वैष्णवी विष्णुसदृशी गरुडोपरि संस्थिता |
चतुर्बाहुश्च वरदा शङ्खचक्रगदाधारा || रूपमण्डन 5.66
रूपमण्डन या ग्रंथामध्ये वैष्णवीसाठी आलेल्या या श्लोकाचा अर्थ असा होतो की, वैष्णवी ही विष्णूप्रमाणे दिसणारी असावी. गरुडावर स्थित असावी. तिच्या चार हातांमध्ये वरद मुद्रा, शंख,चक्र, गदा अशी आयुधे असावीत.
सप्तमातृका समूहातील वैष्णवी म्हणजे विष्णूचे प्रतिरूप. त्यामुळे अनेक प्रतिमांमध्ये वैष्णवीच्या पायाशी विष्णूचे वाहन सुपर्ण म्हणजे गरुड दाखवला जातो. ती भगवान विष्णूची शक्तीरूपा असल्याने तिच्या हातांमध्ये देखील शंख,चक्र, गदा अशी विष्णूची आयुधे दिसतात.
सप्तमातृका शिल्पांमध्ये नृत्यरत मातृकांचे अतिशय विलोभनीय शिल्पपट आपल्याला अनेकदा बघायला मिळतो. तशीच नृत्यमग्न वैष्णवी या शिल्पामधून आपल्याला दिसते आहे. त्रिभंग अवस्थेमध्ये वैष्णवी नर्तन करीत आहे. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून उजव्या पायावर शरीराचा भर देऊन डावे पाऊल किंचितसे उचलल्याने तिच्या शरीराला एक सुंदर लय प्राप्त झाली आहे.
विष्णूप्रमाणे वैभवसंपन्न असे तिचे रूप आहे. डोक्यावर सुंदर असा मुकुट, डोक्यामागे रेखीव प्रभावलय आहे. उजव्या कानांत वृत्तकुंडल आहे तर डाव्या कानामध्ये पत्रकुंडल आहे. गळ्यामध्ये मोत्यांच्या लडींचे भरगच्च असे ग्रेवेयक आहे. डाव्या खांद्यावर यज्ञोपवीत आहे. तिच्या दंडामध्ये सुंदर असे केयूर आहे आणि हातांमध्ये कंकण. भगवान विष्णूंप्रमाणे वैष्णवीनेही वैजयन्तीमाळा धारण केली आहे.
अत्यंत तलम असे कटीवस्त्र कमरेला गुंडाळलेले असून त्यावरून एक पट्ट बांधलेला दिसतो आहे.
मध्यप्रदेशातील ही प्रतिमा सध्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालात आहे. या शिल्पामधलं एक वैशिष्ट्य माझ्या मनांत सारखे अधोरेखित होत आहे आणि ते म्हणजे इथे वैष्णवी ही तिच्या उजव्या हाताने अभय प्रदान करीत आहे.