भारतीयांसाठी वेद म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहे. वेदांची पवित्रता ही सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे. म्हणूनच बृह्दारण्यक उपनिषदामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद म्हणजे परमात्म्याचे निश्वास म्हटले आहेत.
अस्य महतो मूतस्य निःश्वसितमेतद् यद् ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथर्वांगिरसः |
– बृह्दारण्यक
वेद, भारतीय परंपरेतील संस्कृत रचनांचे अतुलनीय कोष आहेत, दार्शनिक संवाद, मिथक आणि अनुष्ठान मंत्र ह्यांचे भांडार आहे. जगातील सर्वात प्राचीन वाङ्मयाचे नमुने म्हणून ज्याच्याकडे पहिले जाते त्या वेदांची परंपरा ही जवळजवळ साडे तीन हजार वर्ष जुनी परंपरा आहे.
हे वेद लिखित स्वरूपात नसल्याने ते विविध प्रकाराने पठण करून मौखिक परंपरेने कुठलाही बदल न होता आपल्यापर्येंत येऊन पोहचले आहेत. हिंदूंसाठी ज्ञानाचा हा प्राथमिक स्त्रोत मानला जातो.
हे वेद पद्य-गद्य ऋचांचे संकलित संग्रह आहेत. गुरूकडून मौखिक स्वरूपात हे ज्ञान श्रवण करून शिष्य आत्मसाद करतो म्हणून त्याला श्रुती म्हटले आहे. ऋग्वेद म्हणजे ऋचांचा समूह, यजुर्वेद म्हणजे यज्ञाशी संबंधीत मंत्र आणि अर्पण सूत्रे, सामवेद म्हणजे ऋग्वेद आणि इतर स्त्रोतांतून आलेल्या ऋचांचे संगीतबद्ध संकलन आणि अथर्ववेद मंत्र आणि तंत्र ह्यांवर आधारित आहे.
ह्या सर्व वेद वाङ्मयाची पठणांची एक विशिष्ट पद्धत अतिशय कौशल्यपूर्ण शैलीवर आधारित आहे. इतकच नाही तर हे वेद आशयाच्या दृष्टीनेही महत्वाचे आहेत. भारतीय परंपरेसाठी वेद आणि त्यांची पठण परंपरा ही पवित्र मानलेली आहेच ह्यावरून त्यांचे समाजातील महत्व लक्षात येते.
ही मौखिक परंपरा एका विशिष्ट पद्धतीने जतन करण्यासाठी 2008 साली ह्या पठण परंपरेला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले आहे.
भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात उत्तर भारत आणि मध्य भारतामध्ये सादर होणाऱ्या रामलीला विषयी जाणून घेऊ.
(क्रमशः)
Photo Credits : UNESCO
Excellent
Thank you @Ram kaka..!! Keep reading BodhSutra.