राजस्थानमधील साप पकडणाऱ्या कालबेलिया लोकांचे पारंपारिक नृत्य आणि संगीत आहे. कालबेलिया हे भटक्या जमातींपैकी एक असून ते जिथे राहतात त्यांना डेरा म्हणतात.
हे गरुडी लोकं त्यांच्या जवळच्या वेतापासून बनवलेल्या टोपीतून सापांना घेऊन गावातील घराघरातून दानं मागत फिरतात. कालबेलिया जमातीचे समाजात एक विशिष्ट स्थान आहे. कालबेलिया जमातीच्या लोकांसाठी त्यांची परंपरा, हा अभिमानाचा विषय आहे.
कालबेलिया जमातीमधील स्त्रिया गाणी गाऊन आणि नाचून दानं मागतात. गाण्यांमधून आणि नृत्यातून ते लोकांचे मनोरंजनही करतात. ह्या गाण्यांचा आशय हा त्या गावातील दंतकथा, प्रेमकथा यांच्याशी निगडीत असतो. दैनंदिन जीवनातही त्यांच्या उत्स्फूर्त गाण्यांचा समावेश असतो.
त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये बाजरी हे मुख्य धान्य असते. बाजरीची भाकरी आणि भाजी असा त्यांचा आहार असतो.
पारंपारिक पेहराव आणि रंगभूषा
वाळवंटी प्रदेशात असूनही त्यांचा पेहराव हा रंगेबेरंगी असतो. विशेष प्रसंगासाठी ह्या स्त्रिया काळ्या रंगाचा घागरा आणि चोळी घालतात. ह्या स्त्रियांच्या पोशाखावर अराश्याचे काम करतात. हे अराश्याचे काम चंदेरी दोऱ्याने केलेले असते.
पुरुषांचा पोशाख म्हणजे पांढरा लेहेंगा आणि झब्बा आणि डोक्याला रंगेबेरंगी फेटा बांधलेला असतो.
वाद्यांमध्ये हलगी, मंजिरे, खंजिरी आणि पुंगी हे मुख्य वाद्य असून पुरुष ह्या वाद्यांचा वापर करतात.
कालबेलियांचा पारंपारिक नृत्यप्रकाराला मटकू म्हणतात जो त्यांच्या दैनंदिन जीवनाचाही एक भाग आहे. मटकू मध्ये स्त्रिया त्यांच्या कमरेपासून वरच्या अंगाचा आणि हातांचा वापर अधिक करतात. ह्या नृत्यप्रकारात गाणी म्हटली जात नाहीत. केवळ वाद्यांच्या ठेक्यावर स्त्रिया नृत्य करतात.
लूर नृत्य हे होळी सारख्या सणाच्या दिवशी स्त्रिया करतात. अतिशय प्रसन्नता आणि आनंद देणारी ही गाणी असतात. त्यांची ही संगीत आणि नृत्य परंपरा आणि त्यातली सहजता ही त्यांच्या रोजच्या रियाजामुळे दिसते.
नृत्यामधील हालचाली ह्या सापांप्रमाणे लवचिक असतात. अनेक कसरतीचे खेळही त्यांच्या नृत्यप्रकारात समाविष्ट झालेलेल आहेत, जसे डोळ्यांच्या पापण्यांनी अंगठ्या उचलणे वगैरे. कालबेलिया जमातीच्या ह्या भटके लोक त्याचा सांस्कृतिक वारसा जपत, उत्स्फूर्तपणे त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करताना दिसतात. बदलत्या सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेत त्यांच्या समुदायाचे प्रयत्न दिसून येते.
2010 साली कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य प्रकाराला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले. त्यामुळे आता जगभरात त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे.
भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात पूर्व भारतातील एक नृत्यप्रकार बघूया.
(क्रमशः)
Photo Credits : UNESCO
2 thoughts on “कालबेली लोकसंगीत आणि लोकनृत्य”