कुबेराप्रमाणे राजा मरुत याच्या यज्ञासाठी इंद्र, वरूण आणि यम हे देवही उपस्थित असतात. महेश्वरासाठी असलेल्या या यज्ञात रावण त्याच्या सैन्यासह आलेला पाहून कुबेरासह हे सर्व देव वेगवेगळ्या पक्ष्यांची रूपे धारण करतात.
इन्द्रो मयूरः संवृत्तो धर्मराजस्तु वायसः |
कृकलासो धनाध्यक्षो हंसश्च वरुणोऽभवत् ||
(रामायण उत्तरकाण्ड १८.५)
इंद्र मयुर, वरुण हंस तर यमराज कावळ्याचे रूप धरण करतात. रावणापासून लपण्यासाठी त्यांनी ज्या ज्या पक्ष्यांची मदत घेतली त्यांना ते वरदानही प्रदान करतात. इंद्र मयुराला सर्पाच्या भयापासून मुक्ती प्रदान करतो. इंद्राचे सहस्त्रनेत्र मोराच्या पिसाऱ्यावर चंद्रिका स्वरूपात सुशोभीत करून त्याला अजून सौंदर्य प्रदान करतो; आणि आशीर्वाद देतो की जेव्हा इंद्र जलवृष्टी करेल तेव्हा त्याच्या प्रितीचे प्रतिक म्हणून मयूर आनंदाने नाचतील.
अश्याच प्रकारे यमराज कावळ्याचे रूप धारण करतात. त्यामुळे यमदेव कावळ्याला मृत्य भयापासून मुक्ती प्रदान करतात. यमलोकामध्ये असलेल्या जीवांचे पोट तेव्हाच भरेल जेव्हा कावळ्याचे पोट भरेल आणि त्या लोकांना तृप्ती मिळेल असा आशीर्वाद देतात.
वरुणदेव हंसाला वरदान स्वरूप चंद्राप्रमाणे चमकणारा सुंदर शुभ्र वर्ण आणि समुद्राच्या फेसाप्रमाणे ताकाकणारी कांती प्रदान करतात. वरुणाचे शरीर जल असल्याने जलामध्ये हंसाला विहार करताना आनंद आणि सौंदर्य यांची प्राप्त होते, हे वरुणाचे हंसाप्रती असलेल्या प्रेमाचे प्रतिक आहे.
अश्या प्रकारे मयूर बनलेला इंद्र, हंस रूप धारण केलेला वरुण आणि कावळा झालेला यम, आपापले पूर्वस्वरूप धारण करून त्या पक्ष्यांना अशीर्वचनाने तृप्त करतात.
हा कथाभाग रामायणातील उत्तरकाण्ड मधील आहे. या कथांमध्ये रंजकता दिसते. त्यामुळे या कथांवरून ऐतिहासिक शास्त्रोक्त विश्लेषण शक्य नाही. त्यासाठी चिकित्सक दृष्टीकोनातून या कथांकडे बघावे लागेल.