ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा ।
वाराही च तथेन्द्राणी चामुण्डा सप्तमातरः ॥ अमरकोष 1.16
अमरकोषामध्ये ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणी आणि चामुण्डा या सप्तमातृकांचा लोकमाता म्हणून उल्लेख येतो. अगदी प्राचीन काळापासूनच या पूजनीय ठरलेल्या आहेत. प्राचीन काळ म्हणजे नेमक्या किती वर्षांपासून या लोकांच्या जीवनाचा भाग आहेत, असा प्रश्न स्वाभाविकच मनात येतो. अभ्यासकांच्या मते सिंधू-सरस्वती संस्कृतीमध्ये म्हणजेच जवळपास ३५०० वर्षांपूर्वीपासून या सप्तमातृकांचे अंकन बघायला मिळते. परंतु शिल्प स्वरूपातील सप्तमातृकांची अभिव्यक्ती ही कुषाण काळातील मथुरा शैलीमध्ये बघायला मिळते.
मातृका पूजनाची ही परंपरा जनमानसात अगदी पूर्वीपासून रूढ होती. त्यामुळे कधी या माता स्वतंत्र तर कधी सप्त, अष्ट, नव अश्या संघाट स्वरूपातही पुजल्या जात होत्या. मातृकांचे पूजन हे अगदी तेराव्या शतकापर्यंत सुरु होते, असे दिसते. राष्ट्रकुट घराण्याच्या काळात निर्मित वेरूळ गुंफा समूहातही सप्तमातांचे विपुल शिल्पांकन केलेले आहे. चालुक्यांच्या अभिलेखांमध्ये सप्तमातृकांमुळे वृद्धी घडली असे उल्लेख येतात. यावरून चालुक्य काळातील सप्तमातांच्या पुजनाचे वाढलेले महत्त्व सहज अधोरेखित होते. पल्लव शैलीची छाप असलेले रावणफडी या गुंफेतही नृत्यरत शिवासोबत या सप्तमातांचे सुंदर शिल्प पाहायला मिळते.
शिल्पांमध्ये या मातांसोबत वीरभद्र आणि गणेश यांचेही अंकन केलेले असते. कधी त्या नृत्यरत असतात, तर कधी एका बालकाला मांडीवर घेऊन त्या बसलेल्या दिसतात. कधी स्थानक स्थितीत उभ्या असतात तर कधी ललीतासनात बसलेल्या असतात. भारतात स्वतंत्र मातृकाशिल्पे तसेच यांचे शिल्पपटही विपुल प्रमाणात बघायला मिळतात.
मातृकांच्या उत्पत्तीची कथा मत्स्यपुराणात येते. यात अंधकासुर वध प्रसंगात शिवापासून मातृकांची उत्पत्ती झाल्याचे सांगितले आहे. मार्कंडेय पुराणामध्ये मातृकांना शक्तीरूपा म्हणून गौरवलेले आहे. ब्रह्मदेवाची शक्ती ब्राह्मी, महादेवाची शक्ती माहेश्वरी, कार्त्तिकेयाची शक्ती कौमारी, भगवान विष्णूची शक्ती वैष्णवी, वराहाची शक्ती वाराही, देवराज इंद्र याची शक्ती इन्द्राणी आणि चामुण्डा या सप्तमाता चण्डिकेच्या सोबत रणांगणात उतरल्याचा उल्लेख या पुराणामध्ये येतो.
त्या देवतांच्या शक्तीरूपा असल्याने त्यांचे स्वरूप, त्यांच्या हातांमधील आयुधे आणि त्यांची वाहने ही त्या-त्या देवतांप्रमाणे असतात. आता प्रस्तुत शिल्पाचा विचार केला तर या शिल्पपटाध्ये ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणी आणि चामुण्डा या सप्तमाता आहेत. या सर्व आसनस्थ बसलेल्या आहेत. ब्राह्मी, माहेश्वरी, आणि वैष्णवी या चतुर्भुज असून इतर माता या द्विभुजा आहेत. प्रस्तुत शिल्पपट हा ऐहोळे येथील स्थळ संग्रहालयात आपल्याला बघायला मिळतो.