पूर्व भारतातील एक नृत्य प्रकार म्हणजे छउ. छउ ह्या नृत्यामध्ये महाभारत आणि रामायण किंवा कधीकधी स्थानिक लोकांच्या कथा सादर केल्या जातात.
छउ ह्याचा संस्कृत शब्द होतो, छाया म्हणजे सावली किंवा छावणी. ही नृत्यशैली वडील आपल्या मुलाला शिकवतात आणि हा वारसा पुढे प्रवाहित होतो. नृत्य लढाऊ शैलीचे असल्याने ह्यात उत्साहपूर्ण हालचाली आणि प्रचंड ताकद आवश्यक असते, त्यामुळे मुख्यतः हे नृत्य पुरुषांसाठी आहे. ह्या नृत्य शैलीत वीररस हा प्रधान रस असतो. छाउ नृत्याच्या तीन प्रादेशिक नृत्यशैली आहेत.
सराईकेला छउ
सराईकेला छउ नृत्यशैली प्रामुख्याने बिहार भागात बघयला मिळते. ह्यात मुखवट्यांचा वापर केला जातो. सराईकेला छउच्या प्राथमिक सदरीकरणाला फारी-खांडा-खेला म्हणतात. ज्याचा शाब्दिक अर्थ होतो ढाल-तलवारीचे नाटकं
पुरुलिया छउ
पुरुलिया छउ नृत्यशैली प्रामुख्याने पश्चिम बंगाल भागात बघयला मिळते. ह्यात मुखवट्यांचा वापर केला जातो. पुरूलिया छउची नृत्यप्रस्तुती ही मुख्यतः युद्धाशी संबंधित असते.
मयुरभंज छउ
मयुरभंज छउ नृत्यशैली प्रामुख्याने ओरिसा भागात बघायला मिळते. ह्यात मात्र मुखवट्यांचा वापर दिसत नाही. मयूरभंज छउच्या प्राथमिक सदरीकरणाला रुक-मार-नाचा म्हणतात. ज्याचा शाब्दिक अर्थ होतो सुरक्षा आणि आक्रमणाचे नृत्य
चैत्र पर्वात छउ नृत्याचे सादरीकरण मोठ्या प्रमाणात होते. ह्या नृत्यात लढाऊ तंत्राशी निगडित हालचाली तर असतातच शिवाय प्राण्यापक्ष्यांचे हावभाव आणि त्यांची हालचाल किंवा गृहिणींच्या दैनंदिन कामाशी निगडित हालचाली, जसे कि झाडून घेणे, अंगणात सडा घालणे, रांगोळी काढणे इत्यादी नृत्यातून सादर केल्या जातात.
छउ नृत्य हे रात्रीच्या वेळी मोकळ्या आवारात पारंपरिक पद्धतीने सादर केले जाते. ह्यात मुख्यतः शहनाई, बासरी, ढोल, ढोलकी अश्या वाद्यांचा वापर होतो. छउ हा त्या समुदायाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. सर्व जाती-जमातींचे लोकं एकत्र येऊन ह्या नृत्याचा रसास्वाद घेतात. छउ नृत्य करणारे त्यांचे व्यवसाय आणि दिवसभराची कामे आटपून ह्या कलेची साधना जपत आहेत.
2010 साली छउ नृत्य प्रकाराला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले. त्यामुळे छउ नृत्य शैलीची जगाला माहिती तर झालीच शिवाय हा वारसा जपला ही इथून पुढे जाईल.
भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात लडाख येथील बौद्ध पठण परंपरेची माहिती घेऊया.
(क्रमशः)
Photo Credits : Internet
2 thoughts on “छउ नृत्य”