भगवान विष्णूच्या चतुर्विंशति प्रतिमांचा उल्लेख विविध पुराणे, वैष्णव संहिता आणि काही स्मृतीग्रंथांमध्ये येतो. चतुर्विंशति प्रतिमा म्हणजे विष्णूच्या चोवीस मूर्ती. या चोवीस मूर्तींपैकी एक म्हणजे त्रिविक्रम विष्णू.
भगवान विष्णूच्या दशावतार प्रतिमांमध्येही वामन अवतार हा त्रिविक्रम रूपाशी जोडला जातो. परंतु चतुर्विंशति प्रतिमांतील त्रिविक्रम हा चतुर्व्यूह संकल्पनेतून विस्तारत जाऊन व्यूहांतर कल्पनेचा भाग झाला आहे.
त्रिविक्रमस्त्रिषु गदाचक्रशङ्खान् बिभर्ति यः || रूप.3.15
रूपमण्डन या ग्रंथामध्ये त्रिविक्रमाच्या तीन हातामध्ये असलेल्या गदा, चक्र आणि शंख यांचाच केवळ उल्लेख केला आहे.
हयशीर्ष संहितेमध्ये आयुधांचा क्रम हा प्रस्तुत प्रतिमेप्रमाणे आला आहे.
दक्षिणोर्ध्वं गदा यस्य पङ्कजं चाप्यधः स्थितम् ||
वामोर्ध्वं संस्थितं चक्रमधः शङ्खं प्रदृश्यते | 22.12
उजव्या वरच्या हातामध्ये गदा, त्याच बाजूच्या खालच्या हातामध्ये पद्म असून डाव्या वरच्या हातामध्ये चक्र आणि शंख असतो.
प्रस्तुत प्रतिमेतील त्रिविक्रम समपाद स्थानक अवस्थेमध्ये उभा आहे. त्याच्या चतुर्भुज हातांमध्ये पद्म, गदा, चक्र आणि शंख ही लांछने आहेत. डोक्यावर सुंदर असा किरीट मुकुट आहे. डोक्यामागे प्रभावलय आहे. सर्वालंकारांनी सुशोभित अशी ही प्रतिमा मंदिराच्या बाह्यांगावर दिमाखात उभी आहे.