हल्ली म्हणींचा वापर पुष्कळसा कमी झाला आहे पण भाषेतील मार्मिकता किंवा रूपकात्मक अभिव्यक्ती ही आपल्याला एका वाक्याच्या माध्यमातून म्हणींच्या रूपात व्यक्त होताना दिसते. परंपरा आणि संस्कृतीचे गंध बेमालूमपणे कळत-नकळत आपल्या सोबत प्रवाहित होत असतात. त्याचे काही दुवे या म्हणींमध्ये आपल्याला दिसतील. गोष्ट अत्यंत साधी आहे – ताकापुरते रामायण. जितके ताक किंवा पदार्थ किंवा देय तितकाच मोबदला. अर्थात रामायण हे वाल्मिकी यांनी रचलेले आद्य महाकाव्य आपल्या सर्वांना माहितीच आहे. या महाकाव्यात बालकाण्ड, अयोध्या, अरण्य, किष्किंधा, सुन्दर, युद्ध आणि उत्तरकाण्ड असे एकूण सात काण्ड आहेत. हे काही सर्गांचे बनले आहेत आणि त्या सर्गांमध्ये काही श्लोक आहेत. जसे बालकाण्ड मध्ये ७७ सर्ग आणि त्या सर्गांमध्ये २२८० इतके श्लोक आहेत. अयोध्याकाण्ड मध्ये ११६ सर्ग आणि ४२८६ श्लोक आहेत. अरण्यकाण्ड मध्ये ७५ सर्ग आणि २४४० श्लोक आहेत. किष्किंधाकाण्ड मध्ये ६७ सर्ग आणि २४५५ श्लोक आहेत. सुन्दरकाण्ड मध्ये ६८ सर्ग आणि २८५५ श्लोक आहेत. युद्धकाण्ड मध्ये १२८ सर्ग आणि ५६९२ श्लोक आहेत. उत्तरकाण्ड मध्ये १११ सर्ग आणि ३४३२ श्लोक आहेत. एव्हाना रामायणाच्या विस्ताराची साक्ष आपल्याला आलीच असेल. या प्रत्येक काण्डामध्ये एक कथाभाग, एक आशय जोडला आहे, त्याचे महत्त्वही अनन्यसाधणार आहे. पण म्हणी तयार होताना त्यांना लोककथांची आणि लोकपरंपरेची किनार लाभलेली असते. या म्हणींना अस्तित्व देताना त्यांच्या स्वतंत्र, गंमतीशीर अश्या कथा बनवल्या जातात. लहानपणी मी, ताकापुरते रामायण या म्हणीची ऐकलेली अशीच एक गोष्ट, एक गरजू स्त्री आपल्या शेजारीणीला एक वाटी ताक मागायला जाते. शेजारीण बाई त्या एक वाटी ताकाचा मोबदला म्हणून रामायणाची कथा ऐकण्याची इच्छा व्यक्त करतात. ताक मागायला आलेली स्त्री त्यावर होकार देते. एक वाटी ताक घेऊन ही स्त्री रामायण कथा सांगायला सुरुवात करते ‘वडिलांच्या आज्ञेने राम वनवासात जातो. तिथे रावण, रामाची पत्नी सीता हिचे हरण करतो. हनुमान आणि इतर वानरांच्या मदतीने राम रावणाचा वध करतो आणि सीतेला परत प्राप्त करतो’. यावर शेजारीण बाईंचे मन काही भरत नाही. पण जितके ताक तितकाच मोबदला अशी मार्मिक शिकवण ती स्त्री देऊन जाते.
असो पण सांगण्याचा भाग यातला असा की दैनंदिन जीवनात अनौपचारिकपणे या म्हणींचा वापर समाजात केला जात असे. त्यात संस्कृतीशी निगडीत अनेक म्हणी आपल्याला बघायला मिळतात. आणि त्या म्हणींचा अर्थ समजून घेतला तर त्या वाक्यातील मार्मिकता आपल्याला समजते.