नाट्याचे विविध प्रकार असतात. प्रज्ञावंत आणि प्रतिभासंपन्न कवी आणि नाटककार अश्वघोष याचे शारिपुत्रप्रकरण हे प्रकरण प्रकारचे नाट्य आहे. तसेच प्राकृत भाषेमध्ये एका विशिष्ट नाट्य प्रकराची निर्मिती झाली ते म्हणजे सट्टक. संस्कृत नाट्यापेक्षा सट्टक हे वेगळ्या पद्धतीचे नाट्यस्वरूप बघायला मिळते. अभ्यासकांच्या मते सट्टक हा शब्द प्राकृत आट्ट या शब्दापासून बनलेला शब्द असावा असे एक मत आहे. आट्ट या शब्दाचा अर्थ होतो नृत्य. या नाट्य प्रकारामध्ये नृत्याचा अंतर्भाव अधिक प्रमाणात असतो. भरतमुनींच्या नाट्यशास्त्र मध्ये सट्टक या प्रकारचा उल्लेख येत नाही. परंतु जैन आचार्य हेमचन्द्र यांच्या काव्यानुशासन मध्ये सट्टक संबधी माहिती येते. सट्टक या प्रकारामध्ये नाटिके प्रमाणे संस्कृत आणि प्राकृत अशा दोन भाषांचा वापर न करता मुख्यतः एकाच भाषेचा वापर असतो. साहित्यदर्पणानुसार सट्टक पूर्णतः प्राकृत भाषेत असते. नाटकामध्ये ज्याप्रमाणे अंक असतात त्याप्रमाणे सट्टक या प्रकारातही अंक असतात, त्यांना यवनिकांतर अशी संज्ञा योजली आहे. शिवाय या नाट्यकृतीमध्ये अंक किंवा यवनिकांतर यांची संख्या निश्चित नसते. सट्टक कृतींमध्ये कथानक हे नायिकेभोवती फिरणारे असल्याने, नायिकेच्या नावावर त्या सट्टकांची नावे ही आधारित असतात. जादू, चमत्कार यांनी भारलेले अद्भुतरसयुक्त असे याचे स्वरूप असते. राजशेखराचे कर्पूरमंजरी हे प्राकृत मधील एक सुप्रसिद्ध सट्टक म्हणता येईल. याशिवाय नयचन्द्र यांचे रंभामंजरी, रुद्रसेन यांचे चन्द्रलेहा (चन्द्रलेखा), मार्कण्डेय यांचे विलासवती, विश्वेश्वर यांचे श्रृङ्गारमंजरी (सिंगारमंजरी) आणि घनश्याम यांचे आनंदसुन्दरी या नाट्यकृती सट्टक प्रकारात येतात. परंतु यापैकी मार्कण्डेय यांचे विलासवती हे सट्टक वगळता इतर सर्व उपलब्ध आहेत.