भगवान शंकरांनी तिला आपल्या जटेमध्ये धारण करून तिला सप्तधारांनी पृथ्वीवर सोडणे अश्या अनेक दिव्य घटनांचा समावेश या एकाच प्रसंगामधून उलगडतो. या संपूर्ण प्रसंगातील नाट्य भारतीय परंपरेतील प्राचीन शिल्पांमध्ये शिल्पकाराने साकारले आहे. गंगेच्या मानवी स्वरूपातील अनेक मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. पण गंगेचा प्रवाह आणि तिचे भूतलावरील अवतरण यांची अनुभूती देणारा एक शिल्पपट, UNESCO च्या जागतिक वारसा असलेल्या महाबलीपुरम येथे आपल्याला अनुभवायला मिळतो.
संस्कृति आणि नदी यांचे अतूट नाते असते. कोणत्याही संस्कृतीचा मोगोवा घेताना तिथल्या भौगोलिक भागाशी जोडल्या गेलेल्या अनेक नद्या आणि त्यांच्या उपनद्या त्या प्रदेशात वाहत असतात. काळाच्या ओघात अनेक नद्या लुप्त होतात, त्यांचे मार्ग बदलतात, त्याच्या प्रवाहात बदल होतात. पण संस्कृति आणि नदी यांचे सामाजिक, धार्मिक, भावनिक अगदी आर्थिक किंवा राजकीय पदर हे अनुभवता येतात, अभ्यासता येतात. नदी ही माणसासाठी जीवनदायिनी असतेच, पण मानवी मनाच्या भावभावना, संवेदना या नद्यांशी आपण जोडून ठेवल्या आहेत. आज कोरना सारख्या वैश्विक संकटामुळे या नद्यांच्या सानिध्यापासून वंचित असलेला मानव या नद्यांचे नितळ, तरल, स्वच्छ सौंदर्य अनुभवतो आहे. आपल्या भारतीय संस्कृतिमध्ये सात पवित्र नद्यांपैकी एक नदी ही गंगा आहे.
गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥
मंगलस्नानादिक कर्मांमध्ये गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी यांचे अवाहन करून आपल्याकडे असलेल्या जलामध्ये या नद्यांच्या पवित्र जलाचा अंश उतरावा आणि या सप्त पवित्र नद्यांच्या सानिद्ध्यात हे जल पवित्र होवो, अशी आपण कामना करतो. केवळ गंगा नदीच्या संदर्भात म्हणायचे झाले तर, गंगा शब्दाची व्युत्त्पती पुढीलप्रमाणे सांगितली आहे –
गम्यते प्राप्यते मोक्षार्थिभिरिती गङ्गा
म्हणजे मोक्षार्थी जिच्याकडे जातात ती गंगा.
भौगोलिकदृष्ट्या गंगा नदीचा उगम गंगोत्री, टेहरी – गढवालमध्ये होतो. या ठिकाणाला पुराणामध्ये गोमुखी म्हटले आहे. इथून गंगेचे अनेक प्रवाह विविध शाखांना जाऊन मिळतात आणि गंगा सागराला जाऊन मिळेपर्येंत तिच्या विविध स्वरूपाचे दर्शन आपल्याला होते.
मोक्षदायिनी गंगा नदीचे अवतरण या पृथ्वीतलावर केव्हा झाले, या काळामध्ये अनेक मतमतांतरे आहेत. काही पुराणांमध्ये वैशाख शुद्ध तृतीया ही तिथी मानली आहे. काही पुराणांमधून कार्तिक पौर्णिमा ही तिथी येते. पण काही पुराणांनुसार, ज्येष्ठ शुद्ध 10. ही तिथी लोकांमध्ये अधिक प्रचलित झाल्याने आजच्या तिथीला म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध 10. ला गंगेचे पृथ्वीवर अवतरण झाले असे मानतात.
शिवाच्या गंगावतरण शिल्पातही शिवाच्या जटांमध्ये गंगेचे आगमन होताना दाखवले जाते. महाबलीपूरम येथील शिल्पपटामध्ये गंगेचे स्वतंत्र शिल्प दिसत नाही. ती जलाच्या रूपात प्रवाहित होत असल्याचा आभास या शिल्प कथेतून निर्माण करण्याचा प्रयत्न शिल्पकारांनी केलेला आहे.
तामिळनाडू राज्यात चेन्नईपासून 60 कि.मी. अंतरावर सागर तटावर महाबलीपुरम हे एक पूर किंवा नगर वसलेले आहे. इ.स. सातव्या शतकापासून पल्लव राजवंश आणि त्यांच्या नंतर चोल राजवंश येथे राज्य करीत होते. या महाबलीपूरमच्या भूमीवरच एक सुंदर शिल्पपट आहे तो म्हणजे गंगावतरण. या शिल्पपटाला अर्जुनाची तपश्चर्या असेही म्हणतात.
दोन मोठ्या शिलाखंडांचा अतिशय कल्पकतेने वापर करून शिल्पकारांनी साक्षात गंगा अवतरणाचा प्रसंग प्रस्तुत केला आहे. गंगावतरण हा शिल्पपटाची रचना अतिशय कलात्मक आणि नैसर्गिक रचनेला समर्पक केली आहे. हा शिल्पपट ज्या दोन मोठ्या शिलाखंडांवर शिल्पांकित केला आहे त्याच्या मध्ये एक नैसर्गिक घळ निर्माण झालेली आहे. या दोन खडकांच्या माथ्यावर एका कुंडामध्ये पाणी साठवले जाते आणि त्या कुंडातून ते पाणी या शिल्पपटातील घळीतून सतत पडत राहते अश्या प्रकारची सोय केली आहे. पावसाळ्यामध्ये माथ्यावरून सतत पडणाऱ्या पाण्याच्या रूपात साक्षात गंगाच पृथ्वीवर अवतरीत होत असल्याचा सोहळा इथे अनुभवता येतो. या खडकाच्या अरुंद घळीमध्ये नागराज आणि नागस्त्रिया यांची शिल्पे आहेत. नागराज आणि नागस्त्री यांनी त्यांचे हात जोडले आहेत. शिलाखंडावर चंद्र, सूर्य, किन्नर दम्पती, सिद्ध, गंधर्व आणि अप्सरा यांची अंकने आहेत. ज्या भगीरथाने कठोर तपश्चर्या करून गंगेला भूतलावर आणतो आहे हा क्षण या शिल्पामध्ये बघायला मिळतो. भगीरथ एका पायावर उभा राहून कठोर तपश्चर्य करीत आहे. त्याच्या शरीरावरील त्वचा तपश्चर्येने सुकून केवल हाडांचा ढाचा दिसत आहे. सर्व ग्रह, गंधर्व, सिद्ध, अप्सरा तिथे अवतरीत होत असलेल्या गंगेला बघण्यासाठी त्या घळीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. भगीरथाच्या बाजूला चतुर्भुज शिव त्याच्या गणासह उभा दाखवला आहे. अनेक सिद्ध योग-पट्ट धारण करून योगिक असनामध्ये बसलेले आहेत. याशिवाय सिंह, वाघ, हत्ती, वानर, हरीण यांसारखे प्राणीही शिल्पांकित केले आहेत.
वन्यजीवनाचे सुंदर शिल्पांकन या शिल्पांत दिसते. यांत हरीण निवांत सिंहाजवळ बसलेले दाखवले आहे. म्हणजेच हे तपोवन योगीजन, सिद्ध यांच्या सानिद्ध्याने इतके सात्विक झाले कि हिंस्त्र प्राणी आणि इतर प्राणी या वनामध्ये शांतीने, आनंदाने आणि भयमुक्तपणे जगत आहेत. इतकेच नाही इथे एक मांजर दाखवले आहे जे भगीरथाप्रमाणे दोनही हात वर करून तप करीत आहे आणि त्याच्याच शेजारी एक उंदीर त्या मांजराला नमस्कार करीत आहे. हत्तींचा एक कळप आपल्या पिल्लांना घेऊन हे गंगावतरणाचे साक्षी होण्यास येत आहेत. त्यांची पिल्ले त्या मोठ्या हत्तींच्या पायांमध्ये घुटमळत चालत आहेत.
हा संपूर्ण शिल्पपट प्रत्यक्ष समोर थांबून बघताना आपल्याला देवी गंगा साक्षात स्वर्गातून पृथ्वीवर खाली उतरत आहे या भाव निर्माण होतो. या शिल्पाच्या माध्यमातून हा दिव्य सोहळा अनुभवताना आपल्या मुखातून आपसूकच शब्द निघतात हर गंगे भागीरथी.
This information of “gangaavataran” is very helpful and detail.
Best website of historical information of indian art.
Thank you, Omkar ji, for your reply. I hope you’ll continue to follow my blog for more fascinating insights and more exciting posts, especially about Indian Art.