Tag: #siva_nataraja

  • मकर तोरणावरील नृत्यरत शिव

    मकर तोरणावरील नृत्यरत शिव

    मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंडपातून गर्भगृहात जाताना मध्ये अंतराळाची रचना केलेली असते. या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या वर ‘मकरतोरण’ हा मंदिर स्थापत्यातील एक घटक आपल्याला बघायला मिळतो. प्रवेशाच्या दोन कमानी या तोरणाला तोलून धरतात. दोन मकरमुखातून नानाविध लता-वेलींनी हे तोरण बनते त्यामुळे त्याला मकर तोरण असे म्हणतात. या तोरणाच्या मध्यभागी विविध देवतांचे शिल्पांकन केलेले असते, त्यापैकी मकर तोरणावरील नृत्यरत शिव अवलोकन आज करायचे आहे.

    प्रतिमा क्र. 1 – उमरगा

    चालुक्य शैलीतील मकर तोरण (प्रतिमा क्र. 1) – उमरगा येथील शिवमंदिर हे त्रिदल म्हणजे तीन गर्भगृहयुक्त आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यप्रवेशद्वार आणि तीनही गर्भगृहांची प्रवेशद्वार यांवर तीन अशी एकूण चार मकर तोरणे आहेत. यांपैकी एका मकर तोरणावर चतुर्भुज शिव नृत्यमग्न असल्याचे शिल्पित केले आहे. सर्व हस्त मुद्रा या नृत्यमुद्रा आहेत. दक्षिणाधक्रमाने अलपल्लव, लताहस्त, हंसपक्ष आणि एका हाताची करीहस्त मुद्रा करून आशीर्वचनाप्रमाणे एका उद्दकी वाजविणाऱ्या गणाच्या मस्तकावर हात ठेवला आहे. त्रिभंग अवस्थेतील शिव ऊर्ध्वजानु पदन्यास करीत आहे. शिवाच्या पायाशी वृषभ बसलेला आहे. शिवाच्या उजव्या बाजूला वेणुवादक आहे. वेणुवादकाच्या मागे किन्नर युगुल शिल्पांकित केले आहेत. शिवाच्या डाव्या बाजूला एक मृदुंग वादक असून त्याच्याही बाजूला किन्नर युगुल शिल्पित केले आहेत. या तोरणावर काही आकाशगमी गन्धर्व पुष्पमाला घेऊन येताना दाखवले आहेत.

    प्रतिमा क्र. 2 – दिल्ली राष्ट्रीय संग्रहालय

    काकतीय शैलीतील मकर तोरण (प्रतिमा क्र. 2) – सध्या हे मकरतोरण दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे. या मकर तोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यभागी नृत्यरत शिव आहेच पण सोबतच ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूही शिवासोबत नृत्य करीत आहेत. दोन मकरांच्या मुखातून निघालेल्या लता दाखवल्या आहेत. दशभुज शिवाच्या उजव्या हातांमध्ये अक्षमाला, डमरू, खट्वांग, बाण आणि खड्ग आहे तर डाव्या हातांमध्ये खेटक, धनुष्य, त्रिशूल, सर्प आणि बिजपुरक ही आयुधे आहेत. शिवाच्या पायाशी वृषभ बसलेला आहे.  उजव्या बाजूला असलेले ब्रह्मदेव त्रिमुखी चतुर्भुज शिल्प्त केलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये अक्षमाला, स्रुक, पाश आणि कमंडलू आहे. ब्रह्मदेवाच्या पायाशी त्यांचे वाहन हंस दाखवलेला आहे. भगवान विष्णू चतुर्भुज असून त्यांच्या हातांमध्ये गदा, पद्म, शंख आणि चक्र आहे. विष्णूच्या पायाशी हात जोडून बसलेला गरुड शिल्पित केला आहे. त्रिदेव हे सर्वाभरणभूषितम् म्हणजे सर्व अलंकारांनी युक्त असे आहेत. दोन्ही बाजूला असलेले वादकांनी त्यांच्या तालवाद्यांनी ठेका धरलेला आहे. 

    या मकर तोरणाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तोरणावर दोन्ही बाजूंना अष्टदिक्पाल त्यांच्या वाहनावर आरूढ होऊन हा या नर्तन सोहळ्यास उपस्थित झाले आहेत. यामध्ये उजवीकडे इंद्र, अग्नी, यम आणि निरुत्ती तर डावीकडे वरूण, पवन, कुबेर आणि ईशान हे शिल्पित केले आहेत. 

    याशिवाय भारतभर अनेक मंदिरामध्ये अशी विलक्षण सुंदर आणि लक्षवेधी कोरीव मकरतोरणे आपल्याला बघायला मिळतात.

    छायाचित्र –  © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- प्रतिमा क्र. 1 – उमरगा येथील शिवमंदिर, प्रतिमा क्र. 2 – दिल्ली राष्ट्रीय संग्रहालय

    (पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष षष्ठी शके १९४४.)

  • तत् कटीसमम्

    तत् कटीसमम्

    स्वस्तिकापसृतः पादः करौ नाभिकटिस्थितौ|
    पार्श्वनुद्वाहितं चैव करणं तत्कटीसमम् ||

    स्वस्तिक करणाचे संपादन केल्यानंतर पायांना विलग केले जावे. एक हात नाभि जवळ तर दुसरा कटिवर स्थित असेल तसेच पार्श्व भाग उद्वाहित मुद्रेत असल्यास त्याला कटीसम करण म्हणतात.

    वेरूळ येथील लेणीसमूहांपैकी, रामेश्वर लेणीमध्ये दक्षिणेकडील दालनात, भिंतीवर पश्चिमाभिमुख अशी कटीसमम् नृत्यमग्न नटराज प्रतिमा आढळते. अत्यंत देखणी अशी ही प्रतिमा आहे. सात्विक सौम्य चर्या असलेला त्रिनेत्रधारी शिव नर्तनात तल्लीन झाला आहे, असा भाव आहे. षड्भुज नटराजाचा उजवा हात नाभिजवळ आहे परंतु भग्न पावल्याने हस्त मुद्रा दिसत नाही. दुसरा उजवा हात ही भग्न आहे, परंतु हात लताहस्तामध्ये दिसतो. या हातावरून तलम वस्त्राचे उत्तरीय रुळताना शिल्पित केले आहे. उजव्या मागच्या हातामध्ये डमरू आहे. डाव्या हातांपैकी पुढचा डावा हात हा गुडघ्यावर ठेवला आहे. पदन्यासाचा विचार केला तर उजवा पाय गुडघ्यातून किंचित वाकवला आहे, तर डावा पाय किंचित उचलेला आहे. या शिल्पामध्ये नृत्यरत शिवाचे मस्तक हे जटांच्या वेष्टनाने सुशोभीत केले आहे. हा जटामुकुट रत्नपट्टाने बांधला आहे, तर काही जटा शिवाच्या खांद्यावर रुळताना दिसत आहेत. गळ्यात सुंदर असे ग्रेवैयक आहे, डाव्या खांद्यावर रुळणारे यज्ञोपवीत आहे. उदरबंद आहे, कमरेला सुंदर असा मेखला आहे, कटीवस्त्र म्हणून व्याघ्रचर्म आहे. हातामध्ये कंकण, आणि दंडामध्ये केयूर आहे. पायापर्येंत रुळणारी माळा आहे. 

    शिवाच्या या दिव्य नर्तनाचा सोहळा पाहण्यासाठी अनेक देवी-देवता, गण- गन्धर्व, दिक्पाल जमलेले आहेत. शिवाच्या उजव्या बाजूला खाली मृदुंगासारखे तालवाद्य आणि बासरी सारखी सुशीर वाजवणारा वाद्यवृंद आहे. त्यांच्या वर गणेश आहे. नृत्यरत शिवाच्या डाव्या पायांत अस्थीपंजर भृंगी दिसतो आहे. नटराजाच्या डाव्या पायाशी तंतुवाद्य वाजवणारी एक स्त्री बसलेली आहे. तिच्या मागे पार्वती स्कंदाला तिच्या कडेवर घेऊन उभी आहे. त्यांच्या मागे शैव द्वारपाल उभा आहे. आकाशामध्ये हंसारूढ ब्रह्मदेव, गरुडारूढ विष्णू, इंद्र आणि यम या नर्तन सोहळ्यास उपस्थित झाले आहेत. 

    या संपूर्ण शिल्पपटाकडे पाहताना हळूहळू या तालवाद्य, तंतुवाद्य आणि सुशीरवाद्यातून नाद उमटू लागतात आणि नृत्यमग्न नटराजाच्या या कटीसमम् नृत्यात आपणही काही क्षण तल्लीन होतो.

    छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- वेरूळ

    (पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल नवमी शके १९४४.)

  • अष्टादशभुज नटराज

    अष्टादशभुज नटराज

    वातापी चालुक्य यांच्या काळात निर्माण झालेल्या बदामी येथील लेणी समूहातील लेणी क्र. 1 च्या प्रवेशद्वारावरच ही पूर्वाभिमुख अशी भव्य नटराज प्रतिमा आहे. ही लेणी भगवान शिवाला समर्पित आहे. शिवाचे विविध विग्रह इथे बघायला मिळतात. परंतु प्रवेश करतानाच ही नटराजाची चतुर ताण्डव मूर्ती लक्ष वेधून घेते.

    जवळपास 5 फुट उंचीची ही प्रतिमा नृत्यमग्न शिवाचे दर्शन घडवते. ही अठरा हातांची नटराजाची प्रतिमा एका स्वतंत्र पद्म पीठावर नृत्य करताना शिल्पित केली आहे. नटराजाच्या मागे नंदी उभा आहे. डाव्या पायाशी द्विभुज गणेशही शिवाप्रमाणे नर्तन करतो आहे. गणेशाच्या डावीकडे मृदुंग वादक आहे, जो बसून मृदुंग वादन करीत आहे. या शिल्पामध्ये पद्मपीठावर शिवाचा पदन्यास मण्डल स्थानातून सुरु होतो. डावा पाय किंचित उचललेला आहे. शरीराचा भार हा डाव्या बाजूला झुकलेला आहे. याला चतुर करण असे म्हणतात. नटराजाच्या अष्टादश हातांपैकी आठ हातांमध्ये डमरू, दोन हातांमध्ये पकडलेला सर्प, त्रिशूल अशी आयुधे आहेत. तर उर्वरित हात हे करीहस्त, अभयहस्त, हंसपक्ष, अञ्चित, चतुर मुद्रा यांसारख्या विविध नऊ नृत्यमुद्रा दर्शवितात. नटराजाच्या डोक्यावर सुंदर असा जटामुकुट असून तो रत्नपट्टाने बांधलेला आहे. डोक्यामागे लंबगोलाकार प्रभावलय आहे. एका कानात वृत्तकुंडल आहे तर दुसऱ्या कानांत सर्प कुंडल आहे. गळ्यात ग्रेवेयक आहे. उदरबंध आणि खांद्यावर सुंदर असे यज्ञोपवीत रुळत आहे. दंडात केयूर आणि हातांमध्ये कंकण आहे. कटीला वस्त्र आणि त्यावर मेखला आहे. द्विभुज गणेश तुंदिलतनु असून त्याच्या मस्तकामागे ही प्रभावलय दाखविले आहे.

    छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- बदामी,कर्नाटक.

    (पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल अष्टमी शके १९४४.)

  • महानट शिव

    महानट शिव

    आंगिकम् भुवनम यस्य
    वाचिकं सर्व वाङ्ग्मयम्
    आहार्यं चन्द्र ताराधि
    तं नुमः (वन्दे) सात्विकं शिवम् ||

    अर्थात हे संपूर्ण विश्व म्हणजे ज्याचा आंगिक अभिनय आहे, या समस्त विश्वातील वाङ्मय हेच ज्याचा वाचिक अभिनय आहे, हे चंद्र, ग्रह-गोल, तारा आदि ज्याचे आहार्य म्हणजे अलंकार आहेत, त्या सात्विक शिवाला माझे नमन. 

    अश्या या आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विकं अभिनयाचा उद्गाता म्हणजेच ‘महानट शिव’ याच्या नटराज स्वरूपातील प्रतिमांचा मागोवा घेतला, तर प्राचीनतम प्रतिमा ही मध्यप्रदेशातील नचना इथे सापडली आहे, असे दिसते. भारतीय शिल्पकलेतील, शिवाच्या नटराज स्वरूपातील प्राचीनतम अभिव्यक्ती म्हणून ही प्रतिमा अत्यंत महत्त्वाची आहे. नटेश्वराच्या ताण्डव नर्तनाचा शिल्पातील पहिला उपलब्ध पुरावा म्हणजे ही प्रतिमा असल्याचे मत प्रो. डॉ. वासुदेव शरण अगरवाल आणि डॉ.सि.शिवराममूर्ती यांनी मांडलेले आहे. डॉ.वासुदेव शरण अगरवाल या प्रतिमेला ‘महानट शिव’ असे म्हणतात.  

    दिल्ली राष्ट्रीय संग्रहालात नटराजाची ही विलक्षण प्रतिमा माझ्या पाहण्यात प्रथम आली, तेव्हा या प्रतिमेची तशी फार माहिती नव्हती. एक शिल्प म्हणून ओझरती नजर गेली असेल, परंतु नटराज विषयावर समग्र अभ्यास सुरु केल्यावर या प्रतिमेचे महत्त्व अधिक लक्षात आले. मध्यप्रदेशातील नचना- कुठारा इथे सापडलेली प्रतिमा ही श्रीमती पुपुल जयकर यांच्या कडे होती. कालांतरानी त्यांनी ही आणि अश्या काही प्रतिमा संग्रहालयाला भेट स्वरुपात दिल्या, त्यापैकी ही एक प्रतिमा. इ.स 5 शतकातील ही प्रतिमा असून गुप्त- वाकाटक शैलीचा प्रभाव यावर दिसतो आहे. 

    नटराज प्रतिमेची उंची सुमारे 13 इंच आणि रुंदी सुमारे 18 ½  इंच इतकी, आकाराने भव्य अशी ही प्रतिमा असली तरी दुर्दैवाने आज भग्नावस्थेत आहे. मागच्या दोन हातापैकी डाव्या हाताची अलपल्लव मुद्रा आणि पुढचा उजवा हात करीहस्त मुद्रेत आहे. डोक्यावरील जटाभार हा सुंदर अश्या रत्नपट्टामध्ये बांधलेल्या आहे. नृत्याच्या लयीमध्ये हलणाऱ्या काही जटा या शिवाच्या दोन्ही खांद्यांवर रुळत आहेत. कानामध्ये वृत्तकुंडल आहेत, हातांमध्ये कंकण आहेत. तर दंडामध्ये त्रिवलयांकृत केयूर आहे. चर्येवर सौम्य भाव आहे. 

    छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- राष्ट्रीय संग्रहालय – नवी दिल्ली
    (पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल षष्ठी शके १९४४.)

  • उर्ध्वजानु प्रकीर्तितम्

    उर्ध्वजानु प्रकीर्तितम्

    सौंदर्यपूर्ण शिल्पांनी वेढलेले वेरूळ येथील कैलासनाथ म्हणजे पृथ्वीवरील साक्षात कैलास. राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत घडवलेले हे शिवालय डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. नृत्यरत शिवाचे विविध पैलू दाखवणारी अनेक शिल्पे इथे आहेत. त्यातील एक म्हणजे कैलास मंदिराच्या नंदिमंडपाच्या तळमजल्यावर उत्तर दिशेला असलेले नटेश्वराचे हे शिल्प. शिल्प भग्न पावलेले असले तरी या नर्तनातील लय शिल्पामधून प्रतीत होते. आपला उजवा पाय अगदी वक्षस्थळापर्यंत वर उंचावून डाव्या पायावर शरीराचा भार सहज तोलून धरलेला आहे. भरतमुनी नाट्यशास्त्रामध्ये उर्ध्वजानु करणाचे लक्षण पुढील श्लोकातून सांगतात –

    कुञ्चितं पादमुत्क्षिप्य जानुस्तनसमं न्यसेत् |
    प्रयोगवशगौ हस्तावूर्ध्वजानु प्रकीर्तितम् ||
    कुञ्चितं पाद इतका वर उचलावा की जानु वक्षस्थळापर्यत यावा, त्यायोगे हातही उचललेले असावेत. 

    प्रस्तुत शिल्पामध्ये मण्डल स्थानाने डावा गुडघा वाकवलेला आहे. शिवाची मान या उचललेल्या गुडघ्याच्या दिशेने झुकल्याने शरीरामध्ये स्वाभाविकच भंग निर्माण झाला आहे. ही त्रिभंग अवस्था अधिक लयदार व्हावी यासाठी त्या पद्धतीचा हस्त विन्यास या शिल्पामध्ये शिल्पकारांनी साधला आहे. दशभुज नटराजाच्या पुढच्या दोन हातांपैकी उजवा हात सिंहकर्ण मुद्रेत असून डावा हात करीहस्त मुद्रेत गुडघ्यावर ठेवला आहे. उर्वरित हातांतील आयुधांचा विचार केला तर  हातामध्ये त्रिशूल, अग्नीपात्र आणि डमरू आहे. तर मागचा डावा हात डोलाहस्त असून, त्याच्या खालच्या हातामध्ये सर्प असावा. इतर हात आणि काही आयुधे भग्न झाल्याने त्यांचा वेध घेणे कठीण आहे. शिवाच्या डोक्यावर जटामुकुट असून नृत्याच्या लयीमध्ये हलणारे त्याचे कर्णकुंडलही या शिल्पांत दिसते. दंडामध्ये त्रिवलय सर्पाकृती केयूर आहे, तर हातामध्ये कंकण आहेत. या शिल्पपटामध्ये नटेशाच्या उजव्या पायाशी तालवाद्य घेतलेला एक गण आहे. डाव्या पायाशी पार्वती या दिव्य नृत्याचे अवलोकन करीत बसलेली शिल्पित केली आहे. तिच्या बसण्याची ढब बघितली तर ती राजलीलासनात बसलेली आहे. उजवा पाय गुडघ्यातून वाकवून पाय समतल पातळीवर ठेवलेला असतो. तर दुसरा डावा पाय हा मांडी घातल्याप्रमाणे मुडपलेला असतो. पार्वतीचा हात हे दिव्य नृत्य पाहून विस्मय भावाने तिच्या चेहऱ्याजवळ आला आहे. या शिल्पपटाच्या वरच्या बाजूला आकाशगामी गंधर्व, गण हे या नृत्याला वाद्यांच्या सहाय्याचे ठेका देऊन साथ करीत आहेत. संपूर्ण शिल्प हे एका कोरीव देवकोष्टामध्ये शिल्पित केले आहे. या देवकोष्टाच्या दोन्ही बाजूंना आकाशगामी गन्धर्व युगुल नटेश्वराच्या या दिव्य नर्तनाचा सोहळा अनुभवत आहेत. या नृत्यामधील आवेग हा या उर्ध्वजानु करण आणि सम्मेलीत ताल वाद्यांच्या साथीमुळे अधोरेखित होत आहे.

    छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- वेरूळ
    (पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल पंचमी शके १९४४.)